आहारात वापरा ताक

आहारात वापरा ताक
आहारात वापरा ताक

ताक हे मधुर, आंबट, किंचित तुरट रसाचे, उष्ण गुणाचे व मधुर परिणाम करणारे आहे. ताकाचे ‘वैशिष्ट्य’ म्हणजे ते वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांचे शमन करते. त्यामुळे ताजे ताक कोणत्याही विकारात व कोणत्याही ऋतूत चालते. ताक हे दूध व दह्यापेक्षा पचण्यास हलके असते. ताकात दुधाचे सर्वच गुण असल्यामुळे ताकामुळे दुधाचे सर्वच फायदे मिळून भूक लागणे, अन्नपचन होणे हे विशेष फायदे होतात.

उत्तम पचनासाठी ताक

  • दूध व दह्यातील स्निग्ध (फॅट) पदार्थ ताकात अल्पांशाने असतात, हा ताकाचा विशेष गुण घुसळण्याच्या (मंथन) अग्निप्रक्रियेने आला आहे.
  • ताकामुळे भूक लागते, त्यामुळे भूक लागत नसल्यास (अग्निमांद्य) ताकात थोडी हिंगाची पूड व मीठ घालून किंवा हिंगाष्टक चूर्ण मिसळून जेवणापूर्वी दररोज ताक प्यावे म्हणजे हळूहळू भूक सुधारते.
  • ताकाचा मुख्य गुणधर्म म्हणजे ताकामुळे अन्नपचन चांगल्या रीतीने होते. शरीरातील एकूण पचनसंस्थेवरच ताकाचा उत्तम परिणाम होतो. म्हणून दररोज जेवणानंतर ताक प्यावे. दररोज जेवणानंतर थोडी मिरपूड, काळे मीठ वा साधे मीठ मिसळलेले ताक प्यावे. विशेषत: गोड पदार्थाच्या वा मांसाहाराच्या जड जेवणानंतर तर असे ताक अत्यंत उपयुक्त ठरते.
  • अन्नपचनाची तक्रार (अजीर्ण), पोटात गुबार धरणे (गॅसेस), आंबट, करपट ढेकर येणे, जेवणानंतर पोट जड होणे अशा तक्रारी असतील त्यांनी जेवणामध्ये व जेवणानंतरही हिंगाची पूड, काळेमीठ किंवा हिंगाष्टक चूर्ण घातलेले गोडसर ताजे ताक थोडेथोडे प्यावे. म्हणजे निश्चितपणे फायदा होतो.
  • ताकाचे प्रकार आयुर्वेदाने ताकाचे चार मुख्य प्रकार मानले आहेत. १) तक्र : दही घुसळून वर आलेले लोणी काढून घेऊन नंतर त्यात ताक फार घट्ट किंवा पातळ होणार नाही इतपत पाणी घालून केलेले ताक. २) घोल : विरजलेल्या दह्यात पाणी न घालता लोण्यासकट (मलई) घुसळलेले ताक. ३) मथित : विरजलेल्या दहय़ात पाणी न घालता दही घुसळून वर आलेले लोणी (मलई) काढून घेऊन तयार केलेले ताक. ४) उदश्वित् : विरजलेले दही घुसळून वर आलेले लोणी काढून घेऊन दहय़ाच्या निमपट म्हणजे अर्धे पाणी घालून बनवलेले ताक. याशिवाय व्यवहारात ताकाचे विविध पेय लोकप्रिय आहेत.

    ताकाचे गुणधर्म वैद्यकशास्त्रानुसार ताकामध्ये निसर्गत:च अन्नपचनास मदत करणारे व आतड्यांचे संरक्षण करणारे लॅक्टोबॅसिलस – लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस अॅणसिडोफायलस, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफायलस, स्ट्रेप्टोकोकस लॅक्टिस इत्यादी सूक्ष्मजंतू असतात. आतड्यांतील हे जिवाणू नुसते अन्नपचनासच मदत करीत नाहीत, तर ते आतड्यांतील अनेक विषाणूंचा नाश करून शरीराची प्रतिकारशक्तीही वाढवितात. यामुळे आयुर्वेदामध्ये ताकाला अनन्यसाधारण महत्त्व अाहे.   संपर्क ः कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३ विषय विशेषज्ञ गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, अकोला

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com