agriculture story in marathi, importance of colastrum in calf diet | Agrowon

वासरांच्या आहारातील चिकाचे महत्त्व
डॉ. अतुल वाळूंज, डॉ. अमोल आडभाई
बुधवार, 12 डिसेंबर 2018

हिवाळ्यामध्ये गायी- म्हशी विण्याचे प्रमाण जास्त असते. या काळातील थंड वातावरणामुळे वासरांचे योग्य व्यवस्थापन ठेवणे तसे जिकिरीचे असते. वासराच्या उत्तम, निरोगी आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहार म्हणजे गायीचा प्रथम चीक आहे. अँटीबॉडीज व रोगप्रतिकारक पेशी मुबलक प्रमाणात असल्यामुळे वासराचे संगोपन करताना चीक व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावते.

हिवाळ्यामध्ये गायी- म्हशी विण्याचे प्रमाण जास्त असते. या काळातील थंड वातावरणामुळे वासरांचे योग्य व्यवस्थापन ठेवणे तसे जिकिरीचे असते. वासराच्या उत्तम, निरोगी आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहार म्हणजे गायीचा प्रथम चीक आहे. अँटीबॉडीज व रोगप्रतिकारक पेशी मुबलक प्रमाणात असल्यामुळे वासराचे संगोपन करताना चीक व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावते.

वासरांच्या योग्य संगोपनामुळे भविष्यात उत्तम दुग्धजन्य गायी तयार होतात. हा पौष्टिक आहार पहिल्या २४ तासांत व पहिल्या महिन्यामध्ये वासरांची रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. गर्भधारणेदरम्यान वासराला अँटीबॉडीज पुरवठा कमी प्रमाणात होतो त्यामुळे वासरांमध्ये जन्मजात रोगप्रतिकारकक्षमता कमी असते. नैसर्गिकरित्या ही कमतरता भरून काढण्यासाठी वासराला गायीचा चीक पुरवावा लागतो. ज्यात अँटीबॉडीज व रोगप्रतिकारक पेशी मुबलक प्रमाणात असतात, त्यामुले नवजात वासराचे आजारांपासून संरक्षण होते. जन्मानंतर वासरांच्या आतड्यांत एकविशिष्ट गुणधर्म असतो ज्यामुळे इम्युनोग्लोबुलिन(IgG) आतड्यांमार्फत थेटपणे रक्तप्रवाहात शोषून घेतो. एकदा वासराच्या आतड्यांनी IgG१ शोषले की, त्यातील काही पुन्हा आतडे आणि फुप्फुसांमध्ये सोडले जाते. त्यामुळे वासरांमध्ये पहिल्या आठवड्यात, जुलाब आणि निमोनिया यांसारखे आजार रोखण्यासाठी प्रतिकारक्षमता पुरवली जाते.

संशोधनातून असे दिसून आले आहे की, वासराच्या जन्मानंतर काही तासातच वासराच्या आहार व्यवस्थापनात चिकाचा समावेश केल्यामुळे जनावराची भविष्यातील दुग्ध उत्पादन क्षमता चांगली राहते.

 • प्रजनन परिपक्वता वाढीसाठी आणि वजन लवकर वाढविण्यासाठी मदत करते.
 • संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी अँटिबॉडीज आवश्यक असतात. चीक नवजात वासराला प्रतिकारशक्ती मिळविण्याचे एकमेव माध्यम आहे. परंतु जन्मानंतर उशिरा चीक दिल्यामुळे वासराची अँटीबॉडीज शोषूण घेण्याची क्षमता कमी होत जाते. संशोधकीय अभ्यासात असे दिसून आले आहे की अँटीबॉडीज शोषणाची क्षमता ६ तासांनी ५० टक्क्यांपर्यंत कमी होते आणि जन्माच्या २४ तासांनी पूर्णपणे थांबते. त्यामुळे जन्मानंतर शक्य तितक्या लवकर चीक देणे हिताचे ठरते.
 • वासराच्या जन्मानंतर एका तासाच्या आत जर गायीला त्वरित दूध येत नसल्यास, चांगल्या प्रतीचा पर्यायी चीक आहार वासराला वेळेवर प्रथम आहार म्हणून द्यावा.

साठवणूक व स्वच्छता

 • संकलन, साठवण आणि चीक पाजण्याच्या दरम्यान चीक दूषित होण्याची शक्यता असते त्यामुळे योग्य स्वच्छता बाळगणे आवश्यक असते.
 • दूषित चीक पिल्यामुले आजाराचा धोका वाढतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की, दूषित चिकातील जिवाणूंमुळे वासराची अँटीबॉडीज शोषण करण्याची क्षमता कमी होऊ शकते.
 • गाभण काळातील शेवटच्या ६० दिवसांत गायीचे दूध काढले जात नाही. त्यामुळे गायीच्या कासेच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात जिवाणू असतात. गाय जेव्हा विते, त्यानंतर गाटीची कास स्वच्छ धुवावी. ही चीक व्यवस्थापनाची पहिली पायरी आहे. त्यामुळे चिकामधील जिवाणूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
 • चीक साठविण्यासाठी स्वच्छ, कोरड्या भांड्याचा वापर करावा. अस्वच्छतेमुळे चिकामधील जिवाणू अँटीबॉडीज शोषनासाठी वासराच्या शरीरात अडथळा आणतात.

चीक प्यायला देण्याचे प्रमाण

 • चीक देण्याचे प्रमाण हे चिकाची गुणवत्ता, वासराचे वजन, वेळ आणि पाजण्याची पद्धत यावर अवलंबून असते.
 • नियमानुसार, चीक वासराच्या शरीराच्या वजनाच्या १० टक्के दिवसांतून विभागून द्यावा. त्यामुळे वासराची रोगप्रतिकारक्षमता वाढते आणि मरतूक कमी होते.
 • संशोधनानुसार वासराला पहिल्या काही तासांमध्ये कमीतकमी ४ लिटर चांगल्या प्रतीचा चीक दिला गेला पाहिजे.
 • चिकामध्ये अ जीवनसत्त्वाचे प्रमाण सामान्य दुधापेक्षा १० ते १५ पट अधिक असते.
 • प्रथिनांचे प्रमाण सामान्य दुधापेक्षा ५ ते ७ पट अधिक.
 • खनिज द्रव्ये, तांबे, लोह, मॅग्नेशियम अणि कॅल्शिअमचे प्रमाण ही अधिक असते जे की वासरांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

संक्रमण काळ

 • गायींमधील चीक स्राव संपल्यानंतर, त्यानंतरच्या पहिल्या आठवड्यात दुधात काही अतिरिक्त पोषक घटक असतात. जे वासरांची वाढ आणि विकासासाठीच्या पोषकतत्त्वांनी समृद्ध असतात. याव्यतिरिक्त ते अतिरिक्त प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठीही मदत करते.
 • जरी वासरे अशावेळी आपल्या रक्तप्रवाहात थेट अॅँटीबॉडी शोषून घेऊ शकत नाही, तरी अशा दुधातील रोगप्रतिकारक घटक स्थानिक रोग प्रतिकारशक्ती आणि अतिसारमुळे होणाऱ्या संक्रमणांपासून संरक्षण करण्यात उपयुक्त ठरते.

चिकामधील पोषक घटक स्‍निग्‍धांश

 • चिकातील स्‍निग्‍धांश (फॅट) पोषक घटक जन्मानंतर वासरासाठी एक अतिआवश्यक ऊर्जेचा स्राेत म्हणून कार्य करतो.
 • वासराला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा जन्म झाल्यानंतर २४ तासांच्या आत प्राप्त होत नाहीत. त्यामुळे जन्मानंतर पहिल्या महिन्यामध्ये वासरांमध्ये मरतूक होण्याचे प्रमाण जास्त असते.
 • चांगल्या गुणवत्तेच्या चिकामधून वासराला स्‍निग्‍धांशाचा पुरवठा होतो.

चीक आहार वासरांना कसा द्यावा?

 • चीक देण्यासाठी सर्वात चांगली पद्धत म्हणजे वासराला स्वच्छ बाटलीतून चीक पाजावा. त्यामुळे वासराला स्वतःच्या वेगाने चीक ओढता येतो. जबरदस्तीने वासराला चीक पाजू नये, त्यामुळे चीक श्वसननलिकेमध्ये जाऊ शकतो आणि निमोनिया किंवा मृत्यूदेखील होऊ शकतो.
 • चीक २४ तासांपेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये साठवून ठेऊ नये. फ्रीजच्या तापमानात बॅक्टेरिया हळूहळू वाढू शकतात. चीक हे ० अंश सेल्सिअस तापमानाला फ्रीझरमध्ये साठवता येतो.

संपर्क ः डॉ. अतुल वाळूंज, ८२९५६३५१९९
(पशू शरीरक्रिया शास्त्र विभाग, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाणा)

 

इतर कृषिपूरक
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
प्रथमोपचाराने बरे होतील जनावरांतील आजारजनावरांमध्ये विविध प्रकारचे विषाणूजन्य व...
वाढत्या तापमानाचा जनावरांवर होणारा...जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या उष्मा तणावासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाच्या...जनावरांना विशेषतः शेळ्या-मेंढ्यांना गर्भाशयाचे...
नियोजन स्वच्छ दूध उत्पादनाचे...दुग्ध व्यवसायात आर्थिक परिस्थिती, शास्त्रोक्त...
अॅझोला, हायड्रोपोनिक्स चाऱ्यातून करा...चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याची...
संवर्धन खिलार गोवंशाचे...जातिवंत खिलार जनावरांची पैदास वाढवण्यासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाचे आजार,...शेळ्या मेंढ्यांना गर्भाशयाचा आजार झालेला आहे हे...
झलक क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...इटली देशात दरवर्षी क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...
जनावरांच्या संतुलित आहार...जनावरांना दिवसभरात किती चारा दिला पाहिजे आणि तो...
जनावरांच्या आहारात कोरडा चारा वापरताना...महाराष्ट्रातील बहुतांशी भागात फेब्रुवारी ते...
कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबी...कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबीची लागवड करता येत...
जनावरांच्या खाद्यामध्ये अचानक बदल करणे...कोवळा चारा, निकृष्ट दर्जाचा चारा किंवा बुरशीची...
जनावरांतील रोगनिदानासाठी प्रयोगशाळा...तात्काळ रोगनिदान व योग्य उपचार केल्यामुळे औषधांचा...
गाई, म्हशींची दुग्धोत्पादन क्षमता वाढवा...सध्याच्या काळात सेक्स सीमेन किंवा सॉर्डेड सीमेन,...
ओळखा लिस्टेरिओसिस आजाराची लक्षणेजनावरापासून माणसास होणारे आजार प्रामुख्याने...
पशुसल्लावाढत्या तापमानात जनावरांच्या आहार...
प्रजननक्षमता सक्षम करण्यासाठी...सुयोग्य व समतोल आहारातून जनावरांना ऊर्जा, प्रथिने...
जनावरांमध्ये प्रसूतीनंतर येणाऱ्या समस्याजनावर गाभण असताना व विताना जर व्यवस्थित लक्ष दिले...