जनावरांतील रोगनिदानासाठी प्रयोगशाळा तपासण्यांची उपयुक्तता

तात्काळ रोगनिदान आणि योग्य उपचार झाल्यामुळे गोठ्यातील सर्व जनावरे निरोगी राहतात.
तात्काळ रोगनिदान आणि योग्य उपचार झाल्यामुळे गोठ्यातील सर्व जनावरे निरोगी राहतात.

तात्काळ रोगनिदान व योग्य उपचार केल्यामुळे औषधांचा होणारा बेसुमार वापर टाळता येतो; तसेच आजाराचा योग्य उपचार लवकर झाल्यामुळे जनावराची उत्पादकता टिकून राहून पशुपालकास दुहेरी फायदा होतो. व्यावसायिक पशुपालनामध्ये तर प्रयोगशाळा तपासण्यांची मदत व्यवस्थापनात घेतल्यास आजारांचा प्रतिबंध करणेही शक्य होते व पशुपालनातून चांगली आर्थिक प्रगती साधता येऊ शकते.   पारंपरिक तसेच शास्त्रोक्त पशुपालनात व्यवस्थापनाचे घटक जरी सारखेच असले तरीही एकसमान व्यवस्थापन केले जात नाही. व्यवस्थापनाप्रमाणे पशुपालनाच्या अर्थकारणावर परिणाम करणारे विविध प्रकारचे आजारसुद्धा नेहमीचेच आहेत. प्रामुख्याने लहान जनावरांमधील जंतांचा प्रादुर्भाव, बह्यपरजीवींचा प्रादुर्भाव, जीवाणूजन्य हगवण व फुफ्फुसदाह हे महत्त्वाचे आजार आहेत. मोठ्या जनावरांमध्ये उत्पादकतेशी निगडित आजार, जिवाणूजन्य कासदाह, गर्भाशयाचा दाह व त्याचबरोबर प्रजीवजन्य संसर्गामुळे होणारे आजार हे प्रामुख्याने महत्त्वाचे आहेत. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पशूंच्या नियमित व्यवस्थापनात तसेच आजारी पडल्यानंतरच्या काळात तात्काळ रोगनिदान व योग्य उपचार हे द्विसूत्री अत्यंत महत्त्वाची आहे. १. जंत प्रादुर्भाव निदानासाठी शेण तपासणी साधारणपणे कळपातील लहान वासरांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात राहतो. त्यामुळे ज्या वासरांमध्ये वाढीचा दर कमी आहे किंवा ज्या वासरांमध्ये हगवणसदृश्य लक्षणे जास्त दिवस आढळतात अशा वासरांच्या शेणाची प्रयोगशाळेत तपासणी करून घेतल्यास हगवण किंवा खुंटलेली वाढ यासाठी जंत कारणीभूत आहेत की नाही याची खात्री होते. जर तपासलेल्या शेण नमुन्यात विविध जंतांची अंडी सापडल्यास जंतांच्या प्रकारानुसार पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार योग्य ते जंतनाशक योग्य मात्रेत देऊन होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. व्यावसायिक पशुपालनामध्ये लहान वासरांचे शेण नमुने वेळोवेळी तपासून त्यानुसार प्रतिबंधात्मक जंतनाशक औषध वापरल्यास कळपामध्ये जंतांचा प्रादुर्भाव टाळून त्यापासून भविष्यात होणारे अपाय टाळता येतात. २. प्रतिजैविके संवेदनशीलता तपासणी कासदाह हा आजार दुभत्या जनावरांमधील आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आजार आहे. दुधाळ जनावरांत दृष्य कासदाह संसर्ग झाल्यास सड व कासेला सूज येणे, कासेचा गरमपणा वाढणे तसेच खराब गाठीमिश्रित, पाण्यासारखे किंवा रक्तमिश्रित दूध येणे व दूध उत्पादन घटणे ही प्रमुख लक्षणे दिसून येतात. बहुतांश कासदाह हे जिवाणूजन्य प्रकारचे आढळून येतात. उपचारपद्धतीत प्रतिजैविकांचा वापर केला जातो. परंतु, या आजाराचा दुभत्या जनावरांमधील भरपूर प्रमाणात आढळून येणारा प्रादुर्भाव व उपचारपद्धतीत प्रतिजैविकांचा बेसुमार वापर यांमुळे आजार व उपचारपद्धती यांपासून पशुपालाकास दुहेरी तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे अशा जनावरांच्या बाधित सडातील दुधाची तात्काळ प्रयोगशाळेत तपासणी केली असता आजारास कारणीभूत जिवाणू कळतो तसेच प्रतिजैविके संवेदनशीलता तपासणी करून उपचारास योग्य असे प्रतिजैविक निवडता येते. अशा प्रकारे निदान व उपचार करून घेतल्यास स्तनदाह आजार लवकर आटोक्यात आणता येतो व त्यातून कमी होणारे दूध उत्पादन व औषधोपचारावरील खर्च यांना आळा घालता येऊ शकतो. त्याचप्रमाणे जिवाणूजन्य फुफ्फुसदाह, हगवण, गर्भाशयाचा दाह इत्यादी आजारांमध्येही प्रतिजैविके संवेदनशीलता तपासणी आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरते. ३. कॅलिफोर्निया मस्टायटीस टेस्ट दुधाळ जनावरांमध्ये प्रामुख्याने दृष्य आणि सुप्त कासदाह हे दोन प्रकारचे दूधउत्पादनाशी निगडित आजार आढळून येतात. दृष्य कासदाह या आजाराचे लक्षणांवरून तात्काळ निदान करता येते. परंतु, सुप्तावस्थेतील कासदाह आजाराचे निदान करणे अवघड असते. कारण सुप्त कासदाह झालेल्या जनावरांत डोळ्यांनी दिसेल याप्रकारचे एकही लक्षण आढळून येत नाही, दूध दिसायला साधारण दिसते तरीही दूध उत्पादन काही प्रमाणत कमी होते. दूध उत्पादन कमी होण्याची बरीचशी कारणे असल्याने सुप्त कासदाह निदान करणे अवघड जाते व त्यामुळे दूध उत्पादन कमी होते; तसेच बाधित जनावरांपासून निरोगी दुभत्या जनावरांस आजाराचा संसर्ग होण्याचा धोका संभवतो. अशावेळी दुधाची कॅलिफोर्निया मस्टायटीस टेस्टद्वारे तपासणी केल्यास सुप्त कासदाहाचे निदान लागून उपचारासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना अमलात आणता येऊ शकतात व आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते. व्यावसायिक पशुपालनामध्ये दुधाळ जनावरांमधील सुप्त कासदाह आजाराची कॅलिफोर्निया मस्टायटीस टेस्टद्वारे नियमित तपासणी करून वेळीच निदान व उपचार पद्धती अवलंबून आर्थिक नुकसान टाळले जाते. त्यामुळे दुभत्या जनावरांमध्ये कॅलिफोर्निया मस्टायटीस टेस्ट नियमित अमलात आणून कासदाह आजार आटोक्यात आणता येऊ शकतो. ४. रक्त नमुने तपासणी रक्तामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारच्या अनुक्रमे पांढऱ्या पेशी, लाल पेशी व रक्त गोठविणाऱ्या रक्तबिंबिका पेशी येतात. आजारी पशूंची रक्त तपासणी केली असता बऱ्याचशा आजारांचा अंदाज लावता येवू शकतो तसेच आजाराची तीव्रता ही जाणून घेता येते. उदाहरण दाखल जिवाणूजन्य आजारांमध्ये पांढऱ्या पेशींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, जंतांचा प्रादुर्भाव असल्यास किंवा गोचीड तापाची लागण झाली असता रक्तातील लाल पेशींची संख्या व हिमोग्लोबीन कमी होते. त्याचप्रमाणे रक्तश्राव होणाऱ्या आजारांमध्ये रक्तबिंबिका पेशी मोठ्या प्रमाणात घटतात. अशाप्रकारे प्राथमिक अनुमान लावून रोगनिदानासाठी पुढील तपासण्या करणे तसेच आजाराची तीव्रता जाणून घेण्यासाठी व उपचारादरम्यान जनावराचा उपचारास मिळणारा प्रतिसाद इत्यादी गोष्टींसाठी आजारी जनावरांमधील रक्त नमुने नियमित तपासणे गरजेचे असते. ५. रक्त काचपट्टी तपासणी जनावरांच्या गोठ्यात व अंगावर विविध बह्यापरजीविंची उत्पती हि खूप मोठ्या प्रमाणत होत असते. जनावरांमध्ये बह्यपरजीविंचा प्रादुर्भाव झाल्यास ते परजीवी अन्नासाठी जनावरांवर अवलंबून असतात आणि त्यामुळे वाढ खुंटणे, प्रजनन व दूध उत्पादकता घटने, रक्तक्षय होणे, नियमित चाव्यांमुळे जनावरांचे खाद्यावरील लक्ष कमी होणे या प्रकारची लक्षणे आढळून येतात. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे गोचीडांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांत अत्यंत महत्त्वाचे गोचीडजन्य तापाच्या प्रजीवजन्य परजीवींचे संक्रमण होते. गोचीड ताप हा दुभत्या जनावरांमधील आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आजार असून, यामध्ये थायलेरीया, बबेसिया व ॲनाप्लास्मा हे प्रजीवजन्य जिवाणू आजारास कारणीभूत ठरतात. या आजाराच्या तीव्रतेमुळे जनावराला रक्तक्षय होऊन दगावू शकते, त्याचप्रमाणे आजाराच्या उपचारासाठी मोठा आर्थिक खर्च करावा लागतो. म्हणून अंगावर गोचीड असलेल्या जनावरांत ताप येण्याची लक्षणे दिसल्यास रक्ताची काचपट्टी तपासणी करून घेणे अनिवार्य आहे. यामध्ये गोचीड तापाच्या प्रकाराचे निदान होऊन योग्य उपचार वेळेत देऊन आर्थिक नुकसान टाळता येते. ६. रक्त गोठवण वेळ तपासणी कावीळ व विषारी सर्पदंश यासारख्या आजाराने ग्रस्त जनावरांमध्ये एकतर रक्त गोठविण्यासाठी लागणाऱ्या विविध घटकांची यकृतातील निर्मिती कमी झालेली असते किंवा सर्पदंशाच्या विषांमुळे रक्तबिंबिका पेशींची संख्या रोडावून शरीरात रक्तस्त्राव होण्यास सुरवात होते व त्याची तीव्रता तपासण्यासाठी रक्त तपासणी आणि त्याचबरोबर जनावरांच्या गोठ्यात करता येण्यासारखी रक्त गोठवण वेळ तपासणी करता येऊ शकते व त्याप्रमाणे उपचारपद्धतींचा अवलंब करता येतो. यामध्ये आजारी जनावरांच्या शिरेतून रक्त केसासारख्या लहान काचेच्या नळ्यांमध्ये किंवा काचेच्या स्वच्छ टेस्ट ट्यूब मध्ये घेऊन रक्त गोठण्यासाठी लागणारा वेळ मोजता येतो. रक्त काढल्यापासून ते गोठण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच रक्त गोठवण वेळ. हा वेळ निरोगी जनावरांत साधारणपणे ७-८ मिनिटे असतो; परंतु कावीळ किंवा विषारी सर्पदंशामध्ये अगदी ३० ते ४५ मिनिटांपर्यंत वाढतो. या चाचणीचा वापर करून पुढील आवश्यक त्या चाचण्या किंवा उपचारपद्धती अवलंबता येते. ७. लघवी तपासणी दुभत्या जनावरांमध्ये विताच्या सुरवातीच्या काळामध्ये दूध उत्पादन वाढलेले असते अशावेळी आहारात पोषणतत्त्वांची कमतरता झाल्यास ही जनावरे उत्पादकतेशी निगडित आजारांना बळी पडतात. यामध्ये दुग्धज्वर, कितनबाधा, स्फुरद कमतरतेमुळे होणारा लाल लघवीचा आजार हे प्रामुख्याने आढळून येतात. या आजारांची लक्षणे व दूध उत्पादकतेविषयी माहिती यावरून साधारण निदान लावता येते; परंतु कितनबाधासारख्या आजाराच्या परिपूर्ण निदानासाठी आजारी जनावरांच्या लघवीची तपासणी करता येते. रोथ्राज चाचणीद्वारे लघवीमध्ये किटोन बॉडीजचे परीक्षण करून आजाराचे निदान करता येते व त्याप्रमणे योग्य उपचारपद्धती अवलंबून आर्थिक नुकसान टाळता येते. हल्ली बाजारामध्ये याच चाचणीच्या कागदी पट्ट्या उपलब्ध असून या पट्ट्यांची लघवीत बुडवून तपासणी केली असता तात्काळ कितनबाधेसारख्या आजाराचे निदान लावता येते. या व्यतिरिक्त गरजेनुसार क्ष किरण तपासणी, सोनोग्राफी, रक्त जल नमुने तपासणी आदी चाचण्यांचा वापरही पशुधनातील रोगनिदानासाठी करता येतो. अशाप्रकारे आवश्यकतेनुसार योग्य वेळी योग्य अशा आणि आपल्या परिसरात उपलब्ध असणाऱ्या प्रयोगशाळेची मदत घेऊन रोगनिदानासाठी आवश्यक त्या तपासण्या करून घेतल्यास तात्काळ निदान करून योग्य उपचारपद्धती अवलंबता येते व आजारांपासून होणारे आर्थिक नुकसान टाळता येते.   संपर्क ः डॉ. रवींद्र जाधव, ९४०४२७३७४३ डॉ. संभाजी चव्हाण, ९२८४५५५३१९ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com