कापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता वाढीचा मंत्र

प्रकल्पांतर्गत कपाशी क्षेत्रात निरीक्षण नोंदविताना विनायक लिल्हारे
प्रकल्पांतर्गत कपाशी क्षेत्रात निरीक्षण नोंदविताना विनायक लिल्हारे

‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक ग्राम परिवर्तन) फाउंडेशन व भारत विकास शिक्षण संस्था यांच्या संयुक्‍त सहकार्याने कापूस उत्पादक यवतमाळ जिल्ह्यात कापूस उत्पादकता वाढ प्रकल्प राबविला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे १९७८ शेतकऱ्यांची निवड या प्रकल्पात करण्यात आली आहे. दुष्काळी स्थितीत कपाशी उत्पादकता वाढीचा उद्देश या माध्यमातून साध्य करण्यात येतो आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा पुरवण्याबरोबरच तज्ज्ञांचेही मार्गदर्शन या प्रकल्पाच्या माध्यमातून होते आहे.    अनियमित पाऊस, प्रतिकूल हवामान व अन्य कारणांमुळे कापसाची हेक्‍टरी उत्पादकता घटली आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांचे उत्पन्न घटण्यावर होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी भारत विकास शिक्षण संस्थेने पुढाकार घेतला. लावणीपासून ते काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देण्यासाठी संस्थेचे पाऊले उचलली. माती परीक्षणाच्या आधारे खतांची मात्रा देणे असो की हवामानाचा अंदाज घेणे असो, त्या आधारेदेखील शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन करण्याविषयीचे तज्ज्ञांचे सल्ले देणे आदी बाबी प्रकल्पांतर्गंत अंतर्भूत आहेत.  तज्ज्ञांचे होणार मार्गदर्शन  यवतमाळ आणि कळंब या दोन तालुक्‍यांची निवड प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ३५ गावांचा समावेश तर १९७८ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी १५ कृषी पदवीधरांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. प्रत्येकाकडे दोन गावे दत्तक देण्यात आली आहेत. त्यासोबतच कृषितज्ज्ञ आणि कृषी विद्यापीठांचे आजी-माजी कुलगुरू यांचे देखील मार्गदर्शन प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घेतले जात आहे.  विविध निविष्ठांची मदत  प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना मातीचा पीएच. संतुलित करण्याविषयीचे साहित्य, निंबोळी अर्क, स्प्रे ग्रेड फर्टीलायझर्स, नॅनो तंत्रज्ञान युक्त निविष्ठा, पीकवाढीचे घटक, अमोनियम मॉलीबडेट, सिलीका आदींची मदत करण्यात आली. पीक संरक्षणासाठी कडूनिंब अर्क, अन्य जैविक निविष्ठा तसेच संप्रेरकांचा वापर शेतकऱ्यांच्या शेतावर करण्यात आला. विविध घटकांतील विविध गुणधर्मांच्या वापरामुळे  पिकांना पावसाच्या खंडाचा ताण सोसता आला. झाडाची रोगप्रतिकारक शक्‍ती वाढण्यास मदत झाली. कीड नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांवरील खर्च वाचला, असा अनुभव वटबोरी येथील गंगाधर लिल्हारे यांनी मांडला.  शेतकऱ्यांचे अनुभव  या प्रकल्पात मी सहभाग घेतला आहे. त्या अंतर्गत एक एकरावर कापूस व्यवस्थापन सुरू आहे.  त्याद्वारे प्रतिझाडाला सरासरी ५५ बोंडे लागली. त्या तुलनेत प्रकल्पात समावेश नसलेल्या  कापूस क्षेत्रात प्रतिझाड अवघी १५ ते २९ बोंडे लागली होती. त्यातून उत्पादनात निश्‍चितच वाढ होईल. यावर्षी कापसाला चांगले दर असल्याने ही बाबदेखील सुखावणारी ठरली आहे.  - विनायक लिल्हारे, वटबोरी, यवतमाळ  आमची जमीन लालखडीची आहे. शेतात दगडांचे प्रमाणदेखील अधिक आहे. या क्षेत्रातून आजवर कपाशीचे एकरी उत्पादन दोन क्‍विंटलपेक्षा अधिक मिळालीच नाही. यंदा दुष्काळामुळे परिस्थिती आणखीच भयावह आहे. पाणी व अन्नद्रव्यांची कमतरता भासली. प्रयोग न केलेल्या क्षेत्रातील कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याचा उत्पादकतेला फटका बसेल. भारत विकास संस्थेच्या प्रकल्पांतर्गत कापूस पिकाची परिस्थिती मात्र वेगळी भासली. एक एकरातून दोन क्‍विंटल ६० किलो उत्पादन पहिल्या तोड्यातच मिळाले. दुसऱ्या तोड्यातून पाच क्‍विंटल उत्पादनाची सरासरी अपेक्षा आहे. निश्‍चितच यापुढील काळात कापसाची उत्पादकता वाढण्यास मदत होईल."  -रुख्मीना भुजाडे- ७५१७९२५५१५  गांधीनगर, यवतमाळ  माझी आठ एकरांवर कपाशी असून त्यातील एक एकर प्रकल्पात समावेशीत आहे. उपचारित क्षेत्रातील कपाशीतून आजवर एकरी सात क्‍विंटल उत्पादन मिळाले आहे. प्रती झाड ६६ अशी बोंड संख्या होती. उर्वरित प्रकल्पात समाविष्ट नसलेल्या सात एकरांत काही ठिकाणी खाडे (गॅप) पडले होते. त्यासोबतच झाडाला बोंडे धरण्याचे प्रमाणही कमी होते. एकरी चार ते साडेचार क्‍विंटल उत्पादन मिळाले. माझ्याकडे ३३ जनावरे आहेत. त्यापासून मिळणाऱ्या शेणखताचा वापर नियमितपणे शेतीत केला जातो.  - संदीप घाटोळ-७८८७५९७३५१  सोनखास, ता. कळंब यवतमाळ  प्रकल्प दृष्टीक्षेपात 

  • लाभार्थी संख्या - १९७८ 
  • कार्यक्षेत्र- यवतमाळ जिल्ह्यातील ३५ गावे 
  • उद्देश- सुधारित तंत्रज्ञान वापरून शेती उत्पादनात वाढ करणे. 
  • कालावधी- खरीप २०१८ 
  • प्रकल्पाचा पहिला टप्पा 

  • शेतकऱ्यांच्या शेतीविषयक उपक्रमांची रोजची देखरेख आणि मूल्यांकन 
  • क्‍लस्टर वा गावस्तरावर शेतकऱ्यांची क्षमता निर्माण करणे, त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे, पीकनिहाय शेतकऱ्यांना प्रशिक्षण मॉड्यूल पुरविणे. 
  • प्रात्यक्षिक क्षेत्राचे ‘जीओ टॅगिंग’ आणि ‘सॅटेलाईट मॅपिंग’. तसेच प्रभावी पर्यवेक्षणासाठी ‘डेटा डॅशबोर्ड’ची सुविधा पुरविणे. त्यासोबत विश्‍लेषणही. 
  • पीकनिहाय खतांच्या मात्रांची शिफारस करणे आणि खत वापरासंबंधी मार्गदर्शन करणे. 
  • हवामान इशारा आणि शिफारसी. 
  • शेतकऱ्यांसाठी ‘कॉल सेंटर’ सेवा.  
  • प्रकल्पाचा दुसरा टप्पा 

  • सायट्रिक ॲसिड, लिंबू किंवा बाजारात उपलब्ध असलेली पीएच नियंत्रण करणारी उत्पादने वापरून फवारणीच्या पाण्याचा सामू साडेपाच ते सहापर्यंत संतुलित ठेवणे. 
  • खतांच्या कार्यक्षम उपलब्धतेसाठी योग्य मात्रा योग्य प्रमाणात देणे. खत झाडांच्या मुळाजवळ देणे आणि वरून मातीने झाकून घेणे. 
  • ‘नीम ऑईल’चा वापर. 
  • पीकवाढीसाठी जैविक घटकांवर आधारित उत्पादनांचा वापर. 
  • पिकांची चांगली वाढ होण्यासाठी तसेच पिकांना पाण्याचा ताण सहन करता यावा, यासाठी अमोनियम मोलीब्डेट आणि सिलीका यांचा वापर. 
  • पिकांची वाढ व्हावी तसेच पोषक तत्त्वे योग्य वेळी उपलब्ध व्हावीत याकरिता ‘स्प्रे ग्रेड’ खतांचा वापर. 
  • कापूस पिकांमध्ये सापळा पिके, चिकट सापळे आणि ब्रॅकोन बेटचा वापर. 
  • ट्रायकोग्रामा मित्रकीटकांचा वापर. 
  •   प्रकल्पाचे फायदे 

  • नियंत्रित (प्रकल्पात समाविष्ट नसलेल्या) प्लॉटच्या तुलनेत उपचारित क्षेत्रातील पीक उत्पादनात २० ते ३० टक्‍के वाढ. 
  • नियंत्रित प्लॉटच्या तुलनेत उपचारित क्षेत्रातील पीक गुणवत्तेत वाढ. 
  • प्रकल्पातील माहितीचे व यशाचे अन्य गावांत सादरीकरण आणि विस्तार 
  • संपर्क- रवींद्र मारोतराव भुजाडे- ७०३८९५७०९९  गांधीनगर, यवतमाळ  विजयकुमार चोले-९१३००३५०६९  उपाध्यक्ष, भारत विकास शिक्षण संस्था 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com