रब्बी हंगामासाठी सुधारित अवजारे

बैलचलित धसकटे गोळा करण्याचे अवजार, लोखंडी वखर
बैलचलित धसकटे गोळा करण्याचे अवजार, लोखंडी वखर

रब्बी हंगामाचा विचार करता मजुरांची उपलब्धता व पिकासाठी मिळणारा कालावधी खूप कमी असतो. अशा वेळी सुधारित अवजारांचा वापर करून शेतातील कामे करता येऊ शकतात. शेतातील विविध कामांसाठी सुधारित अवजारे सध्या उपलब्ध आहेत.   मशागतीसाठी अवजारे

  १. रोटाव्हेटर

  • हे एक ट्रॅक्‍टरचलित अवजार असून, जमिनीस दुहेरी रोटोव्हेटर केल्यास जमिनीचा पोत हा एक नांगरणी, दोन मोगडणी व एक वेळेस पाळी घातल्यावर मिळणाऱ्या जमिनीच्या पोतापेक्षाही चांगला मिळतो असे दिसून येते.  
  • पहिल्या पिकांचे धसकटे व इतर काडीकचरा बारीक होऊन जमिनीत मिसळला जातो, ज्यामुळे पहिल्या पिकाची धसकटे व इतर अवशेष गोळा करण्याचे काम करावे लागत नाही.
  • एका दिवसामध्ये १०-१२ एकरपर्यंत क्षमता आहे.
  • २. बैलचलित धसकटे गोळा करण्याचे अवजार

  • हे अवजार बैलचलित असून, ते १.६५ मीटर रुंद व ३० सें.मी. उंच लोखंडी फ्रेममध्ये बनविलेले असून, त्यास १२ मी.मी. जाडीचा सळईमध्ये ७.५ सें.मी. अंतरावर टोकदार दाते बनविलेले आहे.
  • जमिनीच्या व धसकटाच्या प्रकारानुसार अवजारावर उभा राहून व उभे न राहता चालवता येते व त्यासाठी अवजारांवर लाकडी फळ्या बसविलेल्या आहेत.  
  • धसकटे गोळा करत असताना ढेकळे फुटून जमीन भुसभुशीत व समपातळीत करता येते. एका दिवसात अंदाजे २.५ ते ३ एकर क्षेत्रावरील घसकटे गोळा करता येतात.
  • ३. रानसावडी

    हे अवजार मनुष्यचलित असून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून, पिकांचे अवशेष (धसकटे व काश्‍या) गोळा करता येतात. हे अवजार गांडूळ शेती, परस बागेतील कामासाठीही उपयुक्त आहे.

    ४. लोखंडी वखर

    रब्बी पिकाच्या पूर्वमशागतीसाठी वापरता येते.

    आंतरमशागतीसाठी अवजारे

    १.  हात कोळपे

    आंतरमशागतीसाठी प्रामुख्याने मकृवि चाकाचे हात कोळपे, दातेरी हात कोळपे, कृषिरत्न हात कोळपे, सायकल कोळपे इ. कोळप्यांचा समावेश होतो. ही सर्व हात कोळपी ढकला व चालवा या तत्त्वावर विकसित झालेली आहेत. आंतरमशागतीचे काम कमी कष्टात करता येते.

    २. खत कोळपे

    हे बैलचलित अवजार असून, कोळपणीबरोबरच खताची मात्रा ही दिली जा ते. कोळप्यासाठी ६, ९ व १२ इंच पास उपलब्ध असून, या अवजारांमुळे मजुराची बचत होते. खत पिकाच्या जवळ देता येत असल्यामुळे खताची मात्रा पूर्णपणे पिकांसाठी उपयोगी पडते.

    ३. बैलचलित तीन पासेचे कोळपे

  • एक मजुराच्या साह्याने तीन ओळींतील आंतरमशागतीचे व खत देण्याचे काम एकावेळी करता येते.
  • या अवजाराची लांबी १७० सें.मी. असून, उंची ३० ते ४५ सें.मी. करता येते. त्यावर २२.५ सें.मी. व ३० सें.मी. रुंदीच्या तीन पास बसविता येतात. त्यामुळे खत पेरण्याचा व आंतरमशागतीचा वेळ वाचतो.  
  • एका दिवसात २.५ ते ३.०० एकर क्षेत्राची कोळपणी व खत देण्याचे काम करता येते.
  • फवारणीसाठी यंत्रे

     १. बैलचलित फवारणी यंत्र

  • हे यंत्र एचटीपी पंपाच्या साह्याने कार्य करते. या फवारणी यंत्रात ६ मी. बुमवर १४ नोझल बसविलेले अाहेत.  
  • हे यंत्र बैलशक्तीवर चालत असून, पंपाला गती बैलगाडीच्या चाकावरून दिली जाते.   
  • ६ मी. रुंद बुमवरील नोझल एकाचवेळेस फवारणी करतात.
  • नोझलची उंची पिकाप्रमाणे कमी-जास्त करता येते. दोन नोझलमधील अंतर पिकाच्या ओळीप्रमाणे कमी-जास्त करता येते.
  • कार्यक्षमता १.३३ हेक्टर प्रति तास आहे.
  • पेरणीसाठी सुधारित अवजारे

    १. रब्बी तिफन

  • एक तीन ओळीची बैलचलित तिफन असून, खासकरून रब्बीच्या पेरणीसाठी (ज्वारी) विकसित करण्यात आली आहे.
  • बियाणे १३ ते १५ सें.मी. पर्यंत खोलीवर पेरता येते. पेरणी करताना पूर्ण माती बियाण्यावर न पडता त्या ठिकाणी ६ ते ९ सें.मी. पर्यंत सरी पडते. याचा उपयोग हलका पाऊस झाल्यावर त्या ठिकाणी जलसंधारण म्हणजे पाणी अडविण्यासाठी होतो.  
  • तिफनीसाठी विशिष्ट आकाराचे फारोळे (फन) असल्यामुळे १५ सें.मी. खोलीपर्यंत बियाणे टाकण्यासाठी शक्ती कमी लागते. मध्यम आकाराचे बैलसुद्धा ही तिफन चालवू शकतात. सर्वसाधारणतः एका दिवसामध्ये ५ ते ६ एकर क्षेत्रावर पेरणी करता येऊ शकते.
  • २. झीरो टील ड्रील

  • हे  ट्रॅक्‍टरचलित अवजार असून जमिनीची मशागत न करताही पेरणी करता येते.
  • खत व बियाणे योग्य प्रमाणात, योग्य खोलीवर टाकले जाऊन उपलब्ध निविष्ठांचा पुरेपूर वापर होतो. या यंत्रावर "शू'' टाइप फन बसवलेले असतात.
  • पेरणी झाल्यावर वेळेच्या उपलब्धतेनुसार आंतरमशागत करता येते.  
  • ३. ‘क्रिडा’ बैलचलित बहुपीक टोकण यंत्र

  • पारंपरिक पेरणी पद्धतीमधील त्रुटी लक्षात घेता केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद तर्फे क्रिडा बैलचलित बहुपीक टोकण यंत्र विकसित करण्यात अाले अाहे.  
  • या यंत्राने सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी, हरभरा, बाजरी, मका, भुईमूग, वाटाणा, गहू वगैरे पिकांची पेरणी एका मजुराद्वारे करता येते.
  • या यंत्राचे बीज व खत पेटी, गती देणारी यंत्रणा, दिशा देणारी चाके, फण (दोन, तीन किंवा चार फणांमध्ये उपलब्ध) बियाण्याच्या तबकड्या, बियाणे नळ्या हे भाग आहेत व ते सर्व मुख्य सांगाड्यावर बसविलेले आहे.
  • कार्यक्षमता -५ एकर प्रति दिवस असून आंतरपीकसुद्धा घेता येते.
  • कापणी व मळणीसाठी अवजारे

      १. मकृवि विळा खुरपी

  • या अवजाराच्या पात्याला दोन्ही बाजूंनी धार असल्यामुळे बाहेरील बाजू खुरपी म्हणून तर आतील बाजू विळा म्हणून वापरली जाते.
  • पात्याची रुंदी १५ सें.मी. असून,  काम करताना मुठीवरील पकड घट्ट बसते व काम करणे त्रासदायक वाटत नाही. वजन पारंपरिक विळ्यापेक्षा कमी असून, ते हायकार्बन स्टीलपासून बनविले आहे.
  • २. शेंगा काढणी यंत्र (डिगर)

  • शेंगा काढणी यंत्राच्या वेगवेगळ्या तीन संरचना तयार करण्यात आल्या असून, त्या लोखंडी आहेत. त्यामध्ये व्ही आकाराची पास, सरळ पास व दातेरी पास शेंगा काढण्यासाठी वापरण्यात येते. यातील एक संरचना ही बहुउद्देशीय अवजार वाहकासोबत वापरता येते.
  • जमिनीतून १५ सें.मी. खोलीपर्यंतच्या शेंगा काढता येतात. शेंगा जमिनीत राहण्याचे प्रमाण खूपच कमी १-२ टक्के एवढे आहे.- शेंगाफुटीचे प्रमाण साधारणपणे ३ टक्के आहे.
  • हे अवजार एका मध्यम आकाराच्या बैल जोडीच्या साह्याने चालवता येते. एका मजुराच्या साह्याने साधारणतः एका दिवसात एक हेक्‍टरपर्यंत भुईमुगाचे वेल शेंगांसहित उपटले जाऊ शकतात.
  •  ३.  कम्बाईन हार्वेस्टर

  • हे एक स्वयंचलित अथवा ट्रॅक्‍टरचलित यंत्र असून गहू, हरभरा, करडई इत्यादी रब्बी पिकांसाठी उपयुक्त आहे.
  • या यंत्राद्वारे पिकांची कापणी, मळणी व उधळणी व पाते भरणे ही कामे करता येतात. त्यासाठी तीन स्वतंत्र भाग देण्यात अाले अाहेत.
  • ४. भुईमूग शेंगा तोडणी चौकट (स्ट्रिपिंग फ्रेम)

  • हे एक साधे पण उपयुक्त असे शेती अवजारे आहे. ही २ x २ x १ फूट असून, त्यावर उलटे व्ही आकाराचे दाते लावले आहेत. यामुळे शेंगा तोडण्यासाठी लागणारी मजूर शक्ती व वेळ यांची बचत होते.
  • स्त्री मजूर शेंगा तोडणी चौकटीच्या साह्याने १२० ते १३० किलो शेंगा एका तासात तोडते.
  • शेंगा तोडणीची क्रिया शेंगासहित असलेल्या वेलाला तोडणी चौकटीवर ओढता मारा देऊन केली जाते. यामध्ये शेंगा फुटण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. हाताने शेंगा तोडणीपेक्षा जवळ जवळ चारपट शेंगा तोडणी जास्त होते.
  • संपर्क  ः डॉ. स्मिता सोलंकी, ८००७७५२५२६ (लेखक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यरत अाहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com