ऊस लागवडीचे करा योग्य नियोजन

  उसपिकात बाळबांधणी करणे अत्यंत आवश्‍यक आहे.
उसपिकात बाळबांधणी करणे अत्यंत आवश्‍यक आहे.

एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी ऊस बेण्याची निवड, तणनाशकांचा वापर व बाळबांधणी या बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यांच्याबाबत योग्य माहिती घेणे फायद्याचे राहते.

ऊस बेण्याची निवड :

  • ९ ते १० महिने वयाचे रोग व कीड मुक्त बेण्याची निवड करावी.
  • उसाचे वजन (वाढे सोडून) २.० ते २.५ किलो असावे. यामध्ये १.० ते १.५ किलोपर्यंत असणारे ऊस लागणीसाठी अजिबात घेऊ नयेत, बेणे छाटतेवेळीच बाजुला काढावेत.
  • लागवडीसाठी एक डोळा पद्धतीचा वापर केल्यास उसाचे बेणे कमी लागते. खर्च वाचतो. हवामानानुसार १० ते १५ दिवसांत संपूर्ण उगवण पूर्ण होते. फुटव्याचे प्रमाणही चांगले निघते.
  •                    सरीतील अंतरानुसार एकरी ऊस बेणे टिपरी संख्या    

    अ. क्र.     लागवड प्रकार     सरीतील अंतर फूट       एक एकरातील सरीची लांबी     दोन टिपरीतील अंतर, फूट    दोन टिपरीतील अंतर, फूट    दोन टिपरीतील अंतर, फूट दोन टिपरीतील अंतर, फूट      दोन टिपरीतील अंतर, फूट
    - - - - १.०         १.५    २.०   २.५    ३.०
            एक डोळा टिपरी संख्या (एकरी) एक डोळा टिपरी संख्या (एकरी)  एक डोळा टिपरी संख्या (एकरी)     एक डोळा टिपरी संख्या (एकरी) एक डोळा टिपरी संख्या (एकरी)
    १      सरफेस ४     १०८८९     १०८८९    ७२५९      ५४४५     ४३५६   ३६३०
    २     ठिबक सिंचन ४.५   ९६७९   ९६७९  ६४५३      ४८४०    ३८७२    ३२२६
    ३     --     ५.०     ८७११     ८७११     ५८०८     ४३५६     ३४७५   २९०४
    ४    --      ६.० ७२५९   ७२५९     ४८४०    ३६३०   २९०४    २४२०
            दोन डोळा टिपरी संख्या (एकरी) दोन डोळा टिपरी संख्या (एकरी) दोन डोळा टिपरी संख्या (एकरी) दोन डोळा टिपरी संख्या (एकरी) दोन डोळा टिपरी संख्या (एकरी)
    ५    सब-सरफेस       ६.०    १४५१८   १४५१८  ९६७९    ७२५९   ५८०७     ४८३९
    ६      ठिबक सिंचन     ७.०      १२४४४     १२४४४  ८२९६ ६२७२   ४९७८   ४१४८
    ७   --  ८.० १०८९०   १०८९०    ७२६०   ५४४५    ४३५६     ३६३०
    ८    --   ९.०     ९६८०     ९६८०   ६४५३      ४८४०    ३८७२     ३२२७
    ९    --  १०.०     ८७१२    ५८०८     ४३५६     ३४८५     २९०४     २४८९

    * टीप : वरील तक्त्यात दिलेल्या एकरी लागणारी टिपरी संख्येमध्ये २५ टक्के जादा टिपरी धरावी. प्रत्येक ५ व्या सरीमध्ये दोन टिपऱ्यांच्या मध्ये एक जादा टिपरी लावल्यास २५ टक्के जादा टिपरी लागेल. जमिनीच्या प्रकारानुसार दोन टिपऱ्यांतील अंतर ठेवावे. हलकी जमिनीत १ फूट, मध्यम जमीन १.५ फूट, तर भारी जमिनीत २ फूट अंतर ठेवावे. अतिभारी जमिनीत २.५ ते ३ फूट ठेवले, तरी ऊस उत्पादनावर काहीही परिणाम न होता बेण्याची बचत होऊन फुटवाही मोठ्या प्रमाणात निघतो.

    २५ टक्के अधिक रोपे तयार करावीत : नांग्या भरण्यासाठी कांडी लावल्यास त्याची उगवण झाली, तरी उर्वरित उसासारखी समान वाढ मिळत नाही. याच वेळा आपण नांग्या पडल्यास नंतर कांडी लावतो. परंतु आधी केलेल्या लागणीचा ऊस वाढल्याने नंतर लावलेल्या कांड्याची उगवण होईल, परंतु एकसारखी वाढ होणार नाही. किंवा बाहेरून रोपे विकत घेऊन नांग्या भरण्याचा प्रयत्न केला जातो. तातडीच्या स्थितीमध्ये चांगल्या प्रतीची रोपे मिळत नाहीत. तसेच खर्चातही वाढ होते. त्याऐवजी आपल्या शेतात २५ टक्के जादा रोपे तयार करून घेणे फायद्याचे ठरते. त्यासाठी

  • साधारणपणे लागवडीच्या ७५ ते ८० टक्केच उगवण होते. एक डोळा पद्धतीमध्ये १०० टक्के उगवण होणे जरुरी आहे. त्यासाठी २५ टक्के जादा रोपे तयार करून ठेवावीत. त्यासाठी ऊस लागवड करतानाच पहिल्या चार ओळींत ठरविलेल्या अंतरानुसार लागवड केल्यानंतर प्रत्येक ५ व्या ओळीला दोन टिपऱ्यांच्या मध्ये एक डोळ्याचे जादा टिपरे लावावे. आपल्याच शेतात जादा कष्ट न करता २५ टक्के जादा ऊस रोपे तयार होतील. या अतिरिक्त रोपांची लागवड डोळे न उगवल्याने पडलेल्या नांग्या/ तुटाळ / गॅप यामध्ये २५ ते ३० दिवसांनंतर करावी.
  • आपण रोपांची लागवड करणार असल्यास, पहिल्या ९ ओळींनंतर १० व्या ओळीला (१० टक्के) दोन्ही रोपांमध्ये एक जादा रोप जरूर लावावे. रोग-कीड किंवा अति पावसाने रोपे जळून गेल्यास नांग्या भरण्यासाठी यापैकी एक आड एक रोप काढून वापर करता येईल. नांग्या पडल्या नसतील तर ही एक आड एक रोपे काढून टाकावीत.
  • बऱ्याच ठिकाणी उसाची कोरडी लागवड करून नंतर ठिबकद्वारे पाणी दिले जाते. अशावेळी ठिबकने पाणी दिल्याने कांड्याला माती घट्ट न चिकटल्याने उगवण होत नाही. यासाठी ऊस लागवडीपूर्वी जमीन ठिबक सिंचनाने जमिनीच्या प्रकारानुसार ८ ते १० तास चांगली एकसारखी भिजवून घ्यावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वाफसा आल्यानंतर शिफारस केलेला बेसल डोस टाकून घ्यावा. त्यानंतर बैलाच्या साह्याने बळिराम नांगर वापरुन किंवा मजुरामार्फत कुदळीच्या साह्याने चळी घेऊन, चळीमध्ये डोळा वरच्या बाजूस राहील अशा प्रकारे टिपऱ्या लावून घ्याव्यात. त्यावर २-३ से.मी. ओली झालेली माती घालून टिपरी घट्ट दाबून झाकून घ्यावी.
  • रोपांवरील रोगांचा प्रादुर्भाव टाळून एक सारख्या उगवणीसाठी बेण्यावर शिफारशीप्रमाणे कीडनाशकांची प्रक्रिया करावी. लवकर व रोगमुक्त उगवणीसाठी बेणे कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम अधिक डायमिथोएट किंवा मॅलॅथिऑन ३०० मिलि प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणात बेणे १२ ते १५ मिनिटे बुडवावे.
  • तणनाशकांचा वापर :

  • ऊस लागवडीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी उस संशोधन केंद्र, पाडेगाव यांच्या शिफारशीप्रमाणे तणनाशकांचा वापर करावा. त्यासाठी उगवणपूर्व तणनाशक मेट्रीब्यूझीन १.५ किलो किंवा अॅट्राझिन ५ किलो प्रति १००० लिटर पाणी प्रतिहेक्टरी याप्रमाणात मिसळून ओल्या जमिनीवर फवारणी करावी. यामुळे शेतामध्ये पहीले दीड ते दोन महिन्यांपर्यंत तण उगवत नाही. अशा तणविरहित शेतीमध्ये १५ दिवसांनंतर फर्टिगेशन चालू केल्यास उसाची वाढ चांगली होते. उसाचा मुख्य कोंब मोठा व जाड होतो.
  • लागवडीवेळी काही कारणास्तव तणनाशकांचा वापर शक्य न झाल्यास मजुरांमार्फत खुरपणी / निंदणी करून घ्यावी. शेत तणविरहित ठेवल्यावर फर्टिगेशनचे चांगले परिणाम मिळतात.
  • उसामध्ये बाळबांधणी : उसाच्या लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी एक-दोन फुटव्यांचे कोंब निघायला सुरवात होतात. त्या वेळी बाळबांधणी करावी. उसाची उगवण झाल्यानंतर सुरवातीला ऊस कांडीला मुळे सुटतात, त्यांना आपण कांडीमुळे (Set root) म्हणतो. ज्या वेळेस कोंब बाहेर येऊन कोंबावर छोट्या कांड्या तयार होतात व त्यावर असणाऱ्या डोळ्यातून फुटवे निघायला सुरवात झाल्यानंतर कांडीला पांढरी मुळे सुटतात. निसर्ग नियमानुसार २ ते २.५ महिन्यांनंतर हळूहळू कांडीमुळे मरायला लागतात. कांडीमुळाचे आयुष्य फक्त १.५ ते २ महिनेच असते. पांढरी मुळे ही कायमस्वरूपी राहात असतात. पांढरी मुळे ही नाजूक असल्याने कडक झालेल्या जमिनीत सहजासहजी घुसण्यासाठी अडथळा येतो. त्यासाठी जमीन भुसभुसीत करणे आवश्यक आहे. प्रत्येक मुख्य कोंबावर पक्व झालेल्या कांडीतून फुटवे बाहेर पडण्यासाठी मुख्य कोंबाला थोडीफार माती लागणे आवश्यक आहे. यासाठी बैल अवजाराने किंवा कुदळीच्या साह्याने कोंबापासून दोन्ही बाजूंस ८-१० सें मी. अंतरापर्यंत जमीन भुसभुशीत केल्यास फुटव्यांची संख्या झपाट्याने वाढायला सुरवात होते. फुटवे झपाट्याने वाढायला लागल्यामुळे मुख्य कोंब आपोआपच दबला जातो. त्याची वाढ कमी होऊन सर्व फुटवे व मुख्य कोंब एक सारखे वाढायला लागतात. या बरोबरच मुख्य कोंबाला थोडीफार माती लागल्याने खोड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. खोड अळीची मादी ऊस पानाच्या मागील बाजूस अंडी घालते. अंडी घातल्यानंतर लागणाऱ्या भुकेमुळे अन्नाच्या शोधात पानावरून तार करुन जमिनीवर उतरते. तिच्या चालण्यालाही जमिन भुसभुशीत असल्याने मर्यादा येतात. उगवलेल्या दुसऱ्या कोंबापर्यंत पोचण्यास उशिर होऊन मरते. यामुळे खोडअळीचे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नियंत्रण होते. यासाठी बाळबांधणी करणे फार आवश्यक आहे.

    संपर्क : विजय  माळी, ०९४०३७७०६४९ (वरिष्ठ कृषी विद्यावेत्ता,जैन इरिगेशन सिस्टिम्स लि, जळगाव.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com