गाई, म्हशींची दुग्धोत्पादन क्षमता वाढवा...

 गाईंचे दूध काढणीसाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर.
गाईंचे दूध काढणीसाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर.

सध्याच्या काळात सेक्स सीमेन किंवा सॉर्डेड सीमेन, एम्ब्रियो ट्रान्स्फर तंत्रज्ञान दूध उत्पादकांपर्यंत पोचत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे उत्तम उत्पादन क्षमता असलेल्या प्रजाती तयार करून योग्य पैदास धोरण राबविणे फायदेशीर ठरणार आहे.   स्वातंत्र्यानंतर आपल्याकडील गाईंचे दूध उत्पादन वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. गाईंच्या होल्स्टीन फ्रीजियन, ब्राऊन स्विस, रेड डेन, जर्सी या विदेशी जातींबरोबर मिश्र पैदास करून गेली पाच दशके हा कार्यक्रम राबवला गेला. याचा दूध उत्पादनवाढीसाठी चांगला परिणाम झाला. पशुसंवर्धन क्षेत्रातील वार्षिक वाढीचा वेग हा सुमारे ५ टक्के इतका आहे. भारतातील दुधाळ गाई, म्हशींच्या जाती निवडून दूध उत्पादन वाढविण्यासाठी अजून प्रयत्नांची गरज आहे. भारतात गाई, म्हशींची संख्या जास्त असूनही सरासरी दूध उत्पादन खूप कमी आहे. देशातील सरासरी प्रति जनावर दूध उत्पादन प्रति वर्ष २,०७० किलोग्रॅम इतकेच आहे, जे जगातील दूध उत्पादन सरासरीपेक्षा निम्म्याने कमी आहे. विकसित देशांच्या तुलनेत फक्त १५ टक्के आहे. आपल्याकडील चांगले दूध देणाऱ्या गाई वर्षाला सरासरी ३००० ते ४००० लिटर दूध देतात, जे प्रमाण एका लहान पशुपालकासाठी चांगले म्हणता येईल; परंतु व्यावसायिक डेअरी फार्मसाठी पुरेसे नाही. दुभत्या गाई, म्हशींची उत्पादन क्षमता वाढविणे ः

  • देशी गाय किंवा मिश्र पैदास केलेल्या गाई तसेच म्हशींपैकी कुठल्याही जाती आपण दूध उत्पादनासाठी निवडल्या तरीही त्यांची दूध उत्पादन क्षमता तपासून पाहावी.
  • चांगल्या गुणवत्तेची दुधाळ जनावरे आपल्या गोठ्यात आणली तर पुढील पैदास चांगली होईल.
  • सध्याच्या काळात सेक्स सीमेन किंवा सॉर्डेड सीमेन, एम्ब्रियो ट्रान्स्फर तंत्रज्ञान दूध उत्पादकांपर्यंत पोचत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे उत्तम उत्पादन क्षमता असलेल्या प्रजाती तयार करून योग्य पैदास धोरण, उत्तम पशू आहार, राहण्याची उत्तम व्यवस्था व आरोग्य काळजी यामुळे जनावरांची पूर्ण उत्पादनक्षमता वापरता येईल.
  • ताण व्यवस्थापन 

  • उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये जनावरांवर येणारा ताण दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम करतो. व्यवस्थापनातील बदलाने आपण या परिणामांची तीव्रता कमी करू शकतो.
  • उन्हाळ्यातील उच्च तापमानात दाट सावली देणारा गोठा किंवा झाड, गोठ्याचे योग्य दिशेनुसार बांधकाम, उन्हाळ्यात गोठ्यात पाणी शिंपडणे किंवा स्प्रिंकलर / फॉगर बसविणे, फॅनचा वापर, पिण्यास थंड पाणी देणे महत्त्वाचे आहे.
  • पशू आहारशास्त्रातील नियमानुसार उन्हाळ्यात पहाटे लवकर व सायंकाळच्या थंड वातावरणात पशुखाद्य आणि चारा द्यावा. सोपा व सहज पचणारा, जास्त पोषण मूल्ये असलेला आहार द्यावा.
  • उन्हाच्या ताणामुळे पचन क्षमतेवर ताण येतो. यामध्ये कोठीपोटातील प्रथिनांचा होणारा वापर पाहता जास्त प्रथिनयुक्त आहार या काळात जनावरांना द्यावा. उन्हाळ्यात शरीरातील इतर क्षारांचा होणारा वापर पाहता सोडियम, पोटॅशियम यांसारख्या खनिजांचे योग्य व्यवस्थापन या काळात उपयुक्त ठरते.
  • आहार व्यवस्थापन 

  • अपुऱ्या आहारामुळे दुधाळ जनावरांची शारीरिक वाढ, दूध उत्पादन, प्रजनन व शरीर स्वास्थ्य यावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. चांगल्या पशू आहार व्यवस्थापनाची सुरवात संक्रमणकाळापासूनच करावी.
  • जनावरांना उच्च प्रतीची प्रथिने व ऊर्जायुक्त आहार आणि त्यांचे एकूण शुष्क पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढविल्यास अपेक्षित परिणाम दिसू लागेल.
  • जनावरांचे वजन आणि त्याचा प्रकृती अंक यावर बारीक लक्ष ठेवावे. गाय, म्हैस व्यायल्यानंतर तीन आठवडे योग्य काळजी घेतली पाहिजे. या काळातील ऊर्जेची कमतरता ही बायपास फॅट व इतर पशुखाद्य पुरके देऊन पूर्ण केली, तर उर्वरित काळात चांगले दूध उत्पादन मिळू शकेल.
  • गाय, म्हैस तिच्या उच्च दूध उत्पादनाला पोहोचली, की त्यानंतरचे खाद्य हे दूध उत्पादनाच्या प्रमाणात दिले पाहिजे.
  • दुभत्या गाई, म्हशींना लागणारे एकूण खाद्य - चारा, त्यातील प्रथिने, ऊर्जा आणि त्याचे चांगले पचन होण्यासाठी लागणारे तंतुमय पदार्थ याबरोबरच इतर खनिजे व पुरके यांचे प्रमाण पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रमाणित करावे. नवीन मिश्र खाद्य किंवा टीएमआर तंत्रज्ञान पशुखाद्य आणि चाऱ्याचा पुरेपूर वापर आणि पोटातील आम्लता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
  • नवीन तंत्रज्ञानाचा वापर 

  • गोठ्याचे आधुनिक बांधकाम, मिल्किंग पार्लर, दूध काढणी यंत्र, गाई- म्हशींचा ताण कमी करण्यासाठी स्प्रे कूलिंग, ग्रुमिंग ब्रश, दूध व शेण गोळा करण्यासाठी यांत्रिकीकरण, वासरांचे शिंग कापणे, वासरू अडकल्यास लागणारी सामग्री, खुरांसाठी लागणाऱ्या उपकरणामुळे एकूणच व्यवस्थापन सुधारण्यासाठी मदत झाली आहे.
  • गाई- म्हशींना मोजून खाद्य देणे, कासेची काळजी, रोजची संगणीकृत नोंदवही, गाई- म्हशींना ओळखण्याचे तंत्रज्ञान, जनावरांची पेडिग्री ठेवावी.
  • गोठ्याची जैवसुरक्षितता 

  • जैवसुरक्षितता म्हणजेच जनावरे, गोठा, भेट देणारे लोक, वापरत असलेली उपकरणे, भांड्यांचे निर्जंतुकीकरण. जनावरांमध्ये या गोष्टीला फार महत्त्व आहे.
  • अचानक उद्भवलेल्या आजारांमुळे दूध उत्पादनात घट येते. जनावरे व पर्यायाने दूध उत्पादकांचे आर्थिक नुकसान होते. गोठ्यामध्ये येणारे आगंतुक, प्राणी, पक्षी रोग पसरविण्याचे काम करतात.
  • गोठ्याला भेट देणाऱ्या लोकांचे हात व पाय किंवा बूट निर्जंतुकीकरण करून आत सोडल्यास रोगांचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.
  • विविध प्रकारचे विषाणू, जीवाणू, बुरशी आणि इतर अपायकारक सूक्ष्मजीव अगोदरच दुधाचा ताण असलेल्या दुभत्या जनावरांना आजारी पाडण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यावर वेळेत नियंत्रण केल्यास जनावरे आजारी पडणार नाहीत. गोठ्यात पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रमाणित जंतुनाशकांची नियमित फवारणी करावी.
  • संपर्क ः डॉ. पराग घोगळे, ९६७३९९८१७६ (लेखक बर्ग अँड श्मिट, पुणे येथे पशुआहार विभागात वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com