agriculture story in marathi, indigenous cow farming, allied business, mangvali, vaibhavvadi, sindhudurga | Agrowon

देशी गोपालन व्यवसायातून घेतली नव्याने उभारी
एकनाथ पवार
मंगळवार, 4 जून 2019

इमूपालन व्यवसायात काही लाख रुपयांचा आर्थिक फटका सहन केला. तरीही जिद्द व संयमाने 
मांगवली (जि. सिंधूदुर्ग) येथील महेश संसारे आणि सतीश जागृष्टे यांनी देशी गोपालन व्यवसाय सुरू केला. काळजीपूर्वक पावले उचलत, उत्तम व्यवस्थापनाची कास व बाजारपेठेचा अभ्यास केला. आज तूप व गोमूत्र-शेणावर आधारित उत्पादनांची निर्मिती व विक्रीतून त्यांनी बाजारपेठेत वेगळी ओळख तयार करताना आर्थिक स्थैर्य कमावले आहे. 

 

इमूपालन व्यवसायात काही लाख रुपयांचा आर्थिक फटका सहन केला. तरीही जिद्द व संयमाने 
मांगवली (जि. सिंधूदुर्ग) येथील महेश संसारे आणि सतीश जागृष्टे यांनी देशी गोपालन व्यवसाय सुरू केला. काळजीपूर्वक पावले उचलत, उत्तम व्यवस्थापनाची कास व बाजारपेठेचा अभ्यास केला. आज तूप व गोमूत्र-शेणावर आधारित उत्पादनांची निर्मिती व विक्रीतून त्यांनी बाजारपेठेत वेगळी ओळख तयार करताना आर्थिक स्थैर्य कमावले आहे. 

 
मांगवली (ता. वैभववाडी, जि. सिंधूदुर्ग) येथे महेश संसारे राहतात. त्यांचे मेहुणे सतीश जागृष्टे यांचेही जवळच घर आहे. दोघांचाही बांधकाम उभारणीचा व्यवसाय आहे. सतीश व्यवसायाच्या निमित्ताने पालघर येथे असतात. दोघांची अतूट मैत्री आहे तेवढीच शेतीचीही प्रचंड आवड आहे. विचार व आचारदेखील बहुतांशी सारखेच आहेत. शेतीत त्यांनी अनेक प्रयोग एकत्रित केले. 

इमूपालनात प्रचंड फटका 
सुमारे सहा वर्षांपूर्वी या दोघांनी इमूपालन व्यवसाय सुरू केला. त्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. परंतु संबंधित कंपनी, व्यापारी यांनी मोठी फसवणूक केली. विक्रीचे सारे व्यवस्थापन फसले. या व्यवसायात गुंतलेले अनेक तरुण कर्जबाजारी झाले. त्यात या दोघांचाही समावेश होता. दोघांनाही सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचा मोठा फटका सहन करावा लागला. 

गोपालनातून पुन्हा उभारी 
इमूपालनातून संसार विस्कटला. परंतु खचून न जाता दोघांनाही त्यातून बाहेर पडण्याचे ठरवले. 
चर्चा केली. अभ्यास केला. नव्याने देशी गोपालनात उतरायचा निर्धार केला. आर्थिक जुळवाजुळव केली. 
ऑगस्ट २०१५ मध्ये मांगवली येथेच आधुनिक पद्धतीचा गोठा बांधला. गायी आणण्यापूर्वी आवश्‍यक चारा उपलब्ध होईल अशी तरतूद केली. सुरवातीला दहा आणि त्यानंतर पाच अशा १५ गीर गायी खरेदी केल्या. 

व्यवसाय वृद्धी 
दुग्धव्यवसाय सुरू केल्यानंतर त्यातील खाचखळगे लक्षात लक्षात येऊ लागले. दूध, गोमूत्र, शेण यावर प्रकिया करून उत्पादने तयार करता येतात हे समजले. मग संसारे यांच्यातील अभ्यासूपणा स्वस्थ बसू देईना. त्यांनी पंचगव्य अभ्यासक्रमाला सुरवात केली. आवड असल्यामुळे बऱ्याच गोष्टींचे आकलन केले. एक वर्षाचा या विषयातील अभ्यासक्रम सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे पूर्ण केला. काही दुधाची किरकोळ स्थानिक विक्री करायची व तूपनिर्मितीवर अधिक भर दिला. 

अन्य उत्पादने 
गोमूत्र व शेणापासून उत्पादने तयार करण्यासाठी स्वतंत्र इमारतीची उभारणी केली. आवश्‍यक यंत्रसाम्रगी खरेदी केली. गोमूत्र अर्क व अन्य वनस्पतींचे अर्क तयार करण्यास सुरवात केली. आज सुमारे अठरा अर्क संसारे यांच्याकडे उपलब्ध आहेत. अर्क तयार करताना कुकर विशिष्ट तापमानाला उष्ण करून त्यामधील अमोनिया वेगळा केला जातो. उर्वरित गोमूत्रातील ५० टक्के हिस्सा अर्क बनविण्यासाठी वापरला जातो. शेणापासून गांडूळखत तयार केले जाते. महिन्याला सुमारे पाच टन निर्मिती केली जाते. सध्या प्रती टन ९००० रुपये दराने त्याला मागणी येऊ लागली आहे. 
याशिवाय सुगंधी साबण, दंतमंजन, भस्म पावडर, शाम्‍पू, मलम, फेस पॅक आदींचीही निर्मिती केली जाते. 
या व्यवसायात संपूर्ण कुटुंब उतरले असल्याने श्रमाची विभागणी होऊन कामाचा ताण हलका झाला आहे. 
निर्मितीपासून ते विक्री करण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यत कुटुंबाची धडपड सुरू असते. त्यामुळेच बाजारपेठेत विक्री व्यवस्था उभी करणे शक्य झाले. 

आर्थिक स्थैर्य लाभतेय 
पूर्वी १५ गायींचा गोठा होता. आता गायींची संख्या ६५ पर्यंत गेली आहे. यात गीर गायींबरोबर 
कांकरेज गायीदेखील आहेत. गोठ्यातच अधिकाधिक पैदास होत असल्याने गायी खरेदी करण्याची गरज कमी झाली आहे. दुधाची विक्री स्थानिक पातळीवर ५० रुपये प्रतिलिटर दराने होते. तूप महिन्याला ३० किलोपर्यंत तयार होते. त्याची विक्री २२०० ते २५०० रुपये प्रतिकिलो दराने होते. दर्जेदार तुपाला स्थानिकसह मुंबई, पुणे, कोल्हापूरसारख्या शहरातून मागणी आहे. ‘फूड सेफ्टी’ विषयातील परवाना प्रक्रियाही केली असून लवकरच तो हाती येईल असे संसारे यांनी सांगितले. 
अन्य उत्पादनांची विक्रीही स्थानिक पातळीवर होऊ लागली आहे. महिन्याला सुमारे ७० हजार रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे. तीन कामगार जोड्या तैनात केल्या आहेत. त्यांनाही रोजगार मिळाला आहे. 
एकेकाळी इमूपालनात झेललेले प्रचंड मोठे संकट भेदण्याचा संसारे व जागृष्टे यांनी केलेल्या प्रयत्नांना चांगले यश येऊ लागले आहे. संसारे हा व्यवसाय सांभाळून शेतीही पाहतात. आंबा, काजू, भाजीपाला, शेवगा आदी विविध पिके त्यांनी घेतली आहेत. 

देशी गोपालक संघाची स्थापना 
देशी गायींचे संगोपन आणि त्यांच्या संख्येत वाढ व्हावी या हेतूने सिंधुदुर्ग जिल्हाभरातील सव्वादोनशे 
जण एकत्र येत देशी गोपालक संघाची स्थापना करण्यात आली आहे. संघाचे महेश संसारे अध्यक्ष आहेत. 
या माध्यमातून उत्पादनाला बाजारपेठही मिळणे शक्य होणार आहे. 

 संपर्क- महेश संसारे- ७७४४०५७७३१ 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
काटेकोर जलव्यवस्थापनाद्वारे खेडी खुर्द...खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी...
वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची...वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची शेती ...
गीर गायींच्या संगोपनासह पॅकेटबंद दुधाची...अमरावती जिल्ह्यातील मोर्शी हा संत्रा पिकासाठी...
अथक प्रयत्न, संघर्षातून  प्रयोगशील...पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून २० एकरांत...
मुंबईतील नोकरी सांभाळून गावी विस्तारली...मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात...
नंदाताईंनी मिळवली प्रक्रिया उद्योगात...पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा...
बहुवीध पीक पद्धतीद्वारे जोखीम कमी...लातूर जिल्ह्यातील हेर येथील प्रयोगशील शेतकरी...
पाण्याचे महत्त्व ओळखूनच सुधारले पीक...सततच्या दुष्काळामुळे पाण्याचे उभे ठाकलेले संकट व...
दुष्काळातही बहरलेली बेलखेडेेंची...अत्यंत अभ्यासूवृत्ती, प्रयोगशीलता, तंत्रज्ञानाचा...
भाजीपाला पिकातून कळवंडे झाले...रत्नागिरी जिल्ह्यातील कळवंडे (ता. चिपळूण) गाव...
केशर आंबा बाग, मिश्रपिके,  अन...लातूर जिल्ह्यातील शिवणी बु. येथील पृथ्वीराज...
शेततळ्याच्या जोरावर फुलली २५ एकरांत...संत्रा शेतीत अग्रेसर म्हणून वाशिम जिल्ह्यातील...