ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचालकाची कार्यक्षमता वाढविणारी आधुनिक साधने

उपग्रह मार्गदर्शक आणि प्रकाश कांडी (Satelite Navigator and Light bar)
उपग्रह मार्गदर्शक आणि प्रकाश कांडी (Satelite Navigator and Light bar)

ट्रॅक्टरसाठी उपग्रह मार्गदर्शक आणि प्रकाश कांडी ही दोन महत्त्वपूर्ण जोड साधने आहेत. ही आधुनिक साधने चालकाला सततच्या हालचालीपासून मुक्त करतात आणि ट्रॅक्टर सतत इच्छित/सरळ मार्गावर ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे ट्रॅक्टरची कार्यक्षमता आणि कार्यकुशलता वाढण्यास मदत होते. जैविक संसाधनांचा कमीत कमी वापर व संवर्धन करणे, शेतीची उत्पादन क्षमता आणि गुणवत्ता वाढवणे तसेच मानवी कार्यक्षमता वाढवणे आणि वेळेत शेतीकामे पूर्ण करणे यासाठी ट्रॅक्टरला आता आधुनिक तंत्रज्ञानाची आणि साधनांची जोड देणे आवश्यक आहे. ओव्हरलॅपिंग क्षेत्र   ट्रॅक्टरचे कार्य चालू असताना ट्रॅक्टरचालकाचे अर्धे लक्ष मागे चालणाऱ्या यंत्राकडे असते. ट्रॅक्टरचालकाची मागे-पुढे बघण्याची ही कसरत चालूच असते. यामध्ये ट्रॅक्टर आणि यंत्र यावर नियंत्रण ठेवणे अवघड होते आणि ट्रॅक्टर सरळ रेषेतून बाहेर जाण्याचे प्रमाण वाढते. ट्रॅक्टर सरळ रेषेत आणि समांतर न चालल्यामुळे छायाचित्र १ मध्ये दाखवल्याप्रमाणे शेताच्या काही भागाची पुन्हा मशागत केली जाते याला ओव्हरलॅपिंग तसेच काही भाग बिगर मशागतीचा राहून जातो, त्याला मिसिंग असे म्हणतात. ओव्हरलॅपिंग किंवा मिसिंग फक्त मशागतीपुरते मर्यादित नसून पेरणी, फवारणी आणि कापणी इ. करताना देखील होते. उपग्रह मार्गदर्शक आणि प्रकाश कांडी (Satelite Navigator and Light bar)

  •  ट्रॅक्टरची आणि यंत्राची कार्यक्षमता व कार्यकुशलता वाढवण्यासाठी तो सरळ रेषेत चालणे महत्त्वाचे असते. ट्रॅक्टरला वेगवेगळी यंत्रे जोडून शेतीची मशागत, वखरणी, पेरणी, कोळपणी, फवारणी व कापणी इ. कामे केली जातात. फवारणीसाठी दोन किंवा अधिक नोझल असलेले बूम फवारणी उपकरण ट्रॅक्टरला जोडले जाते.
  • ट्रॅक्टरला जोडली जाणारी सर्व अवजारे आणि यंत्रे ही वेगवेगळ्या रुंदीची असतात. त्यावरून या साधनांची कार्यक्षमता ठरते. समजा शेतीची मशागत ट्रॅक्टरच्या साहाय्याने जोडलेल्या २.७ मीटर रुंदीच्या कल्टीवेटरने करावयाची आहे.
  • पहिल्या फेरीत कल्टीवेटरने २.७ मीटर रुंद जमिनीचा (मातीचा) वरचा थर कट केल्यानंतर त्याशेजारील फेरीत पहिल्या फेरीत केलेल्या भागाच्या लगोलग दुसरा कट आला पाहिजे, पण ट्रॅक्टरचालकाच्या नकळत पूर्वी कट केलेल्या ५-१० टक्के भागाची पुन्हा मशागत केली जाते. यामुळे ट्रॅक्टरची आणि यंत्राची कार्यक्षमता कमी होते.
  • या प्रणालीचा मुख्य उद्देश ऑपरेटरला क्षेत्र नकाशा प्रत्यक्ष कामाच्या वेळी दाखविणे हा आहे.
  • उपग्रह मार्गदर्शक कार्यपद्धती

  • उपग्रह मार्गदर्शकामध्ये प्रामुख्याने मार्गदर्शक स्क्रीन, वीजपुरवठा केबल, जीपीएस आणि अँटेना इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.
  • मार्गदर्शक स्क्रीन ही वेगवेगळ्या आकारात (१० सें.मी. पासून ३० सें.मी. पर्यंत) आणि प्रकारात (टचस्क्रीन) बाजारात उपलब्ध आहेत, तसेच त्या सोबत इंटरनेट जोडण्याची सुविधा ही उपलब्ध असते.
  • ही स्क्रीन ट्रॅक्टर केबिनमध्ये चालकाच्या नजरेसमोर कुठलाही अडथला न होता बसवली जाते. स्क्रीनच्या मदतीने ट्रॅक्टर शेताच्या कोणत्या भागात तसेच सरळ रेषेत चालत आहे का नाही याची माहिती मिळते.
  • उपग्रह मार्गदर्शक प्रणालीचा वापर

  • उपग्रह मार्गदर्शक सेटअपमध्ये प्रामुख्याने जीपीएस अँटेना (ट्रॅक्टरच्या मध्य बिंदूपासून ॲंटेनाचे अंतर) आणि यंत्राची संपूर्ण रुंदी या किमती भरणे गरजेचे असते. उपग्रह मार्गदर्शकाला एक विशिष्ट मेमरी असते, त्यात केलेले कार्य जतन करण्याची तरतूद असते. इच्छित ऑपरेशन/कार्य पूर्ण केल्यानंतर, एका फाइलमध्ये मार्गदर्शक स्वतःहून ऑपरेशन्स जतन करते.
  • उपग्रह मार्गदर्शकामध्ये पॅरलल-ट्रॅकिंग किंवा सरळ परस्पर चालणे आणि वर्तुळाकार अशा दोन पद्धती उपलब्ध आहेत. साधारणपणे, ट्रॅक्टरवर बसवलेली जीपीएस प्रणाली उपग्रहाकडून भौगोलिक स्थिती म्हणजेच लोकेशन मिळवत असते.
  • हे लोकेशन मार्गदर्शक प्रणालीला केबलच्या साहाय्याने पुरवले जातात. ट्रॅक्टर ठराविक सरीमध्ये किंवा रेषेमध्ये चालत आहे की नाही हे मार्गदर्शक प्रदर्शन स्क्रीनवर दाखवले जाते. या प्रकारे ऑपरेटरला लगोलग संचलनाची माहिती मिळते व तो स्टेरिंगच्या साहाय्याने ट्रॅक्टरबरोबर ठराविक सरीमध्ये किंवा रेषेमध्ये चालवतो.
  • या प्रणालीमध्ये ओव्हरलॅप तसेच कार्यातून गहाळ म्हणजेच सुटलेले क्षेत्र सहजरीत्या मार्गप्रदर्शन स्क्रीनवर नकाशाच्या स्वरूपात किंवा रंगीत छटांमध्ये प्रदर्शित केले जाते.
  • प्रकाशकांडी प्रणाली

  • प्रकाशकांडी प्रणाली हे पॅरलल-ट्रॅकिंग (समांतर संचलन) उपकरण म्हणून ओळखले जाणारे एक मार्गदर्शन तंत्र आहे.  ३० से.मी. ते ४५ से.मी. लांब एका प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये छोटे छोटे प्रकाश उत्सर्जक बल्ब एका आडव्या सरळ रेषेत व्यवस्थितपणे मांडलेले असतात.
  • साधारणपणे प्रकाशकांडी ऑपरेटरच्या नजरेच्या अगदी समांतर, मध्यभागी किंवा बाजूला बसवली जाते. ट्रॅक्टर चालवित असताना चांगल्या प्रकारे प्रकाशकांडी दिसण्यासाठी प्रकाशकांडीच्या मध्यभागी असलेला बल्ब हा हिरवा आणि किंचित मोठा तर बाजूचे बल्ब हे लाल रंगाचे असतात आणि छोटे असतात.
  • ही प्रणाली सॉफ्टवेअरद्वारे जीपीएस प्रणालीशी जोडलेली असते. ट्रॅक्टर ऑपरेटरला शेजारी केलेल्या ओळीच्या संदर्भात त्यांची स्थिती दाखवण्यात मदत करते आणि स्टीयरिंग ॲडजस्टमेंटची गरज ओळखण्यासाठी मदत करते.
  • ट्रॅक्टर चालवताना बसवलेल्या जीपीएस सिस्टिम प्रकाशकांडी केबलच्या साहाय्याने लोकेशन पुरवत असतो, नंतर मग ट्रॅक्टर ठरलेल्या रेषेमध्ये चालत आहे की नाही हे प्रकाशकांडीमध्ये पाहिले जाते.
  • जर प्रकाशकांडीमध्ये बरोबर मधोमध असणाऱ्या हिरव्या रंगाचा दिवा जळत असेल तर ट्रॅक्टर प्रदर्शित केलेल्या इच्छित दिशेत आहे आणि याउलट जर लाल रंगाचा दिवा जळत असेल तर ट्रॅक्टर हे पूर्व निश्चित केलेल्या मार्गावरून भटकत आहे असे समजले जाते.
  • प्रकाशकांडी प्रणालीचा वापर

  • ट्रॅक्टर सरळ चालवायचा की, वळण असणाऱ्या शेतात चालवयाचा ही माहिती आधी इनपुट म्हणून द्यावी लागते. प्रणालीमध्ये प्रथमतः प्रारंभिक माहिती देणे आवश्यक आहे, जसे ऑपरेशनचे प्रकार, मशिनची रूंदी, जीपीएस रिसीव्हरची जागा किंवा ट्रॅक्टरच्या मध्य बिंदूपासून त्याचे अंतर आणि शेतीतील कार्याचा अवलंब इ. मशिनची रूंदी किंवा ओव्हरलॅप नेहमी शेतीतील ऑपरेशन प्रकारावर अवलंबून असते. उदा. नांगरणी करताना ओव्हरलॅपची गरज नसते आणि मशिन वळवणेही सोपे असते, कारण बहुतांशी यंत्रांची ऑपरेटिंग रुंदी हिही ट्रॅक्टरच्या रुंदीपेक्षा कमी असते.
  • ऑपरेशन पुन्हा अचूक त्याच ठिकाणाहून सुरू करण्यासाठी व जैविक संसाधनांच्या योग्य प्रकारे वापरासाठी उपग्रह मार्गदर्शक आणि प्रकाशकांडी सिस्टिम मदत करते.
  • फायदे आणि बचत

  • या प्रणालीचा वापर करून इंधन, बियाणे, खते, रसायने आणि मजूर इ. कृषी निविष्ठांचा अचूक व योग्य वापर करून आर्थिक उत्पन्न वाढवता येईल. दरम्यान, ट्रॅक्टरचा व इतर संसाधनाचा वापर कमी होण्याबरोबरच मानवी श्रम ही कमी होईल.
  • काही संशोधनाप्रमाणे २ ते ७ टक्क्यांपर्यंत कृषी निविष्ठांची बचत करता येते. कृषी निविष्ठांची बचत ही शेताचा आकार, उपकरणाचा आकार आणि कार्याचा स्तर इ. अवलंबून असते.
  • आंतरमशागतीमध्ये गहाळ (मिसिंग एरिया) आणि ओव्हरलॅप होणाऱ्या क्षेत्राची टक्केवारी कमी केली जाऊ शकते. उपग्रह मार्गदर्शक वापरून ट्रॅक्टरची कार्यक्षमता वाढवली जाऊ शकते. याशिवाय ऑपरेटरकडून अत्यंत अचूक आणि योग्य कार्य करून घेण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे.
  • संपर्क ः आशिष धिमते, ९५१८९०१०२७ (आशिष धिमते केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद येथे शास्त्रज्ञ असून मोदी शेती यंत्रसामग्री आणि ऊर्जा अभियांत्रिकी विभाग, पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना येथे पीएच.डी. स्कॉलर आहेत.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com