फूलशेती, फीलर्ससह दुग्धप्रक्रिया, पोल्ट्रीतून एकात्मिक शेती फुलवली

खव्याची घरीच विक्री, घरपोचही.. परिसरात आपल्या खव्याला चांगली अोळख देण्यात आठरे यशस्वी झाले आहेत. परिसरातील नागरिक, व्यावसायिक घरी येऊन १६० ते १८० रुपये प्रतिकिलो दराने खवा घेऊन जातात. दर्जा चांगला असल्याने नगरसह नजीकच्या भागातूनही व्यापारी खव्याची मागणी करतात. मागणीनुसार खवा घरपोचही दिला जातो.
-आठरे यांची संरक्षित फूलशेती
-आठरे यांची संरक्षित फूलशेती

कौडगाव (आठरे) (जि. नगर) येथील आठरे कुटुंबाचे अवघे दोन एकर क्षेत्र अाहे. त्यात गुलाब, जरबेरा व फीलर्सची शेती, दुग्ध व्यवसाय, प्रक्रियेतून खवा निर्मिती, पोल्ट्री, आदी विविध उद्योगांतून त्यांनी शेतीचे अर्थकारण समृद्ध केले आहे. घरच्या सदस्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पेलून मजूर समस्या कमी केली आहे. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत कष्ट उपसत उत्पन्नाचे विविध स्त्रोत निर्माण करणाऱ्या या कुटुंबाची शेती प्रेरणादायीच आहे . नगर जिल्ह्यातील पाथर्डी हा कायम दुष्काळी असलेला तालुका. येथील कौडगाव (आठरे) येथील संतोष आणि महादेव या आठरे बंधूंची अवघी दोन एकर (८६ गुंठे) जमीन आहे. भागात पाण्याची कायमच टंचाई. त्यामुळे पारंपरिक पिके घेण्यावरच भर. बहुतांश कुटुंबांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिली आहे. आठरे कुटुंबाची प्रयोगशील शेती नगर येथील खासगी शिक्षण संस्थेत संतोष कार्यरत आहेत. मात्र, सध्या शेतीचाच विकास करण्यासाठी त्यांनी दीर्घ रजा घेतली आहे. त्यांचे एमएपर्यंत शिक्षण झाले आहे. सन २०१४ मध्ये त्यांनी १० गुंठे क्षेत्रावर पॉलिहाऊस उभारले. त्यात गुलाबाची लागवड केली. दोन वर्षे विक्री साधली. मात्र, मध्यंतरी नोटाबंदी, त्यानंतर घसरलेले दर, तीव्र पाणीटंचाई आदी कारणांमुळे फूलशेती थांबवावी लागली. काकडीचा प्रयोग भोसे, त्रिभुवनवाडी, खांडगाव, लोहसर भागांतील तरुणांचा गुलाब लागवडीत सहभाग होता. सर्व जण एकत्र येऊन वाहनातून दिवसाआड विक्रीला फुले पाठवत. पण, गुलाब शेती थांबवल्यानंतर २०१६ मध्ये पॉलिहाऊसमध्ये काकडीची लागवड केली. त्याचे साधारण ८ टन उत्पादन मिळाले. परिसरातील आठवडी बाजारात विक्री करून ठोक बाजारापेक्षा दीडपट ते दुप्पट म्हणजे सरासरी ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दर मिळवला. जरबेरा व फीलर्सची शेती त्याच काळात दहा गुंठ्यांचे शेटनेट उभारले. आता त्यात गुलाब, तर पॉलिहाऊसमध्ये जरबेरा फुलांची लागवड केली आहे. वर्षभरापासून दर तीन दिवसांनी जरबेराच्या प्रत्येकी दहा फुलांच्या शंभर गड्‌ड्‌या ते औरंगाबादला पाठवतात. त्यास सरासरी ३० ते ७० रुपये दर मिळत आहे. स्प्रिंगर व कामिनी फीलर्स गुलाब, जरबेरासोबत विविध कार्यक्रमांत मंच डेकोरेशन व बुकेसाठी स्प्रिंगर व कामिनी या फीलर्सनाही अधिक मागणी आहे. बाजारपेठेची मागणी अोळखून आठरे यांनी वर्षभरापूर्वी तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथून फीलर्सची प्रत्येकी एक हजार रोपे आणून सतरा गुंठ्यांवर लागवड केली. आता ते गुलाब, जरबेरासोबत या फीलर्सच्या प्रत्येकी वीस काड्याची स्वतंत्र गड्डी करून प्रत्येकी पंचवीस रुपयांना विक्री करतात. तीन दिवसांमागे प्रत्येकी पन्नास गड्ड्या औरंगाबाद, हैदराबाद येथे पाठवतात. दोन्ही फीलर्सची परिसरात पहिल्यांदाच लागवड झाली असावी. शेततळ्याचा आधार पाणी व्यवस्थेसाठी शेतापासून बऱ्याच अंतरावर विहीर आहे. त्यामुळे ४० हजार लिटर क्षमतेची सिमेंट टाकी बांधली आहे. त्यालाच ठिबक यंत्रणा जोडली आहे. पॉलिहाऊस उभारणीनंतर २०१६ साली २५ लाख लिटर क्षमतेचे शेततळे उभारले आहे. मागील दोन वेळा या भागांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईत शेततळ्याच्या आधारावर फूलशेती आणि दुग्ध व्यवसाय जगवणे शक्य झाले. अतिरिक्त उत्पन्नासाठी गावरान पोल्ट्री पाथर्डी तालुक्‍यातील बहुतांश भागाला सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. करंजी, कौडगाव आठरे, त्रिभुवनवाडी, तिसगाव, देवराई भागांत पाण्याची कायम टंचाई. यंदाही पाऊस नाही. त्यामुळे खरिपाची पिके कायम वाया जाण्याचा धोका असतो. त्यामुळे संतोष यांनी पोल्ट्रीतून उत्पन्नाचा आणखी एक पर्याय उभा केला आहे. अलीकडेच सहाशे गावरान कोंबड्यांचे पालन सुरू केले आहे. शेतीला फटका बसला, तरी पोल्ट्रीतून कमी पाण्यात अर्थकारण सुधारता येईल, हा त्यामागील हेतू आहे. खवा निर्मितीतून दुग्ध व्यवसायात फायदा सध्या दुग्धव्यवसाय सर्वत्र अडचणीचा ठरत आहे. सरकारने दर वाढवूनही गाईच्या दुधाला लिटरला २२ रुपयांपेक्षा अधिक दर मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आठरे कुटुंबाचा दुग्ध हा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यांच्याकडे सुरुवातीला चार गायी होत्या. त्यात २०१० पासून टप्प्याटप्प्याने वाढ केली. सध्या दहा दुभत्या गाई, दहा कालवडी आणि अन्य पाच अशी सुमारे पंचवीस जनावरे आहेत. दुधाला दर नाही ही स्थिती अोळखत त्यांनी दूध विकण्याएेवजी खवा निर्मिती करून विकण्याचा निर्णय घेतला आहे. आता यंत्राद्वारे खवा तयार केला जातो. सहा महिन्यांपासून दररोज दीडशे लिटर दुधापासून सुमारे तीस किलो खवा तयार केला जातो. संतोष यांच्या आई नर्मदा, वडील मधुकर, भाऊ महादेव, भावजय सविता यांची मोठी मदत यामध्ये होते. आठरे यांच्या शेती व्यवसायाची वैशिष्ट्ये

  • फुलांची मागणी वाढल्याने गणपती उत्सव काळात मुंबईला पाठवण्याचे नियोजन
  • सुरुवातीपासून ठिबकचा वापर, त्यामुळे कमी पाण्यात यशस्वी उत्पादन
  • शेणखताच्या वापरावर भर
  • पहाटे पाचपासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सारे कुटुंब विविध शेतीकामांत व्यस्त
  •  अॅग्रोवनचे नियमित वाचन, शेतीतले नवे प्रयोग समजावून घेण्यासाठी शेतकऱ्यांसोबत चांगले ‘नेटवर्क’
  • प्रतिक्रिया  हवामान, पाणी, शेतमालाचे दर, सरकारी धोरणे यांच्यामुळे शेती बेभरवशाची झाली अाहे. मात्र अल्प शेती, पाणीटंचाई अशा परिस्थितीत अतिव कष्ट करून वेगवेगळे प्रयोग, दुग्धप्रक्रिया आणि उत्पन्नाचे विविध स्त्रोत वाढवत शेती नफ्याची करण्याचा प्रयत्न केला आहे. दुष्काळातही उमेद जागवली आहे. -संतोष आठरे संपर्क- ९४०४०८१७८५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com