ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद जागवली 

दुष्काळात हार मानू नये... अर्जून सांगतात की पर्याय नसल्याने ऊसतोडणीचा व्यवसाय पंचवीस वर्षे केला. आई वडिलांनीही देखील हेच कष्ट उपसले. पण अखेर यातून किती काळ निभावणार, असा प्रश्न सतत पडायचा. कुक्कूटपालनाने खरंच दिशा आणि उमेद दिली. आता पूर्णवेळ शेतकरी झालो आहे याचे समाधान वाटते आहे. कोणत्याच शेतकऱ्याने उमेद हरवू नये. दुष्काळात हार मानू नये. धडपड सुरू ठेवावी. यश नक्कीच येईल.
केदार यांचे कुटूंब दुष्काळाशी लढत शेळीपालन व अन्य व्यवसायात गुंतले आहे.
केदार यांचे कुटूंब दुष्काळाशी लढत शेळीपालन व अन्य व्यवसायात गुंतले आहे.

शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील स्थिती यंदा फारच गंभीर आहे. तालुक्‍यातील वारणी येथील अर्जुन केदार यांना आपल्या तीस गुंठे क्षेत्रात जीवावरची कसरत करावी लागत आहे. पंचवीस वर्षे ऊसतोडणीचे काम केलेले केदार मोठ्या जिद्दीने पूर्णवेळ शेती करताहेत. त्यात नवे घडवण्याचा प्रयत्न आहे. भाजीपाला शेती पाण्याअभावी थांबली असली तरी जिद्दीने कुक्कूटपालन, शेळीपालन करीत त्यांनी  शेतीत नवी उमेद मात्र जपली आहे.  नगर जिल्ह्यातील दुष्काळी असलेल्या पाथर्डी तालुक्‍याला जोडून बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुका आहे. सिंचनाचा अभाव असल्याने येथील शेती पाण्याच्या भरवश्‍यावर असते. त्यामुळे या भागातील बहूतांश शेतकरी कुटूंबे ऊसतोडणीचे काम करतात. तालुक्यातील वारणी येथील अर्जुन नामदेव केदार यांनादेखील नाईलाजास्तव तब्बल पंचवीस वर्षे ऊसतोडणीचे काम करावे लागले. मात्र त्यातून आयुष्य स्थिर नव्हते. खडतर कष्ट होते, पण त्या मानाने आर्थिक परतावा काहीच नव्हता. अखेर तीन वर्षांपूर्वी पूर्णवेळ शेतकरी होऊन स्वतःच्याच ३० गुंठ्यांतून चांगल्या उत्पन्नाची हमी मिळवावी असे त्यांनी ठरवले.  शेतीतील उमेद वाढली  उसतोडणीचे काम सुरूच असताना २००५ मध्ये पाचशे कोंबडीपालन क्षमता असलेले शेड त्यांनी बांधले होते. त्यासाठी बैल विकून भांडवल उभे केले. तीनशे देशी कोंबड्यांचे पालन सुरू केले. कोंबडी विक्रीतून पस्तीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. शेतीतील उमेद त्यातून वाढली.  धडपड सुरूच राहिली  कोंबडीपालनाचा व्यवसाय तब्बल दहा वर्षे सुरूच राहिला. त्या काळात भाकड म्हशींचे संगोपन करून त्या गाभण राहिल्या की विकायच्या, असा व्यवसाय सुरू केला. शेडमध्ये कोंबड्यांची पैदास व विक्रीही सुरू होतीच.  संघर्षातून नव्या शेडची उभारणी  साधारण २०१५ च्या सुमारास ऊसतोडणी व्यवसाय थांबवला. मात्र त्या वर्षी पशुसंवर्धन विभागाच्या योजनेतून एकहजार पक्षी क्षमतेच्या शेड उभारणीसाठी अनुदान मिळाले. त्यासाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च करून शेड बांधले. जरी अनुदान मिळाले तरीही पुरेसे भांडवल नसल्याने त्यावर्षी बैल विक्री करून ५२ हजार रुपये उभे करावे लागले. उर्वरित भांडवलासाठी पुन्हा ऊसतोडणी करण्याचा निर्णय घेतला. मोठी धडपड करत नव्या शेडची उभारणी केली.  पूरक व्यवसायांची जोड  अर्जुन यांच्या कुटूंबात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. सगळे मिळून आज शेतीला हातभार लावतात. तीस गुंठ्यांत शेती, कोंबडीपालन व शेळीपालन असा पसारा उभा केला आहे. सुमारे पंधराशे लेअर पक्षी आहेत. महिन्याला सुमारे ४०० ते ५०० पक्षांपर्यंत विक्री होते. त्यातून सुमारे १० हजार रुपयांचा मोठा आधार मिळतो. बहुतांश विक्री बांधावरच होत असल्याने त्यासाठी स्वतंत्र कोठे जावे लागत नाही.  शेळीपालनाची जोड  सध्या सात ते आठ शेळ्या आहेत. शक्यतो बोकडाची तीनशे रुपये प्रति किलो दराने विक्री होते.  कोंबडीपालनाला या व्यवसायाची जोड मिळाल्याने उत्पन्नातही वाढ झाली आहे.  भाजीपाला शेती संकटात  साधारण १५ गुंठे टोमॅटो, १० गुंठे मिरची असे क्षेत्र असते. सातही दिवस दररोज बाजारात स्वतः बसून थेट विक्री करण्याचे कष्ट अर्जून उचलतात. त्यामुळे नफ्याचे प्रमाण वाढते. दररोज सुमारे एकहजार ते पंधराशे रुपयांचे एकूण उत्पन्न मिळते. मात्र यंदा पाऊस जवळपास झालाच नाही. त्यामुळे पाणीच नाही. अशावेळी भाजीपाला शेती थांबवली असल्याचे अर्जून यांनी सांगितले. कोंबडी व शेळीपालन शेडच वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यासाठी विंधन विहीर खोदली आहे. पाण्याचा वापर काटेकोर व्हावा म्हणून ठिबक सिंचनही केले आहे. दिलासादायक बाब म्हणजे कुक्कूटपालन व ऊसतोडणीतील उत्पन्नातून दहा गुंठे जमीन घेतली आहे. दहा गुंठ्यांवर शेळ्यांसाठी चारा लागवड केली आहे.  आत्मविश्वास उंचावला  अर्जून सांगतात की पर्याय नसल्याने ऊसतोडणीचा व्यवसाय पंचवीस वर्षे केला. आई वडिलांनीही देखील हेच कष्ट उपसले. पण अखेर यातून किती काळ निभावणार, असा प्रश्न सतत पडायचा. कुक्कूटपालनाने खरंच दिशा आणि उमेद दिली. आता पूर्णवेळ शेतकरी झालो आहे याचे समाधान वाटते आहे. भले उत्पन्न फार नसेल पण प्रयत्न सोडलेले नाहीत. कोणत्याच शेतकऱ्याने उमेद हरवू नये. दुष्काळात हार मानू नये. धडपड सुरू ठेवावी. यश नक्कीच येईल. मागील वर्षी पाऊस चांगला झाला होता. मागील वर्षी शेततळे घेतले होते. मात्र अनुदानाची रक्कम मिळाली नाही. अस्तरीकरणासाठी पुरेसे भांडवल नाही.  अशा परिस्थितीत पाण्याची शाश्‍वत सोय करणे शक्य नाही. तरीही चिकाटी कायम ठेवल्याचे अर्जून म्हणाले.  केदार यांच्याकडून शिकण्यासारखे 

  • अल्प शिक्षण असूनही अभ्यास, धडपडीतून पूरक व्यवसाय केले उभे 
  • दुष्काळी भाग असला तरी उमेद कायम 
  • पाण्याचे काटेकोर नियोजन  
  • संपर्क- अर्जून केदार - ९७६७६०५१३२   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com