agriculture story in marathi, integrated farming, rui, indapur, pune | Agrowon

एकेकाळचा मजूर परिवार झाला दोनशे एकरांचा बागायतदार
मनोज कापडे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

पुणे जिल्ह्यात इंदापूर भागातील रूई गावाच्या शिवारात येथील माने परिवाराने दोनशे एकरांवर शेती फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. एकेकाळी सालगडी म्हणून राबलेल्या श्रीरंग माने व त्यांच्या तिघा मुलांनी शून्यातून सुरवात करून शेती, सिंचन, दोनशे जनावरांचा दुग्धव्यवसाय व उद्योगविश्‍वात समृद्धी आणली. छोटे-मोठे व्यवसाय केले. संघर्षाचे अनेक प्रसंग आले. पण प्रत्येकातून स्वतःला सिद्ध करीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशवाटा उजळ केल्या आहेत. 

पुणे जिल्ह्यात इंदापूर भागातील रूई गावाच्या शिवारात येथील माने परिवाराने दोनशे एकरांवर शेती फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. एकेकाळी सालगडी म्हणून राबलेल्या श्रीरंग माने व त्यांच्या तिघा मुलांनी शून्यातून सुरवात करून शेती, सिंचन, दोनशे जनावरांचा दुग्धव्यवसाय व उद्योगविश्‍वात समृद्धी आणली. छोटे-मोठे व्यवसाय केले. संघर्षाचे अनेक प्रसंग आले. पण प्रत्येकातून स्वतःला सिद्ध करीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशवाटा उजळ केल्या आहेत. 

एके काळी पाच एकर खडकाळ शेती असलेले श्रीरंग माने रेडारेडणी गावात एकेकाळी सालगडी होते. घरची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने दशरथ, हरिश्चंद्र आणि विष्णूकुमार या त्यांच्या तीन मुलांनाही शेतमजुरी करावी लागली. गवत देखील न उगवणारी शेती. घरात खायला अन्न नाही. हाताला काम नाही. अशी स्थिती असतानाही आम्ही सर्व भाऊ संकटाला खचलो नाही. सन १९८० च्या सुमारास खडकवासला धरणाच्या कालव्यावर बारा आणे हजेरीने काम करीत होतो. भाऊ दशरथ हा पोटाला चिमटा काढून शिकत राहिला. मिल्ट्रीत भरती झाला. तो पैसे पाठवत असे. त्यातून एक सायकल घेतली. मग याच सायकलवरून बिस्कीट, गुडदाणी, भजी विकू लागलो. पुढे लोक वस्तू घेण्यासाठी घरी येऊ लागले. घरीच कपाटात किराणा वस्तू ठेवण्यास सुरवात केली. त्यातून रूई गावात आमच्या किराणा दुकानाचा जन्म झाला असे प्रयोगशील शेतकरी हरिश्‍चंद्र माने सांगतात. दशरथदादा बीए, विष्णूकुमार बारावी तर हरिश्चंद्र सातवीपर्यंत शिकले. तिघांनीही किराणा दुकानातच झोकून दिले. दशरथदादांनीही पूर्णवेळ भावांनाच साथ देण्याचे ठरवले. 

त्या काळचा मॉलच.. 
आम्ही दुकानात केवळ किराणा वस्तू विकत नव्हतो. तर लोकांच्या सुखदुखाला धावून जायचो. विश्वास हेच आमचे भांडवल होते. त्यामुळे व्यवसाय वाढत गेला. पुढे भांडी, कपडे, ते तेल- तुपापर्यंत सर्व पदार्थ ठेऊ लागलो. रॉकेल विक्रीचा परवाना मिळाल्यानंतर पंचक्रोशीतील शेतकरी किराणा आणि रॉकेलसाठी दुकानात येऊ लागले. आमचे हे दुकान म्हणजे ग्रामीण भागात सुरू झालेला पहिला जणू मॉलच होता. शेतकरी वर्गाला महिन्याची नव्हे, तर वर्षाची उधारीची सवलत आम्ही द्यायचो असे हरिश्च्रंद्रकाका सांगतात. 

अडत प्रसिद्ध झाली 
किराणा व्यवसायातून आर्थिक प्राप्ती सुधारली. मग काही शेती विकत घेतली. त्यातून येणारे अन्नधान्य विकायला जायचे तेव्हा बाजारातील अडते-व्यापारी यांच्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक होते असे लक्षात आले. त्यातून दशरथदादांनी इंदापूरला अडत सुरू करण्याचे ठरविले. “उघड लिलाव, माल उतरताच पट्टी आणि सहा तासांत रोख पेमेंट ही पद्धत सुरू केली. त्यातून दशरथदादांची अडत प्रसिद्ध झाली. शेतकऱ्यांनी त्यांना बाजार समितीच्या निवडणुकीला उभे केले. ते चक्क सभापतीदेखील झाले. मला शेती जास्त आवडत होती. त्यात अधिक लक्ष घातले अशी आठवण काकांनी सांगितली. 

पाणी शेतात आणले 
काकांनी पुढे गावात शेजारची जमीन घेऊन विहीर घेतली. तेथून चार किलोमीटरवर पाणी नेले. ठिबकवर ऊस लावला. विशेष म्हणजे त्या काळात एकरी ८० ते १०० टन उत्पादनाचे प्रयत्न काकांनी केले. त्यामुळे त्यांचे शेत शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक क्षेत्र बनले. पुढे केळीची लागवड केली. पण पाणी कमी पडत असल्याने बागा जळू लागल्या. पाण्याचा मार्ग शोधण्याची गरज लक्षात आली. त्यासाठी उजनी धरणाचे पाणी शेतात आणण्याचा धाडसी निर्णय घेतला. सात किलोमीटरची पाइपलाइन करण्यासाठी सुमारे २९ लाख रुपये खर्च येणार होता. त्या वेळी जैन कंपनीने मदत करून सवलत दिली. पाणी वापर सोसायटीच्या माध्यमातून ३३ टक्के सवलत मिळाली. किराणा, अडती यातून साठवलेला पैसा उपयोगात आणून एका महिन्यात सात किलोमीटरची चारी खोदून पाणी शेतात आणले. 

शेती विस्तारली 
पाण्यामुळे आमच्या दारात सोनेच आले. कारण त्यामुळेच दहा एकर केळी लागवड झाली. त्यानंतर या शेतातून केळीची नऊ पिके घेतली. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे शेताला भेट देण्यासाठी आले. त्यांनी माने यांनी केलेल्या प्रयोगांची प्रसंशा केली. खरे शेतकरी तर तुम्ही आहात, आम्ही बांधावरचे शेतकरी आहोत असे गोपीनाथराव आनंदाने म्हणाले अशी आठवण काकांनी सांगितली. फळबागेतून चांगले उत्पन्न मिळत गेले. शेती वाढत गेली. सुमारे ३५ एकर डाळिंब, ५० एकर ऊस, १० एकर द्राक्षे, ४० एकर केळी अशी शेती विस्तारत गेली. सीताफळ, आंबे, मोसंबी, चिंच, पेरू, कलिंगडे अशा बागा केल्या. आता यातील बऱ्याच बागा अस्तित्वात नसतील. पण नवी लागवड वा प्रयोग थांबवलेले नाहीत. दुसऱ्या बाजूला आम्ही पशुपालनाकडेही लक्ष दिले. छोटा गोठा तयार केला. त्यात प्रयोग करीत राहिल्याने आता गोठ्यात गायींची संख्या तब्बल २०० पर्यंत पोचल्याचे हरिश्‍चंद्रकाकांनी अभिमानाने सांगितले. 

माने परिवारातील प्रत्येक सदस्य वेळ मिळेल तसे शेतीत लक्ष घालतात. सोनाई उद्योग समूहाचे सर्व प्रशासकीय कामकाज विष्णुकुमार पाहतात. तर सोनाई उद्योगाचे राज्यभर व देशातील जाळे भक्कम करण्याची जबाबदारी दशरथदादा यांनी उचलली आहे. एके काळी सायकलवरून फिरून किराणा माल विकणारे हरिश्‍चंद्रकाका खडकाळ जमिनीवर फुलविलेल्या नंदनवनात रमले आहेत. त्या वेळी खोपी होती. आता टुमदार बंगला झाला आहे. तेव्हा सायकल होती आता मात्र दिमतीला आलिशान कार आहे. अर्थात त्या काळापासूनच माणुसकी जपलेले व गरिबीची जाण असलेले काका आजही स्वभावाने साधेच असल्याचा अभिमान गावाला आहे. 

वादळातही प्रकाशवाट तयार केल्या
अन्न नाही म्हणून अन्नधान्याचे विक्री केंद्र सुरू करावे असे स्वप्न माने परिवाराने पाहिले. ते सत्यातदेखील आणले. पाणी नाही म्हणून सात किलोमीटरवरून ते उपलब्ध केले. राजकीय भावनेतून घरच्या गोठ्यातील दूध नाकारले गेल्याने स्वाभिमान दुखावलेल्या माने परिवाराने स्वतःची डेअरी सुरू केली. अथक कष्ट, बदलत्या बाजारपेठांचा अभ्यास व उद्यमशीलता यांच्या जोरावर तब्बल तीन हजार कोटींची उलाढाल असलेला डेअरी उद्योग उभा केला. घरचा ऊस नाकारणारा कारखाना पाहून त्यांनी स्वतःचा पाचशे टन क्षमतेचा गूळ पावडर कारखाना उभारला. समस्या आली त्या समस्येला सोडविणाऱ्या उपायांचे मालक व्हा, अशी जिद्द माने बंधूंनी ठेवली. सोनाई डेअरीच्या उदघाटनासाठी माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार आले. “तुम्ही वावटळीतदेखील कतृत्वाचे दिवे पेटवता आहात. अलीकडील काळात दूध व्यवसाय परवडणारा राहिलेला नाही. तुम्ही मात्र तो फायद्यात सुरू ठेवला आहे. या दूध प्रकल्पाच्या नफातोटा पत्रकाचा मलाही अभ्यास करायचा आहे, असे श्री. पवार या वेळी गंमतीने म्हणाले होते. माने परिवाराने खऱ्या अर्थानेच दूध, शेती, गूळ, पशुखाद्य अशा विविध क्षेत्रात आपल्या प्रकाशवाटा तयार केल्या आहेत. प्रत्येत उद्योग फायद्यात राहील असा त्यांच प्रयत्न राहिलेला आहे. 

माने यांच्या गोठ्यातील प्रयोग 

 • प्रयोग- मुक्त संचार पद्धतीने गोठ्याची बांधणी 
 • फायदा- कमी खर्चात जास्त दूध उत्पादनाचे लक्ष्य साध्य होते. 
 • गोठ्यात २०० जनावरांसाठी मजुरांना स्वतंत्र कामे. एकाने धारा काढणे, दोघांनी सतत शेण उचलणे, दोघांनी खाद्य सामुग्रीचे काम करणे, एकाने शेतातून वैरण-चारा गोठ्यापर्यंत आणणे असे कामाचे वाटप. 
 • त्याचा फायदा म्हणजे मजुरांना आपापल्या कामांवर लक्ष ठेवता येते. सर्व कामे वेळेत आणि चांगली होतात. 
 • भरपूर हवा व जागा, तीन दिशांना गव्हाणी बांधल्या. गारवा, स्वच्छ पाणी, आजूबाजूला झाडे, बगळे-कावळे व किडी खाणाऱ्या पक्षांसाठी अनुकूल वातावरण 
 •  त्याचा फायदा- जनावरांना आजार होत नाहीत. गोठ्यातील कीड-गोचिड-माश्यांवर नियंत्रण. दुर्गंधी येत नाही. भरपूर जागेमुळे गोठ्यात थेट ट्रॅक्टर आणून खाद्य देता येते. तीनही दिशांना गव्हाणीची व्यवस्था केल्याने जनावरे मुक्तपणे फिरतात. 
 • गोठ्यात विविध कक्षांची उभारणी. त्यात दुभतीस गाभण, नुकतीच जन्मलेली, मध्यम वयाची अशा जनावरांचा समावेश. 
 • त्याचा फायदा- प्रत्येक गटातील जनावरांची स्वतंत्र काळजी घेता येते. औषधोपचार, निगा, खुराक यांचे नियोजन सोपे जाते. 
 • जनावरांना सतत स्वच्छ पाणी आणि अंघोळ, गोठ्यात २० टक्के कोबा आणि ८० टक्के वाळलेल्या शेणाच्या लादीचे सपाट आवार 
 • फायदा - स्नान आणि स्वच्छ पाणी सेवनामुळे दूध उत्पादनात वाढ. शेणलादीच्या आवारामुळे जनावरे हवे तेव्हा चांगली हिंडतात. खाली बसल्यावर जखमा होत नाहीत. 
 • मिल्किंग मशीनचा वापर. जनावरांना गट व गरजेनुसार आपल्याच कंपनीचे दर्जेदार पशुखाद्य. याशिवाय मका, ज्वारी, ऊस, कडवळीचा खुराक. 
 • फायदा- यंत्रामुळे दूध लवकर दूर काढून तातडीने कुलरकडे नेता येते. पशुखाद्य व हिरव्या खुराकमुळे संगोपन खर्चात किंचित वाढ होते. मात्र दूध उत्पादनात मोठी वाढ होते. 
 • सर्व सुविधा आणि नियोजन करताना प्रति गायीसाठी २० लिटर दुधाचे टार्गेट ठेवले 
 • फायदा- सध्या सुंमारे ४० गायी टार्गेटप्रमाणे दूध देतात. दररोज ८०० लिटर दुधाचा डेअरीला पुरवठा होतो. सध्या १६० जनावरे गाभण किंवा वाढीच्या अवस्थेत आहेत. 
 • मुऱ्हा रेड्याचे स्वतंत्र संगोपन 
 • फायदा- दुधाळ म्हशींची चांगली पैदास आणि निर्भेळ दुधाचे उत्पादन वाढते. 
 • कोणत्याही शेतकऱ्याला गोठ्यात मुक्त प्रवेश आणि माहिती दिली जाते. 
 • गोठ्यातील टीप्स आणि रचना अंमलात आणून शेतकऱ्यांना आपले गोठे सुधारणे शक्य होते. 

माळरानावर साकारलेल्या सिंचन व्यवस्थेची वैशिष्ट्ये 

 • खडकाळ जमिनीला सुपीक करण्यासाठी उजनी धरणातून सात किलोमीटरची पाइपलाइन 
 • पाणी नियोजनासाठी शंकर सहकारी पाणीपुरवठा सोसायटीची स्थापना 
 • सिंचन व्यवस्थापनात जैन इरिगेशनची मोलाची साथ 
 • दोन शेततळी उभारली. अडीच एकरमध्ये एक शेततळे उभारून आठ कोटी लिटर्स पाणी साठविले जाते. 
 • एक एकरवर दुसरे शेततळे बांधून यातून गुरूत्व पद्धतीने विविध पिकांना ठिबकने पाणी दिले जाते. 
 • शेततळ्यांच्या पाण्याचे चांगले नियोजन करण्यासाठी २०० एकरांच्या रानात नऊ विहिरी खोदल्या. प्रत्येक विहिरीला सिमेंटची रिंग. 
 • जनावरांचे मल-मूत्र स्वतंत्र विहिरीत सोडून त्यालाच शेणस्लरीच्या मोठ्या टिपाचा दर्जा दिला. या विहिरीतील शेणस्लरीचे पाणी सर्व पिकांना देत रासायनिक खतांचा वापर कमी केला.  

हरिश्चंद्रकाकांच्या टीप्स 

 • शेतीत पाणी कसे उपलब्ध करता येईल ते पाहा 
 • प्रयोगांची सतत माहिती घ्या. ॲग्रोवन वाचा. कृषी मेळावे, शास्त्रज्ञांच्या बैठकी, विद्यापीठे, संशोधन केंद्रांना भेटी अत्यावश्यक आहेत. 
 • मलाच खूप कळते अशी धारणा शेतीत ठेवू नका. एखाद्या मजुराकडे तुमच्यापेक्षाही जास्त ज्ञान असू शकते. 
 • गरजेपुरतेच कर्ज काढा. कर्जफेड वेळेत आणि नव्या प्रयोगांसाठी कर्ज घ्यावे. त्यामुळे मोठी कामे होतात. 
 • गावाच्या राजकारणात भाग घेतला तरी त्यात माणुसकी आणि सामाजिक भावना ठेवावी. दंगामस्ती, व्यसनाधीन व्यक्तींपासून दूर रहावे. 
 • गणगोत, मित्रांच्या सुखदुःखात कायम सहभागी व्हा. आई-वडिलांना जीव लावा. गावातील धार्मिक कार्यक्रमात सहभाग महत्त्वाचा ठरतो. 
 •  शब्दाने किंवा पैशाने कुणाच्या अडीअडचणी सुटत असल्यास शब्द टाकून किंवा पैसाअडका देऊन शेतकऱ्यांना मदत करा. 
 • अतिरेकी पद्धतीने कीटकनाशके, रासायनिक खतांचा वापर टाळावा. रासायनिक व सेंद्रिय दोन्ही पद्धतीने वापर करावा. 
 • पिकांची फेरपालट आवश्यक. मजुरांना जीव लावणे, निसर्ग जपणे महत्त्वाचे 
 • आयुष्यात पैसा आणि समाधान एकत्र हवे असल्यास कोणाचेही वाईट होईल असे कृत्य करू नका.  

माने कुटूंब बनले गावाचे भूषण 
रुई गावासाठी माने कुटूंब आदर्श आणि भूषणावह बाब समजली जाते. सोनाई दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथ हे कुटूंबाचा आधारवड तर त्यांचे चिरंजीव प्रवीण सामाजिक बांधिलकीतून राजकारण करतात. 
अतुल डेअरी उद्योगात आहेत. हरिश्चंद्र यांचे दुसरे बंधू विष्णूकुमार डेअरीच्या प्रक्रिया सांभाळतात. त्यांचे चिरंजीव दिग्विजय व हरिश्चंद्र यांचे चिरंजीव किशोर उद्योजक म्हणून प्रयत्नशील आहेत. फूड टेक्नॉलॉजी विषयातून एमटेक केलेले व सोनाई डेअरी उद्योगाचे पशुखाद्य उत्पादन युनिट सांभाळणारे किशोरराव अन्य वेळेत शेतीत रमतात. माने परिवाराने पंचक्रोशीत धार्मिक स्थळांच्या उभारणीत सहभाग घेतला. आर्ट ऑफ लिव्हिंगचे उपक्रम राबविले. गावासाठी स्व खर्चाने प्रशासकीय इमारत बांधत असून त्यात सोसायटी,बॅंक, अभ्यासिका, सभागृह आदी सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. 

संपर्क- हरिश्‍चंद्र माने - ९९२३५०२२२२ 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
स्ट्राॅबेरीची बाजारपेठ होतेय अधिक सक्षम महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...