गहू पिकासाठी संरक्षित पाणी, आंतरमशागत महत्त्वाची...

सध्याच्या काळात गव्हाच्या चांगल्या वाढीसाठी काटेकोर पाणी व्यवस्थापन आणि आंतरमशागतीवर भर द्यावा.
सध्याच्या काळात गव्हाच्या चांगल्या वाढीसाठी काटेकोर पाणी व्यवस्थापन आणि आंतरमशागतीवर भर द्यावा.

ज्या भागात पुरेशा पाण्याची उपलब्धता आहे, अशा ठिकाणी खरिपातील कांदा तसेच ऊस पिकानंतर काही शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. सध्याच्या काळात गव्हाच्या चांगल्या वाढीसाठी काटेकोर पाणी व्यवस्थापन आणि आंतरमशागतीवर भर द्यावा. गव्हाची भारी जमिनीत लागवड केलेली असल्यास १८ दिवसांच्या अंतराने हा पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. मध्यम जमिनीसाठी १५ दिवसांच्या अंतराने सात पाळ्या द्याव्यात तर हलक्या जमिनीस १० ते १२ दिवसाच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात. परंतु, पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्था व या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनावर परिणाम होतो.

  • मुकुटमुळे फुटण्याच्या वेळी (पेरणीनंतर २१-२५ दिवसांनी): या वेळी जमिनीत पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे मुकुटमुळे कमी फुटतात. फुटलेल्या मुळ्या जास्त पसरत नाहीत. फुटवे कमी येतात. गहू काढणीस लवकर येतो. उत्पादनात घट येते.
  • फुटवे फुटण्याची अवस्था (पेरणी नंतर ५५-६० दिवसांनी): ओंब्या कमी बाहेर पडतात. बाहेर पडलेल्या ओब्यांची लांबी कमी होते. उत्पादनात घट येते.
  • पीक फुलोऱ्यात येणे (पेरणी नंतर ७०-८०- दिवसांनी): परागसिंचन कमी होऊन दाण्याची संख्या घटते.
  • दाण्यात चिक भरण्याची वेळ (पेरणीनंतर ९०-१०० दिवसांनी): या अवस्थेत दाणे पोसतात, त्यांचा आकार वाढतो. परंतु, जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार लहान होतो, वजन कमी होते.
  • दाणे टणक होण्याची अवस्था (पेरणी नंतर ११० दिवसांनी): या अवस्थेत जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार कमी होतो. दाण्यांवर सुरकुत्या पडून प्रत निकृष्ट होते.
  • पाणी नियोजन ज्या शेतकऱ्यांकडे पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध नाही अशा परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी अपुरे असल्यास व एक ते पाच पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पुढीलप्रमाणे पाणी द्यावे.

  • एक पाणी देणे शक्य असल्यास पेरणीनंतर २१-२५ दिवसांनी द्यावे.
  • दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी व दुसरे ५५-६० दिवसांनी द्यावे.
  • तीन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५-६० दिवसांनी तर तिसरे ७०-८० दिवसांनी द्यावे.
  • चार पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५-६० दिवसांनी तर तिसरे ७०-८० दिवसांनी द्यावे तर चौथे पाणी ९०-१०० दिवसांनी द्यावे.
  • पाच पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ४०-४५ दिवसांनी तर तिसरे ५५-६० दिवसांनी, चौथे पाणी ७०-८० दिवसांनी तर पाचवे ९०-१०० दिवसांनी द्यावे.
  • आंतरमशागत आणि खतमात्रा

  • पेरणी नंतर २१ ते ३० दिवसांनी एक खुरपणी आणि कोळपणी करून तण नियंत्रण करावे.
  • गव्हात चांदवेल, हरळी यांसारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता जरूरीप्रमाणे एक किंवा दोन खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. आंतरमशागतीमुळे तणांचे नियंत्रण होते. जमिनीत ओलावा टिकून रहातो.
  • खुरपणीनंतर शिफारशीत मात्रेपैकी उर्वरित नत्राची मात्रा द्यावी. बागायती वेळेवर पेरलेल्या गव्हास खुरपणी झाल्यानंतर (सर्वसाधारणपणे २१-३० दिवसांनी) प्रती हेक्टरी ६० किलो नत्र ( १३० किलो युरिया), बागायती उशिरा पेरलेल्या गव्हास प्रती हेक्टरी ४० किलो नत्र ( ८७ किलो युरिया) द्यावा.
  • पीक ५५ ते ७० दिवसांचे असताना १९:१९:१९ या विद्राव्य खताची दोन टक्के (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम १९:१९:१९ ) याप्रमाणे दोन वेळा फवारणी करावी. दाणे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची फवारणी करावी. (१०लि.पाण्यात २०० ग्रॅम युरिया)
  • उशिरा पेरणीचे नियोजन

  • गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी (१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर) निफाड ३४ (एनआयएडब्लू-३४), एकेएडब्लू-४६२७ किंवा फुले समाधान (एनआयएडब्लू १९९४) या सरबती जातींची लागवड करावी.
  • बागायती उशिरा पेरणीसाठी प्रती हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे लागते. रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह दोन चाढ्याच्या पाभरीने एकेरी पद्धतीने १८ सें.मी.अंतरावर पेरावे.
  • पेरणी करतेवेळी ४० किलो नत्र व ४० किलो संपूर्ण स्फुरद व ४० किलो पालाश म्हणजेच ८७ किलो युरिया,२५० किलो सिंगल सिंगल सुपर फॉस्फेट आणि ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. उर्वरित नत्राचा हप्ता ८७ किलो युरिया खुरपणी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी प्रती हेक्टरी पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावा.
  • पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रती १० किलो बियाणास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर आणि २५० ग्रॅम पीएसबी जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी. पेरणी उथळ म्हणजेच ५ ते ६ से.मी खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते.
  • पेरणी उभी-आडवी अशी दोन्हीबाजूने न करता एकेरी करावी. म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत.
  • संपर्क ः डॉ. आदिनाथ ताकटे , मो.९४०४०३२३८९ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com