प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजांसाठी अंडे सर्वोत्तम

प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजांसाठी अंडे सर्वोत्तम
प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजांसाठी अंडे सर्वोत्तम

आपल्या रोजच्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि लोह असे आवश्यक पोषक घटक मिळविण्याचा सोपा मार्ग म्हणजे अंडे. राष्ट्रीय पोषण संस्थेने पोषणाच्या दृष्टीने समतोल आहारात अंडी हा महत्त्वाचा भाग आहे, अशी शिफारस केली आहे. लोकांमध्ये अंड्यांच्या सेवनाबाबत जनजागृती तसेच अत्यल्प दरात उच्च दर्जाच्या प्रथिनांद्वारे कुपोषण दूर करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी जागतिक अंडी दिन साजरा करण्यात येतो. राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, गृहविभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विविध संस्था, उद्योग समूहांच्या सहकार्याने पशुसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी जागतिक अंडी दिनानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी आणि शाळेतील विद्यार्थी तसेच दवाखान्यातील रुग्णांना उकडलेल्या अंड्यांचे मोफत वाटप करण्यात येते.

जीवनसत्त्वांनी परिपूर्ण

  • डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक अ जीवनसत्त्व अंड्यात सुमारे १९ टक्के असते.
  • अंड्यातील ल्युटीन आणि झेक्झॅथिनमुळे डोळ्याची फ्री रॅडीकल्सपासून होणारी हानी थांबते. मोतीबिंदूसारख्या दृष्टिदोषाची जोखीम कमी करण्यास मदत होते.
  • रक्त साकळण्याची क्रिया स्वाभाविकपणे होण्यासाठी क जीवनसत्त्व अंड्यामध्ये असते.
  • शरीराची झीज भरून येण्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्व ब १, ब २, ब ६ व ब १२ अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात असते. हिमोग्लोबीन तयार होण्यासाठी जीवनसत्त्व ब १२ ची गरज असते. ते अंड्यातून नैसर्गिकरित्या मिळते.
  • अन्नपचन, मज्जातंतू मजबूत होण्यासाठी अंड्यातील ब जीवनसत्त्व उपयुक्त असते. दैनंदिन आहारात ड जीवनसत्त्व स्राेतांची ६०० आय.यू. ची आवश्यकता असते. बळकट दात आणि हाडे यासाठी ड जीवनसत्त्व आवश्यक आहे. दैनंदिन आहारात त्यापैकी ४१ आय. यू. एका अंड्यातून मिळतात.
  • अंड्यातील पौष्टिक घटक

  • कोंबडीच्या साधारण आकाराच्या अंड्यापासून सरासरी ६६ किलो कॅलरी ऊर्जा मिळते, ती मानवी आहारात लागणाऱ्या सरासरी ऊर्जेच्या ३ टक्के आहे.
  • अंड्याच्या प्रथिनांची गुणवत्ता ९३.७ टक्के. अंड्यांच्या प्रथिनांच्या पोषणाच्या बाबतीत आईच्या दुधानंतर दुसरा क्रमांक. प्रथिने हे मांसपेशीच्या वाढीकरीता तसेच नवीन पेशी तयार करण्यासाठी आवश्यक.
  • एका अंड्यामध्ये उत्तम दर्जाची ६.३ ग्रॅम प्रथिने असते. त्यात शरीरासाठी आवश्यक नऊ अमिनो आम्ले असतात. ही अमिनो आम्ले वाढत्या मुलांसाठी अत्यंत पोषक आहेत. उत्तम प्रतीची प्रथिने इतक्या कमी खर्चात देणारे अंडे हे एकमेव अन्न आहे.
  • लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम, सोडीयम, क्लोरीन, पोटॅशियम, सल्फर, मॅग्नेशियम, झिंक, कॉपर आणि आयोडीन ही ११ खनिजे आपल्या शरीराचे कार्य सुव्यवस्थित होण्यासाठी उपयुक्त ठरतात.
  • अंड्याच्या सेवनाने काही प्रमाणात कॅल्शिअमची कमतरता भरून येते.
  • अंड्यातील लोह शरीरातील लाल पेशी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते.
  • केसांची निकोप वाढ व नखांसाठी आवश्यक घटक अंड्यात आहेत.
  • अंडी सौंदर्यवर्धक असून, सौंदर्यप्रसाधने आणि औषधेनिर्मितीतील महत्त्वाचा घटक आहे.
  • भारतीय ऑम्लेट, बुर्जी, एग पॅटीस, अंडी वडा, एग चाट, बिर्याणी, एग फ्रेंच टोस्ट, अंडा करी, अंडा मसाला, एग पराठा, एग पॅन केक आदी पदार्थांना खवय्यांची विशेष पसंती मिळते.
  • अंडी उत्पादनाचा आलेख

  • भारतात सन २०१६-१७  या वर्षात ८,८१४ कोटी अंड्यांचे उत्पादन, तर महाराष्ट्रात ५४८ कोटी अंड्यांचे उत्पादन झाले.
  • अंडी उत्पादनात महाराष्ट्राचा देशात पाचवा क्रमांक. अंडी उत्पादनासाठी महाराष्ट्राला चांगली संधी आहे.
  • गर्भवतींसाठी उपयुक्त

  • गरोदर स्त्रियांच्या दृष्टीने अंड्यातील प्रथिने अतिशय महत्त्वाची आहेत. त्यामुळे गर्भाची वाढ नियमित आणि नैसर्गिकरीत्या होते. बाळाच्या अंगी रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होते.
  • अंड्याच्या बलकातील कोलीन गर्भाच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक ठरते. मेंदूपेशी निरोगी राहण्यासाठी आवश्यक फॉस्फोलिपीड्स हे कोलीनमुळे मिळते.
  • मुडदूस, अल्झायमर, हाडाची ठिसूळता आणि दोन प्रकारचे मधुमेह याची जोखीम कोलीनमुळे कमी होते.
  • दैनंदिन आहारात आवश्यक असलेल्या एकूण कोलीनपैकी २० टक्के कोलीन अंड्यात असते.
  • जन्मदोष कमी करण्यासाठी अंड्यातील फोलेट हा घटक उपयोगी आहे.
  • अंड्याचा बलक हा जीवनसत्त्वे, क्षार, लोह यांचा प्रमुख स्राेत. बाळांसाठीचा हा पहिला आदर्श घनआहार आहे.
  • वृद्ध व्यक्ती, रुग्णांसाठी फायदेशीर

  • अंड्यातील उत्कृष्ट प्रतीचे प्रथिने शरीरातील थकल्या भागलेल्या, झिजलेल्या आणि खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करून त्यांना संजीवनी देण्यासाठी आवश्यक.
  • अन्नाचे नीट पचन होऊन, रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी प्रथिनांची मदत. अंड्यातील प्रथिने ही दूध व मांसामध्ये असलेल्या प्रथिनांपेक्षा पचनास हलकी.
  • ट्रिप्टोफॅन आणि ट्रायरोसीन हे निद्रा हितकारक घटक अंड्यात असतात. मानवाचा कल आणि झोप यावर चांगला परिणाम घडवून आणतात.
  • शरीराची झीज होताना येणारा ताण-तणाव कमी करण्यासाठी तसेच प्रोस्टेट ग्रंथीची वाढ/ गाठ निर्माण होणे/कर्करोग यास प्रतिबंध करणारे सेलेनियम हे घटकद्रव्य अंड्यात असते.
  • नियमित अंड्याचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २४ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे.
  • खेळाडूंसाठी अंडी ऊर्जादायी

  • अंड्यात आवश्यक अमिनो आम्लाचे प्रमाण चांगले असते. त्यातील ल्युसीन हे मांसपेशीतील ग्लुकोज वापरण्यासाठी मदत करते. जर ल्युसीनची कमतरता असेल तर ग्लुकोज जास्त प्रमाणात वापरले जात नाही. त्यामुळे थकवा जाणवतो. परंतु, अंडे खाल्ल्याने ही कमतरता भरून निघते. मांसपेशीतील ग्लुकोजचा वापरही उत्तम रितीने होतो.
  • अंडी खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते. दिवसभर भूक लागली असे वाटत नाही. त्यामुळे स्थूलता वाढत नाही. जर स्थूलता वाढली तर मधुमेहाचा धोका वाढतो. अंड्याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
  • अंडी खा, सशक्त व्हा

  • रक्तात होणाऱ्या गाठी आणि हृदयविकार यांची जोखीम कमी करणारे घटक अंड्यात आहेत. अंड्यातील पेप्टाईड हे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
  • आहारात अंड्याच्या समावेशामुळे मानवी रक्तातील घातक कोलेस्टेरॉल एलडीएलचे प्रमाण कमी होऊन आवश्यक कोलेस्टेरॉल एचडीएलचे प्रमाण वाढते.
  • अंड्यातील कोलीन हा घटक शरीरात निर्माण होणारा दाह कमी करून हृदयरोगाची जोखीम कमी करण्यास मदत करतो.
  • निरोगी हृदयासाठी आणि पोषणासाठी आवश्यक असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड अंड्यात चांगल्या प्रमाणात असते.
  • आदिवासी क्षेत्रात स्वयम् प्रकल्प

  • अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण कमी करणे आणि पर्यायाने बालकांचा विकासासाठी कुक्कुटपालनविषयक स्वयम् हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रातील १६ जिल्ह्यांमधील एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात १०४ पक्षी संगोपन केंद्रे (मदर युनिट) स्थापन करण्यात येत आहेत.
  • या केंद्रांमार्फत आदिवासी लाभार्थ्यांना कुक्कुट पक्षी देऊन या पक्ष्यांपासून उत्पादित होणारी अंडी अंगणवाड्यातील मुलांच्या आहारात पुरवठा करण्यात येणार आहे.
  • हा प्रकल्प आदिवासी विकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, ग्रामविकास विभाग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्याद्वारे संयुक्तरीत्या राबविण्यात येत आहे.
  • संपर्क ः डॉ. व्यंकटराव घोरपडे, ९४२२०४२१९५ (सहायक आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्तालय, औंध, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com