पीक, पूरक उद्योगांवर दिसतोय तापमानवाढीचा परिणाम

हवामानबदलामुळे पीक उत्पादनावर परिणाम दिसू लागले अाहेत.
हवामानबदलामुळे पीक उत्पादनावर परिणाम दिसू लागले अाहेत.

सद्यस्थितीमध्ये दर वर्षी कमाल व किमान तापमानामध्ये वाढ होताना दिसत आहे. वैश्‍विक तापमान १.४ ते ५.८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान वाढणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. हवामानबदलामुळे पावसाची अनियमितता वाढली असून, दोन पावसांतील कोरडे अंतर वाढणे किंवा अचानक अतिवृष्टी यामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होताना दिसतो.

तापमानवाढीचे परिणाम मनुष्य, प्राणी, शेती, मत्स्य उत्पादन; तसेच यावर अवलंबून असणाऱ्या घटकांवर होत आहेत. औद्योगीकरणामुळे प्लॅस्टिक, रबर, रसायने यांचा अतिवापर, स्वयंचलित वाहनांचा वाढता वापर, जंगलाचे कमी होणारे क्षेत्र, वाढते शहरीकरण व जिवाश्‍म इंधनाचा अमर्याद वापर इत्यादींमुळे तापमानात वाढ होत आहे.

हरितगृह वायूचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या वायूंमध्ये कार्बन डाय ऑक्‍साइड, मिथेन, नायट्रस ऑक्‍साइड, क्‍लोरोफ्लुरो कार्बन, हायड्रो फ्लुरोकार्बन, सल्फर हेक्‍झाफ्लोराइड, मिथील ब्रोमाइड, फ्रीयॉन गॅस यांचा प्रामुख्याने समावेश होतो. पृथ्वीवरील तापमान नियंत्रित व स्थिर ठेवण्यामध्ये ओझोन वायू महत्त्वाचा आहे.

ओझोन थर महत्त्वाचा ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी संरक्षक थर आहे. यामुळेच पृथ्वीचे आयुष्यमान व तापमान स्थिर राहण्यास मदत होते. सूर्यापासून येणारी काही घातक अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे गाळली किंवा रोखली जातात. अतिनील किरण रोखले गेले नसते तर त्वचेचा कर्करोग, डोळ्यांचे विकार, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे इत्यादी समस्यांत वाढ झाली असती. याचबरोबरीने एकूणच जीवसृष्टीचा नाजूक समतोलही बिघडण्याची शक्‍यता आहे.

वातावरणातील ओझोन वायूचा थर कमी होत असून, त्याचा विपरीत परिणाम मानव, प्राणी व मासे यांच्यावर होत असल्याचा निष्कर्ष मारीया मोलीना आणि शेरवूड रोलॅंड या अमेरिकन शास्त्रज्ञांनी १९९४ मध्ये काढला. औद्योगिक कारणांसाठी निर्माण केलेल्या क्‍लोरो फ्लुरो कार्बन (सीएफसी) वायूमुळे त्याला धोका पोचू शकतो, असे त्यांनी मत मांडले. सीएफसी वायू १६ ते २५ किलोमीटर उंचीपर्यंत जाऊ शकतो. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्याचे विघटन होऊन त्यातील क्‍लोरीन वेगळा होऊन तो ओझोनशी प्रक्रिया करून ओझोनचा थर नष्ट करेल, असा इशारा रोलॅंड आणि मोलीना यांनी दिला होता.

अंटार्क्‍टिकावरील ओझोनच्या थराचा विस्तार १९६०च्या तुलनेत तब्बल ३५ टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे धक्कादायक निष्कर्ष १९८४ मध्ये ब्रिटिश अभ्यासक जो फार्मन, ब्रायन गार्डीनर व जोनेथन शांकलीन यांनी मांडले. यामुळे खऱ्या अर्थाने ओझोनच्या थराची तीव्रता जगापुढे आली. त्यानंतर ओझोनच्या थराला वाचविण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू झाले. १९८७ व त्यानंतर जगभरातील प्रतिनिधींच्या बैठका झाल्या. बहुतांश देशांनी सीएफसी वायूवापरावर बंदी आणण्याच्या माँट्रीएल करारावर सह्या केल्या.

दरम्यानच्या काळात १९८५ नंतर ओझोनच्या थराला पडलेल्या छिद्राचा आकार २००६ पर्यंत वाढतच गेला. मात्र माँट्रीएल करारानुसार ओझोन वायूला घातक असलेल्या सीएफसी वायूची निर्मिती घटत गेल्यामुळे २००६ नंतर ओझोनला पडलेल्या छिद्राचा आकार कमी होत आहे ही जरी सुखद बाब असली, तरी पृथ्वीवरून हवेत सोडली जाणारी इतर ९७ प्रकारची रसायने ओझोनच्या थराला हानिकारक ठरतात. ते रोखण्यासाठीसुद्धा उपाययोजना करणे गरजेचे आहे.

ओझोनच्या थराला हानी पोचल्यास पृथ्वीवरील तापमान वाढेल. नैसर्गिक समतोल बिघडून विविध गंभीर आजार, दुष्काळ किंवा अतिवृष्टी होण्याची शक्‍यता वाढणार आहे. बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे भूभाग पाण्याखाली जाण्याची शक्‍यता आहे. पाण्याचे जलदगतीने बाष्पीभवन झाल्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यावर विपरीत परिणाम, हवामानबदलामुळे कीड, रोगांच्या प्रमाणात वाढ इत्यादी गंभीर समस्यांना भविष्यात सामोरे जावे लागणार आहे.

संपर्क ः राहुल रामटेके ः ७५८८०८२८६५ (विद्युत व इतर ऊर्जा विभाग, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com