agriculture story in marathi, jwari crop, akola, vidharbha | Agrowon

खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला ज्वारीचा सक्षम पर्याय 
गोपाल हागे
शुक्रवार, 19 एप्रिल 2019
 • खारपाणपट्ट्यातील जमीन भारी आहे. पाणी धारण क्षमता जास्त आहे. त्यामुळे खरिपात तयार झालेली आर्द्रता रब्बीत पीक घेण्यासाठी फायदेशीर राहू शकते. ही बाब लक्षात घेता आम्ही ज्वारीसारखे पीक रब्बीत घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळे या वर्षात ५०० एकरांपर्यंत लागवड पोचली. 

धान्य व चारा मिळत असा दुहेरी फायदा या पिकातून होतो. हा प्रयोग आशादायी म्हणावा लागेल. 
_डॉ. व्ही. एम. भाले 
कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला 

खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर मर्यादा येतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कमजोर राहते. यावर उपाय म्हणून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्यांना ज्वारीचा ठोस पर्याय दिला. विद्यापीठाच्या सुधारित वाणांची विदर्भात २०० हेक्टरवर एकूण ५०० प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या शेतात राबविली. त्यातून हेक्टरी २७.२० क्विंटल उत्पादन तर कडब्याचे १०६.७० क्विंटल उत्पादन मिळाले. पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी उत्पन्नवाढीचा निश्‍चित व आश्‍वासक पर्याय त्यातून तयार झाला आहे. 

पश्चिम विदर्भात मोठ्या भूभागात खारपाणपट्टा विस्तारला आहे. यात अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील गावे येतात. पूर्णा नदीच्या दोन्ही तिरांवर पसरलेल्या भागापैकी चार हजार ७०० चौरस किलोमीटर म्हणजे सुमारे ५० टक्के क्षेत्र खारपाणपट्‍ट्याने बाधीत आहे. भूगर्भातील पाणी सिंचन व पिण्याकरिता अयोग्य आहे. साहजिकच पट्ट्यातील सुमारे ९० टक्के शेतकरी दुबार पीक घेऊ शकत नाहीत. खरिपातही मोजकेच पर्याय उपलब्ध असतात. 

ज्वारीचा ठरला महत्त्वाचा पर्याय 
सर्व मर्यादा लक्षात घेता डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी खारपाणपट्ट्यात पर्यायी पीक देण्याचे ठरवले. ज्वारी हे धान्य, कडबा तसेच आहार सुरक्षेसाठी अनन्यसाधारण महत्त्वाचे पीक आहे. कमी खर्च व कमी पाण्यात त्याचे व्यवस्थापन होऊ शकते. बदलत्या वातावरणात समरस होण्याची क्षमता त्यात असल्याने या पिकाची निवड करण्यात आली. 

राबविली प्रात्यक्षिके 
विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्राने पुढाकार घेतला. प्रथम रेषीय प्रात्यक्षिक व ट्रायबल सब प्लॅन कार्यक्रमांतर्गत २०१८-१९ च्या खरीप व रब्बी हंगामात प्रात्यक्षिक उपक्रम राबविण्यात आला. यात प्रामुख्याने खारपाणपट्टा, अकोला, वाशीम, अमरावती, मेळघाट, यवतमाळ, गोंदिया तसेच गडचिरोली भागांत २०० हेक्टरवर एकूण ५०० प्रात्यक्षिके राबविली. 

वापरलेले वाण 
 डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विकसित खरिपासाठी ‘पीडीकेव्ही-कल्याणी, एसपीएच-१६३५, सीएसएच-३५ हे सुधारित वाण 
रब्बी- पीकेव्ही-क्रांती 

शेती दिनातून प्रसार 
ज्वारीचा प्रसार करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम झाले. शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी झाल्या. सन २०१८-१९ हे राष्ट्रीय तृणधान्य वर्ष असल्याने अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप, सिसा उदेगाव, अमरावती जिल्ह्यातील तळवेल, उचलपूर येथे रब्बी ज्वारी शेतीदिन व पौष्टीक तृणधान्य दिवस कार्यक्रम राबविण्यात आला. या वेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष संजय धोत्रे, कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, विद्यापीठाचे संशोधन संचालक डाॅ. व्ही. के. खर्चे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. आर. बी. घोराडे, सहायक प्राध्यापक डाॅ. गोपाल ठाकरे यांनीही परिश्रम घेतले. शेतकऱ्यांनीही उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला. 

ज्वारी प्रात्यक्षिक कार्यक्रम- ठळक बाबी 

 • खरीप उत्पादन- २७.२० क्विंटल तर कडबा- १०६.७० क्विं. प्रतिहेक्टर 
 • ज्वारीचा सरासरी दर १८०० रु. प्रतिक्विंटल 
 • कडबा दर २००० रुपये प्रतिक्विंटल 
 • एकूण उत्पादन खर्च- २३, २३५ रु. 

विदर्भात कोरडवाहू ज्वारीची सरासरी उत्पादकता (हेक्टरी) 

 • खरीप हंगाम- १३.२० क्विं. 
 • रब्बी हंगाम- ९.६० क्विं. 
 • - प्रत्यक्ष उत्पादकता फरक- खरीप -१८.३८ क्विं. 
 • रब्बी- ११.६४ क्विं. 

ज्वारीच्या प्रमुख वाणांची वैशिष्ट्ये 

 • पीडीकेव्ही कल्याणी 
 • खरीप हंगामासाठी सरळ वाण 
 • ११५ ते १२० दिवसांत परिपक्व होतो. 
 • धान्याची प्रत चांगली. कडब्याचेही उत्पादन अधिक 
 • हेक्टरी ३५ ते ४० क्विंटलपर्यंत उत्पादन 
 • किडी व रोगांना सहनशील 
   
 • एसपीएच १६३५ 
 • खरीप वाण असून ११० ते ११५ दिवसांत परिपक्व 
 • अधिक धान्य व अधिक कडबा असे दुहेरी उद्दीष्ट साध्य 
 • या संकरित वाणापासून हेक्टरी ४८ ते ५० क्विंटल धान्य व १२० ते १२५ क्विंटल कडबा उत्पादन 

एकरी साडेआठ क्विंटल उतारा 
खारपाणपट्टयात ४० एकर शेती आहे. त्यात यंदा रब्बीत पहिल्यांदाच पीकेव्ही क्रांती वाणाची लागवड केली. बियाणे विद्यापीठाने दिले. दोन वेळा स्प्रिंकलरने पाणी दिले. ज्वारी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. एकरी साडेआठ क्विंटल उत्पादन झाले. या भागात माझी एकट्याकडेच लागवड असल्याने पक्ष्यांचा त्रास झाला. सुमारे १५ ते २० टक्के नुकसान झाले. पण, समाधानकारक उत्पादन मिळाले. तीन एकरात १२०० पेंडी जनावरांसाठी उत्कृष्ट चारा झाला. 
-अरुण सुरेश पागृत, घुसर 
ता. जि. अकोला 
९४२३१६११३३ 

 • आमच्या खारपाणपट्ट्यात बारमाही सिंचनाची सोय नाही. ज्वारीचे पीक सहसा कोणी घेत नाही. 
 • यावषी रब्बीत सहा एकरांत ज्वारी लागवड केली. एक वेळच सिंचन केले. एकरी १० पोती ज्वारी झाली. 
 • ज्वारी पांढरीशुभ्र व चवीला उत्कृष्ट होती. पॅकिंग करून ४० रुपये प्रतिकिलो दराने विकत आहोत. 
 • सोयाबीन, कापूस या पारंपरिक पिकांना चांगला पर्याय मिळाला आहे. 

-राजाभाऊ देशमुख, तळवेल 
९४२२१५५८१३ 

संपर्क- 
डॉ. गोपाल ठाकरे 
सहायक प्राध्यापक, ज्वारी संशोधन केंद्र 
९५५२६८०८८८ 

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...
सत्तर कारखान्यांना बजावली 'आरआरसी'पुणे : राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडून...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
पतआराखड्याची वाट न बघता खरिपासाठी कर्जपुणे : खरीप पीक कर्जवाटप नियोजनात मुख्य भूमिका...
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...
जरंडीत ‘एक गाव, एक वाण’ योजना फसलीनागपूर ः कापसाचे एक गाव एक वाण लावण्याचा आदर्श...
उन्हाचा चटका कायम राहणार पुणे : विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी...
आया मौसम बदली कामार्च ते मे हे तीन महिने शासकीय अधिकारी-...
आगीपासून वन वाचविण्याचा करूया निर्धारजंगलातील वाळलेला पालापाचोळा हा ज्वलनशील पदार्थ...
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...
शुक्रवारपर्यंत उष्ण लाटेचा इशारापुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य...