अापल्या खात्यावर फक्त अापलाच अधिकार

अापल्या खात्यावर फक्त अापलाच अधिकार
अापल्या खात्यावर फक्त अापलाच अधिकार

बँकेत भीमाबाईचं खातं राधाच्या ओळखीमुळे निघालं, हे राधाने तिच्या फॉर्मवर सही केल्यामुळे भीमाबाईला कळलं. पण बँकेबद्दल अजून फारसं काहीच कळलं नव्हतं. गावाकडे येताना राधाला भीमा म्हणाली, ‘आता तुझ्या ओळखीनं खातं निघालं म्हणजे तुला दर बारीला माझ्या सोबत यायला हवं. नायतर मला कोण ओळखणार बँकेत?’ भीमा अात्याला पहिल्यांदाच बँकेत आल्यामुळे तिला खूप प्रश्न पडणार हे राधाला माहीतच होतं त्यामुळे न रागावता राधा म्हणाली, ‘नाही आत्या तुमचा फोटो लावला आहे ना? मग मी नसले तरी कोणी पण ओळखेल तुम्हाला बँकेत.... म्हणून नेहेमी दिसता तसा दिसणारा फोटो बँक मागते. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमची सही! त्यावरून बँकेचा साहेब तुम्हाला ओळखतो.... कधी कधी तर साहेबाला प्रश्न पडला तर तो कॉम्प्युटर वर तुमची सही मोठी करूनसुद्धा बघतो मगच पैसे देतो.’

आज खातं काढून झालं होतं. भामाबाईने आजपर्यंत आपण बँकेत जाऊन खातं काढू असा विचारसुद्धा कधी केला नव्हता. तिच्या बापानं दारूड्या नवऱ्याशी लगीन लाऊन दिलं तसं ‘आपले भोग’ असं वाटून ती निमुटपणे सारं सहन करत होती. अडीनडीला दुसऱ्याच्या शेतावर काम करून पैसे आणत होती... तरी तिनं कमावलेले ते पैसे मार बसला की दारूला देत होती. आज तिचं मन शांत झालं. तिनं राधाला चहाला घरी नेलं अगदी माजघरात. पटकन चहा केला. थोडी साखर जास्तच घातली. चहा देतादेता हळूच म्हणाली, ‘त्यांना मान्य नाही हे काही. तरी तुझ्यामुळे धाडस केलं बघ!’ राधाच्या नजरेनच तिला सारं समजलं अस सांगितलं...... थोडे चहाचे गरम घोट पोटात गेल्यावर भामा म्हणाली, ‘सगळे पैसे नाही भरले. थोडे ठेवलेत लपवून.... माझी सीता माहेराला येईल तेव्हा खर्चायला होतील.’ राधाने ‘कधी येणार?’ विचारले तर भामाने सहा महिन्यांनंतर असे सांगितले. राधा म्हणाली, ‘मग तेव्हा आणले असते की काढून... आता तर ठेवायचे बँकेत.’ त्यावर भामा म्हणाली, ‘तसं न्हाई ह्यांना हे काही मान्य न्हाई. गेले बँकेत नि आणले माझे पैसे काढून तर मलातर कळणार पण न्हाई .... म्हणून म्हंटले आपले राहू देत माझ्यापाशी थोडे.....’ ‘म्हणजे?’ राधाने न समजून विचारले पुन्हा पुन्हा विचारल्यावर तिला समजलं की भीमाबाईला वाटतंय की तिचा नवरा तिच्या खात्यातून भीमाच्या न कळत पैसे काढून आणेल. मग राधाने सांगितले, ‘अस होणार नाही कारण खातं तुझं एकटीचं आहे.’.... पण भीमा आपलं म्हणत होती ‘अग राधा खात्यावर माझं नाव आहे ना.... मग कळणारच की बँकेला की ते माझे मालक आहेत म्हणून!..... ‘ त्यावर राधा सांगत होती की ‘तरीही तुझ्या सही शिवाय त्यांना तुझ्या खात्यातले पैसे मिळणार नाहीत’ हे भीमाला समजूच शकत नव्हते. ‘अगं अन वेळेला मीच पाठवलं त्यांना पैसे काढून आणायला तर?.... बँक माझे पैसे त्यांच्याकडे देणार न्हाई होय?’.... भीमात्याचा परत प्रश्न होताच, ‘हो हो ....अस झालं तर तुला सही केलेला चेक द्यावा लागेल त्यांच्या सोबत... तरच तुझ्या खात्यातले पैसे त्यांना मिळतील ....जसे ते त्यांना मिळतील तसे ते कोणाला पण मिळतील. तू ज्याचे नाव चेक वर लिहिशील त्याला मिळतील.... माझं नाव लिहिलंस तर मलाही मिळतील. पण आत्या एक लक्षात ठेवा बँक काही तुझे मालक म्हणून त्यांना तुझ्या खात्यातले पैसे देणार नाही. एवढच काय तुझ्या नावात त्याचं नाव लपलं असलं.... ते तुझे मालक असले तरी पण तुझ्या खात्यात किती पैसे आहेत हे बँक तोंडाने सुद्धा सांगणार नाही.’ आता मात्र भीमात्याचा चहा गारच झाला. तिला कानांन ऐकू येत होतं सगळं पण मन मानत नव्हतं.

आजपर्यंत मालका शिवायच्या स्वतःच्या अशा वेगळ्या अस्तित्वाचा तिने कधी विचारसुद्धा केला नव्हता. हे काहीतरी अघटितच झालं, अस तिला झालं. झालाच आपला अभिमन्यू! असंही क्षणभर वाटून गेलं.... तो तिच्या चेहऱ्यावरचा भाव राधानं नेमका टिपला नि म्हणाली, ‘हीच वेळ आहे आत्या, चार पैसे बाजूला टाका. अडीनडीला तुम्हालाच उपयोगी पडतील. तुमची मर्जी होईल तेव्हा काढा. कोणी जबरदस्तीने नाही काढू शकणार तुमचे पैसे. पैसे बँकेत टाकले की कुनाला कळणारसुद्धा नाही. तुमच्या खात्यात कोणीही पैसे टाकू शकतं म्हणजे प्रत्येकवेळी तुम्हाला बँकेत यायला नको मी गटाच्या कामासाठी जातेच बँकेत तेव्हा तुमच्या खात्यात पैसे टाकू शकते पण अजून आपण तुमच्या खात्याचा चेक घेतला नाही म्हणून पैसे काढायला मात्र तुम्हालाच यायला हवे कारण तुमची तिथे सही हवी.’ भीमा आता कुठे समजून म्हणाली, ‘.... आता मी साहेबीन झाले म्हणायचं!. माझ्या सही शिवाय अडणार तर सगळं... यांना म्हणून नको होतं तर मी बँकेत जायला. बरं झालं सांगितलं नायतर म्या अडाण्याला कोण सांगणार. बचत गटात आले म्हणून कळतंय सारं’

संपर्क ःसुवर्णा गोखले, ९८८१९३७२०६ लेखिका पुणे येथे ज्ञानप्रबोधिनी येथे कार्यरत अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com