बॅंक खाते नंबर महत्त्वाचा...

बॅंक खाते नंबर महत्त्वाचा...
बॅंक खाते नंबर महत्त्वाचा...

राधाच्या मदतीनं खातं निघालं नि त्यात आपले पैसेसुद्धा पडले, ते आता आपल्या सहीशिवाय कोणालाही मिळणार नाहीत हे भीमाला चांगलंच उमगलं. पुढच्या महिन्याला तांदळात, कौलाखाली, दागिन्याच्या पेटीत आणि कुठे कुठे ठेवलेल्या सगळ्या नोटा भीमाने बाहेर काढल्या आणि ते सगळे पैसे घेऊन राधाकडे गेली, ‘आता हे सगळे पैसे भरायचेत बँकेत. भरशील ना तू ....का मला यावं लागंल?.... पैसे लागले की जाऊ काढायला आपण बँकेत!’ भीमा राधाला म्हणाली. त्या सांभाळून ठेवलेल्या नोटांकडे बघताना आपण सांगितलेलं भीमात्या सगळं ऐकतात हे राधाच्या लक्षात आलं. भीमात्याने साठविलेल्या त्या नोटाकडे कौतुकाने बघत राधा म्हणाली, ‘एवढे सगळे पैसे लपवून ठेवले होते होय!’ ... ‘काय करणार नवऱ्याच्या हाताला कधी लागतील त्याचा काही नेम नाही बघ. असावेत जवळ म्हणून सांभाळले होते.’ ‘चला आता नोटा लाऊया म्हणजे मग मी स्लीप भरते’, असे राधा म्हणाली.

राधाने कशातरी असणाऱ्या नोटा नीट सरळ केल्या. पन्नास, शंभर, पाचशे अशा एकत्र लावल्या. बँकेत पैसे भरताना जी स्लिप भरायची असते त्यावर कितीच्या किती नोटा आहेत ते लिहायचे असते, पण हल्ली नोटांवर मात्र काही लिहायचे नाही असे भीमात्याला सांगितले. मग स्लिपवर नाव लिहायचे, कितीच्या किती नोटा आहेत ते लिहायचे. त्या लिहिलेल्या रकमेची व अक्षरात लिहिलेली रक्कम आकड्यात लिहिलेली रक्कम एकच यायला हवी, नाहीतर खात्यात पैसे जमा होत नाहीत. त्या शिवाय आपला खाते नंबर महत्त्वाचा असतो. तो हल्ली १६ आकडी असतो. तो नीट लक्षात ठेवायचा, नाहीतर लिहूनच ठेवायचा हे सारे समजून सांगितले. ‘उद्याच जाणार अाहे बँकेत तेव्हा भरते मी पैसे बँकेत!’ असे राधा म्हणाली.

आपली लपवलेली सगळी बचत बँकेत गेली, यामुळे भीमाला खूपच हुश्श झालं. स्वयंपाकघर अगदी रिकामं वाटायला लागलं. तिची कानाकोपऱ्यात वसलेली लक्ष्मी सुखरूप बँकेत गेली होती. दुसऱ्या दिवशी राधाने भीमात्याच्या खात्यात पैसे भरले. ‘हा तुमच्या खात्यात मी पैसे भरल्याचा पुरावा!’ म्हणत प्रत्यक्ष पैसे भरले तेव्हा खिडकीतल्या माणसाने दिलेला स्लिपचा एक तुकडा ज्यावर बँकेचा शिक्का होता तो भीमात्याच्या हाती दिला. या कागदावर तुमच्या खात्यात किती व कधी पैसे भरले आहेत ते लिहिलंय, नीट जपून ठेवा, असं आठवणीन सांगून राधा गेली सुद्धा!... आता हे सांभाळायचे तर म्हणून तिनं कडूसरीला तो कागद लावला.

थोडे दिवस गेले, पंचमीचा सण आला. भीमाची पोर माहेरी आली. रात्रीला मायलेकीच्या गप्पा फारच रंगल्या. पोरीच्या सासरची सारी खबरबात भीमा घेत होती. शेवटी पोरीला शंभर रुपये देण्यापेक्षा उद्या पंचामीची साडीच घेऊया असं ठरवून भीमा शांत झोपली. सकाळी पोराला राधाकडे पाठवलं, ‘राधाताई चार दिवस म्हाहेराहून येणार न्हाही’ पोर सांगत आलं. ‘आता गं बाया!’ म्हणत भीमा मटकन खालीच बसली. पोरीनं सावरलं तिला. मग तिला कळलं की आईचे सारे पैसे राधाताईने बँकेत ठेवले आहेत. आईनं मोठंच धाडस केलंय हेही तिला कळलं. पण आता साडी कशी आणायची काही कळेना. मग भीमाने ठरवलं आता मागे हटायचं न्हाई! ती पोरीला म्हणाली, ‘चल माझ्या सोबत आपण जाऊ बँकेत’ घाबरत दोघी बँकेत गेल्या. पोर पण बँकेत कधी गेली नव्हती. पण सोबतही खूप महत्त्वाची असते. भीमाने कडूसरीची चिठ्ठी खिडकीतल्या माणसाला दाखवली ‘हे पैसे हवेत’ म्हणाली; तर त्याने पुन्हा स्लिप भरायला सांगितली. राधातर म्हणाली होती पैसे भरताना स्लिप भरायची हे काय नवीनच, असं तिला मनातल्या मनात वाटलं. सगळे पैसे उगाच ठेवले बँकेत असेही क्षणभर वाटून गेलं. तेवढ्यात पोरीनं गावातली शकू गटाच्या कामासाठी बँकेत आलेली दाखविली. शकूपाशी जाऊन भीमाने सारा उलगडा केला. मग तिच्याचकडून स्लिप भरून घेतली, मग त्यावर तिने सही करायला सांगितली तेव्हा तिला एकदम ध्यान झालं, की ‘राधा म्हणालीच होती की सही शिवाय पैसे मिळणार न्हाहीत!’ .... अगदी बरोबर! भीमाने मनातल्या मनात बँकेला सुरक्षा केल्याची पावती देऊन टाकली नि खात्यातले पाचशे रुपये रोख काढले! पोर सारं बघत होती. मग पोरीला दुकानात नेऊन तिच्या पसंतीची साडी घेतली. या वेळचा सण आनंदाने साजरा केला, सारं बैजवार केलं.... आता तर पोरीला आईचा फारच अभिमान वाटायला लागला. जाताजाता पोर आईला म्हणाली, ‘माझं पण खातं काढूयात का?’..... नुस्त ऐकूनच सारं भरून पावलं भीमाला! ‘राधा आली की बोलते तिच्याशी मग ठरवू...!’ आता कधी एकदा राधा येते माहेराहून नि तिला सारं सांगते सगळं अस झालं तिला!   सुवर्णा गोखले, ९८८१९३७२०६ लेखिका ज्ञानप्रबोधिनी, पुणे येथे कायर्रत अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com