'लालकंधारी'च्या माळसोन्ना गावाने हटविला दुष्काळ

माझी सात एकर शेती आहे. हळदीसह अन्य पिकांचे उत्पादन घेतो. लाल कंधारी बैलजोडी, एक गाय, दोन कालवडी माझ्याकडे आहेत. गायीचे दूध विकत नाही. नैसर्गिक रेतनासाठी वळूचा वापर करतो. परिसरातील शेतकरी रेतनासाठी गायी घेऊन येतात. एकवेळ रेतनासाठी ३०० रुपये मोबदला मिळतो. वळूचे संगोपन करून वर्षाकाठी चांगले उत्पन्न शिल्लक राहाते. -अनंत लाड, माळसोन्ना, जि. परभणी
 माळसोन्ना येथील अनंत लाड यांचा लाल कंधारी वळू.
माळसोन्ना येथील अनंत लाड यांचा लाल कंधारी वळू.

परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना (ता. परभणी) गावाने देशी गोवंश संवर्धनात स्वतःची अोळख तयार केली आहे. येथील ग्रामस्थ लाल कंधारी प्रजातीचे पालन करतातच, शिवाय गोवंशाचा प्रसार करणारे गाव म्हणूनही गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. याव्यतिरिक्त जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांमधून गाव टॅंकरमुक्त झाले आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी हळदीसारख्या नगदी पिकांकडे वळले आहेत. पशुपालनातून उत्पन्नाचा पर्यायी स्राेत निर्माण झाल्यामुळे गावाच्या अर्थकारणाला चालना मिळाली आहे.   परभणी-गंगाखेड रस्त्यावरील पोखर्णी (नृसिंह) गावाजवळून पूर्वेकडे जाणाऱ्या फाट्यावरून गोदावरी नदीकाठच्या वझूरकडे जाणारा प्रमुख जिल्हा मार्ग, वाटेत लागणारा परभणी-परळी लोहमार्ग ओलांडून आपल्याला माळसोन्ना गावाकडे (जि. परभणी) घेऊन जातो. गावाच्या शिवारात मध्यम ते भारी जमीन आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात गावाचा समावेश आहे. परंतु कालव्याच्या शेवटच्या टोकाला असल्यामुळे तसेच चाऱ्याच्या दुरवस्थेमुळे सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. दोन वर्षापूर्वी दुष्काळात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. अशा सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पीक उत्पादनाची खात्री राहिली नव्हती. लाल कंधारी गोपालनाने दाखविला मार्ग सतत दुष्काळ सोसणाऱ्या गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी विचारपूर्वक पशुपालन व्यवसायाची कास धरली. त्यातही देशी गोवंशाचे म्हणजे लाल कंधारी जातीचे संवर्धन करण्यावर भर दिला. भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र आणि गोवा संघटक दादा लाड हे माळसोन्नाचे सुपुत्र आहेत. दादांची प्रेरणा तसेच मार्गदर्शनाखाली गावात लाल कंधारच्या संवर्धनास दिशा मिळाली. प्रयोगशील शेतकरी केशवराव चव्हाण यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला. त्यातूनच गावातील प्रत्येकाकडे किमान एक लाल कंधारी गाय व बैलजोड्या आहेत. काही शेतकऱ्यांकडे देवणी व अन्य स्थानिक जातीही पाहण्यास मिळतात. लाल कंधारीचा प्रसार गावातील तसेच परिसरातील गावांतील बळिराम लाड आणि अनंत लाड यांच्याकडे लाल कंधारी वळू आहेत. नैसर्गिक रेतनासाठी त्यांचा वापर केला जातो. यामुळे माळसोन्नासह परिसरातील २० ते २५ गावांमध्ये लाल कंधारीचा प्रसार झाला आहे. जिल्ह्याच्या अन्य भागातील शेतकरीही गायींच्या नैसर्गिक रेतनासाठी या वळूची मागणी करतात. या दोन्ही शेतकऱ्यांकडून व्यावसायिक दृष्टीने वळूंचे संगोपन केले जाते. गायीला गोऱ्या झाल्यानंतर भरपूर दूध वासरांसाठी ठेवले जाते. कडबा, हिरव्या चाऱ्यासोबत वळूला हरभरा चुनी, शेंगदाणा पेंड, सरकी पेंड असा खुराक दिला जातो. गोऱ्हे विक्रीतून उत्पन्न शेतीकामासाठी सरस असल्यामुळे लाल कंधारी बैलांना शेतकऱ्यांकडून मागणी असते. त्यामुळे गोऱ्ह्यांची विशेष काळजी घेतली जाते. सुमारे १२ महिने वयाच्या गोऱ्ह्याची विक्री केली जाते. एका गोऱ्ह्यापासून ४० ते ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. तर कालवडीपासून ३० ते ३५ हजार रुपये मिळतात. अनेक शेतकरी योग्य संगोपनातून गोऱ्हे तसेच कालवडींची विक्री करतात. कालवडी वंशवृध्दीसाठी ठेवल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा पर्यायी स्राेत उपलब्ध झाला आहे. माळसोन्ना दृष्टिक्षेपात

  • सरासरी पर्जन्यमान- ७५० मिमी.
  • भौगोलिक क्षेत्र- १०२१ हेक्टर
  • लागवडीयोग्य क्षेत्र- ९१५ हे.
  • पडीक क्षेत्र- ७१ हेक्टर
  • गवत, कुरण क्षेत्र- ३५ हे.
  • लोकसंख्या-
  • कुटुंब संख्या- ४२२
  • शेतकरी खातेदार- ४११ 
  • पिके- खरीप- ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, ऊस, हळद, टोमॅटो, वांगे, मका, गजराज
  • रब्बी- ज्वारी, गहू, हरभरा,
  • उन्हाळी- भुईमूग
  • पाण्याचा ताळेबंद

  • पर्जन्यमान- ७५० मिमी
  • पाणी उपलब्ध होणारे पाणी- ६५७.५ टीसीएम
  • पर्जन्यामुळे मिळणारा अपधाव- १०२३ टीसीएम
  • अस्तित्वातील मृद व जलसंधारण कामांमुळे होणारे पुनर्भरण- ७७३.६३ टीसीएम
  • पिण्याच्या पाण्याची गरज- ४२.८८ टीसीएम
  • संरक्षित सिंचनासाठी आवश्यक पाणीसाठा- ४६९.२ टीसीएम
  • रब्बी व उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध पाणीसाठा 2864.30 टीसीएम
  • रब्बी जल वापर निर्देशांक- ०.८३
  • जलसंधारणातून दुष्काळमुक्तीकडे रब्बी जल वापराचा निर्देशांक एकपेक्षा कमी होता. त्यामुळे उन्हाळ्यात टॅंकर सुरू करावे लागत. गाव टॅंकरमुक्त करण्यासाठी २०१७-१८ मध्ये गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली. त्या अंतर्गत नाल्यावर दोन सिमेंट बंधारे, तलावातील गाळ काढणे तसेच नऊ शेततळ्यांची कामे झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे, कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे शक्य झाले, असे कृषी सहायक सुनील मानोलीकर यांनी सांगितले. लोकसहभागातून गाव तलावाचे पुनरुज्जीवन गावाशेजारील तलावामध्ये गाळ साठला होता. लोकसहभाग तसेच कृषी विभागातर्फे गाळ काढण्यात आला. त्यामुळे तलावाची पाणीसाठवण क्षमता वाढली. विहिरी, बोअर यांची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली. गावाचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला. पीक पद्धतीत बदल होत आहे. शेतकरी हळद, ऊस, केळी या नगदी पिकांकडे वळले आहेत. चाराक्षेत्रही वाढते आहे. हळदीच्या क्षेत्रात वाढ चार वर्षात गावशिवारातील हळदीचे क्षेत्र २५० एकरांपर्यत वाढले आहे. गादीवाफा पद्धतीसह सुधारीत तंत्राद्वारे शेतीचे व्यवस्थापन असल्याने उत्पादनात वाढ दिसत आहे. वाळवलेल्या हळदीचे एकरी ३५ ते ४० क्विंटलपर्यंत उत्पादन शेतकरी घेत आहेत. वसमत (जि. हिंगोली) येथील हळद मार्केटमध्ये विक्री केली जाते.

      प्रतिक्रिया लाल कंधारीचे महत्त्व नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील कंधार राज्याच्या नावावरून देशी गायीच्या या वंशाचे नाव लाल कंधारी पडले आहे. राज्यात खिलार या देशी गोवंशापाठोपाठ संख्येने मोठा असलेला लाल कंधारी गोवंश आहे. नांदेड, परभणी, बीड, जालना या जिल्ह्यांमध्ये लाल कंधारी जातीच्या पशुधनाची संख्या जास्त आहे. राज्यात शुद्ध लाल कंधारी जातीचे सुमारे ८० हजार पशुधन आहे. मराठवाड्याचे सोने असलेल्या या गोवंशाचा रंग वैशिष्ट्यपूर्ण आहे. गोचिड, गोमाशा आदी परजीवींप्रती तसेच रोगप्रतिकारक व तापमान सहनशील अशी ही जात आहे. माळसोन्ना येथील शेतकऱ्यांकडून या गायीच्या संवर्धनाचे चांगले कार्य होत आहे. डॉ. नितीन मार्कंडेय, प्राचार्य पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी. संपर्क- ९४२२६५७२५१ माळसोन्ना परिसरातील लाल कंधारीचा प्रसार चांगला झाला आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे या गोवंशाचे कृत्रीम रेतन केले जाते. त्यातून जनावरांची संख्या वाढण्यास मदत झाली आहे. -एस. आर. लाडाणे, पशुधन पर्यवेक्षक पशुचिकित्सालय, माळसोन्ना संपर्क- ९९२१५६४७६३ माझी सात एकर शेती आहे. हळदीसह अन्य पिकांचे उत्पादन घेतो. लाल कंधारी बैलजोडी, एक गाय, दोन कालवडी माझ्याकडे आहेत. गायीचे दूध विकत नाही. नैसर्गिक रेतनासाठी वळूचा वापर करतो. परिसरातील शेतकरी रेतनासाठी गायी घेऊन येतात. एकवेळ रेतनासाठी ३०० रुपये मोबदला मिळतो. वळूचे संगोपन करून वर्षाकाठी चांगले उत्पन्न शिल्लक राहाते. -अनंत लाड शेतकरी, संपर्क- ९७६४९९०४४९ शेतीतून उत्पन्न मिळतेच. शिवाय लाल कंधारी वळूद्वारे केल्या जाणाऱ्या नैसर्गिक रेतनातूनही वर्षाला दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. देवणी जातीच्या वळूला मागणी आहे. येत्या काळात त्याचेही वळू आणणार आहोत. विविध ठिकाणच्या यात्रांमधील पशुप्रदर्शनात वळूचा सहभाग असतो. -बळीराम लाड पशुपालक शेतकरी संपर्क- ७२१९५४५०५७ लातूर जिल्ह्यातील मावलगाव येथून लाल कंधारी गाय आणली. कालवडी वंशवृद्धीसाठी घरीच ठेवतो. गोऱ्ह्यांची विक्री केली जाते. -सचिन लाड पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी हळद, ऊस, केळी आदी नगदी पिकांकडे वळले आहेत. विशेषतः हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. हळदीच्या बेणे विक्रीतून फायदा होतो. लाल कंधारी गायींचा शेतीसाठी फायदा होत आहे -तुकाराम दहे कृषिभूषण शेतकरी, माळसोन्ना ९८२२४८८३२५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com