पिंप्री गावात लसूणघास लागवड दाखवताना ब्रह्मदेव जाधव, नानासाहेब जाधव व अन्य शेतकरी.
पिंप्री गावात लसूणघास लागवड दाखवताना ब्रह्मदेव जाधव, नानासाहेब जाधव व अन्य शेतकरी.

पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव 

मी २०१२ मध्ये सहा एकरांवर घास लागवड केली होती. त्या वेळी मध्यस्थांमार्फत खरेदी व्हायची. आम्ही मध्यस्थ हटवले. आता घास खरेदीचे वार्षिक करार होतात. -नानासाहेब सीताराम जाधव पिंप्री वळण, जि. नगर

पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा नदीच्या काठावरील गाव आहे. पाण्याची उपलब्धता चांगली आहे. हे गाव आता पूर्वीच्या ऊस पिकापेक्षा लसूणघास या चारापिकासाठी पंचक्रोशीत लोकप्रिय झाले आहे. वर्षभर मागणी, बांधावर खरेदी व वार्षिक ठरलेले दर यामुळे शेतकऱ्यांनी काही वर्षांपासून या पिकाला आपलेसे केले आहे. दिवसाला सुमारे चाळीस टन घासाची विक्री होते.  मुळा, प्रवरा नदीचा परिसर असल्याने नगर जिल्ह्यात राहुरी हा तुलनेने सधन तालुका समजला जातो. ऊस हेच या भागातील मुख्य पीक होते. पूर्वी कोल्हार (ता. राहाता) भागात लसूणघास हे चारापीक काही प्रमाणात पीक घेतले जायचे. खरेदीदारांनी या भागातूनही चारा खरेदी सुरू केली. सुरवातीला पिंप्री (वळण) भागात अवघ्या दहा ते पंधरा एकर क्षेत्रावर हे पीक असे.  मागणी वाढली, क्षेत्र वाढले  घासाला हळहळू मागणी वाढत गेली. या पिकात शेतकऱ्यांना अर्थकारण दिसू लागले. तसतसे आजमितीला सुमारे साडेतीनशे एकर क्षेत्रावर घासाचे उत्पादन घेतले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन घेणे थांबवून घासावर लक्ष केंद्रित केले आहे. दोन वर्षे कापणी केल्यानंतर पुढील लागवडीसाठी घरीच बीजोत्पादन घेतले जाते.  थेट बांधावर खरेदी 

  • पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर भागातील डेअरी फार्मवर येथून घास जातो. 
  • खरेदीदारांची थेट बांधावर खरेदी. दर वर्षी त्यांच्यासोबत करार. 
  • यंदाचा खरेदी करार- दोन रुपये नव्वद पैसे प्रतिकिलो 
  • व्यवहार 

  • वजनानुसार दर पंधरा दिवसांनी थेट खात्यावर पैसे जमा 
  • फसवणूक झाल्याची दहा वर्षांत एकाही शेतकऱ्याची तक्रार नाही. 
  • उलाढाल  महिन्याला मजुरांना मिळालेल्या रोजागारातून सात ते आठ लाख रुपये तर घास विक्रीतून २२ ते पंचवीस लाख रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज.  दृष्टीक्षेपात पिंप्री (वळण) व चारा पीक 

  • लोकसंख्या- १११० 
  • जमीन क्षेत्र- ७५५ एकर 
  • घास क्षेत्र- ३५० एकर 
  • सरासरी एकरी एकूण उत्पादन- २० ते २२ टन 
  • दर दिवशी घासकापणी- ३५ टन 
  • मजुरांना कापणी दर- ७५ पैसे प्रति किलो 
  • कापणी कालावधी- दर वीस दिवसांनी 
  • मध्यस्थी कमी केली, दर वाढले  पूर्वी कोल्हार भागात घासाचे बऱ्यापैकी उत्पादन घेतले जायचे. खरेदीदारांनी २००९-१० पासून मध्यस्थांमार्फत पिंप्री, वळण भागांतूनही घासाची खरेदी सुरू झाली. त्या वेळी घासाला प्रतिकिलो एक रुपया ९० पैसे दर मिळायचा. उत्पादन जास्त झाले की दर खाली यायचे. त्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागायचा. येथील नानासाहेब जाधव यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी मध्यस्थांची साखळी कमी करण्यासाठी थेट खरेदीदारांशीच संपर्क करून करार करण्यास सुरवात केली. मग नफ्याचे मार्जिन वाढण्यास सुरवात झाली. एक रुपये नव्वद पैसांपासून मग दोन रुपये पंचवीस पैसे आणि आता गेल्यावर्षीपासून २ रुपये दर मिळू लागला आहे.  रोजगार  गावात बहुतांश कुटुंबे आदिवासी व त्यातही भूमिहीन आहेत. त्यांचे रोजगारासाठी सातत्याने स्थलांतर असायचे. आता शंभराहून अधिक मजुरांना घास कापणीसाठी गावातच रोजगार मिळाला आहे.  अगदी सण, उत्सवाच्या काळासह वर्षभर कापणी सुरूच असते. एक मजूर दोन किलोपासून चारशे किलोंपर्यंत कापणी करतो. छाया गुलाब बर्डे मजूर व्यवस्थापनाचे काम पाहतात.  आर्थिक पाठबळ  खात्रीशीर रोजगार उपलब्ध झाल्यानंतर मजुरांनी गट तयार केले आहेत. कौटुंबिक कारणांसाठी तसेच अन्य रोजगारांसाठी खासगी कंपनीकडून चाळीसहून महिलांनी कर्ज घेतले आहे. त्यातून शेळीपालन, गाय खरेदी, घराचे बांधकाम, मुलांची लग्ने आदी कामे झाली. अन्य व्यवसायांनाही पाठबळ मिळाले. घास कापणीच्या मजुरीतून कर्जाची नियमित परतफेड होते.  दुष्काळाचा बसला फटका  पिंप्री (वळण) गाव मुळा नदीच्या काठावर असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता आहे. मात्र नदीपासून दूर असलेल्या शेतकऱ्यांना पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा फटका बसतो आहे.  त्यामुळे काहींना घास उत्पादन बंद करावे लागले आहे.  प्रतिक्रिया  मी २०१२ मध्ये सहा एकरांवर घास लागवड केली होती. त्या वेळी मध्यस्थांमार्फत खरेदी व्हायची.  आम्ही मध्यस्थ हटवले. आता घास खरेदीचे वार्षिक करार होतात.  -नानासाहेब सीताराम जाधव  ९४२२७५१३६८  पूर्वी ऊस पीक घ्यायचो. दहा वर्षांपासून घासात सातत्य ठेवले आहे. सध्या पाच एकर क्षेत्र आहे. आमच्या गावचे हे नगदी पीक झाले आहे.  -ब्रह्मदेव जाधव  ७५८८०७८३३०  पूर्वी रोजगारासाठी स्थलांतर व्हायचे. मात्र शिवारात घासाचे क्षेत्र वाढल्यानंतर मजुरांना बारमाही काम मिळून स्थलांतर बऱ्यापैकी कमी झाले आहे.  -छाया गुलाब बर्डे- ९७६३६५११५१  मजूर व्यवस्थापक  आज कोणत्याही शेतमालाला हमी भाव नाही. उत्पादन वाढले पण पुरेसा पैसा मिळत नाही. अशावेळी घासाचे अर्थकारण फायदेशीर ठरत असल्याचे पिंप्रीकरांनी दाखवून दिले आहे. घासाला मागणी चांगली असल्याने पाणी उपलब्ध असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी त्याकडे वळायला हरकत नाही.  -बापुराव आढाव  शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते  गेल्या दहा वर्षांपासून घास कापणी करतो. त्यातून चांगल्याप्रकारे संसार सावरता आला आहे.  -मनिषा डमाळे, मजूर

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com