संक्रमण काळातील गाई, म्हशींचे व्यवस्थापन

संक्रमण काळात जनावरांना पोषक अणि पाचक आहार देणे आवश्यक असते.
संक्रमण काळात जनावरांना पोषक अणि पाचक आहार देणे आवश्यक असते.

गाई-म्हशींमधील विण्याच्या तीन आठवडे अगोदर व तीन आठवडे नंतर अशा एकूण सहा आठवड्यांच्या संक्रमण कालावधीमध्ये ऊर्जेची गरज वाढते. या काळात जनावरांची प्रथिंनांबरोबरच ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी पोषक अणि पाचक आहार देणे आवश्यक असते.

गाई म्हशींमधील विण्याच्या तीन आठवडे अगोदर व तीन आठवडे नंतर असा एकूण सहा आठवड्यांच्या कालावधीला संक्रमण काळ असे संबोधले जाते. गाई व म्हशींचा शेवटच्या ३ महिन्यांचा गाभण काळ दूध उत्पादकांकडून दुर्लक्षिला जातो, कारण त्या वेळी उत्पादकांना दूध मिळत नाही. जनावरांना सुरवातीच्या ६ महिन्यांच्या गाभणकाळात नेहमीचे खाद्य आणि चारा देऊ शकतो, परंतु शेवटच्या तीन महिन्यांमध्ये जनावरांच्या पोटाचा काही भाग वासराने व्यापल्यामुळे तिला पचनाला चांगले खाद्य देण्याची गरज असते, तसेच खाद्य दोनऐवजी चार वेळा विभागून दिल्यास पोटावर अतिरिक्त ताण येत नाही. प्रसूती जवळ आल्यावर पचनाला सोपे खाद्य दिल्यास प्रसूती सुलभ व्हायला मदत होते.

गाभण काळात व व्याल्यानंतर ऊर्जेची गरज

  • गाभण काळातील शेवटच्या दोन महिन्यांत गाय किंवा म्हैस दूध देत नाही, या वेळेस ती पुढील वेताची तयारी करीत असते. त्यामुळे या काळातच जर तिला योग्य आहार दिला गेला तर तिची प्रसूती व्यवस्थित होऊन दूध उत्पादनात सातत्य राहते.
  • शेवटच्या ३ महिन्यांत गर्भाशयातील वासराची सुमारे ६५ टक्के वाढ होते त्यामुळे गाभण काळात प्रथिनां बरोबरच ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी बायपास फॅट देण्याची गरज आहे. यामुळे गर्भाशयातील वासराची नीट वाढ होते व गायीच्या शरीरात चरबीच्या रूपाने ताकद साठून राहते व तिचा प्रकृती अंक (बॉडी स्कोअर) ३.५ ते ४ यादरम्यान राहण्यास मदत होते. विल्यानंतर दुग्धज्वर किंवा मिल्क फिवर, किटोसीस ई. आजार होत नाहीत.
  • संक्रमण काळातील विल्यानंतरचा आहार

  • व्याल्यानंतर ३५ ते ४५ दिवसांपर्यंत गायी-म्हशींचे दूध वाढत जाते, या काळात जितके जास्त दूध मिळवता येईल तितके त्या वेतातील एकूण दूध उत्पादन वाढते.
  • या काळातच जनावरांमध्ये ऊर्जेची कमतरता (निगेटिव्ह एनर्जी) दिसून येते. तिचा प्रकृती अंक (बॉडी स्कोर) खालावतो कारण दुधावाटे पोषकद्रव्ये शरीराबाहेर निघून जातात.
  • या वेळेस गाय उलटण्याचे प्रमाण वाढते कारण नवीन वासरू जन्माला घालण्यासाठी लागणारी ऊर्जा शरीरात कमी पडते. शरीरातील चरबी यकृतावर (लिव्हर) जमा होऊन फॅटी लिव्हर आजार होण्याची शक्यता बळावते.
  • शरीरासाठी लागणारे ग्लुकोज यकृत पूर्ण क्षमतेने तयार करू शकत नाही. यामुळे गाय एकूणच तिच्या क्षमतेपेक्षा कमी दूध व फॅट उत्पादन करते.
  • बहुतांश दूध उत्पादकांकडील गाई-म्हशींमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी निदर्शनास येतात. यामुळे जनावरांमधील ऊर्जेची कमतरता बायपास फॅटच्या स्वरूपात भरून काढल्यास पूर्ण क्षमतेने दूध व फॅट उत्पादन घेणे शक्य होऊन जनावर वेळेवर गाभण राहण्यासही मदत होते.
  • संक्रमण काळातील आजार

  • जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये फॅटी लिव्हर होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. जनावरांच्या शरीरावरील फॅट हे कमी होऊन रक्तावाटे यकृताकडे नेले जाते त्यांना नॉन इस्टरीफाईड फॅटी असिड्स (एन.ई.एफ.ए.) असे म्हणतात.
  • यकृतामध्ये त्यांचे दुधामधील फॅटी असिड्समध्ये रूपांतर होते त्यास व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स (व्ही.एल.डी.एल.) असे म्हणतात.
  • गाभण काळात व ताज्या विलेल्या गाई-म्हशींमध्ये हे रूपांतर होतच असते. थोडक्यात जनावरांच्या अंगावरील फॅटचे दुधामधील फॅटमध्ये रूपांतर होत असते. याचे कार्य तीन प्रकारे चालते
  • यकृतामध्ये आलेल्या फॅटचे पूर्ण ज्वलन होऊन संपूर्ण शरीराला त्यावाटे ऊर्जा पुरविली जाते. यामध्ये यकृत पूर्ण क्षमतेने काम करीत असते.
  • यकृतामध्ये आलेल्या फॅटचे अपूर्ण ज्वलन होते व किटोन बॉडी तयार होतात व त्यांचे रक्तामधील प्रमाण वाढते.
  • शरीरातील सर्व स्नायू या किटोन बॉडीचा इंधन म्हणून वापर करतात.
  • यकृतामध्ये आलेल्या काही फॅटचे व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटिन्समध्ये रूपांतर होते व कासेमध्ये त्याचा दुधामधील फॅट म्हणून वापर केला जातो
  • या सर्व शारीरिक चयापचय प्रक्रियेमध्ये यकृतात फॅटी असिड्सच्या रूपांतरासाठी फोस्फोटिडाईलकोलिन हा घटक आवश्यक असतो.
  • जास्त दूध देणाऱ्या गाई-म्हशींमध्ये या घटकाची कमतरता असल्यास यकृत पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही व फॅटी असिड्सचे अपूर्ण ज्वलन होऊन रक्तामध्ये किटोन बॉडीचे प्रमाण वाढते व जनावर किटोसीस या आजाराला बळी पडते.
  • यामध्ये दुभत्या गाई-म्हशींचे दूध अचानक कमी होते, त्यांची भूक मंदावते. उपचारासही असे जनावर थंड प्रतिसाद देते. दुधामधील घट व उपचाराचा खर्च यामुळे उत्पादकांचे दुहेरी नुकसान होते.
  • यासाठी गाई-म्हशींची संक्रमण काळात योग्य ती काळजी घेतल्यास तिला विल्यानंतर विविध आजारांना सामोरे जावे लागणार नाही.
  • संक्रमण काळात होणारे आजार हे दुभत्या गाई-म्हशींमध्ये दुधाचे प्रमाण क्षमतेपेक्षा कमी करतात. ज्या जनावराला मिल्क फिव्हर किंवा दुग्धज्वर आजार विल्या नंतर झाला असेल तिला मस्टायटीस किंवा कासेचा दाह होण्याची शक्यता ही अनेक पटींनी जास्त असते.
  • विल्यानंतर यकृतात ग्लुकोज तयार करण्याचे प्रमाण दुपटीने वाढते या काळात जर ग्लुकोज निर्मिती वेगाने झाली नाही, तर दूध उत्पादनात घट होते.
  • फॅटी लिव्हर असणाऱ्या गाई-म्हशींमध्ये फोस्फोटिडाईलकोलिन हा कमतरता असलेला घटक तोंडावाटे दिल्यास यकृतावरील चरबी निघून जाण्यास मदत होते.
  • यकृतावरील चरबी निघून गेल्यास त्याची कार्यक्षमता वाढते व शारिरीक क्रियांसाठी लागणाऱ्या ग्लुकोजचे उत्पादन यकृतात मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होते. त्यामुळे गायीचे दूध उत्पादन वाढण्यास मदत होते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com