ब्रुसेल्लोसिस, व्हिब्रिओसिस रोगावर ठेवा नियंत्रण

प्रजननासंबंधी अाजार टाळण्यासाठी वर्षातून एकदा कळपातील सर्व जनावरांची तपासणी पशुवैद्यकाकडून करून घ्यावी.
प्रजननासंबंधी अाजार टाळण्यासाठी वर्षातून एकदा कळपातील सर्व जनावरांची तपासणी पशुवैद्यकाकडून करून घ्यावी.

जनावरांतील प्रजननासंबंधी अाजार टाळण्यासाठी वर्षातून एकदा कळपातील सर्व जनावरांच्या रक्ताची तपासणी करून घ्यावी. प्रादुर्भाव झालेली जनावरे वेगळी करावीत. रोगाचा प्रादुर्भाव झालेली जनावरे, गर्भपात झालेल्या जनावरांचे शव, वार वा गर्भस्त्राव यांची पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्यरीत्या विल्हेवाट लावावी.   जनावरांतील उच्च फलनक्षमता किंवा प्रजनन ही एक महत्त्वाची बाब असून ती टिकवण्यासाठी जनावरांचे प्रजनन व्यवस्थापन अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. प्रजननासंबंधी आजारामुळे जनावर उत्तम प्रकारचे असूनही उत्पादनावर विपरीत परिणाम होतात. या रोगांमध्ये ब्रुसेल्लोसिस, व्हिब्रिओसिस, ट्रायकोमोनियासिस, लेप्टोस्पायरोसिस या रोगाचा समावेश होतो.

१) ब्रुसेल्लोसिस हा आजार जनावरांमध्ये गर्भपात व वंधत्वास (तात्पुरते किंवा कायमस्वरूपी) करणीभूत ठरतो, याला सांसर्गिक गर्भपात असेही म्हणतात. हा आजार ब्रुसेल्ला अबोरटस या जीवणूमुळे होतो. ब्रुसेल्लोसिस मुळे जनावरांमध्ये गर्भपात होतो. तसेच अशक्त वासरांना/करडाना जन्म देणे, वार अडकण्याचे प्रमाण या आजारात जास्त असते. हा आजाराचा दूषित अन्न किंवा पाणी, गर्भाशयातील स्त्रावातून संसर्ग होऊ शकतो. लक्षणे ः गाभण जनावरात सात ते नऊ महिन्यांचे दरम्यान गर्भपात होणे, वार अडकणे, गर्भाशयाचा दाह, कासेचा दाह, वेतातील अंतर वाढते, जनावरांचे दूध कमी होते. उपाय : रोगग्रस्त जनावरे इतर जनावरांपासून वेगळी बांधावीत. कळपातील जनावरांचे ब्रुसेल्ला रोगाचे निदान करून घ्यावे. गर्भाशयातील स्त्राव, वार व वारेचा स्त्राव, रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावे. ४-८ महिन्यांच्या वासरामध्ये या रोगाचे लसीकरण करून घ्यावे. कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब करावा. या रोगाची लागण झालेली जनावरे, वासरांचे शव, झार, गर्भस्त्राव यांची गावाबाहेर योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून निरोगी जनावरात हा आजार बळावणार नाही.

२) व्हिब्रिओसिस हा आजार विब्रिओ फिटस या जिवाणूमुळे होतो. लक्षणे : गरोदरपणात किंवा गर्भावस्थेमध्ये गर्भपात होणे. पुनरावृत्ती प्रजनन, जनावर अनियमितपणे माजावर येणे, ढगाळ किंवा मलिन पूमिश्रित स्त्राव स्त्रावणे . उपाय ः पशुवैद्यकाच्या सल्ल्याने कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब करावा. रोगप्रतिबंधात्मक जिवाणूरोधकांचा, प्रतिजैविकांचा वापर करावा.

३) ट्रायकोमोनियासीस हा गर्भाशयाचा संसर्गजन्य आजार असून ट्रायकोमोनास फिटस या आदिजीवामुळे होतो. रोगजंतू फक्त पुनरुत्पादन संस्थेतील अवयवामध्ये राहतात, त्यामुळे हंगामी वांझपणा येतो, गर्भाशयाला सूज येते, योनिमार्गातून पूमिश्रित द्राव वाहू लागतो, त्यामुळे गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा झालीच तर गर्भपात होतो किंवा वासरू बाहेर पडत नाही. उपाय : खात्रीशीर उपाय नाही, परंतु जनावराला नंतर ९० दिवस विश्रांती द्यावी. गोठ्याची स्वच्छता राखावी.

४) संसर्गजन्य श्वासननलिकेचा दाह (इन्फेक्षीयस बोवाईन रायनोट्रकियायटीस ): हा आजार विषाणूंमुळे बळावतो. लक्षणे : ज्वर किंवा ताप येणे, नाकामधून स्त्राव वाहणे, नेत्रश्लेष्माचा दाह, श्वासनसंबंधी फुफूसदाह, गर्भपात . उपाय : पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविकांचा तसेच ज्वररोधी औषधांचा वापर करावा.

प्रजनन व्यवस्थापन

  • जनावरांना क्षार खनिजे व जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा म्हणजे शरीरातील कमतरता भरून निघेल, जनावर गाभण राहण्यास मदत होईल.
  • माजावर न येणाऱ्या जनावरांची पशुवैद्यकाकडून तपासणी करावी व आवश्यक तो उपचार करून घ्यावा.
  • प्रसूतीच्या काळात जनावरांचा गोठा वा जनावरे स्वच्छ ठेवावीत ती वेळोवेळी निर्जंतुक करून घ्यावीत.
  • वर्षातून एकदा कळपातील सर्व जनावरांच्या रक्ताची तपासणी करून घ्यावी व लागण झालेली जनावरे वेगळी करावीत. रोगाची लागण झालेली जनावरे, गर्भपात झालेल्या जनावरांचे शव, वार वा गर्भस्त्राव यांची पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्यरीत्या विल्हेवाट लावावी.
  • योग्य औषधोपचार, लसीकरण, लसीकरणाच्या पूर्वी जनावराना जंताचे औषध पाजून घेणे पशुवैद्यकतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करावेत.
  • संपर्क : शुभांगी वारके, ९५६१२१४३९५ (नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com