शेळीपालनातील अडचणी अोळखून व्यवसायाचे नियोजन

शेळीपालन व्यवसाय फायद्यात राहण्यासाठी काटेकोर नियोजन अावश्यक अाहे.
शेळीपालन व्यवसाय फायद्यात राहण्यासाठी काटेकोर नियोजन अावश्यक अाहे.

अाधुनिकतेच्या नावाखाली शेळी संगोपनावरचा खर्च वाढत अाहे. व्यवसायाबाबत अवास्तव जाहीरातींकडे अाकर्षित होऊन तरुण वर्ग या व्यवसायाकडे वळत अाहे. अपुऱ्या ज्ञानावर भांडवल अाहे म्हणून शेळीपालन व्यवसाय करणे टाळावे.

शेळीपालन करण्यापूर्वी या व्यवसायाची संपूर्ण काटेकोर माहिती शासकीय संस्थांकडून करुन घ्यावी. त्यामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करुन शेळीपालन व्यवसाय अधिक फायदेशीर करता येईल.

व्यवसायातील अडचणी

  • व्यवसायाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून न बघणे.
  • जातिवंत बोकडांची व विर्याची कमतरता.
  • पैदास तंत्रज्ञान व संकरीकरण यामध्ये सुसूत्रतेचा अाभाव.
  • जातिवंत जनावरे निवडण्यापेक्षा शेळीपालकांचा अनावश्यक खर्चाकडे जास्त कल अाहे.
  • विक्रीव्यवस्थापनामध्ये सुसूत्रतेचा अाभाव व विशिष्ट प्रकारच्या शेळ्या विकण्यासाठी बाजारांची अनुपलब्धता.
  • रास्त किंमत मिळण्यामध्ये मध्यस्थामुळे अडचणी.
  • शेळीपालकांमध्ये शेळ्यांच्या (पैदाशीचे बोकड व माद्या) यांचा विमा करण्याकडे दुर्लक्ष व विमा कंपन्यांची टाळाटाळ.
  • तज्ज्ञ पशुवैद्यकांची अनुपलब्धता.
  • शेळ्यांच्या विक्रीची चुकीची पद्धत. जिवंत, वजनावर विक्रीपेक्षा नगावर विक्री केली जाते.
  • शेळीपालकांमध्ये शेळ्यांच्या उत्तम आरोग्य व रोग प्रतिबंधासाठी लसीकरण व जंतनिर्मूलन करण्याकडे दुर्लक्ष किंवा अजाणतेपणा.
  • करडांची मरतुक १५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त व त्यासाठी लागणाऱ्या माहितीचा अभाव.
  • पशुपालन व शेती असे दोनच व्यवसाय आहेत, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या नोंदी ठेवल्या जात नाहीत. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी नोंदी ठेवणे आवश्‍यक अाहे. त्यामुळे व्यवसायात योग्य बदल करता येतात.
  • शेळीपालन व्यवसायासाठी कर्जपुरवठा करताना बॅंकांची टाळाटाळ किंवा नकार.
  • व्यवसायामध्ये चारा अाणि खाद्यावर सगळ्यात जास्त खर्च (जवळपास ६५ टक्के) होतो. चाऱ्याचा योग्य प्रमाणात पुरवठा होण्यासाठी पूर्व नियोजन करणे अावश्यक अाहे. नियोजनाच्या अभावामुळे वाळला चारा ४० टक्के, ओला चारा ३६ टक्के व खुराक किंवा भरड्यामध्ये ५७ टक्के कमतरता अढळते.  
  • ज्या घटकांमुळे या व्यवसायातील उत्पन्न वाढू शकते, अशा गोष्टींची शास्त्रीय माहिती नसणे किंवा त्याकडे दुर्लक्ष उदा. दोन वेतांमधील अंतर, जुळ्यांचे प्रमाण, करडांना चीक वेळेत पाजण्याचे महत्त्व इ.
  • रोगांवर प्रतिबंध किंवा नियंत्रण करण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा रोग आल्यावर उपचारावर खर्च करण्याची शेळीपालकांची मानसिकता असल्यामुळे एकूण नुकसान जास्त होते.
  • व्यवसायाच्या वृद्धीसाठी शेळीपालकांनी एकत्र येऊन संघटनात्मक कार्य करण्याच्या मानसिकतेचा अभाव.
  • व्यवसाय वृद्धीसाठी उपाययोजना

  • शेळीपालकांचा एकूणच व्यवसायाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात शास्त्रीय व आवश्‍यक बदल घडविण्याची गरज आहे. त्यासाठी शेळीपालनातील आधुनिक तंत्रांची माहिती सिद्धांत तसेच व्यावहारिक स्वरुपात इतरांना देणे गरजेचे अाहे. उदा. व्यवसायाकडे स्वतः लक्ष देणे, कष्ट, मानसिकता, बाजाराची स्थिती व गरज ओळखून व्यवस्थापन ठेवणे, नवीन शेळ्या खरेदीनंतर त्या कमीत कमी २१ दिवस इतर शेळ्यांपासून वेगळ्या ठेवणे, खच्चीकरण व इतर गोष्टी.
  • शासनाकडून फिरत्या दवाखान्यांसारखे फिरते माहितीकेंद्र सुरू करण्याची महत्त्वाची गरज.
  • जातिवंत बोकड तसेच शक्‍य झाल्यास कृत्रिम रेतनासाठी वीर्य गावागावांत उपलब्ध करून देणे. उदा. उस्मानाबादी.
  • चाऱ्याची काढणीपासून शेळीच्या पोटात जाईपर्यंत वेगवेगळ्या स्तरांवर अपव्यय व नासाडी टाळणे. त्यासाठी खाद्य व्हाणीचा वापर करणे.
  • व्यवसायाचे ध्येय व विक्रीमधील आवश्‍यकतेनुसार शेळीच्या बाजारपेठांची पुनर्बांधणी जसे, की पैदाशीच्या शेळ्यांची विक्री, बकरी ईद बोकड विक्री, स्थानिक मटणासाठी विक्री व इतर.
  • शेळ्या व बोकड नगापेक्षा जिवंत वजनावर विकण्यामुळे उत्पन्नात भरीव वाढ होऊ शकते.
  • विक्रीबाबत मानसिकता बदलून थेट ग्राहकांना हव्या असलेल्या मालाची विक्री करणे ही या व्यवसायात टिकून राहून व्यवसायवृद्धी करण्याची महत्त्वाची पायरी आहे. उदा. स्वतःचे मटणाचे दुकान, इंटरनेटचा वापर करून ऑनलाइन विक्री.
  • विविध चारापिकांचे उत्तम प्रतीचे बि-बियाणे शेळीपालकांना सहजरीत्या उपलब्ध झाल्यास तसेच चारा वेगवेगळ्या प्रक्रिया करून कसा वापरता येईल याची माहिती मिळाल्यास मोठा फायदा होऊ शकतो.
  • जनावरांच्या आवश्‍यकतेनुसार छोटी-छोटी चराऊ कुरणे तयार करून त्यात रोजच्या रोज ठरविलेल्या वेळापत्रकानुसार अदलाबदल करून जनावरांना चरायला सोडण्याची पद्धत वापरली जात नाही, की जी बाहेरच्या देशात खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी व परिणामकारकरीत्या वापरली जाते, त्याची खूप मोठी गरज भारतात आहे.
  • शासनातर्फे विमा कंपन्यांना व राष्ट्रीयीकृत बॅंकांना शेतकऱ्यांना आवश्‍यक विमा व कर्जे देण्यासाठी आवश्‍यक आदेश व मदत देण्यासाठी उद्युक्त किंवा प्रोत्साहित करणे.
  • लसीकरण व जंतनिर्मूलनाबाबत माहिती होण्यासाठी शासन, सामाजिक व शैक्षणिक संस्था यांनी मोफत अथवा माफक दरात लसी व जंतनाशके दिल्यास अर्थकारणात मोठा फरक पडू शकतो.
  • स्वच्छ दूधनिर्मिती व मटणनिर्मिती याबद्दल माहिती नसल्याने मालाच्या स्थानिक किंमती, मागणी तसेच निर्यातीवर विपरीत परिणाम होतात, त्यामुळे ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत.
  • आपल्याकडे इतर व्यवसायांप्रमाणे शेती व पशुपालन व्यवसायामध्ये मालाची (दूध व मटण) प्रतिकिलो उत्पादन किंमत काढण्याची पद्धत आहे, ज्यामुळे विक्रीमूल्य तसेच निव्वळ नफा किती होतो आहे व व्यवसाय कसा मार्गक्रमण करू शकतो व त्यासाठी कोणते बदल आवश्‍यक आहेत हे ठरवता येते. ९०-९५ टक्के पेक्षा जास्त लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना याची काहीही माहिती नसते, त्यामुळे या व्यवसायामध्ये नोंदींना खूप महत्त्व आहे.
  • शेतीतून व पशुपालनातून मिळणाऱ्या विविध उत्पादनांवर प्रक्रिया केल्यास उत्पादनाची किंमत, प्रत, सुधारते व ग्राहकांची व्याप्ती वाढते. त्यामुळे शासनाने यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योगाच्या योजना तसेच उद्योग सुरू केल्यास शेळीपालन व्यवसायाला बळ मिळू शकते. प्रक्रिया केलेले उपपदार्थ थेट ग्रहकांना विकल्यास अर्थकारण सुधारू शकते.
  • विक्री करताना फसवणूक न करता योग्य कारणासाठी योग्य किमतीने शेळ्यांच्या जातीनुसार विक्री करावी.
  • संपर्क : डॉ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५ (पशुअनुवंश व पशुपैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com