उसाला ठिबक सिंचनाने पाणी देताना...

वाढीच्या निरनिराळ्या अवस्थांमध्ये पाण्याची नेमकी गरज लक्षात घेऊन ऊस पिकाला पाणी द्यावे.
वाढीच्या निरनिराळ्या अवस्थांमध्ये पाण्याची नेमकी गरज लक्षात घेऊन ऊस पिकाला पाणी द्यावे.

ऊस पिकाला पाणी देताना विभाग, जमिनीचा प्रकार, पिकाचे वय, तत्कालीन हवामान इत्यादी बाबींचा विचार करावा. कमाल उत्पादन मर्यादेसाठी लागणाऱ्या पाण्याची गरज लक्षात घेऊनच ऊस पिकामध्ये ठिबक सिंचन संचाने पाणी व्यवस्थापन करावे. ठिबक सिंचन पद्धतीने उसाला लागणाऱ्या पाण्याची गरज ही उगवण, रोपावस्था, फुटवा,  जोमदार वाढ व पक्वावस्था या निरनिराळ्या वेळी भिन्न असते.

  • पिकाचे वय
  • जमिनीचा पोत
  • जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन
  • पानाद्वारे होणारे उत्सर्जन
  • पानांचा व मुळांचा विस्तार
  • दोन ओळींतील व दोन रोपांतील अंतर
  • वाऱ्याचा वेग व हवेतील आर्द्रता
  • वरील सर्व मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर पिकाला वाढीच्या निरनिराळ्या अवस्थांमध्ये लागणारी पाण्याची गरज समजते. पाण्याची गरज प्रत्येक दिवसासाठी काढली जाते.

    पाण्याची प्रतिदिन गरज काढताना महत्त्वाच्या बाबी :   

  • यू.एस.पॅन.ए. (बाष्पीभवन पात्र) : बाष्पीभवनाच्या वेगानुसार पाण्याची प्रतिदिन गरज काढताना त्या कृषी हवामानातील मागील कमीत कमी २० वर्षांची सरासरी उपलब्ध असावा. किंवा बाष्पीभवनाचा वेग यू. एस. पॅन. ए. बाष्पीभवन पात्राने मोजलेला असावा.
  • पीक गुणांक (क्रॉप फॅक्टर किंवा क्रॉप कोइफिशिएण्ट) : निरनिराळ्या पिकांचा गुणांक वाढीच्या विविध टप्प्यांनुसार निराळा असतो. पाणी व्यवस्थापन तंत्रात एफ.ए.ओ. २४ या पुस्तकातून पीक गुणांक घेतले जातात. यात मुख्यत्वेकरून चार अवस्था असून, त्यानुसार सुरवातीला गुणांक कमी ०.३ ते ०.४ इतका असतो. नंतर तो वाढत जाताना पीकवाढीच्या काळात ०.७ ते ०.८, तर पूर्ण वाढ झालेल्या व जास्तीत जास्त पानांचे क्षेत्रफळ असताना १.० ते १.२ पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर तो ०.८ ते ०.९ पर्यंत कमी होत जातो.
  • पिकाच्या वाढीच्या अवस्था दर्शविणारा गुणांक (कॅनॉपी फॅक्टर)
  • पिकाने व्यापलेले क्षेत्रफळ. (दोन पिकांतील व ओळींतील अंतर)
  • ठिबक सिंचनात प्रतिदिनी पाण्याची गरज काढण्यासाठीचे सूत्र ः   दररोज पिकाला लागणारे पाणी (लिटर) = अ x ब x क x ड

    अ. पिकाची संदर्भ पाण्याची गरज (बाष्पीभवन मि.मी. x पात्र गुणांक)     बाष्पीभवन पात्र गुणांक ०.७ इतका धरला जातो. ब. पीक गुणांक (क्रॉप फॅक्टर) क. पिकाच्या वाढीचा/ विस्ताराचा गुणांक (कॅनॅापी फॅक्टर) ड. दोन ओळींतील अंतर (मीटर)

    उदाहरण ः ऊस पीक वय ः ६ महिने ठिकाण = सोलापूर जिल्हा महिना = मार्च अ. पिकाची संदर्भ पाण्याची गरज     = १० मि.मी. ब. पिकाचा गुणांक     = ०.७ क. पिकाच्या वाढीचा/ विस्ताराचा गुणांक (पूर्ण वाढलेली अवस्था) गुणांक     = १.०० ड. दोन ओळींतील अंतर (मीटर)     = १.८ मीटर

    त्यामुळे अ = १० ब = ०.७ क = १.०० ड = १.८

    दररोज ऊस पिकाला लागणारे पाणी (लिटर) = अ x ब x क x ड             = १० x ०.७ x १.० x १.८             = १२.६ लिटर / मीटर / दिवस               = १२.६ x २२१४             = २७८९६.४ लिटर/एकर/ दिवस

    पूर्वहंगामी ऊस लागवडीसाठी पाण्याची गरज (लिटर/मीटर/दिवस)

    महिना (लागवड)  पट्टा पद्धत (२.५ x ५ x २.५ फूट)   एक ओळ पद्धत (५ फूट)
    ऑक्टोबर १.९० १.२७
    नोव्हेंबर  १.९७    १.३१
    डिसेंबर  २.११    १.४१
    जानेवारी ३.७०   २.४६
    फेब्रुवारी ५.९८     ३.९७
    मार्च   ८.७७  ५.८३
    एप्रिल  १३.३३   ८.८६
    मे १८.२३  १२.११
    जून १३.६७     ९.०९
    जुलै ७.३२ ४.८६
    अाॅगस्ट ७.२९  ४.८४
    सप्टेबर ५.७३ ३.८०

    टीप : वरील तक्त्यामधील उसाची पाण्याची गरज मार्गदर्शनाकरिता आहे. जमिनीचा प्रकार, हवामान (तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग), पिकाची अवस्था यानुसार पाण्याची गरज बदलू शकेल. पाण्याची मात्रा लिटरमध्ये प्रतिमीटर ठिबकची नळी अशी आहे.

    संपर्क ः विजय माळी, ९४०३७७०६४९ (वरिष्ठ कृषी विद्यावेत्ता, जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com