दर्जेदार पशुखाद्यातून होते पोषण, दुग्धवाढ

दुधाळ गायींना संतुलित पशुखाद्य दिल्याने अारोग्य अाणि दुग्धोत्पादन चांगले राहते.
दुधाळ गायींना संतुलित पशुखाद्य दिल्याने अारोग्य अाणि दुग्धोत्पादन चांगले राहते.

गाई-म्हशींना दूध उत्पादनासाठी बरेचसे पौष्टिक घटक आहारामधून देणे गरजेचे असते. त्यामध्ये ऊर्जा, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे इ. दूध उत्पादन वाढल्यास मदत करतात. या घटकांसोबतच जनावरांच्या आहारामध्ये विकर, प्रोबायोटिक्‍स, क्षारमिश्रण इ. घटक गरजेनुसार दिल्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. जनावरांना संतुलित आहार न दिल्यास दूध उत्पादन घटते. कमतरतेचे आजार उद्‌भवतात. जन्मणारी वासरे कमकुवत जन्मतात. रोगप्रतिकार क्षमता कमी होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते. जनावरांच्या आहारामध्ये हिरवा चारा, वाळला चारा, खुराक, स्वच्छ पाणी इ.च्या गरजेनुसार योग्य प्रमाणात वापर करावा. दूध उत्पादन वाढावे, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून जनावरांच्या आहाराबाबत काय काळजी घ्यावी, ते आपण पाहू.

हिरवा चारा

  • जनावरांना त्यांच्या वजनाप्रमाणे आणि दूध उत्पादनानुसार दररोज उत्तम प्रतीचा हिरवा चारा अवश्‍य द्यावा.
  • हिरव्या चारा पिकामध्ये बरीचशी चारा पिके आहेत. त्यापैकी लसूणघास या चारा पिकांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते व महत्त्वाचे म्हणजे १९-२० टक्के प्रथिने असतात. यामुळे दूध उत्पादन वाढते.
  • बरसीम या चारापिकामध्ये ओलावा खूप वेळ टिकून राहतो. त्यामुळे जनावरे चारा आवडीने खातात. यामध्ये १७ ते १८ टक्के प्रथिने व २५ ते २५ टक्के स्निग्ध पदार्थ असतात.
  • चवळी या चारापिकांमध्ये महत्त्वाचे पौष्टिक घटक असतात, त्यामध्ये प्रथिने १८ ते १९ टक्के, स्निग्ध पदार्थ २५ ते २६ टक्के, कॅल्शिअम १.४ टक्के आणि पूर्ण पचनीय पदार्थ हे ५८ ते ६० टक्के एवढे असतात.
  • हिरवा चारा पिकांसोबत धारवाड हायब्रीड नेपीयर, बीएनएच - १० यांसारखी बहुवर्षीय चारापिके आहेत. यामध्ये ऊर्जा मुबलक प्रमाणात असते. १० ते १३ टक्के प्रथिने असतात व चारा उत्पादनही मुबलक मिळते.
  • वाळलेला चारा

  • गाई, म्हैस इ. जनावरांना ओल्या चाऱ्यासोबतच वाळला चारा देणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे.
  • जनावरांना वजनाप्रमाणे व गरजेनुसार वाळला चारा द्यावा.
  • वाळलेल्या चाऱ्यांमध्ये मका, ज्वारीचा कडबा, गुळी, भुसकट इ. जनावरांना द्यावे.
  • या चाऱ्यापासून जनावरांना तंतुमय पदार्थ, ऊर्जा मिळते. त्यामुळे पोट भरल्याचे समाधान मिळून रवंथ उत्तम प्रकारे होते व दुधाला फॅट लागल्यास मदत होते.
  • गाय, म्हैस या जनावरांच्या कोटीपोटामध्ये वाळलेला चारा महत्त्वाची भूमिका बजावतो.
  • हिरवा चारा व वाळला चारा यामधून जर जनावरांची शारीरिक गरज, दूध उत्पादनासाठीची गरज पूर्ण होत नसेल, तर त्यांना योग्य प्रमाणात खुराक किंवा पशुखाद्य द्यावे.
  • खुराक

  • बरेचसे शेतकरी हे दुधाळ जनावरांना गरजेनुसार संतुलित खुराक देत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादन घटते, प्रजोत्पादन क्षमता कमी होते.
  • खुराक म्हणजे जनावरांना वाढीसाठी, दूध उत्पादनासाठी, प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी व हवे त्या प्रमाणात पोषक घटकांचे एकत्रित मिश्रण असते.
  • बऱ्याच वेळा शेतकरी जनावरांना एक तर फक्त ओला चारा किंवा वाळलेला चारा देतात. त्यासोबत खुराक देत नाहीत. जरी दिला, तरी कमी प्रमाणात देतात.
  • खुराकामधून शरीराला आवश्‍यक असणारे व चाऱ्याद्वारे न मिळणारे पौष्टिक घटक हे जनावरांना द्यावेत.
  • खुराकामध्ये जनावरांना गरज असणारे पौष्टिक घटक असतात. जसे की प्रथिने, स्निग्ध पदार्थ, ऊर्जा, क्षार, मीठ इ.
  • दुधाळ जनावरांना योग्य प्रमाणात तज्ज्ञांच्या सल्ल्याने खुराक द्यावा. यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होते.
  • योग्य प्रमाणात गाभण गाई, म्हशींना खुराक दिल्यास शरीराला आवश्‍यक असणारे पौष्टिक घटक मिळतात व गर्भाशयामध्ये वासरांची वाढ चांगली होते.
  • विकरांचा आहारामधील उपयोग

  • विकर हे मुख्यतः प्रथिनांपासून बनलेली असतात. विकर हे शरीरातील रासायनिक क्रियेमध्ये मध्यस्थांची भूमिका बजावून क्रिया जलद करतात.
  • विकरांमुळे जनावरांनी खाल्लेला चारा लवकर पचन होऊन शरीराला आवश्‍यक असणारे पौष्टिक घटक मिळतात.
  • अमायलो अपघटनी विकर हे जनावरांच्या खाद्यामधील विरघळणाऱ्या कर्बोदकांचे विघटन करून साध्या साखरेमध्ये रूपांतर करण्यास मदत करतात व त्यापासून दूध निर्मितीसाठी जनावरांना ऊर्जा मिळते.
  • संपर्क ः डॉ. पवनकुमार देवकते, ९९७०२८५५८५ संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com