गोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त खर्च

मुक्त संचार गोठ्यामध्ये सर्व सुविधा पुरवल्यास जनावरांच्या प्राथमिक गरजा व्यवस्थितपणे पूर्ण करणे शक्य होते.
मुक्त संचार गोठ्यामध्ये सर्व सुविधा पुरवल्यास जनावरांच्या प्राथमिक गरजा व्यवस्थितपणे पूर्ण करणे शक्य होते.

गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू वापरण्यापेक्षा बांबू व लाकडांचा वापर करून, तसेच शेडसाठी पत्रा वापरण्यापेक्षा गवताचे छत करावे. गोठ्यातील जमिनीवर काँक्रीट करण्यापेक्षा सुरवातीचे काही दिवस मुरूम टाकून पक्का पृष्ठभाग करून घ्यावा, त्यामुळे कमी खर्चात सोयी-सुविधायुक्त गोठा तयार होतो.   जनावरासही कमी खर्चाची व नैसर्गिकरीत्या असलेली रचना आवडते व त्यात ते जास्त उत्पादन देतात. कमी खर्चाचा मुक्तसंचार गोठा करण्यासाठी ऊन, वारा व पाऊस यांपासून जनावरांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींच्या सुविधा पुरवल्यास व्यवस्थितपणे जनावरांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करणे शक्य होते. गोठ्यातील पृष्ठभाग

  • गोठ्याचा पृष्ठभाग चांगला ठेवणे आवश्यक आहे. अशा कमी खर्चाच्या लाकडी आराखडा असणाऱ्या गोठ्यात आपण कमी खर्चात मुरुमाचा चांगला पृष्ठभाग तयार करू शकतो. यासाठी चांगल्या गुणवत्तेच्या मुरुमाचा थर टाकून, त्यावर पाणी टाकून रोलरच्या साहाय्याने किंवा हाताने चोपण्याचा वापर करून हा मुरूम व्यवस्थितपणे बसविला जातो. यावर शेणाचे द्रावण करून टाकल्यास मुरुमात ज्या ठिकाणी भेगा असतील अशा ठिकाणी हे शेणाचे कण जाऊन बसतात व पृष्ठभाग अगदी पक्का बनतो.
  • अशा प्रकारच्या पृष्ठभागास सर्वसाधारणपणे थोडा जास्त उतार दिल्यास पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे होईल व पृष्ठभाग लवकर खराब होणार नाही.
  • मुक्तसंचार गोठ्यात जर बाहेरच्या बाजूस झाडे असतील, तर जनावरे जास्तीत जास्त बाहेरच झाडाच्या सावलीत राहणे पसंत करतात. यामुळे अशा शेडमधील पृष्ठभागावर जास्त भार पडत नाही. अशा मुक्तसंचार गोठ्यात जर झाडे नसतील तर जनावरे सावलीसाठी जास्तीत जास्त या शेडमध्येच राहिल्याने ती शेडमध्येच जास्त प्रमाणात मल-मूत्र विसर्जन करतात व कधी कधी अशा भागात खड्डा पडण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळेस या खड्ड्यांची देखभाल जर चांगल्या पद्धतीने केली तर या गोठा पद्धतीपासून चांगला फायदा होतो.
  • कमी खर्चाचे परंतु जनावरास फायदेशीर लाकूड व छप्पर वापरून केलेल्या गोठा पद्धतीचा अवलंब केल्यास कमी खर्चात अधिक चांगल्या दर्जाचे दूध उत्पादन मिळेल. त्याचबरोबर तापमान आल्हाददायक राखल्यामुळे जनावरांची कमी आहारात जास्त उत्पादन देण्याची क्षमता वाढेल.
  • कुंपण

  • सर्वसाधारणपणे पहिला आडवा बांबू लावताना जमिनीपासून २.५ फूट व त्यानंतरचा दुसरी व शेवटची बांबूची ओळ सर्वसाधारणपणे जमिनीपासून ४ फुटांच्या अंतरावर लावावी.
  • किती बांबू लागतील याचा विचार केला तर दोन ओळी करावयाच्या आहेत आणि एका ओळीसाठी सर्वसाधारणपणे २०० फूट बांबू लागेल म्हणजे एक बांबू जर २० फूट असला तर असे एका ओळीसाठी सर्वसाधारणपणे १० बांबू लागतील व दुसऱ्या ओळीसाठीही १० बांबू लागतील. असे सर्व आडव्या ओळींसाठी जे बांबू लागतील त्यांची २० फुटांचे २० नग लागतील. आता ३-४ बांबूपासून बाबूंचा लाकडी दरवाजा करू शकतो. अशा पद्धतीने पूर्ण कुंपण करण्यास २५ डांब व २२ बांबू लागतील.
  • जर जनावरे जास्त दंगा करणारी असतील, तर आडव्या बांबूंची संख्या वाढवून ४ ओळी कराव्या लागतील. यासाठी २० फुटी ४० बांबू लागतील. पहिली ओळ ही १.५ फुटावर घेऊन त्यानंतरची दुसरी ओळ ही जमिनीपासून २.५ फुटांवर व तिसरी जमिनीपासून सर्वसाधारणपणे ३.५ फुटांवर व शेवटची चौथी ओळ जमिनीपासून ४.५ फुटांवर लावता येईल. यामुळे एक चांगल्याप्रकारचे कुंपण होईल. जर देशी जनावरे असतील, त्यातल्या त्यात खिलार जातीची जनावरे असतील, तर ४ ऐवजी ६ आडव्या बांबूच्या ओळी कराव्या लागतात.
  • अशा पद्धतीने कुंपण केल्यास जनावरांना त्यातून बाहेर पडणे शक्य होत नाही. म्हणजे अशा प्रकारे जनावरांच्या क्षमतेप्रमाणे कमी किंवा जास्त बांबू वापरून कुंपण करून कमी खर्चातील परंतु भक्कम मुक्त संचार गोठा तयार करता येतो.
  • संपर्क ः डॉ. एस. पी. गायकवाड, ०२१६६ - २२१३०२ (लेखक गोविंद मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टस् प्रा. लि. फलटण, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com