नियंत्रित दुग्धोत्पादनातून वाढवा फायदा

नियंत्रित दुग्धोत्पादनासाठी प्रजनन व आहार नियोजन करणे गरजेचे असते.
नियंत्रित दुग्धोत्पादनासाठी प्रजनन व आहार नियोजन करणे गरजेचे असते.

दुधाच्या मागणीनुसार व दर जास्त मिळण्याच्या कालावधीत नियंत्रित दुग्धोत्पादन केले तर दुग्ध व्यवसाय फायद्याचा होऊ शकेल. यासाठी जनावरांचा दूध उत्पादनाचा आलेख व प्रजनन चक्र समजून घेऊन नियंत्रित दुग्धोत्पादनाचे नियोजन केले पाहिजे.

महाराष्ट्रातील अनेक छोटे तसेच व्यावसायिक पशुपालन करणाऱ्या पशुपालकांना दुधाच्या बदलत्या दराचा फटका दरवर्षीच बसतो. दूध हा एक नाशवंत पदार्थ आहे. दूध प्रक्रिया करून जास्तीत जास्त आठ ते दहा दिवस साठवता येऊ शकते. दुग्धोत्पादन ऋतूनुसार बदलत असते; परंतु दुधाची मागणी साधारणतः वर्षभर सारखीच असते. उन्हाळ्यात दुग्धोत्पादन कमी झाल्याने दुधाचे दर वाढतात, तर याउलट हिवाळ्यात दूध उत्पादन वाढल्याने दर कमी होतात.

ऋतूंचा दुग्धोत्पादनावर होणारा परिणाम

  • देशात सन २०१२ च्या पशुगणनेनुसार १०८.७ दशलक्ष म्हशी व १९०.९ दशलक्ष गायी आहेत. कृषी खात्याच्या सन २०१६-१७ च्या वार्षिक अहवालानुसार दुग्धोत्पादनात म्हशीच्या दुधाचे प्रमाण ४९ टक्के, तर गाईच्या दुधाचे प्रमाण ५१ टक्के आहे.
  • हिवाळा हा म्हशींचा प्रजननाचा काळ असल्याने हिवाळ्यात म्हशीचे गाभण राहण्याचे प्रमाण सर्वाधिक राहते.
  • दहा महिन्यांनी म्हणजेच पुढील पावसाळ्याच्या शेवटी म्हशी वितात व त्यानंतर ४५ ते ६० दिवसांनी वेतातील सर्वाधिक दूध देतात. म्हणजेच म्हशी हिवाळ्यात सर्वाधिक दूध देतात. त्यामुळे हिवाळ्यात अधिक दूध उत्पादित होते.
  • हिवाळ्यात गाभण राहिलेल्या म्हशी पाच ते सात महिन्यांत म्हणजेच उन्हाळ्यात आटतात. तसेच उन्हाळ्यात हिरवा चारा, पाणी यांच्या कमतरतेमुळेही दूध उत्पादन घटते.
  • जर मागणीनुसार व दर जास्त मिळण्याच्या कालावधीत नियंत्रित दुग्धोत्पादन केले, तर दुग्ध व्यवसाय फायद्याचा होऊ शकेल. यासाठी जनावरांचा दूध उत्पादनाचा आलेख व प्रजनन चक्र समजून घेतले पाहिजे.
  • गाई-म्हशीच्या दुग्धोत्पादनाचा आलेख व प्रजनन चक्र

  • दुग्धोत्पादन हे प्रजननावर अवलंबून आहे. गाई-म्हशी विल्यानंतर सुरवातीला तीन ते पाच दिवस चीक देतात. त्यानंतर हळूहळू दूध वाढत जाऊन ४० ते ४५ दिवसांत जनावरे त्या वेतातील सर्वाधिक दूध द्यायला सुरवात करतात.
  • दुधात झालेली ही वाढ पुढील ५० ते ६० दिवस टिकून राहते. दरम्यानच्या काळात शरीराची व गर्भाशयाची झालेली झीज भरून निघते व विल्यानंतर ४५ ते ६० दिवसांत जनावरे पहिला माज दाखवतात.
  • जनावर गाभण राहिल्यास दूध उत्पादनात हळूहळू घट होऊन पुढील पाच ते सहा महिन्यांत म्हणजेच जनावर सात महिन्यांचे गाभण असताना आटते.
  • पुढील दोन ते तीन महिने गाई-म्हशी दूध देत नाहीत, या काळात गर्भाची जोमाने वाढ होते. तसेच विल्यानंतर शरीराला लागणारी अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या स्वरूपात शरीरात साठवली जाते.
  • अशा प्रकारे योग्य नियोजन केल्यास गाईमध्ये १२ ते १४ महिन्यांत व म्हशीमध्ये १४ ते १६ महिन्यांत एक प्रजनन चक्र पूर्ण होते. जनावरे प्रत्येक वेतात सर्वाधिक दूध ५० ते ६० दिवसच देतात.
  • हेच सर्वाधिक दूध देण्याचे दिवस जनावराच्या आयुष्यात जास्तीत जास्त वेळा आल्यास दुग्ध व्यवसाय फायद्याचा होईल.
  • नियंत्रित दुग्धोत्पादनाचे नियोजन

  • साधारणतः पशुपालक उत्पादित दूध, संकलन केंद्रामार्फत डेरींना पुरवतात किंवा काही व्यावसायिक पशुपालक स्वतः प्रक्रिया करून अथवा बिगर प्रक्रिया करता दूध ग्राहकांना वितरित करतात.
  • स्वतः ग्राहकांना दूध वितरित करताना वर्षभर सारखेच दूध उत्पादन करणे गरजेचे असते. परंतु डेरींना दूधपुरवठा करताना उन्हाळ्यात किंवा दर जास्त असताना दूध उत्पादन करणे फायद्याचे ठरते.
  • वर्षभर सारखाच दूधपुरवठा करण्यासाठी नियोजन

  • वर्षभर सारखाच दूधपुरवठा होण्यासाठी प्रजनन व आहार नियोजन करणे गरजेचे असते.
  • दर महिन्याला गोठ्यातील आठ ते दहा टक्के जनावरे गाभण राहण्याचे नियोजन केल्यास पुढील वर्षी दर महिन्याला जनावरे विल्याने वर्षभर एक सारखाच दूध पुरवठा चालू राहील.
  • पावसाळ्यातील अतिरिक्त हिरव्या चाऱ्याचा मुरघास तयार केल्यास टंचाईच्या काळात जनावरांना सकस आहार उपलब्ध राहील. त्याचबरोबर बहूवार्षिक चारापिके जसे यशवंत, जयवंत, डीएचएन ६ इ. चारापिकांची लागवड केल्याने वर्षभर हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊन दूध उत्पादन टिकून राहील.
  • दुधाला अधिक दर मिळण्याच्या कालावधीत अधिक दूध उत्पादन करण्यासाठी नियोजन

  • ज्या वेळेस दुधाला अधिक दर मिळतो त्या वेळेला गोठ्यातील दुग्ध उत्पादन अधिक असल्यास वाढीव दराचा फायदा होतो. त्यासाठी ठराविक वेळेस गोठ्याचे दूध उत्पादन अधिक करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
  • पुढील वर्षी ज्या महिन्यात अधिक दूध उत्पादन हवे आहे त्या अगोदर दीड ते दोन महिने जनावर विल्यास हे साध्य करता येईल. त्यासाठी जनावर कधी विले पाहिजे हे ठरवून त्याच्या अगोदर नऊ महिने गाईसाठी व दहा महिने म्हशीसाठी जनावरे गाभण राहण्याचे नियोजन करावे.
  • अधिक दूध हवे असलेल्या काळात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध राहण्यासाठीचे नियोजन करावे.
  • नियंत्रित दुग्धोत्पादनासाठी नियंत्रित प्रजनन

  • हवे तेव्हा दूध उत्पादित करण्यासाठी जनावरांच्या प्रजनन चक्रावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. प्रजननाची सुरवात जनावरे माजावर येण्यापासून होते.
  • जनावरे हवे तेव्हा माजावर आणण्याचे विविध उपचार पद्धती उपलब्ध आहेत. यासाठी ओजरसाचे (हार्मोन्सचे) इंजेक्शन किंवा जनावरांच्या योनीमार्गात ठेवायच्या ओजरसाने संस्कारित केलेल्या स्पंजचा वापर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करून जनावरे माजावर आणता येतात.
  • अनेक जनावरांना एकाच वेळेस उपचार करून ठराविक वेळेत माजावर आणून कृत्रिम रेतन केल्यास आपल्याला हवे तेव्हा एकाच वेळेस जनावरे गाभण राहू शकतात.
  • गोठ्यातील व्यवस्थापनानुसार विविध उपचार पद्धतीचा वापर करावा लागतो. यासाठी माजाचे चक्र सुरू असलेल्या जनावरांची निवड करून, त्यांचे योग्य आहार नियोजन करावे.
  • गरजेप्रमाणे पशुखाद्य, क्षार खनिज मिश्रण, जीवनसत्त्वे यांचा पुरवठा करावा. जंतनाशकाची मात्रा द्यावी.
  • अशा प्रकारे पूर्वतयारी करून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य उपचार पद्धतीचा वापर करावा. जनावरे माजावर आल्यानंतर कृत्रिम रेतन करून घ्यावे.
  • एका वेळेस कृत्रिम रेतन केलेल्या जनावरांपैकी साधारणतः ३५ ते ४० टक्के जनावरे गाभण राहतात. त्यामुळे आपल्याला ४ जनावरे गाभण राहणे अपेक्षित असेल तेव्हा ८ ते १० जनावरांना उपचार करून माजावर आणले पाहिजे.
  • उर्वरित जनावरांना पुन्हा २१ दिवसांनी येणाऱ्या माजाच्या वेळी कृत्रिम रेतन करावे.
  • संपर्क ः डॉ. सचिन रहाणे, ७०३८५३५१८१ (पशुधन विकास अधिकारी (गट अ), पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, बुर्ली, ता. पलूस, जि. सांगली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com