योग्य प्रजनन व्यवस्थापनातून वाढवा दुग्धोत्पादन

 योग्य देखभाल व योग्य नियोजन दुधाळ जनावरांच्या सर्व अवस्थांमध्ये आवश्‍यक आहे.
योग्य देखभाल व योग्य नियोजन दुधाळ जनावरांच्या सर्व अवस्थांमध्ये आवश्‍यक आहे.

दुधाळ जनावरांची योग्य देखभाल व योग्य नियोजन जनावरांच्या सर्व अवस्थांमध्ये आवश्‍यक आहे. परंतु विण्यापूर्वी, विताना किंवा विल्यानंतरच्या पहिल्या २४ तासांत घेतलेली काळजी अत्यंत महत्त्वाची असते. विल्यानंतर साधारणतः ५ ते ६ तासांत वार पडते. परंतु, १० ते १२ तासांनंतरदेखील वार न पडल्यास पशुवैद्यकाची मदत घेणे गरजेचे असते.  

  • जी जनावरे शेवटच्या टप्प्यातील गाभण अवस्थेत अाहेत अशा जनावरांना वेगळे करून वाढीव संतुलित खाद्याचा पुरवठा करावा, त्यामुळे पुढील वेतातील दूधवाढ व नवजात वासरांचे आरोग्य चांगले होण्यास मदत तर होतेच; परंतु जनावरांचे आरोग्य तंदुरुस्त राहते.
  • विलेल्या गायीची योग्य काळजी घ्यायला हवी. दररोज ठरवलेले दूध उत्पादन मिळायला हवे. तसेच, विल्यानंतर पहिला माज किमान ३० ते ४० दिवसांत आला पाहिजे व ती गाय किमान ७० ते ८० दिवसांत गाभण राहिली पाहिजे.
  • गाभण जनावरांची विण्यापूर्वी घ्यायची काळजी

  • जनावरांच्या गाभण राहिलेल्या तारखेला नोंदवहीत पाहून प्रसूतीच्या तारीखेचा अंदाज लावावा.
  • प्रसूतीच्या ३ ते ५ दिवस अगोदर जनावराला शांतता असलेल्या वेगळ्या गोठ्यात ठेवावे.
  • प्रसूतीसाठी वापरात येणाऱ्या जागेला प्रसूतीपूर्व जंतुनाशकाच्या मदतीने स्वच्छ करून कोरडे करावे.
  • जमिनीला आरामदायक बनविण्यासाठी त्यावर कोरडे गवत किंवा इतर स्वच्छ आच्छादनाचा वापर करावा.
  • प्रसूतीची जागा वर-खाली किंवा जनावर घसरून पडेल इतकी गुळगुळीत नसावी.
  • विताना अनुभवी व्यक्तीकडून जनावरांची काळजी घ्यावी.
  • विण्यापूर्वी जनावरांचे दूध काढू नये. यामुळे प्रसूतीची निर्धारित वेळ काही तास पुढे जाऊ शकते?
  •  प्रसूतीच्या प्रारंभिक अवस्थेची कारणे

  • कास मोठी व कठोर होते.
  • जननेंद्रियांच्या बाहेरील भागास सूज येते.
  • जननेंद्रियांतून घट्ट स्राव स्रवतो.
  • शेपटीच्या मुळाजवळील दोन्हीकडील भाग आतल्या बाजूस सरकतो.
  • जनावर प्रसूती कळांनी बैचेन होते.
  • जनावर सारखे ऊठबस करते.
  • जनावर विताना घ्यायची काळजी

  • एका ठराविक अंतरावरूनच जनावरांच्या प्रसूतीवर बारकाईने लक्ष ठेवावे. जोपर्यंत आवश्‍यकता भासत नाही, तोपर्यंत जनावरांजवळ जाऊ नये.
  • वासरांच्या सामान्य स्थितीत बाहेर येण्याच्या प्रक्रियेची सुनिश्‍चितता करावी. यामध्ये प्रसूतीसमयी पुढच्या पायांचे दोन खूर व वासराचे तोंड पहिल्यांदा दिसून येते. परिस्थिती वेगळी दिसून अाली तर पशुवैद्यकाची मदत घ्यावी.
  • साधारणतः प्रसूतीच्या क्रियेमध्ये २ ते ३ तास लागतात. पहिल्यांदा होणाऱ्या प्रसूतीमध्ये ४ ते ५ तास वेळ लागू शकतो. याहून अधिक वेळ लागल्यास पशुवैद्यकाची मदत घेणे योग्य ठरते.
  • विल्यानंतर घ्यायची काळजी

  • विल्यानंतर जनावराला कोमट पाणी व त्यासोबत गुळवणी प्यावयास द्यावे. त्यामुळे प्रसूतीदरम्यान शरीरावर येणारा ताण कमी करण्यास मदत होते.
  • प्रसूतीनंतर जनावराच्या मागील भागास योग्य जंतूनाशकाच्या मदतीने स्वच्छ करून कोरडे करावे किंवा कडुनिंबाची पाने टाकून उकळलेल्या पाण्याचा वापर करावा.
  • साधारणतः जनावरांची वार ५ ते ६ तासांत पडून जाते. जर १० ते १२ तासांनंतर देखील वार पडत नसेल तर पशुवैद्यकाची मदत घ्यावी.
  • वार वेळेवर पडण्यासाठी व गर्भाशयात जंतूंचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • जनावर वार खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. साधारणपणे २ ते ३ फूट खड्डा खोदून वार त्यामध्ये पुरावी.
  • पहिल्यांदा दूध काढण्याअगोदर सडांच्या छिद्रांमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे नाहीत. याची खात्री करून घ्यावी.
  • सडावर सूज दिसून आल्यास दिवसातून ३ वेळा दूध काढावे.
  • जनावरांना संतुलित आहार द्यावा. ज्यामध्ये पचनीय प्रथिनांची टक्केवारी १६ ते १८ टक्के व एकूण पचनीय पोषणमूल्यांची टक्केवारी ७० टक्के असावी.
  • जनावरांच्या दररोज २ किलो प्रतिदिन अाहार देण्यापेक्षा २ किलो दूध उत्पादनासाठी १ किलो अाहार अतिरिक्त प्रमाणात द्यावा. यासोबतच जनावरांना मुबलक प्रमाणात हिरवा चारा द्यावा. ज्यामध्ये बरसीम, ल्युसर्न, यशवंत, जयवंत, चवळी इ. चारा पिकांचा समावेश असावा.
  • संपर्क ः डॉ. विशाल केदारी, ९५६१३०७२३१. (कृषी महाविद्यालय, लोणी, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com