संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन 

सालेपुरात बहुतांश क्षेत्र ठिबकवर सापन प्रकल्पाच्या कालव्यामुळे सालेपूर व लगतच्या गावांतील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढीस लागली आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता जरी या परिसरात जास्त असली तरी या भागातील बहुतांश संत्रा उत्पादकांनी बागेसाठी ठिबकचा पर्याय अवलंबिला आहे. गावात ९० टक्क्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे ठिबक यंत्रणा असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
अजय शेळके यांची संत्रा लागवड
अजय शेळके यांची संत्रा लागवड

संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे लागते. हीच गरज ओळखून सालेपूर (ता. अचलपूर, अमरावती) येथील अजय शेळके यांनी आपल्या ३२ ते ३५ एकरांतील संत्रा बागेत ड्रीप ॲटोमेशन तंत्रज्ञानाची उभारणी केली आहे. त्यातून पाण्यासह मजूरबळ, वेळ यांचीही बचत साधण्यास सुरवात केली आहे. वीजभारनियमनाच्या काळात पाणी देण्याची समस्याही त्यांनी सोडवली आहे.    अमरावती जिल्हा संत्रा पिकासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील अचलपूर तालुक्‍यात असलेले सालेपूर हे सातपुडा पर्वतरांगांशी वसलेले गाव आहे. पोषक वातावरणाच्या कारणामुळे या भागातील उत्पादित संत्र्याने रंग आणि चवीच्या बाबतीत वेगळेपण जपले आहे. त्यामुळेच व्यापाऱ्यांच्या मनातही येथील संत्र्याने घर तयार केले आहे. सालेपूरच्या संत्र्याला त्यामुळेच मागणी चांगली राहते. याच गावातील अजय शेळके यांची एकूण ४० एकर शेती आहे, त्यातील सुमारे ३२ एकरांवर संत्रा लागवड आहे. यामध्ये २६ वर्षे जुनी १०० झाडे, १७ वर्षे जुनी १२००, तर सहा वर्षांपूर्वीची १३०० झाडे, दीड ते दोन वर्षांची १२००, तर ३२ वर्षे वयाची सुमारे ३०० झाडे आहेत. जुनी लागवड १८ बाय १८ फुटांवर, तर नवी लागवड १० बाय २० फूट अंतरावर केली आहे.  पाण्याचे नियोजन  शेळके यांच्याकडे तीन विहिरी व दोन बोअरवेल्स असे पाण्याचे स्रोत आहेत. पूर्वी वाफे, त्यानंतर पाटपाणी आणि आता ठिबकच्या साहाय्याने संत्रा बागेला पाणी देण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. शेती पाच तुकड्यांत आहे. दोन शेतांमधील अंतरही जास्त असल्याने पाणी एका शेतातून दुसऱ्या शेतात नेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. एका शेतातील विहिरीलाच मुबलक पाणी असल्याने अन्य शिवार ओलीत करण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत होता. त्यामुळे निमखेडा शिवारातील विहिरीतून सालेपूर शिवारातील आपल्या दुसऱ्या शेतापर्यंत पाइपलाइन उभारत पाणी पोचविले.  ॲटोमेशनचा पर्याय  शेळके यांनी काळाची गरज ओळखत ड्रीप ॲटोमेशन अर्थात स्वयंचलित ठिबक सिंचनाचा पर्याय सुमारे ३२ ते ३५ एकरांत अवलंबिला आहे. शेळके यांचे मल्हारा येथील मित्र राहुल बोरेकर यांनी केळी पिकात ही यंत्रणा बसविली आहे. त्यांना झालेले फायदे लक्षात आल्यानंतर मग शेळके यांनी आपल्या शेतासाठी त्याचा वापर सुरू केला. सापन प्रकल्पाचा कालवा शेताजवळून गेला आहे. या कालव्याचे पाणी शेतीसाठी उपलब्ध होते. हे पाणी निमखेडा शिवारातील विहिरीत सोडण्यात येते. त्यामुळेही पाण्याची उपलब्धता होण्यास मदत झाली आहे. निमखेडा ते सालेपूर शिवारातील विहिरीपर्यंत पाणी पोचविण्यास साडेचार हजार फूट पाइपलाइन करावी लागली. ही तीन इंचांची पाइपलाइन असून त्याद्वारे विहिरीतील पाणी निमखेड्यावरून सालेपूर शिवारात आणले जाते. ॲटोमेशनच्या माध्यमातून शेत भिजविण्यासाठी पाच इंचांची अन्य पाइपलाइन सालेपूर ते निमखेडा शिवारापर्यंत वापरली आहे. अशाप्रकारे दोन पाइपलाइन्स उभाराव्या लागल्या. ॲटोमेशन व पाइपलाइन्स यासाठी एकूण सुमारे २० लाख रुपये खर्च आला. विद्राव्य खतांबरोबर त्याद्वारे जीवामृतदेखील देण्यात येते. पाण्याचा अपव्यय त्यातून टाळता आला आहे. झाडावर फळ असण्याच्या कालावधीत प्रतिझाड सुमारे १५० लिटर पाणी देणे शक्य होते. पूर्वी हीच गरज १९० लिटरपर्यंत जायची.  उत्पादन  स्वयंचलित यंत्रणा अलीकडेच बसवली असली तरी पिकांची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न शेळके यांनी पूर्वीपासूनच केला आहे. सुमारे चार हजार झाडांपासून त्यांना ३५० ते ४०० फळांचे उत्पादन मिळते.  जागेवरच प्रतिकिलो सुमारे २० रुपयांपासून २५ रुपये दर मिळतात. एकरी सुमारे ६० हजार रुपये उत्पादन खर्च येतो. अधिक वर्षे वयाच्या प्रतिझाडापासून सुमारे एक ते दीड क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. आंबिया बहराचे व्यवस्थापन ते करतात. या बहरातील फळांना अन्य बहरांच्या तुलनेत अधिक दर असल्याचे ते सांगतात. पूर्वी पीक व्यवस्थापनाकामी दररोज सहा मजुरांची गरज भासत होती. आता ही गरज दोन ते तीन मजुरांपर्यंत येऊन ठेपली आहे. पाण्याबरोबर खतांचाही अपव्यय टळला आहे. अजय यांनी परतवाडा येथे फवारणी यंत्र विक्रीचा व्यवसायही सुरू केला आहे. या माध्यमातून अतिरिक्‍त उत्पन्नाचा स्रोत शोधला आहे.  संपर्क- अजय शेळके - ९८२३०११६८४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com