कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबी उत्पादनाला संधी

 अळिंबीचे बेड स्वच्छ व बंदिस्त ठिकाणी ठेवावेत. वाढ झालेली धिंगरी अळिंबी
अळिंबीचे बेड स्वच्छ व बंदिस्त ठिकाणी ठेवावेत. वाढ झालेली धिंगरी अळिंबी

कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबीची लागवड करता येत असल्यामुळे व्यापारी तत्त्वावर अळिंबीचे उत्पादन घेता येते. अळिंबीपासून बनलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना चांगली बाजारपेठ उपलब्ध अाहे. त्यासोबतच मोठ्या हॉटेलमध्येही ताज्या अळिंबीला चांगली मागणी अाहे. त्यामुळे अळिंबीची लागवड करणे फायदेशीर ठरते.   रुचकर आणि पौष्टिक अळिंबीच्या १०-१२ प्रकारांची जगभरात व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते. अळिंबी ही विशिष्ट स्वाद व चवीसाठी पुरातन काळापासून सुपरिचित आहे. अळिंबीचा उपयोग प्राचीन काळापासून औषधीसाठी केला जातो. अन्नघटकांच्या पृथक्करणावरून अळिंबीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, प्रथिने व खनिजे असून भाजीपाल्यापेक्षा पौष्टिक असते, त्यामुळे दररोजच्या आहारात अळिंबीचा उपयोग केला जाऊ शकतो. अळंबीची आहारातील उपयुक्तता व औषधी गुणधर्म

  • पचनास सोपी, सात्त्विक व पौष्टिक आहे.
  • अळिंबीच्या प्रथिनांमध्ये लायसीन व ट्रिप्टोफॅन ही महत्त्वाची अमीनो ॲसिड आहेत. तृणधान्यांत त्यांचा अभाव असल्याने अळिंबीचा वापर केल्यास हे आवश्यक अमीनो ॲसिड शरिराला मिळतात.
  • पिष्टमय पदार्थ नसतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांना उपयुक्त.
  • प्रथिनांचे प्रमाण २.७ ते ३.९ टक्के असून, हे भाजीपाला व फळे यांच्या तुलनेत दुप्पट आहे.
  • आहारात समतोल राखण्यासाठी व शारीरिकदृष्ट्य़ा शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व मूलद्रव्ये अळिंबीमध्ये आहेत.
  • ब-१, ब-२ व क जीवनसत्त्वे, खनिजापैकी पालाश, कॅल्शियम, सोडियम, स्फुरद, लोह इत्यादी भरपूर प्रमाणात आहेत.
  • शरीर वाढीसाठी आवश्यक अमिनो आम्ले असल्याने लहान मुलांसाठी उपयुक्त.
  • क जीवनसत्त्वामुळे स्कव्‍‌र्ही रोग, नायसिन व पेयेनिक आम्लामुळे त्वचा, दात, हाडे यांच्या वाढीसाठी व चांगल्या दृष्टीसाठी याचा उपयोग होतो.
  • पिष्टमय पदार्थ व शर्करा अत्यल्प प्रमाणात असल्याने उच्च रक्तदाब असणा-यांना गुणकारी व आरोग्यवर्धक आहे.
  • कर्करोग, हृदयरोग, अर्धांगवायू, संधीवात, मधुमेहासाठी तर वरदानच आहे.
  • हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी, त्वचारोग, वजन कमी करण्यासाठी व आम्लपित्तावर अळिंबी उपयुक्त ठरते. यामुळेच अळिंबीचा रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे ठरते.
  • अळिंबीची लागवड व व्यवस्थापन

  • उसाची वाळलेली पाने, केळीची पाने व बुंधा, कापसाची वाळलेली झाडे, सोयाबीनचे कुटार, मक्याच्या व ज्वारीच्या धाटांचा उपयोग अळिंबी उत्पादनासाठी होतो.
  • बटन, शिंपला, धानपेढ्यांवरील अळिंबी या जातींची लागवड केली जाते. ‘राष्ट्रीय अळिंबी संशोधन केंद्राने अळिंबीच्या विविध जाती विकसित केल्या आहेत. जसे की काबुलभिंगरी/धिंगरी, यू-३, एस-११, एस-७६, एस-७९१, एनसीएस-१००, एनसीएस-१०१/१०२, एनसीबी-६, एनसीबी-१३ इत्यादी.
  • बटन अळिंबी

  • बटन अळिंबीची लागवड कंपोस्ट खतावर केली जाते.
  • दीर्घ मुदतीची पद्धत (२६-२८ दिवस) किंवा कमी मुदतीच्या पद्धतीने (१६ ते १८ दिवस) कंपोस्ट तयार केले जाते. ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते.
  • कंपोस्टच्या वजनाच्या ५ ते १० टक्के या प्रमाणात बी पेरले जाते.
  • १२-१५ दिवसाने अळिंबीची वाढ झाल्यावर दीड इंच जाडीचा कंपोस्ट खत, माती, वाळू यांच्या निर्जंतुक मिश्रणाचा थर द्यावा लागतो. उत्पादनाकरिता १२ अंश सेल्सिअस तापमान लागते.
  • नैसर्गिक वातावरणात (२० अंश ते ३० अंश सेल्सिअस तापमान व आर्द्रता ८०-८५ टक्के) या अळिंबीची लागवड ८-१० महिने करता येते.
  • शिंपला अळंबी (धिंगरी अळिंबी)

  • संपूर्ण भारतात या अळिंबीची लागवड करतात. धिंगरी अळिंबीची लागवड बटन अळिंबीपेक्षा अल्पखर्चिक व किफायतशीर आहे.
  • कमी पाण्यात धिंगरी अळिंबीची लागवड करता येते.
  • धिंगरी अळिंबीची लागवड पद्धत

  • व्यापारी तत्त्वावर अळिंबीची लागवड करण्यासाठी गव्हाचे काड किंवा भाताचे काड वापरले जाते. लागवडीच्या दृष्टीने पिकाची काढणी झाल्यास गव्हाचे काड किंवा भाताचे काड पावसात भिजू देऊ नये, ते सुरक्षित ठिकाणी साठवावे.
  • अळिंबी लागवडीचे विविध टप्पे आहेत. प्रथम पाण्यात ‘काड’ भिजवून मग त्याचे निर्जंतुकीकरण करावे.
  • निर्जंतूक केलेले काड प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये थरावर थर देऊन दाबून भरावे. काडाच्या प्रत्येक थरावर धिंगरी अळिंबीचे बी (स्पॉन) पसरावे.
  • सर्व थर भरून झाल्यानंतर पिशवीचे तोंड घट्ट बांधून बंद करुन पिशवीला बाहेरुन छीद्र पाडावेत.
  • भरलेल्या पिशव्या रॅकवर स्वच्छ व बंदिस्त ठिकाणी ठेवाव्यात.
  • काडावर स्पॉनची पूर्ण वाढ २५ अंश सेल्सिअस तापमानात १५ दिवसांत होते. टाचणीच्या टोकाएवढी अळिंबी प्लॅस्टिकच्या पिशवीत दिसू लागल्यास वरील पिशवी ब्लेडने अलगद कापावी व वेगळी करावी. बेड १५ सें.मी. अंतर ठेवून रॅकवर ठेवावेत.
  • हवामानानुसार बेडवर दिवसातून २ ते ३ वेळेस पाण्याची फवारणी करावी. जमिनीवर व भिंतीवर पाणी शिंपडून खोलीत आर्द्रता ८५ टक्‍क्‍यांपर्यंत राहील याची काळजी घ्यावी.
  • पुढील ३-४ दिवसांत ८-१० सें.मी. व्यासाची पांढरी किंवा करड्या रंगाची अळिंबी तयार होते.
  • पक्व अळिंबी काढण्यापूर्वी ४-६ तास अगोदर बेडवर पाणी शिंपडू नये.
  • पूर्ण वाढ झालेली अळिंबी काढल्यानंतर २ ते ३ वेळेस पाणी घालावे. ८-१० दिवसांनी दुसरे, तर परत ८-१० दिवसांनी तिसरे पीक त्याच बेडवर तयार होते.
  • दोन किलो वाळलेल्या काडाच्या एका बेडपासून ४५ दिवसांत १.५० ते १.७५ किलो अळिंबीचे उत्पादन मिळते.
  • अळिंबी वाळवून ठेवण्याची पद्धत गार पाण्यात प्रथम अळिंबी स्वच्छ धुवावी, नंतर पातळ फडक्‍यात अळिंबी बांधून ती उकळत्या पाण्यात ३ ते ४ मिनिटे ठेवावी. त्यानंतर ती गार पाण्यात ठेवून थंड करावी. अळिंबीतील जादा पाणी काढून उघड्यावर परंतु सावलीत वाळवावी व प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून सील करावी. अळिंबीपासून विविध खाद्यपदार्थ तयार होतात धिंगरी अळिंबी रेफ्रिजिरेटरमध्ये तीन ते चार दिवस चांगल्या स्थितीत राहू शकते. उन्हात किंवा ड्रायरमध्ये वाळवून हवाबंद पिशवीत ठेवता येते. वाळल्यामुळे वाळलेली अळिंबी खाण्यासाठी वापरताना कोमट पाण्यात १५ मिनिटे भिजत ठेवावी. भिजल्यानंतर वजनात पाच ते सहा पट वाढ होते. यापासून पुलाव, सूप, करी, भजी, इ. खाद्यपदार्थ तयार करता येतात.    संपर्क ः किरण नवले, ९९७५३०३१५० (श्रमशक्ति कृषी महाविद्यालय, मालदाड, संगमनेर, जि. नगर) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com