कासदाह आजाराची लक्षणे, प्रतिबंध, उपचार

कासदाह होऊनये यासाठी दूध काढताना कासेची वेळोवेळी तपासणी करावी.
कासदाह होऊनये यासाठी दूध काढताना कासेची वेळोवेळी तपासणी करावी.

देशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या प्रसूतीपेक्षा नंतरच्या प्रसूतींच्या काही दिवसांनतर किंवा काही दिवस आधी कासदाह आजार अधिक प्रमाणात होतो. जिथे जनावरांची संख्या जास्त असते तिथे कासदाहाचा संभव जास्त असतो. ज्या जनावरांच्या जातींमध्ये कास छोटी आणि सडे मोठी असतात, अशा जनावरांमध्ये कासदाह अजार होण्याचे प्रमाण जास्त असते. कासदाह हा प्रामुख्याने दुधाळ गायी-म्हशींमध्ये होणारा जिवाणूजन्य अजार आहे. हा आजार म्हशींपेक्षा गायींमध्ये जास्त प्रमाणात होतो, ज्या गायी जास्त दूध देतात. ज्या जनावरांना खाद्यातून अधिक प्रमाणात प्रथिने दिली जातात व ज्या जनावरांचा जार पडत नाही त्यांच्यामध्ये कासदाह होण्याची जास्त शक्यता असते. या आजारात दूध गोठते, कास गरम होऊन सुजते. कधी कधी रक्तस्रावही होतो.

कासदाह आजाराची कारणे

  • कासेमध्ये जिवाणू आत प्रवेश करतात. जिवाणू मध्ये मुख्यतः स्टॅफिलोकोकाय, स्ट्रेप्टेकोकाकय, कोरीने बॅक्टेरिया, इकोलाय अणि बॅसिलस या जिवाणूमुळे कासदाह अजार होतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे.
  • जिवाणू कासेला झालेल्या जखमांमधून सडांच्या माध्यमातून कासेमध्ये प्रवेश करतात.
  • रक्त शोषणाऱ्या मोठ्या आकाराच्या माश्याही या आजाराचा प्रसार करतात.
  • कारणे

  • कासेला जखमा होणे
  • दूध काढणाऱ्याचे अस्वच्छ हात व कपडे.
  • गोठ्याची अस्वच्छता.
  • गोठ्यामध्ये घोंगावणाऱ्या माश्या
  • धार काढण्याची चुकीची पद्धत.
  • दूध पूर्ण न काढणे.
  • गोठ्यातील पृष्ठभाग सतत ओला असणे, गोठ्यामध्ये स्वच्छता नसणे.
  • दुधाळ आणि मोठी कास असणाऱ्या जनावरांमध्ये कासदाह होण्याचे प्रमाण जास्त आहे. मोठ्या कासेमुळे सडांना व कासेला दुखापत होण्याची शक्यता असते.
  • जार लटकणे (पूर्णपणे न पडणे) किंवा प्रसूतीच्या वेळी झालेला संसर्ग.
  • अन्य आजारांचा प्रभाव.
  • लक्षणे

  • जनावरांमध्ये अस्वस्थता व ताप येणे
  • कास गरम, लाल होते, वेदना होतात, काही वेळाने ताप येतो व कास थंड आणि कठोर होते.
  • सडांमधून दूध येणे बंद होते, सडातून पिवळसर रक्तयुक्त स्राव येतो.
  • नेहमीच्या (सामान्य) दुधापेक्षा दह्यासारखसारखे स्वरूप असणारा स्राव, पिवळ्या, भुऱ्या स्रावासोबत पांढरे (गोठलेले) कण व एपिथेलियम टिश्यू (पेशी) येतात .
  • तीक्ष्ण कासदाह तीव्र कासदाहामध्ये हळूहळू दूध येणे बंद होत. कास सुजते.

    दीर्घकालीन कासदाह

  • कास अधिक कठोर व लहान होते.
  • दूध पातळ व पाण्यासारखे येते.
  • कधी कधी कासेला फोड येतात.
  • कास दाबल्यानंतर वेदना होतात.
  • अंतिम टप्प्यात दूध पूर्णपणे बंद होते.
  • रोग प्रतिबंध

  • कासदाह मुख्यता अस्वच्छतेमुळे पसरतो. त्यामुळे गोठ्याची पूर्ण स्वच्छता ठेवावी. गोठ्यामध्ये दर १५ दिवसांनी जंतुनाशक फवारावे.
  • दूध काढण्यापूर्वी व नंतर आयोडीन सोल्यूशन (०.२५ टक्के) ने सडांना धुवावे व स्वच्छ हाताने दूध काढावे.
  • दूध काढताना पूर्ण हाताचा उपयोग करावा, अंगठ्याने दूध काढू नये.
  • दूध काढताना सडांमधून संपूर्ण दूध काढावे.
  • गाय व म्हशींना दूध काढल्यानंतर अर्धा तास बसू देऊ नये.
  • आजारी जनावरांचे दूध त्यांच्या वासरांना पाजू नये.
  • आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे व त्यांचे दूध शेवटी काढावे.
  • वेळोवेळी सर्व जनावरांच्या दुधाची चाचणी करावी,
  • स्ट्रिपकप पद्धतीने दुधाची चाचणी करावी.
  • वेळेवर कासदाहचा उपचार झाला नाही तर टी. बी. रोगाचे जिवाणूदेखील आत प्रवेश करतात व त्यामुळे रोग आणखी गंभीर होतो.
  • उपचार सुरू झाल्यानंतर तीन ते पाच दिवस ट्यूब व इंजेक्शन सोडले पाहिजे.
  • एक किंवा दोन दिवसांत पूर्णपणे उपचार होत नाही.
  • कासदाहाच्या उपचारासाठी प्रतिजैविके पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार द्यावी.
  • दूध कमी होताना गायी व महशींच्या चारही सडांमधून संपूर्णपणे दूध काढावे व प्रत्येक सडामध्ये ट्यूबने औषधे सोडावीत.
  • उपचार

  • कोणतेही प्रतिजैविके वापरण्यापूर्वी, दुग्धप्रतिजैविक संवेदनशीलता तपासावी व पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार द्यावे .
  • सडामधून पूर्णपणे खराब दूध काढून टाकावे. दिवसातून एकदा प्रतिजैविके ट्यूबद्वारे द्यावीत. जर संसर्ग अधिक असेल तर सकाळी व संध्याकाळी दिवसातून दोनदा द्यावीत.
  • तीव्र कासदाहामध्ये कास गरम होते तेव्हा शेकमध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर केला जातो, या अवस्थेत कासेला थंड करावे आणि दीर्घकालावधीतील कासदाह असेल जेव्हा कास थंड व कडक होते तेव्हा उबदार शेक द्यावा.
  • संपर्क ः अमोल आडभाई, ८८०५६६०९४३ (राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाना)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com