पेढा, बासुंदी, खव्यासाठी प्रसिद्ध वटबोरी

कुटुंबातील सदस्यांचे श्रम दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याच्या या कामात वटबोरी गावातीलकुटुंबातील सदस्यांचा राबता राहतो. त्यामुळे मजुरीवर अधिक खर्च करण्याची गरज भासत नाही. त्यातून उत्पादकता खर्चात बचत होते.
खव्यापासून पेढा निर्मिती करण्याच्या कामात कुटुंबातील सदस्यांचाच वाटा असतो.
खव्यापासून पेढा निर्मिती करण्याच्या कामात कुटुंबातील सदस्यांचाच वाटा असतो.

यवतमाळ जिल्हयातील वटबोरी हे दुग्धव्यवसाय व प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध गाव आहे. अनेक वर्षांची या गावाला दुग्धोत्पादनाची परंपरा आहे. येथील ग्रामस्थांकडून तयार होणाऱ्या पदार्थांना ग्राहकांची चांगली पसंदी आहे. विदर्भातील दुग्धव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यात या गावाचे योगदान महत्त्वाचे मानावे लागेल.   असे आहे वटबोरी  नागपूर-यवतमाळ महामार्गावर कळंब तालुक्‍यातील (जि. यवतमाळ) वटबोरी हे गाव आहे. या गट ग्रामपंचायतीमध्ये वटबोरीसह टपालहेटी, बेलापूर, सोनखास या चार गावांचा समावेश आहे. चारही गावांची मिळून लोकसंख्या सुमारे १२०० आहे. गवळी समाजाची लोकवस्ती अधिक असल्याने गावात पारंपरिक दुग्ध व्यवसाय आहे. दुधाचे संकलन होऊन एसटी बसमार्फत दूध यवतमाळमधील हॉटेल व्यावसायिकांपर्यंत पोचवले जायचे. सुरवातीला तीन हजार लिटरपर्यंत दुधाचा पुरवठा व्हायचा. त्या वेळी चाऱ्याची उपलब्धता सहज आणि मुबकल व्हायची. पुढे चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होत गेला. दुधाळ जनावरांसाठी ढेप, पोषक अन्न देण्याची गरज भासू लागली. खर्चही वाढू लागला.  दुधाची मागणी  आजमितीला वाटबोरी येथे सुमारे ७५, टपालहेटीला २०, बेलापूरहेटी सुमारे ३० तर सोनखासला १५ पर्यंत गवळी समाजाची कुटुंबे राहतात. प्रतिकुटुंबाकडे किमान पाच ते सहा दुधाळ जनावरे आहेत. हळूहळू प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारात मागणी वाढू लागली. पेढा, बासुंदी, कलाकंद आदी पदार्थांच्या निर्मितीसाठी गावातील दूधही कमी पडू लागले. हा तुटवडा भरून काढण्यासाठी वागदा येथून १०० लिटर दुधाचा पुरवठा गावाला होऊ लागला. रामाखडी येथूनदेखील तेवढ्याच दुधाची मागणी येथील व्यावसायिकांची राहते. गावातील दुग्धोत्पादनातील काही कुटुंबे दही, लोणी विक्रीही काही गावांमध्ये फिरून घरोघरी विक्री करतात. त्याद्वारे त्यांनी आपले उत्पन्न वाढवले आहे.  खवानिर्मितीत पाऊल  काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट असेल. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह भागातील हॉटेल व्यावसायिकांना वाटबोरीत मोठ्या प्रमाणावर दुग्धोत्पादन होत असल्याची माहिती मिळाली. त्यांना पेढा व मिठाईचे अन्य पदार्थ तयार करण्यासाठी खवा लागायचा. मग काही व्यावसायिकांनी हे गाव गाठले. गावकऱ्यांना मग उत्पन्न वाढवण्याचा पर्याय मिळाला. गावातील आनंदराव घाटोळ यांनी खवा उत्पादनास सुरवात केली.  त्यांच्या पावलावर पाऊल टाकून येवले, पुंडलीकराव चावरे आणि मग टप्प्याटप्प्याने गावातील बहुतांश दुग्ध व्यावसायिक दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी सरसावले असे गावातील सुनील चावरे सांगतात.  बाजारपेठ केली विकसित  दुग्धजन्य पदार्थांना त्या वेळी स्थानिक स्तरावर बाजारपेठ नव्हती. परिणामी राजूरा, गडचिरोली, मुकुटबन, पांढकरवडा, वणी, बल्लारशाह या भागात खासगी वाहनांच्या माध्यमातून सुमारे १०० ते २०० किलो खवा विक्रीसाठी नेण्यात येई. मोठ्या प्रमाणावर खवा उत्पादन सुरू झाल्यानंतर व्यावसायिकांकडून दर पाडण्याचे प्रयत्नदेखील झाले.  थेट बाजारपेठ  केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचे या गावाशी जुने ऋणानुबंध आहेत. त्यांची गावात नेहमी ये-जा असायची. गावातील दुग्धोत्पादकांना बाजारपेठ मिळवण्यासाठी करावी लागणारी दमछाक त्यांनी लक्षात घेतली. पश्‍चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर गावातच पेढे आणि अन्य दुग्धजन्य विक्रीसाठी दुकाने थाटण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्याद्वारे गावातील अर्थकारणाला मोठी दिशा मिळेल असे त्यांचे म्हणणे होते. अधिक चर्चेतून व अभ्यासातून मग गावकऱ्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. ते प्रक्रिया व्यावसायिक झाले.  ग्राहकांच्या पसंतीस उतरले पदार्थ 

  • नागपूर- यवतमाळ रस्त्यावरील बहुतांश प्रवासी गावच्या ठिकाणी हमखास थांबून पदार्थांची खरेदी करतात. 
  • पेढा, खवा, बासुंदी, कलाकंद, रबडी अशा तोंडाला पाणी सुटणाऱ्या पदार्थांना ग्राहकांची चांगली पसंती मिळते. विशेष म्हणजे खवय्यांच्या जिभेवर रुळणारी चव असल्याने ग्राहक पुन्हा येथे येथून 
  • पदार्थ खरेदी करतो. कुंदा, खवा आदीं पदार्थ साखर, साखरेविना या प्रतीत २०० ते २६० रुपये प्रति किलो दराने (घाऊक) विकले जातात. कलाकंद, २८० रु., मिल्क केक ३०० रु., श्रीखंड २४० रु., तूप ५५० रुपये असे प्रतिकिलोचे दर आहेत. खवा दररोज १५ ते २० किलो तर पेढा २५ किलोपर्यंत विकला जातो. व्यापाऱ्यांकडून त्यांची पुढे अधिक किमतीने विक्री होते. 
  • देशी जातींचे संवर्धन  गावात गावरान म्हशींचे पारंपरिक संगोपन होते. अधिक उत्पादन देणारी म्हणून गावातील काहींनी मुऱ्हा म्हशीदेखील संगोपनासाठी आणल्या होत्या; परंतु हा प्रयोग फार यशस्वी झाला नाही.  दर्जेदार कापूस उत्पादनात आघाडी  गावातील शेतकऱ्यांचा दर्जेदार कापूस उत्पादनाही हातखंडा आहे. यंदा एका खासगी कंपनीच्या प्रोत्साहनातून काही शेतकऱ्यांकडून सेंद्रिय कापूस पिकविला जात आहे. त्यातून आर्थिक फायदा वाढेल अशी त्यांना आशा आहे.  संपर्क- सुनिल चावरे-९४२०१२१४५३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com