तूप, खवा निर्मितीसह उभारली सक्षम विक्रीव्यवस्था 

दूध संघात काम करीत असताना आलेले अनुभव आणि मिळालेली माहिती तूप, खवा तयार करण्यासाठी उपयोगी आली. आज नवी दिल्ली येथील प्रगती मैदान परिसरात एका ठिकाणी तुपाची मागणी पुरवत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनादेखील आपल्या दुधाला शाश्‍वत विक्री व्यवस्था तयार झाली आहे. -आजीनाथ जगदाळे - ९८५०७२२०६७
उत्पादनापासून तुपाच्या पॅकिंगपर्यंतची सर्व कामे कुटुंबातील व्यक्ती करतात.
उत्पादनापासून तुपाच्या पॅकिंगपर्यंतची सर्व कामे कुटुंबातील व्यक्ती करतात.

दहावीपर्यंत शिक्षण झालेले. रोजगारासाठी दूध संघात काम केले, त्यामुळे दुग्धोत्पादनाची मागणी ओळखली. गायीच्या दुधापासून तूप, खवा तयार करण्यास सुरवात केली. आई आणि पत्नीच्या मदतीने व्यवसायात भरभराट घेतली. स्थानिकसह देशातील मार्केटही मिळवले. मोरगव्हाण (जि. नगर) येथील आजीनाथ जगदाळे आज शेतकऱ्यांकडून दूध घेतात. महिन्याला तब्बल दोन टन तूप व मागणीनुसार खवा उत्पादन घेऊन विक्री करणारे जगदाळे भागातील एकमेव आहेत.    मोरगव्हाण (ता. नेवासा, जि. नगर) येथे आजीनाथ व राजेंद्र हे जगदाळे बंधू राहतात. दोघांचेही शिक्षण दहावीपर्यंत झाले. राजेंद्र टॅंकरचालक आहेत. आजीनाथ यांनी तालुका दूध संघात चार वर्षे काम केले. संघाच्या दूधगाडीबरोबर त्यांना अनेकवेळा जावे लागे. त्यामुळे बाजारात नेमकी कशाची व किती मागणी आहे याचा व विक्री व्यवस्थेचा अभ्यास त्यांनी केला. त्यानंतर संघातील नोकरी सोडून स्वतः तूप, खवा तयार करण्याचा व्यवसाय करण्याचे निश्‍चित केले.  व्यवसायाची उभारणी 

  • विक्री व्यवस्थेसाठी शनिशिंगणापूर रस्त्यावर भाड्याच्या जागेत तूप, खवा तयार करण्याचे युनिट २००५ मध्ये उभारले. त्यासाठी लागणाऱ्या यंत्रासाठी सात लाख रुपयांचा खर्च केला. 
  • सुरवातीला काही दिवस पस्तीस किलो तूप बाहेरून खरेदी करून मागणीनुसार विक्री केली. साधारण चार महिने हा व्यवसाय केला, त्यानंतर स्वतःच तयार करण्याचे ठरवले. 
  • जगदाळे बंधूंनी २००२ मध्ये दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्या वेळी दोन गायी व एक म्हैस होती. दूध संकलन केंद्र सुरू केले. तीन वर्षे व्यवसाय केला. सन २००५ पर्यंत तो सुरू राहिला; पण त्यानंतर गावातील शेतकऱ्यांकडून दूध संकलन सुरूच ठेवले. सुरवातीला चाळीस लिटरपासून खरेदी सुरू केली. 
  • आज सुमारे साडेसातशे ते आठशे लिटर दुधाची खरेदी करून त्यापासून तूप तयार केले जाते. 
  • क्रांती बचत गटाचे साह्य  आजीनाथ यांच्या आई शांताबाई यांनी गावातील महिलांना सोबत घेऊन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून क्रांती महिला बचत गट सुरू केला. त्यातून सुरवातीला ४० हजार रुपये कर्ज घेतले. त्यानंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने कर्ज घेऊन स्टीम बॉयलर, जनरेटर, खवा यंत्र, क्रीम सेपरेटर, फॅटचे व पॅकिंग यंत्र तसेच फ्रीज आदी सामग्री खरेदी केली.  प्रदर्शनातून जोडले ग्राहक  या व्यवसायाला महिला बचत गटासाठी होत असलेल्या विविध प्रदर्शनांतून ग्राहक जोडले आहेत. शांताबाईंनी गटाच्या माध्यमातून दिल्लीच्या राष्ट्रीय प्रदर्शनासह हरियाना, मुंबईसह राज्य व देशातील विविध प्रदर्शनांत तूप विक्रीला ठेवले. तेथे मागणी चांगली राहिली. ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. येथूनच खऱ्या अर्थाने सक्षम विक्री व्यवस्था उभी राहिली. त्याचबरोबर पुणे, नगर व परिसरातही हॉटेल व्यावसायिक ग्राहक तयार केले.  दोन टन महिन्याची विक्री  सध्या महिन्याला दोन टन तूप, तर मागणीनुसार खव्याची निर्मिती करून विक्री केली जाते. मुंबई, पुणे शहरांत गायीच्या तुपाला मोठी मागणी आहे. सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या शनी शिंगणापूर रस्त्यावर तूप तयार करण्याचे युनिट आहे. त्यानजीक रस्त्याकडेला स्टॉल उभारून दररोज महिन्याला पाचशे किलोपर्यंत तूप विक्री होते. शिवाय, नवनवे ग्राहक जोडले जात आहेत.  ॲमॅझोनवरून विक्री  महिला अार्थिक विकास महामंडळाच्या संमतीने जगदाळे यांनी तुपाचा ‘तेजस्विनी’ हा ब्रँड तयार केला आहे. महिला बचत गटाच्या मदतीने यशस्वी झालेल्या उद्योजकांत जगदाळे कुटुंबाचा  समावेश आहे. महामंडळाने राज्यातील काही प्रमुख व्यावसायिकांच्या मालाची जगभरात ‘ऑनलाइन’ विक्री करण्यास संमती दिली आहे, त्यात जगदाळे यांच्या तुपाचाही समावेश आहे. महामंडळामार्फत ॲमॅझोनवरूनही मागणीनुसार तुपाचा पुरवठा केला जातो असे महामंडळाचे नगर जिल्हा समन्वयक संजय गायकवाड यांनी सांगितले. जगदाळे यांनी व्यापारी वर्ग केंद्रस्थानी ठेवून नव्याने तुपाचा ‘ओशिया’ ब्रॅंडही विकसित केला असून, त्याचीही विक्री सुरू आहे.  दुधाची सरकारी दराने खरेदी  गाईच्या दुधाला सरकारी नियमानुसार जो दर असेल तो आजीनाथ देतात. दर महिन्याच्या पाच व वीस तारखेला दूध उत्पादकांना मोबदला दिला जातो. तूप विक्रीतून पैसे मोकळे होत असल्याने खेळते भांडवल राहते. काही दुग्ध उत्पादकांना दूध व्यवसायासाठी गायी खरेदी करण्यासाठी आत्तापर्यंत पाच लाख रुपयांचे वाटपही त्यांनी केले आहे.  शेतीतही आघाडीवर  तूप उत्पादनाचा व्यवसाय करताना जगदाळे यांनी शेतीकडेही दुर्लक्ष होऊ दिले नाही. परिवाराची वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. दुग्धप्रक्रिया व्यवसायातून सहा वर्षांपूर्वी आठ एकर शेती खरेदी केली. या भागात ज्वारी, बाजरी यासारखी पारंपरिक पिके होतात; पण जगदाळे यांनी तीन वर्षांपूर्वी ‘लताफळ’ नावाच्या सीताफळाची साडेतीन एकरांत लागवड केली आहे. या भागात त्यांनीच पहिल्यांदा हे पीक घेतले आहे. त्यात खरबुजाची दीड एकरात लागवड केली आहे. संरक्षित पाणी म्हणून दीड एकरावर सव्वीस कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले आहे. कांद्याचेही उत्पादन घेतले आहे.  मजुरीतून पैशांची बचत  प्रकिया व्यवसायात कुटुंबातील सर्व सदस्यच पॅकिंगपर्यंतची सगळी कामे करतात. घरातील तीन ते चार व्यक्ती सतत या कामांत असल्याने मजुरांची मदत घेण्याची गरज पडत नाही. त्यातून पैशांची बचत होते. आत्तापर्यंत हा व्यवसाय भाडेतत्त्वावरील जागेवर सुरू आहे. आता दहा गुंठे जागेची खरेदी केली असून, तेथे युनिट उभे करण्याचे नियोजन आहे. 

    संपर्क- आजीनाथ जगदाळे - ९८५०७२२०६७   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com