महाराष्ट्राला ‘मनरेगा’चे राष्ट्रीय पुरस्कार

महाराष्ट्राला ‘मनरेगा’चे राष्ट्रीय पुरस्कार
महाराष्ट्राला ‘मनरेगा’चे राष्ट्रीय पुरस्कार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्राला विविध श्रेणीत चार पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात मंगळवारी (ता.११) केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)’ पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. या वेळी विविध श्रेणीत एकूण २३७ पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राला रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबाजवणीसाठी राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफीस अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री राम कृपाल यादव, सचिव अमरजीत सिन्हा व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलसिंचनात केलेल्या उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार रोजगार हमी योजना आयुक्त ए. एस. आर. नाईक, रोहयो उपसचिव प्रमोद शिंदे व कमलकिशोर फुटाने यांनी स्वीकारला. रोजगार हमी विभागाने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये नैसर्गिक स्राेतांचे व्यवस्थापनांतर्गत एनआरएममध्ये एकूण ७० हजार ५१४ कामे पूर्ण केली आहेत. यासाठी १४५१ कोटींचा निधी खर्च झाला आहे. एनआरएमअंतर्गत राज्य शासनाची महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार योजना’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजना राबविण्यात आल्या व या माध्यमातून रोजगारनिर्मिती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावळ यांनी २ आक्टोबर २०१६ रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना जाहीर केली. कृषी व वन विभागाला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीचे अधिकार दिले. त्याकरिता प्रमुख ११ योजना जाहीर केल्या, त्यामधील कृषी व जलसंधारण विषयक कामाच्या प्रमुख योजनांमध्ये ‘अहिल्यादेवी सिंचन विहीर’ योजनेंतर्गत १ लाख १० विहिरी घेण्यात आल्या, त्यामधून ५ लाख एकर संरक्षित सिंचन तयार झाले. ‘कल्पवृक्ष फळबाग योजने’मध्ये ७८ हजार एकरवर फळबाग लागवड करण्यात आली. नरेगातून अंकूर रोपवाटिकेची कामे हाती घेण्यात आले यातंर्गत ९ कोटी रोपे तयार करण्यात आली, या माध्यमातून राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेस बळकटी मिळाली. नंदन वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत ८ लाख रोपांची लागवड करण्यात आली. अशाप्रकारे नैसर्गिक साधन संपत्ती विषयक कामांवर एकूण १४५१ कोटी रुपये खर्च करण्यात आले.   गडचिरोली जिल्ह्याचा सन्मान गडचिरोली जिल्हा हा मनरेगाअंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरला आहे. या जिल्ह्यास या वेळी सन्मानित करण्यात आले. रोजगार हमी आयुक्त, तसेच गडचिरोली जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नाईक, सध्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग, उपायुक्त के. एन. राव, उपमुख्यकार्यकारी अधिकारी जयंत बहरे, गटविकास अधिकारी एस. पी. पडघन यांनी पुरस्कार स्वीकारला. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ८ हजार ८९४ कामांना सुरुवात झाली. यातून दोन वर्षांत ३९.१२ लाख मनुष्य दिन निर्मिती झाली. विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या नेतृत्वात या आदिवासीबहुल जिल्ह्यामध्ये मनरेगाअंतर्गत वैयक्तीक कामांवर भर देण्यात आले. जिल्ह्यात शेततळे, सिंचन विहीर, व्हर्मी कंपोस्ट आदी ६ हजार ७५० कामे पूर्ण झालेली आहेत. नागरी ग्रामपंचायतींचा सन्मान ः मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातीलच गडचिरोली ब्लॉकमधील नागरी ग्रामपंचायतीला गौरविण्यात आले. सरपंच अजय मशाखेत्री आणि ग्रामसेवक राकेश शिवणकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या ग्रामपंचायतीने एनआरएमची विक्रमी ३८ कामे पूर्ण केली. या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली.   नूतन प्रकाश यांना उत्कृष्ट डाकसेवक पुरस्कार ः ठाणे जिल्ह्यातील खुटाघर येथील ग्राम डाकसेवक नूतन प्रकाश यांनी २०१६-१७ मध्ये स्थानिक रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या जवळपास ३०० मजुरांना सात लाख रुपयांचे वितरण केले. त्यांच्या या सेवेसाठी त्यांना सन्मानित करण्यात आले.   पुण्यातील एमपीटीए संस्थेला तृतीय पुरस्कार मनरेगाअंतर्गत दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य आधारित योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पुणे येथील एमपीटीए शिक्षण संस्थेला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद देशपांडे, सहायक उपाध्यक्ष अमोल वैद्य, संचालक प्रसाद कराडकर यांनी स्वीकारला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com