agriculture story in marathi, multi cropping in drought condition, jadhavvadi, koregaon, satara | Agrowon

डोंगर फोडून दुष्काळातही नंदनवन फुलवण्याची जिद्द 
विकास जाधव
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पिके पाहून समाधान 
रामचंद्र जाधव सांगतात की केलेल्या परिश्रमांचे फळ मिळण्यास सुरवात झाली आहे. उत्पादन किती मिळेल? उत्पन्न हाती येईल का याची उत्तरे देणे सद्यःस्थितीत तरी शक्य नाही. पण दुष्काळातही पिके जगवली याचे समाधान आहे

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग अवर्षणप्रवण म्हणून ओळखला जातो. उंचच उंच डोंगरकडा, त्याखाली खडकांनी भरलेली लालसर ओबडधोबड आणि नेहमीच तहानलेली जमीन... अशाच तहानलेल्या डोंगराळ खडकावर घामाचे सिंचन करून शेतीचे नंदनवन फुलवण्याचा प्रयत्न तालुक्यातील जाधववाडी येथील रामचंद्र राजाराम जाधव यांनी केला आहे. डोंगर फोडून शेती विकसित करताना दुष्काळी स्थितीतही डाळिंब, आले, टोमॅटो, ज्वारी यांसारख्या पिकांचे उत्पादन घेण्याची त्यांची धडपड अत्यंत स्तुत्य म्हणावी लागेल
 
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा उत्तरेचा भाग म्हणजे सह्याद्रीच्या सावलीचा प्रदेश. येथे पर्जन्यमान अतिशय कमी असते. याच भागात जाधववाडी गाव वसले आहे. गावचा शिवार चक्क खडकांचा, डोंगरमाथ्यांचा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या डोंगरमाथ्यावर सर्वत्र कुसळ उगवलेले दिसते. मुळात पिण्याच्या पाण्याचीच तीव्र टंचाई, तर मग शेतीची अवस्थाही अत्यंत बिकट असते. येथील फार कमी शेती बागायती पाहण्यास मिळते. ऐन उन्हाळ्यात गावाला टँकरचा आधार घ्यावा लागतो. 

निसर्गाशी झुंज देत शेती 
जाधववाडीतील रामचंद्र राजाराम जाधव प्रतिकूल परिस्थितीतही माघार न घेणारे शेतकरी. निसर्गाशी झुंज देत त्यांनी शेतीला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी या कुटुंबाचा लग्नकार्यात घोडे पुरवण्याचा व्यवसाय होता. कुटुंबाच्या विभाजनानंतर रामचंद्र यांच्या वाट्याला चार एकर शेती आली. व्यवसाय व शेतीतून मिळालेल्या उत्पादनातून त्यांनी डोंगराळ पट्ट्यात सहा एकर शेती खरेदी केली. हा भाग घरापासून सुमारे तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे. चढ-उताराच्या भागात पीकपद्धतीचे नियोजन करणे तसे आव्हानाचे होते; पण जिद्द असलेल्या जाधव यांनी आव्हान पेलले. 

खडक फोडून शेती 
जाधव यांना दोन मुले आहेत. पैकी रणजित लष्करात आहे, तर सचिन हा वडिलांना शेतीत मदत करतो. डोंगर फोडून शेती विकसित करताना पिता-पुत्रांनी एकत्रितपणे मन लावून काम केले. दीड- दोन वर्षांत 
मोठे दगड बाजूला काढण्याचे दिव्य आव्हान पार पाडले. गाळाची शेकडो ट्रॅक्टर माती आणून शेतात टाकली. अथक परिश्रमातून लागवडयोग्य जमीन तयार झाली. शेताच्या खालील बाजूस ओढा आहे, तिथे विहीर खोदली. तसेच सर्व क्षेत्राला पाणी देता यावे यासाठी कूपनलिकादेखील घेतली. तरीही संरक्षित पाण्याचा पर्याय वापरणे गरजेचे होते. मग कृषी विभागाच्या मदतीने १२० बाय १०० बाय ३० फूट खोल या आकारमानाचे शेततळे खोदले. त्याच्या तांत्रिक बाजू मजबूत केल्या. विहीर आणि कूपनलिकेमधील पाण्याद्वारे शेततळे भरून घेतले. 

दुष्काळात पिकांचे नियोजन 
विकसित केलेल्या शेतीत एक- दीड एकर असे प्लॉट तयार केले. तीन एकर क्षेत्रात रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन १५ बाय दहा फूट अंतरावर सुपर भगवा या डाळिंब वाणाची लागवड केली. बाग लहान असल्याने त्यात आले, टोमॅटो यांसारखी आंतरपिके घेतली. यापासून समाधानकारक अर्थार्जन झाले. टप्प्याटप्प्याने शेतीत वाढ करत नेली. यंदा पाऊस झालाच नाही, त्यामुळे संकट वाढले. मात्र उपलब्ध पाण्याच्या जोरावर पिके जगवण्याची कसरत केली जात आहे. एक एकर आले आहे. डाळिंबाच्या सुमारे आठशे ते साडेआठशे झाडांचे संगोपन होते आहे. दीड एकर टोमॅटो होता. मात्र पाण्याअभावी व दरांअभावी प्लाॅट सोडून देणे भाग पडले आहे. हरभरा दोन एकर व रब्बी ज्वारी एक एकर आहे. 
सध्या शेततळे भरले असले तरी अद्याप एप्रिल, मे महिन्यातील पाण्याची झळ लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन ठिबकद्वारे केले जात आहे. 

अन्यत्र कुसळच 
उन्हाळ्यात शेततळ्यातील पाण्याचा वापर केला जातो. तोपर्यंत विहीर व कूपनलिकांमधील पाण्याचा वापर होतो. ठिबकमुळे काटेकोर पाण्याद्वारे जास्तीत जास्त भिजवण होण्यास मदत होत असते. रामचंद्र यांचे शेतीचे क्षेत्र संपताच डोंगर सुरू होतो. त्यांच्या शेतीतील हिरवेपणा सोडला तर सर्वत्र केवळ कुसळच दिसते. 
जाधव यांनी शेती विकसित करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला आहे. सध्या डाळिंबाची छाटणी सुरू 
आहे. साधारण मे महिन्यानंतर उत्पादन सुरू होईल. तालुक्यात आले पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. जाधव यांच्याकडेही आले आहे. मागील वर्षी या पिकात दर चांगले मिळाल्याने दुष्काळात त्याचा आधारच झाला आहे. या पिकाचे एकरी १५ ते १६ टन उत्पादन त्यांना मिळाले आहे. हरभरा, ज्वारी ही पिके चांगली आली आहेत. 

पिके पाहून समाधान 
रामचंद्र सांगतात की केलेल्या परिश्रमांचे फळ मिळण्यास सुरवात झाली आहे. उत्पादन किती मिळेल? उत्पन्न हाती येईल का याची उत्तरे देणे सद्यःस्थितीत तरी शक्य नाही. पण दुष्काळातही पिके जगवली याचे समाधान आहे. कुटुंबाची तसेच कृषी विभागाची मोठी मदत झाली आहे. सध्या शेती सांभाळून गावच्या सरपंच पदाची जबाबदारीदेखील माझ्या खांद्यावर आहे. गावातील पाणीटंचाई कमी होण्यासाठी जलसंधारणाची कामे सुरू आहेत. पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी पाठपुरावा सुरू आहे. ‘अॅग्रोवन’चा मी नियमित वाचक आहे. शेतीत प्रयोग करताना ॲग्रोवनचे मार्गदर्शन नेहमी होत असते. बैलांचाही छंद असल्याने दोन खोंडांचे संगोपन केले जात आहे. पुढील काळात पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन करणार असल्याचेही रामचंद्र यांनी या वेळी सांगितले. 
 
संपर्क- रामचंद्र जाधव  ९५६१८९५९११, ९४२११२०१८६ 
 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...
पशुपालन, प्रक्रिया उद्योगात नेदरलॅंडची...शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
दोनशे देशी गायींच्या संगोपनासह ...सुमारे दोनशे देशी गायींचे संगोपन-संवर्धन यासह...
अर्थकारण उंचावणारी उन्हाळी मुगाची शेती वाशिम जिल्ह्यातील पांगरी नवघरे येथील दिलीप नवघरे...
शंभर एकरांत सुधारित तंत्राने शेवग्याची...नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी (ता. मालेगाव) येथील...
निर्धारातून टाकोबाईची वाडीच्या...सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग...
निसर्गरम्य पन्हाळा तालुक्यात ...कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ, निसर्गरम्य पन्हाळा...
दुष्काळात स्वयंपूर्ण शेतीचा आदर्श,...नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५०...
उच्चशिक्षित कृषी पदवीधराने उभारला...गोपालपुरा (जि. आणंद, गुजरात) येथील एमएस्सी...
अभ्यासातून शेतीमध्ये करतोय बदलवेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील महाविद्यालयात...
आळिंबी, गव्हांकुर उत्पादनातून बचत गटाची...गोद्रे (ता. जुन्नर, जि. पुणे) गावातील महिलांनी...
कुटुंबाची एकी, सुधारित तंत्र, शिंदे...नांदेड जिल्ह्यातील वसंतवाडी येथील शिंदे परिवाराला...
दुष्काळात बाजरी ठरतेय गुणी, आश्‍वासक... कमी पाणी, कमी कालावधी, अल्प खर्चातील बाजरी...
AGROWON AWARDS : नैसर्गिक, एकात्मिक...ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार...
रडायचं नाही, आता लढायचं : वैशाली येडे पुणे : सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने...