बहुवीध पीक पद्धतीद्वारे जोखीम कमी करणारी शेती 

दोन एकरांवरील आल्याची लागवड. यात जैविक मल्चिंग केल्याने पाण्याचे बाष्पीभवन कमी झाले आहे.
दोन एकरांवरील आल्याची लागवड. यात जैविक मल्चिंग केल्याने पाण्याचे बाष्पीभवन कमी झाले आहे.

लातूर जिल्ह्यातील हेर येथील प्रयोगशील शेतकरी नामदेव मनोहर गुरमे यांनी बहुपीक पद्धतीचा अवलंब करून शेतीतील जोखीम कमी केली आहे. योग्य नियोजन व कष्टाच्या जोरावर दुष्काळातही समाधानकारक उत्पन्न त्यांनी घेतले आहे. पाणी व बाजारपेठ हे मुख्य घटक केंद्रस्थानी ठेवून आंबा, आले, ऊस, केळी, टोमॅटो व पारंपरिक पिकांचा सुरेख मेळ त्यांनी घातला आहे.  लातूर जिल्ह्यातील हेर (ता. उदगीर) येथील नामदेव गुरमे यांची पूर्वी पारंपरिक शेती होती. त्यातून फार काही हाती लागत नव्हते. गावातील महेश कडोळे यांचे मार्गदर्शन घेत गुरमे यांनी सुधारित शेतीला सुरुवात केली. हलक्या प्रतीची जमीन, पाणी, बाजारपेठ या सर्वांचा विचार करून त्याला सुसंगत पीकपद्धतीची निवड करण्यास सुरुवात केली.  आंबा लागवड  सन २००९ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या फळबाग लागवड योजनेतून अडीच एकरांत आंब्याच्या १२० झाडांची लागवड केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने झाडांच्या संख्येत वाढ केली. आज शिवारात केशर आंब्याची ५००, मलगोबा १०, तर दशहरी आंब्याची ४० झाडे आहेत. १५ जून ते ३० जूनदरम्यान झाडांची दर वर्षी छाटणी होते. ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन होते. उन्हाळ्यात झाडांच्या बुडाला उसाचे पाचट टाकून ओलावा टिकवला जातो.  जागेवरच विक्री  झाडाच्या वयानुसार प्रतिझाड २० किलो उत्पादन मिळते. सुरुवातीच्या काळात घेतलेल्या आंतरपिकांतून बराच खर्च निघाला. यापूर्वी साडेपाचशे झाडांमधून ११ टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे. सुरुवातीला व्यापाऱ्याला बाग दिली जायची. त्यातून अपेक्षित दर मिळत नव्हता. या वर्षीपासून प्रामुख्याने जागेवरूनच थेट विक्रीला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत दोन टन विक्री झाली आहे. किलोला ६० रुपये दर मिळत आहे. यंदाच्या दुष्काळातही दोन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. दोन वर्षांपूर्वी आंब्याची व्यापाऱ्यांमार्फत निर्यातही केली होती. त्या वेळी किलोला ८१ रुपये दर मिळाला होता. यंदाही १३० रुपये दराने विचारणा झाली आहे. मात्र, दुष्काळामुळे तेवढा माल उपलब्ध नाही.  आले पिकात सातत्य  सुमारे आठ वर्षांपासून दर वर्षी एक ते दोन एकरांवर आल्याची लागवड असते. एकरी सुमारे १०० ते १२० क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्यात येते. बेणे घरचेच वापरण्यात येते. बेणेप्रक्रिया, गादी वाफ्यावर लागवड करून ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन केले जाते. नवे शेत असल्यास लागवडीपूर्वी एकरी पाच ट्रॅक्टर ट्रॉली शेणखताचा वापर केला जातो. मागील जूनमध्ये दोन एकरांत लागवड केली होती. एकरी दर वर्षीएवढेच उत्पादन मिळण्याची आशा आहे. एकरी सरासरी एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. शेतकऱ्यांना बेणे विक्री करूनही नफा मिळवण्यात येतो. आल्याची विक्री नांदेड येथील मार्केटमध्ये होते.  उसाची जोड  सध्या तीन एकरांत उसाची लागवड आहे. गुरमे सांगतात की उसाचे एकरी ४५ टनांपर्यंत उत्पादन मिळते.  उसाच्या पाचटाचा उपयोग अन्य पिकांसाठी अवशेष म्हणून होतो. आले पिकातही जैविक मल्चिंग केल्याने पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. वरंब्यावर ओलावा टिकून राहतो.  केळीची लागवड  आंबा, आले व ऊस पिकाचे चांगले उत्पादन घेतल्यानंतर गुरमे आता केळी लागवडीकडे वळले आहेत.  जानेवारी २०१८ मध्ये सव्वा एकरांत ग्रॅंड नैन जातीची लागवड केली. सुमारे २८ टन उत्पादन मिळाले. उदगीर येथील व्यापाऱ्याला जागेवरच विक्री केली. साडेनऊ रुपये प्रतिकिलो दर मिळाला.  खर्च वजा जाता सुमारे दीड लाख रुपये उत्पन्न मिळाले.  भाजीपाला लागवडीकडे  पाच वर्षांपासून जून महिन्यात टोमॅटोची सुमारे दोन एकरांवर लागवड असते. योग्य व्यवस्थापनातून  एकरी १५०० ते १७०० क्रेट उत्पादन घेतले आहे. सध्या तीन एकरांवर ठिबक व मल्चिंगचे काम सुरू आहे.  धैंचा लागवड  जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी गुरमे हिरवळीच्या खातांना प्राधान्य देतात. त्यासाठी दहा वर्षांपासून धैंचा या हिरवळीच्या पिकाची दर वर्षी दोन एकरांवर लागवड असते. ट्रॅक्टरच्या साह्याने रोटर करून धैंचा जमिनीत गाडला जातो.  गुरमे यांची शेती दृष्टिक्षेपात 

  • एकूण क्षेत्र- २८ एकर 
  • पाणी व्यवस्था- एक विहीर, दोन कूपनलिका 
  • वर्षभरात सात पिके घेतात. त्यामुळे जोखीम कमी झाली आहे. 
  • सेंद्रिय व रासायनिक अशा एकात्मिक पद्धतीने उत्पादन. 
  • जमा-खर्चाचा हिशेब ठेवतात. त्यातून काटेकोर आर्थिक नियोजन केले जाते. 
  • यंदा पाच एकरांत सोयाबीन. योग्य व्यवस्थापनातून एकरी दहा क्विंटल उत्पादन. 
  • ऑक्टोबर २०१८ मध्ये पाच एकरांत जॉकी वाणाच्या हरभऱ्याची लागवड. योग्य व्यवस्थापनातून एकरी दहा क्विंटल उत्पादन. 
  • पीक फेरपालट व जमीन उन्हाने तापू देतात. गुरमे सांगतात, की त्यामुळे सूत्रकृमी पूर्ण नियंत्रणात येत नसला, तरी काही प्रमाणात फरक निश्‍चित पडतो. यापूर्वी डाळिंब घेतले होते. त्यात या किडीची समस्या जाणवली होती. 
  • ॲग्रोवनमुळे झाली प्रगती  गुरमे सांगतात की शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची आवड आहे. बहुपीक पद्धतीवर जास्त भर असतो. ॲग्रोवनमध्ये प्रकाशित होणाऱ्या यशोगाथांमधील शेतकऱ्यांशी अनेक वेळा चर्चा करतो. त्यातूनच आले, केळी व भाजीपाला लागवडीकडे वळलो आहे. ॲग्रोवनने शेतीत नवी दिशा दाखवण्याचे काम केले आहे. त्यामुळेच आज माझी शेती समृद्ध झाली आहे.  संपर्क- नामदेव गुरमे- ९४०३२५०७३१   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com