नैसर्गिक भाजीपाला - फळांचा विधाते फार्म 

शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुदृढ आरोग्यासाठी रासायनिक अंशविरहित शेतमालाविषयी प्रबोधन करण्यासाठी आशिष यांनी व्हिडिअो तयार करून ते यू-ट्यूबला शेअर केले आहेत. शहरातील नागरिकांनी बाल्कनी, टेरेसवर आपली भाजी स्वतः पिकवावी यासाठी ते मार्गदर्शन करतात.
आशिष विधाते आपल्या शेतात
आशिष विधाते आपल्या शेतात

‘बॉयलर’ व्यवसायाशी संबंधित सुट्या भागांचा किंवा यंत्राचा छोटा कारखाना सांभाळत  आशिष विधाते (मांजरी, जि. पुणे) यांनी नैसर्गिक पद्धतीच्या शेतीचीही आवड जपली आहे. विविध प्रकारचा भाजीपाला, फळझाडे, शेवगा, सेलेरी आदींचे प्रयोग आपल्या २० गुंठ्यांत केले. या शेतीतून काही प्रमाणात स्वयंपूर्णतः मिळवताना ग्राहकांना थेट विक्री करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.  पुणे शहरातील उपनगर असलेल्या मांजरी येथे आशिष विधाते राहतात. त्यांचे वडील अशोक पूर्वी  खासगी कंपनीत पर्यवेक्षक होते. पुढे त्यांनी ‘बॉयलर’ उद्योगासाठी लागणाऱ्या भागांचे उत्पादन करण्याचा छोटा कारखाना सुरू केला. आशिष यांनी वडिलांच्याच व्यवसायात काम सुरू केले. त्यांना शेतीची पहिल्यापासूनच आवड होती. रस्त्याला लागूनच त्यांनी २० गुंठे जमीन घेतली होती. सुरवातीला ती कसण्यास दिली होती. आता ती आशिषच करतात.  थोड्या क्षेत्रात पीकपद्धतीची रचना  वीस गुंठ्यांत म्हणजे कमी क्षेत्रात आशिष यांनी पीकपद्धतीचा कुशल आराखडा तयार केला आहे. काही वर्षांपासून ते नैसर्गिक पद्धतीने शेती करतात. सन २००७ मध्ये काही क्षेत्रात परसबाग तयार करून भाजीपाला पिके घेण्यात सुरवात केली. घरासाठी कांदा, लसूण, टोमॅटो, कढीपत्ता व अन्य भाजीपाला आणि फळांची लागवड सुरू झाली. वंदन घुले, माधव घुले यांच्यासोबत संपर्क येताच नैसर्गिक शेतीतील रस वाढला. मोठे बंधू अमित अाध्यात्मिक वृत्तीचे असल्याने ते आरोग्याविषयी अधिक जागरूक आहेत. त्यामुळे रासायनिक निविष्ठा न वापरता नैसर्गिक पद्धतीनेच शेती पिकवण्याबाबत ठाम मत झाले. शेतात ट्रॅक्टर नेला जात नाही.  सेलेरी उत्पादनातून चांगला फायदा  परसबाग वगळता उर्वरित १५ गुंठ्यांत ‘सेलेरी’ या परदेशी भाजीपाला पिकाचे दोन वेळा उत्पादन घेतले. जागेवर व्यापारी खरेदीसाठी यायचे. ते एक गड्डी पाच रुपये या कवडीमोल दराने मागायचे. मग आशिष माल घेऊन मुंबईत वाशी मार्केटमध्ये जाऊ लागले. तेथील व्यापाऱ्याने २५ रुपये दराने जुडीची मागणी केली. पुढील काळात बाजारात जुडीचा कमाल दर १८० रुपयांपर्यंत वाढत गेला. स्प्रिंकलरने पाणी देऊन या प्रयोगात तीन लाख रुपयांच्या पुढे उत्पन्न घेण्यात आशिष यशस्वी झाले. पुढील प्रयोग मात्र हवामानामुळे यशस्वी झाला नाही.  शेवगा शेंगा, बियांची विक्री  सेलेरीच्या पिकानंतर मागील वर्षापासून शेवगा घेण्यास सुरवात केली. सुरवातीला पाच गुंठ्यांत सिद्धिविनायक वाणाची ४२, तर पुढे पाच गुंठ्यांत ओडिसी मोरिंगा वाणाची ५५ झाडे लावली. शेंगा सुरवातीला मित्रांना दिल्या. त्यातून तोंडी प्रसिद्धी मिळून मागणी वाढू लागली. त्यांनतर विधाते फार्मच्या नावाने विक्री सुरू झाली. शेवग्याचे किमान एक किलो वजनाचे पॅकिंग करून ५० रुपये दराने विक्री करण्यात आली. थेट शेतात येणाऱ्या ग्राहकांनाही विक्री केली जात होती. दुसरीकडे झाडावरच पक्व झालेल्या शेंगा वाळवून त्यातून बियाणे काढले जायचे. नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ‘व्हाॅट्सअॅप ग्रुप’वर बियाण्यांविषयी माहिती देताच बियाण्याची मागणी वाढली. त्यातून आत्तापर्यंत ४५ हजार बियांची विक्री केली आहे.  भाजीपाला, फळांत स्वयंपूर्णतः 

  • शेवग्यात अनेक भाज्या हंगामानुसार. यात कोबी, फ्लाॅवर, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, मेथी, कांदा, लसूण, अंबाडी, वांगी, चवळी, गाजर, दुधी, तांबडा भोपळा, भेंडी, श्रावण घेवडा, घोसावळे, दोडका, चवळई, आदींचा समावेश 
  • फळांमध्ये आंबा, पेरू, मोसंबी, लिंबू, नारळ, स्ट्राॅबेरी, लिची, चिकू, एॅपल बोर, आवळा, पपई, सीताफळ, डाळिंब, द्राक्षे, अननस, सफरचंद, सुपारी विक्री हा मुख्य उद्देश नसून घरची गरज व स्वयंपूर्णतः मिळावी हा उद्देश. 
  • नैसर्गिक उपायांवर भर 

  • कोणत्याही रसायनांचा वापर नाही. 
  • जीवामृत, दशपर्णी अर्कासह झेंडू, चवळी, अंबाडी, मका, शेपू यांचा सापळा पिके म्हणून वापर 
  • जीवामृत, गूळ आणि नारळपाण्यामुळे मधमाश्या, फुलपाखरे, मुंग्या, गांडुळांसह अन्य मित्रकीटक शेतात वाढून फळधारणा चांगली होते. किडींचे नियंत्रण होते. 
  • मित्रकीटक हे चोवीस तास काम करणारे कामगार असल्याचे विधाते सांगतात. 
  • झाडांच्या पानांचे नैसर्गिक आच्छदन 
  • ठिबकद्वारे पाणी 
  • समाधानकारक उत्पन्न  भाजीपाला, फळे, शेवगा बिया आदींच्या विक्रीतून वर्षभरात दोन ते सव्वादोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. दरमहा समाधानकारक रक्कम हाती येते. शिवाय, घरच्यासाठी आरोग्यदायी अन्न उपलब्ध होते. मशागतीची कामे घरच्या घरीच केली जातात.  विक्री व्यवस्था 

  • व्हॉट्सअॅप आणि मोबाईल मेसेजच्या साहाय्याने भाजीपाल्याची माहिती ग्राहकांपर्यंत पोचवून विक्री 
  • रासायनिक अंशमुक्त भाजीपाला मिळत असल्याने कायमस्वरूपी ग्राहक ठरलेला 
  • किमान पाच किलो माल घेणाऱ्या परिसरातील ग्राहकांना भाजीपाला घरपोच 
  • मोबाईलच्या साहाय्यानेच मागणी नोंदविली जाते. 
  • ग्राहक जागेवर येऊनही खरेदी करतात. 
  • विधाते फार्म नावाने भाज्यांचे ब्रॅंडिंग. थेट ग्राहकांकडून रक्कम हाती आल्याने नफ्याचे प्रमाण वाढते. 
  • मुलांवर संस्कार  लहानपणीच प्रत्येक झाड, बियांविषयी माहिती मिळावी याकरिता मुलांसाठी दाेन गुंठ्यांत ‘प्ले ग्राउंड’ तयार केले आहे. खेळता खेळता मुले पीक निरीक्षण करतात. त्यातून शेतीची आवड निर्माण होते. विविध बियांचा साठाही केला आहे. 

     संपर्क- अाशिष विधाते - ९९२१२४१४१३   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com