मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव

मिर्झापूर, जि. परभणी ः ‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या शेततळ्यांची साखळी.
मिर्झापूर, जि. परभणी ः ‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या शेततळ्यांची साखळी.

‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता. परभणी) गावशिवारात सलग साखळी पद्धतीने शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली. गेल्या दोन वर्षांत या गावामध्ये एकूण ४२ शेततळी खोदण्यात आली. त्यामुळे भूजलपातळीत वाढ झाली. सिंचनासाठी संरक्षित पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केला. विशेष म्हणजे गतवर्षी पावसाच्या खंड काळात खरीप पिकांना संरक्षित सिंचनासाठी पाणी मिळाल्याने चांगले उत्पादन मिळाले. यंदाही खंड काळात पिकांना पाणी देता येत असल्यामुळे उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. या संदर्भात माहिती देताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे म्हणाले की, मिर्झापूर गावशिवारातील ७७७ हेक्टर जमीन लागवड योग्य आहे. कृषी विभागातर्फे ‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये एकूण ४२ शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली. सलग साखळी पद्धतीने दहा शेततळी खोदण्यात आली. अन्य शेततळीही दोन ते तीन अशा साखळीमध्ये खोदण्यात आली. यामुळे वरच्या भागातील शेततळ्याचे आउटलेट त्याखालील शेततळ्यामध्ये सोडण्यात आले. त्यामुळे एकापाठोपाठ एक शेततळी पाण्याने भरतात. शेवटच्या शेततळ्याचे आउटलेट ओढ्यामध्ये दिलेले आहे. सर्व शेततळी भरल्यानंतरच ओढ्यामध्ये पाणी जाते. पावसाचे वाहून जाणारे पाणी शेततळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुरत आहे. त्यामुळे विहिरी, कूपनलिकेच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी सोयाबीन, कपाशी या पिकांसोबतच हळद, पपई, भाजीपाला आदी नगदी पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत एक सामूहिक शेततळे आहे.शे ततळ्यांमुळे १०० ते १२५ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. गतवर्षी जुलै, आॅगस्टमधील पावसाच्या प्रदीर्घ खंड काळात सोयाबीनला संरक्षित पाणी दिलेल्या शेतकऱ्यांना तुलनेने अधिक उत्पादन मिळाले. यंदाही जुलै-आॅगस्ट, तसेच सध्या पावसाच्या ताणाच्या काळामध्ये संरक्षित पाणी देत येत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे, मंडळ कृषी अधिकारी एम. बी. बनकर, के. एम. जाधव, कृषी सहायक एस. बी. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार गावातील शेतकऱ्यांनी शेततळ्यांची खोदाई केली. सर्वांच्या प्रयत्नांतून गावामध्ये मोठ्या संख्येने शेततळ्यांची निर्मिती झाली. सिंचनासाठी संरक्षित पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना शेततळ्यांचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे येत्या काळात या गावशिवारामध्ये शेततळ्यांच्या संख्येत निश्चित भर पडणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com