agriculture story in marathi, nutrient management of crops | Agrowon

अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...
डॉ. विलास पाटील, डॉ. पपिता गौरखेडे
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला उपसा आणि सेंद्रिय कर्बाचे घटत जाणारे प्रमाण या मुख्य समस्या आहेत. जमिनीत सेंद्रिय कर्ब एक टक्क्यांपेक्षा जास्त असावे. सेंद्रिय खतांचा नियमित वापर करून जमिनीचा सामू ६.५-७.५ दरम्यान आणावा.

जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला उपसा आणि सेंद्रिय कर्बाचे घटत जाणारे प्रमाण या मुख्य समस्या आहेत. जमिनीत सेंद्रिय कर्ब एक टक्क्यांपेक्षा जास्त असावे. सेंद्रिय खतांचा नियमित वापर करून जमिनीचा सामू ६.५-७.५ दरम्यान आणावा.

हवामान, खडक, भूपृष्ठाचा उंच-सखल भाग, माती तयार होण्यासाठी लागणारा काळ, वनस्पती आणि उपयुक्त जिवाणू या बाबी भूभागानुसार बदलत असतात. म्हणूनच प्रत्येक ठिकाणच्या मातीच्या गुणधर्मामध्ये बदल दिसतो. मध्यम काळ्या आणि हलक्या जमिनीची धूप होत आहे. जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला उपसा आणि सेंद्रिय कर्बाचे घटत जाणारे प्रमाण या मुख्य समस्या आहेत. यासाठी मृद-संवर्धनाची कामे (बांध-बंदिस्ती) केल्यास माती वाहून जाणार नाही. जमिनीमध्ये पाणी झिरपते. मृद-संधारणाची कामे होत असताना शेतकऱ्याने प्रत्यक्ष हजर राहून शेतीचा चढ-उतार, उंच-सखल भाग इत्यादी माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली, तर मृद-संधारण अधिक चांगल्याप्रकारे होईल. मृद-संधारणामुळे मातीचा वरचा थर ज्यामध्ये सेंद्रिय कर्बाचे आणि उपयोगी जिवाणूंचे प्रमाण सर्वाधिक असते, त्याची जपणूक होते. मृद संधारणामुळे पिकांना आवश्यक पोषक अन्नद्रव्यांच्या ऱ्हासावर नियंत्रण मिळविता येते.

सामूचे बिघडते प्रमाण ः

 • काळ्या जमिनी अल्कलीधर्मी असून, त्यामध्ये सामूचे प्रमाण वाढत आहे.
 • सामू ७.५ च्या वर गेल्यामुळे नत्र, तांबे स्फुरद, बोरॉन, जस्त, लोह व मँगनीज या अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते. त्यासाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान ठेवावा.
 • सेंद्रिय खते उदा. शेणखत, गांडूळखत, कंपोस्टखत इत्यादींचा प्रतिहेक्टरी ५ टन वापर केल्यास सामू नियंत्रणात राहतो. पाण्याचा योग्य निचरा करावा.
 • सामू ८.५ च्या वर असेल, तर प्रतिहेक्टरी ३ टन जिप्सम मिसळावे. योग्य निच­ऱ्याची व्यवस्था करावी.
 • बागायती क्षेत्रामध्ये प्रामुख्याने धरण प्रकल्पाखालील क्षेत्रामध्ये क्षार जास्त प्रमाणात आढळतात. त्यासाठी चर काढून निच­ऱ्याची व्यवस्था करावी. मळी, सेंद्रिय खतांचा योग्य वापर केल्याने क्षाराचे प्रमाण नियंत्रणात येते.

अन्नद्रव्यांच्या ­ऱ्हासास कारणीभूत घटक

 • जमिनीची धूप होऊन अन्नद्रव्ये वाहून जातात.
 • जास्त पाण्यामुळे जमिनीच्या सुपीक थरातील अन्नद्रव्ये पाण्याद्वारे खालच्या थरात जाऊन तेथून भूगर्भातील पाण्यात वाहून जातात. त्यामुळे पाणीही दूषित होते.
 • जास्त तापमान आणि उष्ण हवेमुळे पाण्याच्या वाफेद्वारे अन्नद्रव्यांचा ­ऱ्हास होतो.
 • जास्त अन्नद्रव्ये शोषणारी पिके आणि तत्सम पीक पद्धतीमुळे अन्नद्रव्यांचा उपसा आणि त्या बदल्यात पिकांना खताद्वारे कमी अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो.

पोषण अन्नद्रव्यांचा ­ऱ्हास

 • मराठवाड्यातील काळ्या खोल व मध्यम खोल जमिनीतून चारही प्रमुख अन्नद्रव्यांचा उपसा प्रमाणाबाहेर होत आहे. हेक्टरी सरासरीचा विचार केला, तर जवळपास ११७ किलो खते दिली जातात आणि पिके प्रतिहेक्टरी १८९ किलो अन्नद्रव्यांचे शोषण करतात. याचाच अर्थ दरवर्षी एका हेक्टरमधून ७२ किलो अन्नद्रव्यांचा जास्तीचा उपसा होत आहे. मराठवाड्याप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर क्षेत्रामध्येही अशाच प्रकारचा अन्नद्रव्यांचा उपसा दिसून येतो.
 • कृषी संशोधनानुसार जमिनीतून जे काही उत्पादन मिळते, त्याचा एक तृतीयांश भाग जमिनीस परत केला पाहिजे. तो जमिनीचा हक्क आहे. यामुळे जमिनीचे आरोग्य अबाधित राहील.

अन्नद्रव्यांच्या वापरातील असमतोल

 • नत्रयुक्त खतांच्या भरमसाट वापराने अन्नद्रव्यांच्या वापरामध्ये असमतोल आहे. त्यामुळे पिकांना दिलेल्या अन्नद्रव्यांचा पुरेपूर उपयोग होत नाही.
 • पिकांना लागणारी अन्नद्रव्ये आणि त्यांचे प्रमाण योग्य असेल, तरच पिकांची चांगली वाढ होत असते. तृणधान्यासारख्या पिकांसाठी (उदा. ज्वारी, बाजरी, मका, गहू आणि भात इत्यादी) नत्र, स्फुरद व पालाश यांचे प्रमाण २:१:१ असावे.
 • कडधान्यांसाठी नत्र, स्फुरद, पालाश व गंधक यांचे प्रमाण १:२:१:१ असे असावे.
 • तेलबिया आणि इतर कडधान्यांना गंधकयुक्त खतांची गरज असते. त्यामुळे १६ टक्के स्फुरद व १२ टक्के गंधक असलेले सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरावे.
 • जमिनीस नियमितपणे सेंद्रिय खते दिल्यास पिकांना गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरविली जातात.

चांगले आरोग्य असलेली जमीन

 • जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. क्षारांचे प्रमाण कमी असावे.
 • सेंद्रिय कर्ब एक टक्क्यांपेक्षा जास्त असावे.
 • चुनखडीचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी असावे.
 • जमिनीमध्ये गांडूळे असावीत.
 • पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी.
 • क्षारयुक्त किंवा चोपण नसलेली जमीन असावी.
 • अन्नद्रव्यांचा समतोलपणे पुरवठा करणारी जमीन असावी.
 • पाणी आणि हवेचे योग्य प्रमाण असणारी जमीन असावी.
 • उपयुक्त जीवाणूंनी युक्त जमीन असावी.

खत वापरायची कार्यक्षमता

 • पिकांना रासायनिक खतांद्वारे विविध पोषक अन्नद्रव्यांचा म्हणजेच नत्र (युरिया), स्फुरद (सुपर फॉस्फेट), पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश), सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते (झिंक सल्फेट, आयर्न सल्फेट, बोरॅक्स) इत्यादींचा पुरवठा केला जातो.
 • खतातील अन्नद्रव्ये पिके पूर्णत: शोषून घेत नाहीत, त्यातील काही अंश शोषून घेतात. उर्वरित अन्नद्रव्यांचा (पाणी, हवा, तापमान यामुळे) ­ऱ्हास होतो.
 • प्रमुख अन्नद्रव्यांमध्ये स्फुरदाची कार्यक्षमता फक्त १५ ते २५ टक्के आहे. म्हणजेच दिलेल्या खतांच्या ७५ ते ८५ टक्के खत वाया जाते. हीच स्थिती नत्र आणि पालाशच्या बाबतीतही आहे.
 • सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या बाबतीत पहिले, तर ९५-९९ टक्के खतांचा उपयोग होत नाही. त्यासाठी या खतांची कार्यक्षमता वाढविणे गरजेचे आहे.

खतांची कार्यक्षमता वाढविण्याचे उपाय

 • खते जमिनीवर फेकू नयेत. योग्य ओलावा असतानाच द्यावीत.
 • पेरणी करताना खते बियाणाखाली पेरून द्यावीत.
 • खतमात्रा मुळांच्या सानिध्यात द्याव्यात.
 • आवरणयुक्त खते/ब्रिकेटस/सुपर ग्रॅन्युलसचा वापर करावा.
 • निंबोळी पेंडीसोबत युरियाचा १:५ प्रमाणात वापर करावा.
 • पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत खते विभागून द्यावीत.
 • सूक्ष्म सिंचनाद्वारे द्रवरूप खतांचा वापर करावा.
 • तृणधान्य पिकांसाठी (नत्र, स्फुरद, पालाश, गंधक) खतांचा ४:२:२:४ या प्रमाणात, तर कडधान्यासाठी १:२:१:१ या प्रमाणात वापर करावा.
 • माती परीक्षणावर आधारित शिफारशींनुसार खतांचा वापर करावा.
 • सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर फवारणीद्वारे करावा.
 • पिकांचे अवशेष व हिरवळीच्या खतांचा वापर करावा.
 • रासायनिक खतांचा वापर सेंद्रिय पदार्थांसोबतच (कंपोस्टखत, गांडूळखत, शेणखत आदीसोबतच) करावा.
 • सेंद्रिय खतांचा नियमित वापर करून जमिनीचा सामू ६.५-७.५ दरम्यान आणावा.
 • विविध जिवाणू खतांचा (रायझोबियम, पी. एस. बी., अॅझोटोबॅक्टर २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाणे) वापर करावा.
 • समस्यायुक्त, क्षारयुक्त व चोपण जमिनीत भूसुधारक खतांचा (जिप्सम, सेंद्रिय खते, पेंडीची खते, प्रेसमड, उसाची मळी प्रतिहेक्टर ३ टन) वापर करावा.
 • चुनखडी विरहित जमिनीमध्ये जिप्समचा वापर करावा.
 • मृद व जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा.

संपर्क ः डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६
(मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर कृषी सल्ला
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
ढगाळ वातावरण, भुरीच्या धोक्याकडे लक्ष...बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वादळाचा परिणाम...
पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्वपिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये ही अत्यल्प प्रमाणात...
डाळिंब बागेतील आंबेबहारासाठी ताणाचे... डाळिंबामध्ये प्रामुख्याने तीन बहर घेतले जातात...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
हळदीवरील रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...
कृषी सल्ला - कोकणभात अवस्था ः पूर्व मशागत उन्हाळी भात...
कृषी सल्ला : कापूस, गहू, रब्बी ज्वारी,...कापूस ः १) बीटी कपाशीवर गुलाबी बोडअळीचा...
हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रणहरभऱ्याच्या उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात मोठी...
पूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...पूर्वहंगामी उसामध्ये वाढीच्या अवस्थेप्रमाणे...
तंत्र ऊस खोडवा व्यवस्थापनाचे...ऊस तोडणीच्या वेळी पाचट ओळीत न लावता जागच्या जागी...
मसाला पिकांना द्या पुरेसे पाणीमसाला पिकांना पाण्याचा ताण सहन होत नाही, हे...
डाउनी, भुरी नियंत्रणाच्या उपाययोजनामा गील एक दोन दिवसांत झालेल्या पावसानंतर...
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
शेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...