आरोग्यदायी रानभाजी चाईचा वेल

चाईचा वेल
चाईचा वेल

शास्त्रीय नाव :- Dioscorea pentaphylla कुळ : - Discoreaceae स्थानिक नाव : - शेंडवेल, शेंदूर वेल, मांदा, येलेरगडू, करांदा इंग्रजी नाव : - Five Leaf Yam, Mountain yam, Prickly yam, Wild yam   आढळ : पावसाच्या सुरवातीला डोंगरकपारीला या वनस्पतीच्या वेली दिसतात. प्रामुख्याने कोकण, पश्चिम घाट या परिसरात मोठ्या प्रमाणावर ही वनस्पती वाढलेली दिसते. कोकणात पालघर जिल्ह्यात मोखाडा, जव्हार, वाडा, विक्रमगड डहाणू तसेच नाशिक जिल्ह्यातील हर्सूल, पेठ, सुरगाणा व नगर जिल्ह्यातील अकोले तसेच पुण्यातील जुन्नर, मावळ या भागातील जंगलात ही वनस्पती मुबलक प्रमाणात वाढते. पावसाच्या सुरवातीला नाशिक-जव्हार-डहाणू महामार्गावर आदिवासी लोक या वेलीची कोवळी डिरे विकायला घेऊन बसतात. वनस्पतीची ओळख :

  • जंगलातील मोठ्या वाढ झालेल्या वेलींना ५ ते ६ फूट लंबगोलाकार कंद जमिनीत खोलवर वाढलेले असतात.
  • पावसाला संपल्यावर काही महिन्यांत कंद पूर्णपणे वळून जातो, पण वेलीच्या खाली कंद तसाच असतो. पुढील वर्षी पाऊस सुरू होताच जमिनीतून पुन्हा हा वेल उगवू लागतो. हीच ती कोवळी डीर आदिवासी लोक तोडून आणून आपल्या आहारात वापरतात.
  • खोड ः या वनस्पतीचे खोड नाजूक व आधाराने वाढणारे असते. दुसऱ्या मोठ्या झाडांना गुंडाळत हा वेल १५ ते २० फुटांपर्यंत वाढतो. जुन्या झालेल्या खोडास खालील भागात लहान काटे वाढतात. पाने ः पाने संयुक्त, एका आड एक, ३ ते ५ पर्णिका, टोका कडील पर्णिका मोठी असते. पानाचा देठ २.५ ते ७.५ सें.मी. लांब, पण पर्निकांचे देठ अगदी लहान. पर्णिका ५ ते १०.५ सें. मी. लांब व २.४ ते ५.० सें.मी. रुंद , गुळगुळीत असते. फुले : फुले अगदी लहान, एकलिंगी, नियमित, हिरवट पांढरी, लांब लोंबणारया पुष्प मंजिरीत झुपक्यानी येतात. नर फुले व मादी फुले वेगवेगळ्या वेलींवर येतात. नरफुले लहान, पांढऱ्या रंगाची, पानांच्या बेचक्यातून खाली लोंबणाऱ्या लहान-लहान मंजिऱ्यातून येतात. फुलांच्या मंजिरी शाखा २.५ ते ३.८ सें. मी. लांब, झुपक्यानी येतात. मुख्य पुष्प मंजिरी ०.५ ते १ फूट लांब असते. तीन वांझ पुकेसर मध्ये वांझ बीजांड कोशाची विभागणी असते. मादी फुले हिरवट रंगाची व पानाच्या बेचक्यातून खाली लोंबणाऱ्या ५ ते १५ सें. मी. लांब पुष्पमंजिरीत येतात. बीजांडकोश लंबगोलाकार, तीन विभागी व तीन कप्पी असतात. फळे ः फळे त्रिकोणी आकाराची, पंखधारी. बिया अनेक १.२ ते १.५ सें.मी. लांब, चापट्या व पातळ असतात. औषधी उपयोग : या वेलीचे कंद कापून सूजेवर बांधतात, यामुळे सूज कमी होते. आजारपणात कंद शक्ती येण्यासाठी भाजून खायला देतात. पाककृती ः साधारण सप्टेबर-ऑक्टोबरमध्ये चाईच्या वेलाला मोहोर यायला सुरवात होते. या फुलांची भाजी अतिशय रुचकर लागते. चाईच्या कोवळ्या डिराची भाजी ः साहित्य ः चाईची कोवळी डीरे, २-३ बारीक चिरलेले कांदे , ३-५ बारीक चिरलेल्या लसून पाकळ्या, २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा हळद, १-२ चमचे लाल मिरची पावडर, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी. कृती ः प्रथम चाईचे कोवळी डीरे स्वच्छ पाण्याने धुऊन बारीक चिरून घ्यावे. फोडणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरी टाकून बारीक चिरलेला कांदा मंद आचेवर शिजवून घ्यावा. नंतर त्यात लसूण आणि बारीक चिरलेल्या मिरच्या, हळद व लाल मिरची पावडर टाकून परतून घ्यावे. त्यात बारीक चिरलेले चाईचे डिरे घालून चांगले एकत्र करून शिजवून घ्यावे. नंतर चवीप्रमाणे मीठ घालावे. पावसाळ्यात साधारण १५ ते २० दिवसांनी जंगलात चाईचे कोवळी डीरे उगवलेली असतात. चाईच्या मोहोरची भाजी साहित्य ः चाईचा मोहोर, २-३ उभे चिरलेले कांदे, ३-५ बारीक चिरलेल्या लसून पाकळ्या, १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा हळद, १-२ चमचे लाल मिरची पावडर, कोथिंबीर, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी कृती ः प्रथम चाईचा मोहोर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. देठे काढून टाकून मंजिऱ्या काढून घ्याव्या. एका पातेल्यात पाणी गरम करून वाफवून घ्याव्यात. गार झाल्यावर मोहोर पिळून, फोडणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरी टाकून उभा चिरलेला कांदा मंद आचेवर शिजवून घ्यावा. नंतर त्यात लसूण आणि बारीक चिरलेल्या मिरच्या हळद व लाल मिरची पावडर टाकून परतून घ्यावा. त्यात मोहोर घालून चांगले शिजवून घ्यावे. नंतर चवीप्रमाणे मीठ घालावे. भाजी शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालावी. चाईच्या कंदाची भाजी ः साहित्य ः चाईचे कंद, ३-४ काकड ची फळे किवा बोंडाऱ्याचा पाला २-३ बारीक चिरलेले कांदे, ३-४ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, १-२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा हळद, १-२ चमचे लाल मिरची पावडर, कोंथिबीर, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी कृती ः प्रथम चाईच्या कंदावरची साल काढून टाकावी व त्याचे बारीक तुकडे करून पाण्यात शिजवून घ्यावेत. नंतर फोडणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरी टाकून बारीक चिरलेला कांदा मंद आचेवर शिजवून घ्यावा. नंतर त्यात लसूण आणि बारीक चिरलेल्या मिरच्या हळद व लाल मिरची पावडर टाकून परतून घ्यावा व त्यात शिजवलेले कंदाचे तुकडे घालून चांगले परतून घ्यावे. नंतर चवीप्रमाणे मीठ मिसळावे. भाजी शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालावी. ही भाजी बटाट्याच्या भाजीप्रमाणे लागते. संपर्क : अश्विनी चोथे, ७७४३९९१२०६ (क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com