agriculture story in marathi, organic farming | Agrowon

जमिनीत वाढवा सेंद्रिय घटक
अंबादास मेहेत्रे, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. एस. एच. पठाण
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

सेंद्रिय कर्बामुळे जमिनीत योग्य प्रमाणात हवा आणि पाणी यांची उपलब्धता वाढते. जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते. सेंद्रिय पदार्थाद्वारे सेंद्रिय कर्बाचा पुरवठा संतुलित करता येतो. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी जिवाणू संवर्धके, हिरवळीच्या खतांचा वापर करावा.

सेंद्रिय कर्बामुळे जमिनीत योग्य प्रमाणात हवा आणि पाणी यांची उपलब्धता वाढते. जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते. सेंद्रिय पदार्थाद्वारे सेंद्रिय कर्बाचा पुरवठा संतुलित करता येतो. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी जिवाणू संवर्धके, हिरवळीच्या खतांचा वापर करावा.

सेंद्रिय कर्ब हे जमिनीच्या बहुतेक गुणधर्माशी निगडित असून, ते जमिनीचे गुणधर्म संतुलित आणि नियंत्रित ठेवण्याचे कार्य करते. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीत योग्य प्रमाणात हवा आणि पाणी यांची उपलब्धता वाढल्यामुळे जमिनीत जिवाणूंची संख्याही वाढते. जिवाणूंच्या कार्य शक्तीत वाढ होते. सेंद्रिय पदार्थाद्वारे सेंद्रिय कर्बाचा पुरवठा संतुलित करता येतो. सेंद्रिय पदार्थामध्ये शेतीसाठी वापरात येणारी भरखते म्हणजे शेणखत, कंपोस्टखत, कोंबडीखत, शेळ्या-मेंढ्यांचे लेंडीखत, गव्हाचा भुसा, करडईचा भुसा, शेतातील पिकांचे अवशेष, हिरवळीचे खताचा समावेश होतो. सेंद्रिय पदार्थामध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण विघटनानंतर ५० ते ५८ टक्क्यांपर्यंत असते. सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीच्या भौतिक आणि जैविक गुणधर्मात वाढ होते. अन्नद्रव्यांची उपलब्धता व कार्यक्षमता वाढते.

जिवाणू संवर्धकांचा वापर
पिकांच्या वाढीसाठी नत्र आणि स्फुरद हे महत्त्वाचे घटक आहेत. जमिनीमध्ये नत्र व स्फुरदाचे प्रमाण कमी असल्यामुळे चांगले उत्पादन येण्यासाठी सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर करावा लागतो. हवेतील वायुरूप नत्राच्या उपयोग करून घेण्यास वनस्पती अकार्यक्षम असतात. मात्र जमिनीतील काही सूक्ष्म जिवाणू या वायुरूप नत्राचे रूपांतर करून पिकांना उपलब्ध करून देण्यास सक्षम असतात. उदा. रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलिम इत्यादी.

 • जिवाणू संवर्धके संपूर्ण सेंद्रिय व सजीव असून, त्यामध्ये कोणताही अपायकारक घटक नाहीत. हवेतील नत्र शोषून व साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देणारे जिवाणू यामध्ये असतात. जिवाणू पिकांना नत्र मिळवून देतात. अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळवतात. सेंद्रिय पदार्थाचे जलद विघटन करतात.
 • पेरणीपूर्वी १०किलो बियाण्यास २५० ग्रॅम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया केल्यास नत्रयुक्त खतांची हेक्टरी २५ ते ३० टक्के बचत तर होतेच त्याचबरोबर उत्पादनातसुद्धा १५ ते २० टक्के वाढ होते. बियाण्याची उगवण लवकर व चांगली झाल्याने पिकांची वाढ जोमदार होते व रोगप्रतिकारकशक्ती वाढते, जिवाणू संवर्धकाच्या वापराने नत्र प्रमाण योग्य ठेवून पोत सुधारतो. पिकास त्याचा फायदा होतो.
 • जमिनीची सुपीकता व उत्पादकतासुद्धा वाढते.

हिरवळीची पिके

 • जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वाचा आहे. त्यास पर्याय म्हणून हिरवळीच्या पिकांची लागवड करावी. हिरवळीची पिके साधारणत: ६० ते ८० किलो नत्र स्थिरीकरण करतात. ही पिके मुख्य पीक तसेच आंतरपीक म्हणून घेता येते. हिरवळीची पिके फुलोऱ्यात आल्यावर जमिनीत गाडल्याने चांगल्या पद्धतीचे खत तयार होते.
 • हिरवळीच्या पिकांचा जीवनक्रम अल्प कालावधीचा असावा. या पिकांना जातीत जास्त फांद्या, पाने, व उत्पादन देणारी असावी.
 • वनस्पतींच्या मुळ्या जमिनीत खोलवर जाणाऱ्या असाव्यात. पिकाच्या मुळ्या जमिनीच्या खालच्या थरापर्यंत जाऊन वनस्पतींना लागणारे अन्नद्रव्य घेण्याची क्षमता असावी. हे पीक कमी पाण्यात लवकर वाढणारे, प्रतिकूल परिस्थितीत तग धरून उत्तम उत्पादन देणारे असावे.
 • हिरवळीच्या खतासाठी निवडल्या जाणाऱ्या वनस्पती या द्विदल असाव्यात. त्यांच्या मुळ्यावरील गाठी सतत भरपूर वाढणाऱ्या असाव्यात. प्रतिकूल परिस्थितीतदेखील नत्र स्थिरीकरण जलद करण्याची क्षमता असणाऱ्या असाव्यात.
 • हिरवळीचे पीक ६ ते ८ आठवड्यांत फुलोऱ्यात येते. या आवस्थेत तागासारखे पीक जमिनीत गाडल्यास जास्तीत जास्त नत्र स्थिरीकरण करून त्यानंतर घेणाऱ्या गहू पिकाच्या उत्पादनात १२ ते २५ टक्क्यांनी वाढ होते, असे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.

हिरवळीचे खत तयार करण्याची पद्धत

 • हिरवळीचे खत शेतात तयार करण्याची पद्धत: या पदधतीत हिरवळीची पिके पेरणी करून ठराविक वाढ झाल्यावर याच शेतात गाडून त्याचा वापर हिरवळीचे खत म्हणून करतात. धैंचा, ताग, चवळी, बरसीम गवत.
 • पालापाचोळा, वनस्पतींचे पानांपासून हिरवळीचे खत तयार करण्याची पद्धत : या पद्धतीत कमी कालावधीत येणारी झाडे व झुडपे यांची बांधावर लागवड करून फुलोरा अवस्थेत आल्यानंतर या झाडांची पाने, फांद्या तसेच शेतातील पालापाचोळा शेतात पसरवून नांगराने गाडून घेऊन याचा वापर हिरवळीचे खत म्हणून करतात. उदा. ग्लिरिसिडिया.

फायदे:

 • जमिनीत सेंद्रिय घटक वाढतात. हिरवळीच्या पिकाद्वारे जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये वरच्या थरात उपलब्ध करून दिले जातात. जमिनीचा पोत सुधारतो.
 • जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते, त्यामुळे जमिनीची धूप कमी होते.
 • हिरवळीच्या खतामुळे पिकांना लागणारी अन्नद्रव्य जमिनीत उपलब्ध केली जातात.
 • ताग व धैंचासारख्या द्विदल पिकांचा हिरवळीचे खते म्हणून वापर केल्यास त्या जमिनीत नत्राच्या प्रमाणात वाढ होऊन पिकांना लागणारे नत्र, स्फुरद, पालश, कॅल्शिअम, मग्नेशियम, लोह व इतर अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात.

आच्छादनाचा वापर
काडीकचरा, धसकटे, गवत, साळीचा व गव्हाचा भुसा व तुरकाडी, उसाचे पाचट, कपाशीचे काड याचे आच्छादन करावे. नैसर्गिक घटक असलेल्या आच्छादनाचे कालांतराने सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होते. जिवाणूची वाढ होण्यासाठी सेंद्रिय अन्नघटक उपलब्ध होतात. प्लॅस्टिक आच्छादनामध्ये चंदेरी, काळ्या, पांढऱ्या, निळ्या, पिवळ्या, लाल, आकाशी व पारदर्शक रंगाचे प्लॅस्टिक उपलब्ध आहे. याचा वापरदेखील फायदेशीर दिसून आला आहे.
फायदे :

 • जमिनातील ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पाण्याची २० ते ३० टक्क्यांनी बचत होते.
 • पीक उत्पादनात वाढ होऊन ८० ते ९० टक्के तण नियंत्रण होते. जमिनीत हवा खेळती राहते. पाऊस व वारा यांपासून होणारी जमिनीची धूप थांबते.
 • जमिनीचे अंतर्गत तापमान संतुलित राहते. तापमान संतुलित राहिल्यामुळे जिवाणूची प्रक्रिया आणि जमिनीत जीवरासायनिक प्रक्रिया उत्तम प्रकारे चालण्यासाठी सूक्ष्म अनुकूल वातावरण तयार होते.
 • पिकांचे उत्पन्न, उत्पादन व दर्जा सुधारते.
 • खते आणि पाण्याचा योग्य वापर होतो.

संपर्क ः अंबादास मेहेत्रे ९५४५३२३९०६
(सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र,
कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)

इतर सेंद्रिय शेती
बायोडायनॅमिक शेती पद्धतीचे महत्त्व,...बायोडायनामीक शेती पद्धतीचे उद्गाते डॉ. रुडॉल्फ...
बायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...
सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...
शून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
आच्छादनासह गांडूळखत वापरातून वाढवा...सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीवर आच्छादन, गांडूळखताची...
जमिनीत वाढवा सेंद्रिय घटकसेंद्रिय कर्बामुळे जमिनीत योग्य प्रमाणात हवा आणि...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
जमिनीचा पोत वाढवण्यासाठी हिरवळीची खतेहिरवळीच्या खताचा अधिक फायदा मिळण्यासाठी या पिकाचे...
जमिनीच्या सुपीकतेसाठी वापरा हिरवळीची खतेशेतीमध्ये रासायनिक घटकांचा वापर वाढत चालला असून,...
पुण्यातील भिडे यांनी केले मातीला ‘कर्ब... पुणे : पुणे येथील सुनील भिडे यांनी दक्षिण...
मानवी आरोग्यासाठी मातीच्या आरोग्याकडे...मे महिन्याचा दुसरा रविवार हा जागतिक मातृदिन...
टिकवून ठेवा जमिनीची सुपीकताजमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे....
पीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...
खडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...