महत्त्व सेंद्रिय पशुपालनाचे...

सेंद्रिय पशुपालनात जनावराच्या संगोपनासाठी सर्वोत्तम पद्धतीचा वापर करणे अावश्‍यक अाहे.
सेंद्रिय पशुपालनात जनावराच्या संगोपनासाठी सर्वोत्तम पद्धतीचा वापर करणे अावश्‍यक अाहे.

सेद्रिय पशुपालन ही संकल्पना अापल्याकडे नविन असली तरी पाश्चिमात्य देशात सेंद्रिय पशुपालनातून उत्पादन मिळविण्याला प्राधान्य दिले जाते अाहे. भारतातही केरळमध्ये सेंद्रिय पशुपालनाला सुरवात झाली अाहे. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढविणे, अनावश्यक रासायनिक अवशेष कमी करणे तसेच नैसर्गिक जैवविविधतेची जोपासना करणे आणि पर्यायाने पर्यावरणाचीसुद्धा काळजी घेणे शक्य होणार अाहे. ग्राहकांना उत्तमप्रतीचे पशुजन्य अन्नपदार्थ पुरविण्यासाठी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि जनावरांच्या चांगल्या अारोग्यासाठी सेंद्रिय पशुपालन करणे काळाची गरज बनली अाहे. सेंद्रिय पशुपालन म्हणजे अशी पशुत्पादन पद्धती ज्यामध्ये पशुकल्याणाच्या सर्व निकषाची पूर्तता करून, जसे पर्यावरणाची काळजी, वैद्यकीय औषधांशिवाय किंवा कुठल्याही रासायनिक अर्काशिवाय पशू उत्पादन मिळवले जाते. अशा पद्धतीच्या पशुपालनाला सेंद्रिय पशुधन उत्पादन असे म्हणतात. सेंद्रिय पशुपालनाचे महत्त्व

  • सेंद्रिय पशुधन उत्पादन हे रोग प्रतिबंधक तत्त्वावर अवलंबून आहे. याकरिता काही बाबीचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे. यामध्ये जनावराच्या नैसर्गिक वागणुकीला परवानगी दिली जाते.
  • जनावरांना कोणत्याही प्रकारचा तणाव न देणे जसे की पशुपोषण आहार हा संतुलित अाणि उत्तम प्रतीचा देणे.
  • जनावराच्या नैसर्गिक प्रजननाला वाव  द्यावा.
  • जनावराच्या आवडीचे व्यायाम, कार्य करणे, दूध देणे, यासाठी प्रोत्साहित करणे किंवा त्याला मोकळीक द्यावी.
  • जनावराला दिला जाणारा चारा किंवा खाद्य सेंद्रिय पद्धतीने वाढवलेले असावे. ज्यामध्ये रासायनिक  कीटकनाशकाचा वापर झालेला नसावा.
  • जनावराच्या आहारातील नैसर्गिक खाद्यातून मिळणारी पोषणतत्त्वे जसे जीवनसत्त्वे व पोषकद्रवे जनावराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास अाणि ती टिकवण्यास महत्त्वाची भूमिका निभावतात.
  • आहारातील कोणत्याही पोशाकतत्त्वाची कमतरता कोणत्याही आजाराचा संसर्ग होण्यास कारणीभूत ठरते. उदा. प्रथिने, जस्त, लोह आणि जीवनसत्व अ चा अभाव किंवा कमतरता जनावराची रोगप्रतिकार क्षमता कमी करते.
  • जनावरांना जंतुनाशक रासायनिक औषधे देऊ नयेत. रासायनिक औषधी शरीरात जास्त काळासाठी राहतात त्यामुळे त्याचा वापर केला जात नाही.
  • आरोग्य व उत्पादन हे उच्च प्रतीचे असावे, असे अपेक्षित असल्यामुळे निवड करताना रोगमुक्त कळपातील निरोगी अाणि सुदृढ जनावराची निवड केली जाते.
  • गोठ्यातील जनावरे जर वारंवार आजारी पडत असतील तर गोठ्यातील सर्व जनावरांची पशुवैद्यकामार्फत तपासणी करून घेणे आवश्यक असते.
  • जनावरांचे संगोपन हे बंदिस्त स्वरूपात न करता मुक्त पद्धतीने केल्यामुळे जनावरांना विविध संसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो. तरीसुद्धा बऱ्याच रोगाची लागण रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून असते. त्यामुळे पोषणआहार महत्त्वाचा आहे.
  • सेंद्रिय पशुपालनातील महत्त्वाच्या बाबी

  • जनावर खरेदी करताना बरोबरीच्या किंवा उच्च प्रतीच्या सेंद्रिय बाबींची पूर्तता करणाऱ्या प्रक्षेत्रावरून करावी.
  • आजारी जनावरावर त्वरित तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फत उपचार करावेत.
  • अॅलोपॅथिक औषधाचा वापर शक्यतो टाळावा. पर्यायी वनस्पतीजन्य आयुर्वेदिक औषधीचा वापर करावा.
  • रासायनिक औषधाचा नियमित वापर टाळूनच सेंद्रिय पशुधन उत्पादनाची संकल्पना पूर्ण होऊ शकते. (रासायनिक औषधाचा वापर एखाद्या अनपेक्षित वेळी करू शकतात)
  • एका वर्षात एखाद्या प्राण्याचा तीनदा अॅलोपॅथिक औषधाचा वापर करून उपचार झाला असल्यास अशा जनावराला सेंद्रिय पद्धतीतून बाद करण्यात येते.
  • ज्या ठिकाणी रोगांचा प्रादुर्भाव जास्त आहे आणि फक्त व्यवस्थापण चांगले ठेवून रोगांचा प्रादुर्भाव रोखणे कठीण आहे अशा भागातच केवळ जनावरांना लसीकरण करावे.
  • सेंद्रिय पशुधन उत्पादन पद्धतीत लसीकरण नियमितपणे करणे अपेक्षित नाही. तरीसुद्धा त्या भागात कायदेशीर लसीकरण करून घेण्याची सक्ती असेल तर लसीकरण करता येते.
  • सेंद्रिय पशुधन प्रक्षेत्रावर रोगांच्या उपचाराचा संपूर्ण तपशील नोंदीसह सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. आजारी जनावराला उपचारा दरम्यान कोणते औषध दिले याची नोंद ठेवणे अावश्‍यक अाहे.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी

  • सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला चारा रासायनिक खतांचा वापर केलेल्या चाऱ्यापेक्षा अधिक पाैष्टिक अाणि आरोग्यदायी असतो हे संशोधनातून दिसून अाले अाहे. त्यामुळे जनावरांच्या अाहारात सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या चाऱ्याचा समावेश करावा.
  • विल्यानंतर वासराला अाईचे पहिले दूध म्हणजे चीक पाजणे अावश्‍यक अाहे. त्यामुळे वासराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • पचनशक्ती सुधारण्यासाठी अाणि रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी जनावरांना प्रोबायोटिक्स व लॅक्टोबॅसिलस देता येते.
  • लसीकरण लसीकरण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयोगी पडते. सेंद्रिय पशुपालनात आदर्श व्यवस्थापण पद्धतीचा अवलंब केल्यास जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण कमी असते; परंतु जर सेंद्रिय पशुपालनाचे प्रक्षेत्र अशा भागात असेल की जेथे दरवर्षी किंवा एखाद्या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असेल तर अशा ठिकाणी कितीही उत्तम पद्धतीने जरी प्रक्षेत्राचे व्यवस्थापन केले तरी संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. अशा परिसरात लसीकरण करणे आवश्यक असते. आजारी जनावरासाठी उपचार पद्धती अॅलोपॅथिक औषधाचा वापर हा सेंद्रिय पद्धतीमध्ये करता येत नाही किंवा वर्ज्य आहे. त्यामुळे पर्यायी औषधोपचाराची पद्धत म्हणून होमिओपॅथी औषधाचा वापर करून जनावराला रोगमुक्त करता येते. याव्यतिरिक्त वनस्पतिजन्य औषधाचा वापरही करता येतो. तरीही काही फरक पडत नसेल तर शेवटी पशुवैद्यकामार्फत अॅलोपॅथिक औषधे, प्रतिजैविकांचा वापर करता येतो. प्रतिजैविकाचा वापर मर्यादित स्वरूपात करणे आवश्यक आहे. वैद्यकीय उपचारानंतर जनावराच्या शरीरातील रासायनिक प्रतिजैविके संपूर्णतः नष्ट झाल्यानंतर जनावराकडून उत्पादन घ्यावे. जनावरांच्या चांगल्या अारोग्यासाठी महत्त्वाचे...

  • जातिवंत जनावरांची निवड करणे जेणेकरून त्याची रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहील.
  • जनावराच्या संगोपनासाठी सर्वोत्तम पद्धतीचा वापर करणे.
  • गोठ्यामध्ये स्वच्छता राखणे आणि योग्य प्रजनन व्यवस्थापन करणे.
  • खाद्यामध्ये प्रोबायोटिक्सचा वापर करणे.
  • बाह्य व आंतर परोपजीवींचा नायनाट करणे.
  • ज्या भागात संसर्गजन्य रोगांचा उद्रेक / प्रादुर्भाव होत असेल अशा भागात काटेकोरपणे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
  • - गोठ्यातील महत्त्वाच्या नोंदी ठेवणे.
  • संपर्क ः डॉ. चेतक पंचभाई, ८०८७९०९९९३ (पशुवैद्यकीय चिकित्सक विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविदयालय, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com