दीर्घ काळ साठवता येणारा गुलाबी बेंगलोर रोझ कांदा

एकसारखा अाकार अाणि साठवणुकीच्या गुणधर्मामुळे बेंगलोर रोझ कांदा उत्पादनाच्या अंदाजे ४५ ते ५० टक्के निर्यातक्षम गुणवत्तेचा असतो.
एकसारखा अाकार अाणि साठवणुकीच्या गुणधर्मामुळे बेंगलोर रोझ कांदा उत्पादनाच्या अंदाजे ४५ ते ५० टक्के निर्यातक्षम गुणवत्तेचा असतो.

भारतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कांदा आणि कर्नाटकमधील बेंगलोर रोझ कांदा या दोन वैशिष्टपूर्ण कांद्यांना जीआय मानांकन मिळालेले आहे. त्यापैकी आपण आजच्या भागात बेंगलोर रोझ कंादा या कर्नाटकातील कांद्याविषयी माहिती करून घेऊयात.

कांदा हा मानवी आहारातील महत्त्वपूर्ण घटक आहे. नेहमी चर्चेचा विषय ठरणारा कांदा काही बाबतीत खास आहे.  

गुलाबी कांद्याला मिळाले भौगोलिक मानांकन (जीआय)

  • विविधतेने नटलेल्या भारतात शहरांची विविधता ही वेगळी ओळख आहे. गुलाबी रंगाचे शहर म्हणून जयपूरची ख्याती आहे तर गार्डन सिटी म्हणजे उद्यानाचे शहर म्हणून ओळख असलेले बेंगलोर शहर हे एकसारख्या गोल आकाराच्या गुलाबी कांद्यासाठी म्हणजेच बेंगलोर रोझ कांद्यासाठीसुद्धा प्रसिद्ध आहे.
  • कर्नाटक सरकारच्या बेंगलोर येथील फलोत्पादन विभागाने ३० जुलै २०१० मध्ये भौगोलिक मानांकन नोंदणीसाठी अर्ज सादर केला होता.
  • तब्बल चार वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर या कांद्याचे वेगळेपण सिद्ध करण्यात फलोत्पादन विभागाला यश आले आणि जीआय रजिस्ट्रीने या वैशिष्टपूर्ण कांद्याचे वेगळेपण मान्य करून ते १७ नोव्हेंबर २०१४ रोजी जर्नल क्रमांक ६० मध्ये प्रसिद्ध करण्यात आले.
  • चार महिन्यांचा आक्षेप घेण्याचा कालावधी संपल्यानंतर जिओग्राफिकल इंडीकेशन ऑफ गुड्स (रजिस्ट्रेशन ॲण्ड प्रोटेक्शन) एॅक्ट १९९९ नुसार २५ मार्च २०१५ रोजी जीआय प्रमाणपत्र देण्यात आले.  
  • जीआय मानांकनामुळे सदर कांद्याला १४ ते १६ सप्टेंबर रोजी बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, मुंबई येथे भारत सरकारने आयोजित केलेल्या अन्नपूर्णा- वर्ल्ड ऑफ फूड इंडिया या जागतिक प्रदर्शनात स्थान मिळाले होते.
  •   अद्वितीयपणा

  • सपाट तळाचा भाग आणि एकसारखा गोल आकार (साधरणतः २.५ ते ३.५ सेंटीमीटर या श्रेणीमध्ये) असून त्याचबरोबर गडद लाल रंग, उच्च तीव्रता आणि दीर्घ काळ साठवणूक करण्याची क्षमता हे या कांद्याचे खास वैशिष्ट आहे.
  • या कांद्याची गुणवत्ता राखण्यासाठी येथील शेतकरी खूप मेहनत घेतात.  
  • हवामान

  • कांद्याचे उत्पादन कर्नाटकातील बेंगलोर (शहरी व ग्रामीण) आणि कोलार या जिल्ह्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घेण्यात येते.
  • या जिल्ह्यांमधील हवामान या कांद्याच्या पूर्ण वाढीसाठी पोषक आहे. येथील माती रेतीमिश्रित असून तिचा रंग लाल आहे.
  • बेंगलोरच्या फलोत्पादन विभागाच्या अहवालानुसार या मातीचा सामू ६ ते ७ आहे.
  • येथील तापमान सरासरी २५ ते ३५ अंश सेल्सिअस इतके असून हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ७० ते ७५ टक्यापर्यंत आढळते.
  • कांद्याच्या गुणवत्तापूर्ण वाढीसाठी थंड हवामान, साधारणतः १५ ते २१ अंश सेल्सिअस तापमान, आर्द्रता ७० टक्क्यांपर्यंत आणि भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश या प्रकारचे हवामान जास्त फायदेशीर ठरते.
  • ज्या ठिकाणी सुपीक जमीन व मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन मिळते.
  • या कांद्याची वर्षाच्या सर्व ऋतूंमध्ये लागवड करता येते. थंड हवामान जास्त उत्पादन मिळविण्यासाठी उपयुक्त आहे.
  • एकूण उत्पादन

  • सुमारे ४००० हेक्टर क्षेत्रामध्ये या कांद्याची लागवड केली जाते. हा कांदा पूर्णपणे तयार होण्यास ११० ते १२० (साधारण तीन महिने) दिवसांचा कालावधी लागतो.
  • कापणीनंतर २ ते ३ महिने मोठ्या प्रमाणात कांदा साठवून ठेवला जातो आणि त्यानंतर बाजारात विक्रीसाठी आणला जातो.
  • बेंगलोरच्या फलोत्पादन विभागाच्या अहवालानुसार या कांद्याचे सरासरी प्रति हेक्टर १५ ते १८ टन एवढे उत्पादन मिळते, त्याचबरोबर सरासरी वार्षिक उत्पन्न ७०,००० टन एवढे होते. त्यापैकी साधारणपणे एकूण उत्पन्नाच्या ४५ ते ५० टक्के कांदा निर्यात केला जातो.
  • एकूण उत्पादनाच्या अंदाजे १५ टक्के कांदा घरगुती तसेच बियाणे म्हणून वापरला जातो. देशातील एकूण कांदा उत्पादनाच्या ४ टक्के उत्पादन हे एकट्या बेंगलोर रोझ कांद्याचे आहे.
  • निर्यात

  • बेंगलोर रोझ ओनियन साधारणपणे मार्च ते नोव्हेंबर या नऊ महिन्यांत निर्यातीसाठी उपलब्ध असतो.
  • मार्च ते एप्रिल या रब्बी हंगामातील कांदे दोन ते तीन महिन्यांसाठी साठवून ठेवले जातात.
  • एकूण उत्पादनाच्या अंदाजे ४५ ते ५० टक्के कांदा निर्यातक्षम गुणवत्तेचा असतो.
  • सध्या हा कांदा श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, मालदीव, इंडोनेशिया, बांगलादेश अशा अनेक देशात निर्यात केला जातो.
  • संपर्कः गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ (लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com