लक्षात घ्या पाण्याचे प्रदूषण

पाण्याचे प्रदूषण
पाण्याचे प्रदूषण

पीक व्यवस्थापनामध्ये नत्रयुक्त खतांचा वापर चालू झाल्यापासून शेत जमिनीतून नायट्रेट पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात मिसळण्याचे प्रमाण वाढले आहे. आता ही जागतिक समस्या झाली आहे. चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकरी अतिरिक्त नत्राचा वापर करतात. या जादा वापराचे पिकाकडून शोषण होईलच असे नाही. मग जमिनीतील निचऱ्याद्वारे ओघळ, ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्यातून मुख्य जलाशयात ते मिसळतात.

पाण्यात एका ठराविक पातळीच्या पुढे नायट्रेटचे प्रमाण वाढल्यास असे पाणी पिण्याने आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होतात. ज्या वेळी मोठ्या प्रमाणावर लोक आजारी पडतात, त्या वेळी काही काळ अशा समस्यांवर चर्चा होत राहते. लोकांचे आजार औषधोपचारानंतर बरे होतात आणि प्रश्‍नावरील चर्चा थांबते. उत्पादन जास्त मिळवण्याच्या कारणामुळे नत्रयुक्त खतांचा वाढता वापर चालू राहणार आहे. मग या प्रश्‍नावर काही उपाय आहे का? या प्रश्‍नांच्या तळापर्यंत जाऊन अभ्यास केल्यास समस्येवरील उपाय सापडू शकतात.

  • भू सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासानुसार कोणतेही रासायनिक खत जमिनीत मिसळल्यानंतर प्रथम त्याचे स्थिरीकरण होते. स्थिरीकरण याचा अर्थ ते जमिनीत योग्य अवस्थेत साठविले जाते. म्हणजे त्यातील अन्नघटकांचे पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेत केले जाते. असे अन्नांश पिकाला उपलब्ध अवस्थेत नसतात.
  • वनस्पती सूक्ष्मजीवाकडे आपल्याला गरज असणाऱ्या अन्नद्रव्यांची मागणी करतात. मागणीनुसार तितका भाग अवस्थेत रूपांतर करतात. असे अन्नांश पाण्यात विरघळतात. ते द्रावण शोषणाद्वारे वनस्पतीला मिळते. ही झाली रीतसर वाटचाल. वनस्पती फक्त नायट्रेट स्वरूपातील नत्र घेतात. जमिनीत नायट्रेट स्वरूप हे पाण्यात विरघळणाऱ्या स्वरूपात असते. बाकी नत्र अविद्राव्य स्वरूपात असतो.
  • अविद्राव्य स्वरूपात अन्नद्रव्ये साठविण्याची प्रत्येक जमिनीची एक मर्यादा असते. वापरून ती कमी होत असते आणि प्रयत्नपूर्वक वाढविता येते. आपण पिकाला खतमात्रा नेहमीच गरजेपेक्षा जास्त देतो. दिलेला सर्व नत्र योग्य प्रकारे स्थिरीकरण न झाल्याने अतिरिक्त नत्र हवेत वायू रूपात उडून जातो. काही पाण्यावाटे निचरून जातो.
  • पिकाच्या गरजेप्रमाणे स्थिर साठ्यातून उपलब्ध साठ्यात रूपांतर होते, तसे पिकाची मागणी नसता नाही, अशी प्रक्रिया काही जीवाणूंकडून चालू असते. हा नत्रही पाण्यावाटे निचरून पाणीसाठ्यांचे प्रदूषण करू शकतो. आपण दिलेल्या नत्रयुक्त खतापैकी फक्त १५ ते २० टक्के नत्र वापरला जातो. बाकी अशा वेगवेगळ्या मार्गाने फुकट जात असतो.
  • नत्रयुक्त खते तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागते. त्यासाठी नाफ्ता हे इंधन मोठ्या प्रमाणात आयात करावे लागते. या खनिज इंधनाच्या ज्वलनाने हवेत जाणाऱ्या कर्बवायुमुळे होणारे प्रदूषण ही एक मोठी समस्या आहेच. हे इंधन पुननिर्माणक्षम नाही.
  • सर्व खतांत नत्रयुक्त खते जास्त प्रमाणात लागतात. यामुळे सरकारने इतर खतांवरील अनुदान कमी केले आहे; पण नत्रयुक्त खतावरील अनुदान अजून कायम ठेवले आहे. यामुळे नत्रयुक्त खते तुलनात्मक स्वस्त आहेत. यामुळे त्याच्या कार्यक्षम वापरासाठी शेतकरी फारसा अभ्यास करत नाही. गरज लागल्यास पिकाला १-२ पोती खत जादा वापरून मोकळे होतात. असे म्हणावे तर अनुदान कमी केल्यामुळे स्फुरद व पालाशयुक्त खतांचा तरी कार्यक्षम वापर कसा करावा? याबाबत शेतकरी जागरूक आहे का? याचे उत्तर नाही असेच द्यावे लागले.
  • युरियाबरोबर १०-१५ टक्के निंबोळी पेंडीचा वापर केल्यास युरियाची कार्यक्षमता वाढते. यामुळे निंबोळी पेंडेच्या वापराची शिफारस करण्यात आली. फार थोडे शेतकरी निंबोळी पेंडीचा वापर करत असावेत. आता निंबोळी तेल अगर पेंड मिसळूनच युरिया मोठ्या प्रमाणात विकला जात आहे.
  • या सर्व उपायानंतरही नायट्रेटमुळे पाण्याचे प्रदूषण हा प्रश्‍न संपलेला नाही. काही पर्यावरणवादी यावर सेंद्रिय शेती हा पर्याय सुचवित आहेत. यास सरकारचे पाठबळ मिळत असले तरी शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी प्रमाणात  मिळत आहे.
  • प्रदूषण रोखण्याचा एक पर्याय

  • शेतीत काम करत असता व चिंतनातून नायट्रेट प्रदूषण रोखण्याचा एक नवीन पर्याय नजरेसमोर आला. गरजेपेक्षा जास्त नत्र उपलब्ध होत राहणार यावर संपूर्ण नियंत्रण करणे आपल्या हाताबाहेर आहे. मग यावर उपाय म्हणजे उपलब्ध नत्र वापरण्याची जबाबदारी फक्त पिकावरच न ठेवता पीक व योग्य प्रमाणात तण असे मिश्रण शेतात वाढू देणे.
  • पिकांनी आपल्या गरजेनुसार अन्नांश खावे. अतिरिक्त भाग तणांनी खावा. तणांना बेसुमार वाढून त्याचा पिकावर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यासाठी योग्य वेळी शिफारशीत तणनाशकांचा वापर करून तणांची वाढ रोखणे, तणे उपटून न काढता तणनाशकानेच जागेवर मारावीत. तणांनी अतिरिक्त उपलब्ध अन्नांशांचे सेवन केले आहे, ती पुढे जागेला कुजल्यानंतर ती अन्नद्रव्ये पुढील काळात पिकाला उपलब्ध होऊ शकतात, अगर त्याचा स्थिर स्वरूपात साठा जमिनीत राहतो.
  • पीक व योग्य प्रमाणात तणे वाढविण्याचे काही फायदे आहेत. त्याचा उल्लेख यापूर्वीच्या लेखातून मी केला आहे. रासायनिक खतांचा वापर करताना पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण रोखणे ही जबाबदारी आपल्यालाच स्वीकारावी लागणार आहे. यासाठी काही नवीन तंत्रे आपल्याला विकसित करावी लागतील.
  • संपर्क  ः  प्रताप चिपळूणकर - ८२७५४५००८८ (लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com