भातपीक कापणीनंतरचे व्यवस्थापन

विळ्याच्या साह्याने केलेल्या भात कापणीनंतर त्याचा पेंढा जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरता येतो.
विळ्याच्या साह्याने केलेल्या भात कापणीनंतर त्याचा पेंढा जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरता येतो.

सध्या बहुतांश ठिकाणी भातपीक कापणी सुरू असून, भात धान्याची साठवण व त्यानंतर शिल्लक पेंढा व अन्य अवशेषांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

भात काढणीनंतर शिल्लक राहिलेल्या पेंड्याचा उपयोग जनावरांसाठी चारा म्हणून होतो. विळ्याच्या साह्याने कापलेल्या पिकाचा पेंढा व्यवस्थित वाळवून साठवावा. ज्यांनी कापणीसाठी हार्वेस्टर किंवा कापणीनंतर मळणी यंत्राचा वापर केला आहे, अशा शेतकऱ्यांना पूर्ण पेंढा मिळत नाही.

  • देशपातळीवर भातपिकाच्या कापणीनंतर शिल्लक अवशेष व पेंढा जाळल्यामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असल्याचे पाहावयास मिळते. दिल्लीमधील हरित लवादाच्या सर्वेक्षणानुसार, दिल्लीमधील हवेतील प्रदूषणातील मुख्य भाग हा भातपिकाच्या कापणीनंतरचे अवशेष जाळल्यामुळे तयार होणारा धूर हे प्रमुख कारण आहे. या धुरामुळे हवेतील कार्बन मोनाक्‍साईड (CO), मिथेन (CH४), कार्बन डायऑक्‍साईड (CO२), नायट्रोजन ऑक्‍साईड (NO२), या विषारी वायूंचे प्रमाण वाढले आहे. हे विषारी वायू आरोग्यास अत्यंत घातक आहे. पेंढा अथवा भातपिकाचे अवशेष न जाळता त्याचे योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे.
  • हे अवशेष गोळा करून कंपोस्ट खड्ड्यामध्ये टाकावेत. त्यांचे शास्त्रीय पद्धतीने कंपोस्ट करावे. रब्बीमध्ये शेतीतील ज्या क्षेत्रामध्ये विश्रांती देण्याचे नियोजन आहे, तिथे पहिल्या नांगरटीवेळी हे अवशेष गाडावेत. जमिनीच्या जैविक गुणधर्मामध्ये वाढ होऊन तिचा पोत सुधारतो.
  • भात उत्पादक शेतकरीही खरीप हंगामामध्ये रोपवाटिका तयार करतेवेळी पेंढ्याचा व अवशेषांचा राब भाजण्यासाठी उपयोग करतात. यामुळे जैविक संपत्तीचा ऱ्हास होऊन हवेच्या प्रदूषणात वाढ होते. याऐवजी सुधारित पद्धतीने रोपवाटिका तयार करावी. यामध्ये १ ते १.२० मीटर रुंदी व शेताच्या आवश्‍यकतेनुसार लांबीचे आणि ८-११ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करून त्यावर ओळीत बियाणे पेरावे.
  • भातपीक आधारित रब्बी हंगामाचे नियोजन ः खरीप हंगामात भातपीक घेतल्यानंतर रब्बी आणि उन्हाळी हंगामात पिके घेताना आर्थिकदृष्ट्या सक्षम, जमिनीची सुपीकता टिकवणारी, समतोल पीकपद्धती निवडणे फायदेशीर ठरते. या पीक पद्धतीमध्ये, १) दुबार (Double cropping), २) रिले (Relay cropping, ३) बहुविध (Multiple cropping) असे प्रकार पडतात. योग्य पिकांची निवड करताना भौगोलिक परिस्थिती, हवामान, जमिनीची प्रत, सिंचन सुविधा, बाजारपेठ इत्यादी बाबींचा विचार करावा. या पीकपद्धतीमुळे.....

  • उपलब्ध ओलाव्यावर कमी पाण्याची गरज असलेली पिके सहज घेता येतात.
  • मोकाट वाढणारी तणे व गवत यांचा बंदोबस्त होऊन त्याचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • पिकांमध्ये द्विदलवर्गीय पिकांचा समावेश केल्यास जमिनीच्या वेगवेगळ्या थरांतून पोषकद्रव्ये शोषली जातात. द्विदल पिकांच्या मुळांवरील गाठी नत्र स्थिरीकरण करणाऱ्या घटकांमुळे जमिनीचा पोत सुधारतो. नत्राची बचत होते. तसेच या पिकाची पाने जमिनीवर पडतात, त्यामुळे जमिनीचे सेंद्रिय मूल्य वाढते.
  • अतिरिक्त उत्पन्न मिळते. आर्थिक बाजू बळकट होते.
  • पीकपद्धती व नियोजन

    खरीप भाताच्या कापणीनंतर उपलब्ध जमिनीतील फक्त ओलाव्यावर ः

  • खरीप भाताच्या लागवडीसाठी हळवे अथवा निमगरवे वाण वापरावे. कापणीपूर्वी रिले पद्धतीने रब्बी हंगामातील पिके टोकण पद्धतीने पेरून टाकावीत. यामुळे उपलब्ध ओलाव्यावर पीक उगवण चांगली होईल. कोणतीही मशागत न केल्यामुळे पाणी/ ओलावा अधिक काळ टिकून राहतो. यासाठी हरभरा, मसूर, कुळीथ, वाल, मोहरी, तीळ, जवस ही पिके संयुक्तिक ठरतात.
  • खरीप भाताच्या कापणीनंतर लगेच लोखंडी अथवा लाकडी नांगराने हलकी मशागत करून जमीन हलवून घ्यावी. याच वेळी लगेचच ओळीत रब्बी हंगामातील पिकांची पाभरीने पेरणी करावी. यामध्ये जिरायती गहू, हरभरा, वाल, उडीद, राजमा, वाटाणा, जवस पिके घेतल्यास फायदेशीर ठरतात.
  • उपलब्ध ओलावा आणि मर्यादित सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास ः

    खरीप भाताच्या कापणीपूर्वी कोणतीही मशागत न करता उपलब्ध ओलाव्यावर टोकण पद्धतीने रब्बी रिले पद्धतीने पेरून अथवा हलकी नांगरट करून थोड्या मशागतीत रब्बी पिके पाभरीने पेरतात. यामध्ये रब्बी पीक सुरवातीस उपलब्ध ओलाव्यावर चांगले येते. परंतु, नंतर वाढीच्या नाजूक अवस्थेत, फुलोऱ्यात असताना अथवा दाणे भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाणी देणे आवश्यक असते. रब्बी पिकांमध्ये ज्वारी, हरभरा, सूर्यफूल, तीळ, मका, वाटाणा पिकांची निवड करावी. सिंचन सुविधा वर्षभर उपलब्ध असल्यास ः अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी बहुविध पीकपद्धतींचा अवलंब करताना जमिनीचा कस सांभाळण्याकडेही लक्ष द्यावे. खरीप भाताच्या कापणीनंतर भाजीपाला लागवड ही लोकप्रिय पीकपद्धती आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे रब्बी व उन्हाळी हंगामातही योग्य नियोजन करावे लागते.

        खरीप भात ः रब्बी भाजीपाला पिके ः उन्हाळी मूग/ भुईमूग/ बाजरी.     खरीप भात ः रब्बी-उन्हाळी भाजीपाला पिके.     खरीप भात ः उन्हाळी भात. खरीप भात ः उन्हाळी भुईमूग/ वैशाखी मूग.

    अशा प्रकारे भातपीक कापणीनंतर योग्य व्यवस्थापन व नियोजन केल्यास आर्थिक नुकसान कमी होईल, पर्यावरणास व मानवी आरोग्यास हानी कमी होईल. रब्बी हंगामाचे योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यास दुहेरी व बहुहंगामाचा आर्थिक लाभ मिळेल.

    संपर्क ः डॉ. नरेंद्र काशिद, ९४२२८५१२०५ (कृषी संशोधन केंद्र, वडगाव मावळ, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com