संगोपन तलावामध्ये करा कोळंबी बीजाचे संवर्धन

कोळंबी मासे
कोळंबी मासे

उत्तम प्रतीच्या बीजाची उपलब्धता ही कोळंबी संवर्धनाकरिता सर्वांत महत्त्वाची बाब आहे. संगोपन तलावात १ ते २ ग्रॅमपर्यंत वाढलेले कोळंबी बीज पकडून संवर्धन तलावात संचयन केल्यास कोळंबीची वाढ जलद होते. यामुळेच संगोपन तलावाच्या व्यवस्थापनाला बीज केंद्र व संचयन तलाव व्यवस्थापनामधील दुवा म्हणतात.   कोळंबी बीजउत्पादन केंद्रात पोस्ट लार्व्हा अवस्थेचे बीज उपलब्ध होते. हे बीज संवर्धन तलावात संचयन केले, तर बदलत्या हवामानास जास्त प्रमाणात तग धरू शकत नाहीत. त्यामुळे जास्त प्रमाणात मरतूक होण्याची शक्‍यता असते. हे टाळण्यासाठी पोस्ट लार्व्हा अवस्थेच्या कोळंबी बीजाला ६ ते ८ आठवड्यापर्यंत उत्तम प्रतीचे नैसर्गिक खाद्य अाणि पूरक खाद्य देऊन योग्य जागेमध्ये वाढवणे आवश्‍यक असते. यालाच नर्सरी किंवा संगोपन व्यवस्थापन म्हणतात.

संगोपन तलावाची पूर्वतयारी ः

  • संगोपन तलावाचे आकारमान ०.०२ ते ०.१ हेक्‍टर इतके असावे. पाणी तलावाच्या आत घेण्यासाठी व बाहेर जाण्याकरिता स्वतंत्र मार्ग असावेत.
  • बीज सोडण्यापूर्वी प्रत्येक वेळी तलावाची पूर्वतयारी पुढीलप्रमाणे करणे अनिवार्य आहे. यामुळे कोळंबी बीजाची वाढ जलद होऊन मरतुकीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
  • संगोपन तलावातून कोळंबीचे बीज काढल्यानंतर प्रत्येक वेळेस संगोपन तलावातून पाणी पूर्णपणे काढावे. त्यानंतर पाणी आत व बाहेर येणारे मार्ग स्वच्छ करून बंद करावे.
  • तलावाचा तळ भेगा पडेपर्यंत दोन ते तीन आठवड्यापर्यंत कडक उन्हामध्ये सुकवावा. यामुळे पुढील फायदे होतात.
  • १) हायड्रोजन सल्फाईड, अमोनिया व मिथेन यासारखे विषारी वायू जे छोट्या कोळंबी बीजासाठी अपायकारक असतात, ते वातावरणामध्ये मुक्त होतात. २) भक्षक प्राण्याची अंडी, अळ्या तसेच शेवाळ अाणि पाणवनस्पतीच्या बीजाचा नायनाट होतो. ३) आधीच्या संगोपन व्यवस्थापनात तळावर जमा झालेले मृत व कुजलेले सेंद्रिय पदार्थ यांचे विघटन होऊन पुढील संगोपनाकरिता चांगले खत तयार होण्यास मदत होते. तलाव सुकल्यानंतर ३ ते ४ दिवसांच्या अंतराने तलाव दोनदा नांगरावा. तलावातील मातीचा सामू तपासावा. मातीच्या सामूनुसार तलावात पुढील प्रमाणात चुना पसरावा. आम्लता निर्देशांक ः चुना (कि.ग्रॅ./ हेक्‍टर) ६.०० ते ६.५ ः १००० ६.५ ते ७.० ः ४०० ७.० ते ८.५ ः २००

  • तलावाचा तळ एकसारखा सपाट करून पाणी बाहेर जाणाऱ्या जागेकडे थोडासा उतारा करावा. तलावात हळूहळू प्रदूषणमुक्त पाणी सोडावे.
  • सुरवातीला १/४ इतका तलाव पाण्याने भरावा. योग्य प्रमाणात खतांची मात्रा द्यावी. त्यामुळे तलावाच्या तळापर्यंत सूर्यप्रकाश पोचून प्लवंग निर्मितीस सुरवात होते.
  • पाण्याचा रंग जर फिक्कट हिरवा, निळसर हिरवा किंवा तपकिरी हिरवा झाला तर तलावात चांगल्या प्रमाणात नैसर्गिक खाद्याची म्हणजेच प्लवंगाची निर्मिती झाली आहे असे समजावे. त्यानंतर तलावात १ ते १.२ मीटर पाणी भरावे. जर पाण्याचा रंग खूपच फिक्कट असेल तर पुन्हा योग्य प्रमाणात खताची मात्रा द्यावी.
  • तलावातील खत व्यवस्थापन ः

  • तलावातील खत व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश नैसर्गिक खाद्याच्या वाढीसाठी लागणारे पोषक तत्त्वे पुरविणे होय. कोंबडी खत हे प्रामुख्याने सेंद्रिय खत म्हणून वापरले जाते.
  • सेंद्रिय खते पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्यांचे जिवाणूद्वारे विघटन होऊन नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फेट यांसारखे पोषक घटक तयार होऊन ते पाण्यात मिसळतात. या पोषक घटकांचा वापर नैसर्गिक खाद्य म्हणजेच प्लवंग तयार होण्यासाठी होतो. या प्रक्रियेमध्ये विविध प्रकारचे सूक्ष्म जीव जसे जिवाणू, बुरशी इत्यादी तयार होतात. जे कोळंबीद्वारे अन्न म्हणून वापरले जातात.
  • शक्‍यतो ताजे खत वापरावे. कारण जुन्या साठवून ठेवलेल्या खतामध्ये पोषक घटकांचे प्रमाण कमी असते. खताचे प्रमाण तलावाच्या आकारमानावर ठरवावे.
  • युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट या रासायनिक (असेंद्रिय) खताचा वापर करावा.
  • शेणखत ५ टन, युरिया २०० किलो आणि सुपर फॉस्फेट ३०० किलो प्रतिहेक्‍टर या प्रमाणात खताची मात्रा द्यावी. संगोपन तलावात बीज सोडल्यानंतर शक्‍यतो खते मिसळू नयेत. त्यामुळे पाण्यातील विद्राव्य प्राण वायूचे प्रमाण कमी होते. जर पाण्याचा रंग खूपच फिक्कट झाला, तरच खताची मात्रा योग्य प्रमाणात द्यावी.
  • दिलेल्या खताच्या मात्रा फक्त मार्गदर्शक म्हणून वापराव्यात. खताची मात्रा ही पाणी व मातीच्या गुणधर्मानुसार ठरवावी. संगोपन तलावात पोस्ट लार्व्हा अवस्थेच्या कोळंबीना तलावात लपण्याण्याकरिता दाट मुळे असलेल्या तरंगणाऱ्या पाणवनस्पती ठेवाव्यात. पाणवनस्पतीचे प्रमाण एकूण तलावाच्या १० टक्के इतके असावे. बांबूच्या किंवा पीव्हीसी पाइपच्या फ्रेमचा वापर करून पानस्पतीला तलावभर पसरण्यास अडथळा निर्माण करावा.
  • संगोपन तलावात कोळंबी बीजाचे संचयन ः

  • संगोपन तलावात पोस्ट लार्व्हा अवस्थेचे कोळंबीचे बीज योग्यप्रकारे सोडणे ही महत्त्वाची बाब आहे. कोळंबी बीजांची वाढ व जगणुकीचे प्रमाण हे संगोपन तलावात योग्य प्रमाणात असणाऱ्या पोषक घटक व नैसर्गिक खाद्यावर अवलंबून असते.
  • कोळंबी बीज सोडण्याचे प्रमाण संगोपन तलावाचे आकारमान, पाण्याची खोली, बीजाच्या आकारावर अवलंबून असते.
  • सकाळी किंवा संध्याकाळी कोळंबी बीजाचे संचयन करावे, जेणेकरून बीजाचे उन्हापासून संरक्षण होऊन मरतूक कमी होते.
  • बीज सोडण्याची पद्धत ः

  • बीज केंद्रातून आणल्यानंतर प्रथम पोस्ट लार्व्हा अवस्थेचे कोळंबी बीज असलेल्या सर्व प्लॅस्टिकच्या पिशव्या पाण्यात तरंगत ठेवाव्यात.
  • बीजाच्या पिशव्या तलावभर पसरू नयेत म्हणून तलावाच्या एका कोपऱ्यात पिशव्या बसतील एवढ्या आकाराची पाण्याच्या वर दोरी बांधावी. साधारणतः १० ते १५ मिनिटांनंतर पिशव्यांचे तोंड उघडे करावे.
  • प्रथम तलावाच्या पाण्याचा व प्लॅस्टिक पिशवीमधील पाण्याचा सामू (आम्लता निर्देशांक) मोजावा. तो कमीत कमी फरक होईपर्यंत तलावातील पाणी पिशवीत टाकावे.
  • तलावातील पाण्याच्या पिशवीमध्ये टाकण्याची मात्रा एकदम कमी म्हणजे चहाच्या कपाएवढी असावी.
  • प्लॅस्टिकच्या पिशव्या तलावात चारही बाजूला पसरवून त्यातील बीज पाण्यात हळूहळू सोडावे. बीज सोडल्यानंतर पिशवीमध्ये बीज राहणार नाही, याची खात्री करून घ्यावी. शिवाय बीज सोडणाऱ्याच्या शरीरावर बीज चिकटले नाही याची खात्री करावी.
  • बीज सोडताना तलावाचे पाणी गढूळ करू नये. २० ते ५० पोस्ट लार्व्हा प्रति चौ. मी. या दराने बीज संचयन करावे.
  • खाद्य व्यवस्थापन ः

  • तलावामध्ये नैसर्गिक खाद्याबरोबरच पोस्ट लार्व्हीची चांगली वाढ होण्याकरिता पूरक खाद्याची मात्रा देणे आवश्‍यक असते.
  • बाजारामध्ये विविध कंपन्यांचे पूरक खाद्य उपलब्ध आहे. भाताचा कोंडा व शेंगदाणा पेंड यांचाही पूरक खाद्य म्हणून वापर करावा.
  • पहिल्या दोन आठवड्यांमध्ये पुरक खाद्याचे प्रमाण कोळंबी बीजाच्या एकूण वजनाच्या १०० टक्के इतके असावे. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यापासून हे प्रमाण ५० टक्‍क्‍यांपर्यंत करावे.
  • पूरक खाद्य हे दिवसातून दोनदा म्हणजे सकाळी लवकर व रात्री उशिरा द्यावे.
  • तलावाच्या आकारमानानुसार २ ते ४ चेक ट्रे ठेवावे. चेक ट्रेमधील शिल्लक राहिलेल्या खाद्यावरून खाद्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करावे. १० ते १५ दिवसांच्या अंतराने चेक ट्रे मधील कोळंबी बीज पकडून त्याचे निरीक्षण करावे.
  • संगोपन तलावामध्ये पाण्याची पातळी कमी होत असेल तर तलावामध्ये नवीन पाणी भरावे.
  • संपूर्ण संवर्धन कालावधीत पाण्याची पातळी १ ते १.२ मीटर राहील याची काळजी घ्यावी. पाण्याचे तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअस इतकी राहिल्यास बीजाची वाढ चांगली होते. अशाप्रकारे संगोपन तलावाचे व्यवस्थापन केल्यास २.५ ते ३ महिन्यानंतर १ ते २ ग्रॅमपर्यंत कोळंबी बीजाची वाढ होते. हे बीज पकडून संवर्धन तलावात संचयन करण्याकरिता पाठवता येते.
  • संपर्क ः अजय सोनावणे, ९६६५१५७७११ (मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com