स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना...

तयारी स्पर्धा परीक्षेची...
तयारी स्पर्धा परीक्षेची...

विद्यार्थी मित्रांनो/मैत्रिणींनो नमस्कार, नागरी सेवा परीक्षेसंदर्भातील या सदरात आपणा सर्वांचे स्वागत आहे. ‘यूपीएससी/एमपीएससीची परीक्षा हा बहुतेक विद्यार्थ्यांचा व पालकांचा कुतूहलाचा विषय असतो. अधिकारी होण्याची इच्छा बाळगून असणारे विद्यार्थी या परीक्षा व त्यांची तयारी याविषयी माहिती मिळविण्यासाठी उत्सुक असतात. या सदरात आपण वेळोवेळी त्यासंदर्भात सखोल व विस्तृत चर्चा करणार आहोत.

स्वप्न ते प्रत्यक्ष तयारी बहुतेक विद्यार्थ्यांनी नागरी सेवेत जाऊन अधिकारी बनण्याचे ध्येय हे त्यांच्या महाविद्यालयीन काळात किंवा त्याहीपेक्षा आधी ठरविलेले असते. काहींना याची प्रेरणा तडफदार व कर्तव्यदक्ष अधिकारांच्या कामातून मिळते, काहींना यशस्वी झालेल्या उमेदवारांकडून मिळते तर काहींना समाजासाठी काहीतरी करून दाखविण्यासाठीची संधी यामध्ये दिसत असते. त्याचबरोबर या अधिकाऱ्यांना असणारे अधिकार, सामाजिक प्रतिष्ठा याही बाबी विद्यार्थ्यांना या परीक्षांचे आकर्षण वाटण्यास कारणीभूत ठरतात. तथापि, इच्छा बाळगून परीक्षा देण्याचा निर्णय घेणे आणि वास्तवात परीक्षेत यशस्वी होऊन अधिकारी बनणे यामध्ये खूप फरक आहे. प्रत्यक्ष परीक्षेची तयारी करताना ती संपूर्णपणे वास्तववादी दृष्टिकोनातून व नियोजनबद्ध रितीने करणे आवश्यक असते. कोणत्याही क्षेत्रात करिअर करताना त्या संबंधित क्षेत्राच्या काही गरजा असतात, यूपीएसी परीक्षादेखील याला अपवाद नाही. त्यामुळेच संपूर्ण परीक्षेची आखणी त्याच दृष्टिकोनातून केलेली असते.

परीक्षेतील विविध टप्पे परीक्षेतील विविध टप्पे, अभ्यासक्रम, विविध विषय ते अगदी मुलाखतीपर्यंत सर्व बाबींची रचना नागरी सेवकासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांची कठोर मूल्यमापन करणारी असते. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी या सर्व बाबींची विद्यार्थ्यांना जाणीव होणे हे अतिआवश्यक असते. म्हणजेच विद्यार्थ्यांची तयारी ही परीक्षाभिमुख असली पाहिजे. नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना आपल्या पदाच्या जबाबदाऱ्या योग्य तऱ्हेने पार पाडण्यासाठी विशिष्ट गुणांची आवश्यकता भासते. त्यात-अभ्यासूपणा, समस्या सोडवणूक, बुद्धिमत्ता, चातुर्य, निर्भयपणा, नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन इ. बाबींचा समावेश होतो. यूपीएसीतील विविध पेपर्स व त्यांची तयारी करत असताना उमेदवारांच्या नेमक्या याच गुणांचा कस लागतो. परीक्षेसाठी अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष परीक्षा पास होईपर्यंत विद्यार्थ्यांना अनेक दिव्यांमधून जावे लागते. त्यामुळे तयारीदरम्यान अनेक विद्यार्थी गोंधळून जातात तसेच अभ्यासही दिशाहीन होण्याचा धोका असतो. आपल्या या सदराचा उद्देश हा एका वाटाड्यासारखा असेल. वर उपस्थित झालेल्या मुद्यांसंदर्भात आपण वेळोवेळी चर्चा करणार आहोत. त्यात परीक्षेसंदर्भातील सर्वसाधारण माहिती, अभ्यासक्रम, रचना, प्रत्येक टप्प्याची तयारी कशी करावी याबाबत माहिती घेणार आहोत.

हवी कष्टाची तयारी यूपीएससी/एमपीएससीची तयारी करताना विद्यार्थी त्याच्या जीवनातील उमेदीची वर्षे यात खर्च करीत असतो. त्यामुळे परीक्षेतील त्याचे यश हे त्याच्यासाठी व त्याच्या कुटुंबीयांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असते. या वाटेवर चालताना अनेक वळणे, खाच-खळगे व आव्हाने यांचा सामना उमेदवारांना करावा लागणार आहे. तथापि, या प्रवासात तुम्ही एकटे नाही. आपली ही लेखमाला आपणासोबत एक मार्गदर्शक-सहकारी व मित्र म्हणून आपली साथ देईल. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या लेखात.   संपर्क ः जयेंद्र वाळुंज, ९९७०७१७८३२ email ः admin@prithvi.net.in

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com