‘क्लिनिंग-ग्रेडिंग’ यंत्राद्वारे  ‘ए वन’ बेदाणानिर्मिती 

बेदाणानिर्मिती मोठी कष्टाची आहे. घरातील कामे बाजूला ठेऊन आठवडाभर बेदाणा शेडवर तळ ठोकून बसावे लागते. शिवाय मनुष्यांकरवी स्वच्छता व प्रतवारीस वेळ लागतो.यांत्रिकीकरणामुळे आठ दिवसांचे काम दोन दिवसांत होत आहे. तयार झालेला माल थेट विक्रीस पाठवता येतो. -सतीश लक्ष्मण पटाडे कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
माळी यांच्या शेडमध्ये यंत्राद्वारे प्रतवारी केलेला बेदाणा
माळी यांच्या शेडमध्ये यंत्राद्वारे प्रतवारी केलेला बेदाणा

कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथील सुनील महादेव माळी यांनी बेदाणा स्वच्छता, प्रतवारी (क्लिनिंग, ग्रेडिंग) यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर सुरू केला आहे. याद्वारे प्रतितासात दोन टन बेदाणा स्वच्छ करून त्याची प्रतवारी होते. यामुळे मजूरबळ, वेळ व श्रम यांची बचत होऊन बेदाण्याचा दर्जा व मूल्यवर्धन वाढले आहे.  साहजिकच माळी यांच्याकडे शेतकरी ग्राहकांची संख्या वाढून व्यवसायाचे नवे साधन त्यांच्यासाठी खुले झाले आहे.  सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ हा दुष्काळी तालुका. मात्र, इथल्या शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत द्राक्षशेती यशस्वी केली आहेत. याच तालुक्याच्या ठिकाणी राहणारे सुनील महादेव माळी यांची वडिलोपार्जित शेती दोन एकर होती. पण, कर्जाचा डोंगर इतका झाला की त्यात शेती गमवावी लागली. द्राक्ष व बेदाणा क्षेत्रात मजुरी करून ते उदरनिर्वाह करू लागले. त्यातून शिल्लक पैसे जमवत २००८-०९ मध्ये पाच एकर शेती विकत घेतली. आज त्यातील एक एकरात त्यांनी द्राक्षबाग उभी केली आहे. तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी आल्याने सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला. आता टेंभू योजनेचाही लाभ मिळाला असून, उर्वरित क्षेत्रात द्राक्षलागवडीचा मानस आहे.  बेदाणानिर्मिती  सन १९९७-९८ मध्ये निसर्गाची अवकृपा झाली. द्राक्षबागांचे नुकसान झाले. मग टेबल ग्रेप्सपेक्षा बेदाणा उत्पादन हा पर्याय निवडला. अन्य शेतकऱ्यांकडील बेदाणा शेडवर अनुभव घेतला. त्यानंतर स्व निर्मिती सुरू केली. सुरवातीला मजुरांकरवी सर्व कामे व्हायची. यंदा बेदाणा स्वच्छ आणि प्रतवारी करण्याचे आधुनिक यंत्र शेडमध्ये उभे केले आहे, असे माळी अभिमानाने सांगतात. आता अन्य शेतकरीदेखील त्यांच्याकडे बेदाणानिर्मितीसाठी येऊ लागले आहेत. माळी यांना या रूपाने व्यवसायाचे नवे साधन उपलब्ध झाले आहे.  मित्रांची साथ  माळी म्हणाले, की स्वतःच्या बागेबरोबरच शेतकऱ्यांकडूनही द्राक्षे विकत घेऊन बेदाणा तयार करतो. प्रतवारी आणि स्वच्छ केलेल्या बेदाण्याला बाजारपेठेत चढे दर मिळतात. अशा यंत्रांचा अभ्यास सुरू केला. मात्र, त्यांची किंमत जवळपास ३० लाख रुपयांच्या घरात आहे. इतक्या भांडवलाची ताकद नव्हती. पण सतीश माळी, दिग्‍विजय कुलकर्णी, आप्पासाहेब लट्टे, प्रकाश माने व अन्य मित्रांची साथ लाभली. यातून मार्ग निघाला.  बेदाणानिर्मिती, प्रतवारी दृष्टीक्षेपात  भांडवल  शेड उभारणी- १० लाख रु.  बेदाणा यंत्र- ३० लाख रु.  कच्चा माल- १० लाख रु.  मूल्यवर्धन 

  • बेदाणा तयार झाल्यानंतर त्याचे ‘वॉशिंग’ 
  • त्यानंतर उन्हात सुकवणी व मळणी 
  • बेदाणा स्वच्छ करून प्रतवारी 
  • त्याचा फायदा 

  • बाजारपेठेतील सौद्यात अधिक उठाव 
  • प्रतिकिलोस १० ते १५ रुपये अधिक दर 
  • यंत्रामुळे झालेले फायदे 

  • एका तासात मळणी, स्वच्छता व प्रतवारी 
  • ताशी दोन टन स्वच्छ आणि प्रतवारी क्षमता 
  • प्रतवारीप्रमाणे बेदाणा बॉक्समध्ये थेट येतो 
  • बेदाण्याचे वजन करून त्वरित पॅकिंग 
  • एकूण ८ रॅक्स 
  • बेदाणानिर्मिती क्षमता- १२० टन 
  • पूर्वी ३० ते ३५ शेतकऱ्यांसाठी बेदाणानिर्मिती 
  • यांत्रिकीकरणातून ही संख्या ७० ते ८० पर्यंत. 
  • केवळ स्वच्छता व प्रतवारीसाठी १० ते १५ शेतकरी ग्राहक 
  • आज अखेर २५० टन बेदाणानिर्मिती तर ६० टन स्वच्छता व प्रतवारी 
  • आकारण्यात येणारा दर (प्रतिकिलो) 

  • द्राक्षे रॅकवर टाकल्यापासून विक्रीपर्यंत २३ ते २४ रु. 
  • स्वच्छता व प्रतवारीसाठी ४ ते ५ रु. 
  • वडिलांनी आपलेसे केले   बेदाणा प्रतवारीसाठी हंगामात २० ते २५ महिला मजुरांची मदत लागते. पण, मनुष्यांकरवी दर्जेदार प्रतवारी होण्यात मर्यादा होत्या. त्याचा परिणाम दर कमी मिळण्यात व्हायचा. बेदाणा हंगाम चार महिन्यांचा असतो. या काळात वडिलांचा मोठा सहभाग होता. शेतकरी- मजूर हे कुटुंबाचं नातं त्यांनी तयार केलं. इथं येणाऱ्या प्रत्येक शेतकरी ग्राहकासही त्यांनी आपलंस केलं होतं हे सांगताचा सुनील यांना गहिवरून आलं. त्यांच्या वडिलांचं नुकतच निधन झालं आहे.  शेतकरी प्रतिक्रिया  माळी स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याबाबत ते जागरूक असतात.  स्वच्छ माल, प्रतवारी याचा आम्हाला मोठा फायदा होत आहे.  -नकुल धोंडीराम कोरे  कागवाड, जि. बेळगाव     यंत्राच्या मदतीने बेदाण्याची उच्च दर्जाची प्रतवारी होत आहे. मजूरखर्चापेक्षा कमी खर्च येत आहे.  प्रतिकिलोस १० ते १५ रुपये अधिक दर मिळतो आहे.  -सुधीर पिसे  पिसेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर  संपर्क- सुनील माळी- ९७६६८१४४१०, ८००७७९७२३० 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com