तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर यशस्वी फळबाग, डाळिंबाचे निर्यातक्षम उत्पादन  द्राक्षाचीही साथ  

शेतीत एक रुपया गुंतवला तर दोन रुपये मिळू शकतात. आपला दृष्टिकोन व्यावसायिक शेतीचा हवा. वडिलांनी घालून दिलेल्या मार्गावरून आज चालतो आहे. एकेकाळी संघर्ष करीत आज प्रयोगशील शेतकरी झाल्याचा मला अभिमान आहे. - राजेश सातारकर
 राजेश सातारकर यांच्या डाळिंब आणि द्राक्ष शेतीचे ड्रोनच्या साह्याने टिपलेले छायाचित्र.
राजेश सातारकर यांच्या डाळिंब आणि द्राक्ष शेतीचे ड्रोनच्या साह्याने टिपलेले छायाचित्र.

आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची शेती दोन वेळा दुष्काळामुळे संपुष्टात आली. आता शेतीच थांबवूया अशी मानसिकता घरातील सदस्यांची झाली, पण वडिलांची प्रेरणा राजेश सातारकर यांना शेती सोडू देत नव्हती. शेती व्यावसायिक पद्धतीने केली तर परवडते हे लक्षात आले. त्या दृष्टीने नियोजन सुरू झाले. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या तालुक्यात हिंमत, अपयशांवर मात देत व चिकाटी ठेवून राजेश यांनी शेती सुरूच ठेवली. आज डाळिंब व द्राक्ष या दोन मुख्य पिकांना केंद्रित केलेली, तसेच पाणी व पीक व्यवस्थापनावर भर देत केलेली शेती ११० एकरांवर विस्तारली आहे.  सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका तसा पाहिला तर डाळिंबासाठी प्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर अलीकडील काळात तालुक्‍यात द्राक्षाची लागवडदेखील होऊ लागली आहे. याच आटपाडी येथील राजेश रामराव सातारकर यांची वडिलोपार्जित ३० एकर शेती होती. राजेश यांचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. शिक्षणानंतर त्यांनी शेतीच करायचे ठरवले. ते सांगतात की या भागात डाळिंबाची लागवड रुजविण्यामध्ये ज्यांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील, त्यात आनंदराव पाटील यांचे नाव येते.  त्यांची आणि माझ्या वडिलांची मैत्री होती. त्यातूनच १९९५ आम्ही डाळिंब बाग लागवड करण्यासाठी आम्ही पुढे आलो. भगवा, आरक्ता वाणांची निवड केली. १९९७ साली वडिलांचे निधन झाले. संपूर्ण शेतीची जबाबदारी माझ्यावर आली. पाणीटंचाई असल्याने शेतात नऊ विहिरी घेतल्या. पण पाणी जेमतेम लागले. मात्र पाण्याशी संघर्ष करीत उत्पादन घेणे सुरू होते. तीन एकरांतून मिळणाऱ्या पैशांतून शिल्लक टाकण्यास सुरवात केली. त्यातून पुढे साठ एकर नवी शेती विकत घेण्यापर्यंत मजल मारली. ही माळरान जमीन होती. ती विकसित करावी लागली.  दुष्काळाशी संघर्ष  २००७ पर्यंत सुमारे चाळीस एकर डाळिंब बागेचा विस्तार झाला होता. अगदी सुरळीत चालले होत. दरम्यानच्या काळात काकडी, झेंडू, भेंडी अशी पिकेही घेतली जायची. सागवान, चिंच, आवळा, जांभूळ, द्राक्ष आदी पिकांची विविधताही दिसू लागली होती. पण नियतीने पुन्हा फास टाकला. तीव्र दुष्काळ पडला. पाणी कमी पडू लागले. बागा वाळून गेल्या. तरीही चिकाटी सोडली नव्हती.  २०१३ मध्ये टॅंकरने पाणी देऊन बागा जगविल्या. तरीही पाणी कमी पडल्याने बागा जळून गेल्या. या संकटामुळे आता शेतीच नको अशी घरच्यांचीदेखील मानसिकता होऊ लागली. शेती थांबवा असा सल्ला घरचे देऊ लागले; पण वडिलांची प्रेरणा व त्यांचा वारसा शेतीपासून दूर जाऊ देत नव्हता. शेती करायलाच पाहिजे असे वारंवार मन म्हणत होते असे राजेश यांनी सांगितले.  चिकाटी कायम  वास्तविक शेतीत अनेक अडचणी येत होत्या. त्यांवर मात करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देणे सुरू झाले. डाळिंबाचा बहार, फवारणी, ताण कसा द्यायचा याची माहिती घेण्यासाठी फिरती सुरू झाली. त्यातून अभ्यास होऊ लागला. डाळिंबाची शेती फुलू लागली.  द्राक्ष पिकाची निवड  केवळ डाळिंबावर अवलंबून राहणे शक्य नव्हते. दुसऱ्या पिकाचा शोध सुरू होताच. त्या वेळी नुकतीच तालुक्‍यात द्राक्ष शेती सुरू झाली होती. मग २००५ मध्ये द्राक्ष शेतीचा प्रयोग करून पाहण्याचा विचार मनात आला. अभ्यास सुरू केला. लागवड केली. सुरवातीच्या काळात द्राक्षाला दर कमी मिळाल्याने राजेश बेदाणा निर्मितीकडे वळले. परंतु बेदाण्याला अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे दुसऱ्या वर्षी टेबल ग्रेप्सकडे ते वळले. अजून म्हणावे तसे यश हाती येत नव्हते. अपयशच समोर दिसत होते. त्यातच २००९ मध्ये डाळिंबात तेलकट रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला. नुकसान होऊ लागले. त्यामुळे द्राक्ष पीक सोडण्याचा विचारदेखील केला नाही.  पाण्यासाठी कष्ट  निंबोडी तलावातून आठ किलोमीटरवरून वडिलांनी पाच इंची पाइपलाइन केली होती. राजेश यांनी त्यानंतर आटपाडी तलावातून सहा किलोमीटरवरून पाइपलाइन करण्यास सुरवात केली. त्या वेळी गावातील काही लोकांनी वेड्यात काढले. इतक्‍या लांबीची पाइपलाइन करीत आहात, ती टिकणार नाही, पाणी येणार नाही. पैसे वाया जातील अशी टिप्पणी केली. पण त्याकडे राजेश यांनी दुर्लक्ष केले. टेंभूचे पाणी २०१३ मध्ये आले. त्यातून पाण्याची शाश्‍वत सोय झाली. त्यानंतर हळूहळू डाळिंब क्षेत्रात वाढ केली. दोन शेततळी घेऊन संरक्षित सोय अजून वाढवली.  निर्यातक्षम बागेचे शिक्षण  राजेश म्हणाले की शेतीचा कितीही अभ्यास केला तरी तो कमीच असतो. दुसऱ्याकडून शेतीचे ज्ञान घेण्यात कसलाच संकोच केला नाही. दोन वर्षांपूर्वी डाळिंबाच्या बागेतून अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. तरी खचलो नाही. परिसरातील शेतकऱ्यांकडून शिकायला पाहिजे हे त्यातून शिकलो. दरम्यानच्या काळात विजय मरगळे या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची भेट झाली. त्यांनी डाळिंब उत्पादकांचा गट तयार केला आहे. डाळिंबाची निर्यात कशी करायची याबाबतची माहिती त्याद्वारे दिली जाते. त्यांच्याशी चर्चा केली. मला डाळिंबाची युरोपला निर्यात करायची आहे, असे सांगताच ते थेट शेतात आले. त्यांनी शेती पाहिली. युरोपला डाळिंब निर्यातीस लागणारे शेती तंत्र समजावून सांगितले. त्यांच्यामुळेच गेल्या वर्षी डाळिंबाची निर्यात शक्य झाली, असे राजेश सांगतात.  कुटुंबाची साथ  राजेश यांच्या पत्नी सौ. शुभांगी यांचे शिक्षण बीएससी ॲग्री असे आहे. त्यामुळे शेतीतील व्यवस्थापनात त्यांचा मोलाचा वाटा असतो. मोठा अथर्व व लहान अद्वैत अशा दोन मुलांसह त्यांचे कुटुंब शेतीतून समाधानी झाले आहे.  पंचवीस मजुरांचे कुटुंब कायम  शेतीचा पसारा अधिक असल्याने २५ मजूर कायमस्वरूपी ठेवले आहेत. या सर्वांचा आठवड्याला सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत पगार होतो. आठवड्याला पैसे मिळत असल्याने त्यांनाही मोठा आर्थिक आधार या शेतीतून मिळाला आहे.  सातारकर यांची शेती 

  • भगवा वाणाचे डाळिंब ६० एकर (१५ हजार झाडे) 
  • एकरी ३२० झाडे 
  • लागवड पद्धत १५ बाय साडेसात फूट 
  • द्राक्षे- माणिक चमन- ७ एकर, थॉमसन- साडेचार एकर, सुपर सोनाका- १० एकर 
  • दोन महिन्यांपूर्वी पेरूची लागवड केली आहे. 
  • शेतीतील वैशिष्ट्ये 

  • संपूर्ण यांत्रिकीकरणाचा वापर, आठ पॉवर टिलर्सचा वापर, त्यातून २५ ते ३० टक्के खर्चात बचत 
  • संपूर्ण बागेला ठिबक सिंचन 
  • एक एकर व २० गुंठ्यांत अशी दोन शेततळी 
  • बागेतील तण यंत्राद्वारे कापून बागेतच ठेवले जाते. यामुळे जमिनीची धूप कमी होते. 
  • डाळिंबाचे एकरी उत्पादन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न. त्यामुळे अन्नद्रव्यांचा संतुलित वापर होऊन 
  • अतिरिक्त वापर व त्यावरील खर्चात बचत 
  • त्यातून फळगळही कमी होते. 
  • फळांचा दर्जा चांगला राहण्यासाठी थिनिंग 
  • प्रतिझाडास ४० ते ५० फळांची संख्या. काही वेळा ती ९० पर्यंतही 
  • फळांची संख्या कमी ठेवल्याने त्यांचा आकार आणि दर्जा राहण्यास मदत मिळते. 
  • काढणीनंतर डाळिंब स्वच्छ पुसले जाते. 
  • काढणी केल्यानंतर फळांची प्रतवारी केली जाते. 
  • पहाटे पाच वाजल्यापासून साठ एकरांत कामाला होते सुरवात 
  • दर तीन वर्षांनी माती परीक्षण केले जाते 
  • पाणी व्यवस्थापन 
  • बागेत दोन्ही बाजूला ठिबकच्या लॅटरल्स. पाणी मुळांपर्यंत योग्य प्रकारे देण्याची सोय. 
  • वाफसा कायम ठेवण्यात येतो. 
  • प्रत्येक बाजूस प्रत्येकी १६ लिटरचे तीन ड्रिपर्स 
  • दुसऱ्या बाजूस इनलाइनचे प्रत्येक सव्वा फुटावर प्रत्येक सहा लिटरचे चार ड्रिपर्स 
  • पाऊस नसतो त्या काळात प्रति दोन तासांनी १४४ लिटर पाणी 
  • दुसऱ्या महिन्यात १०० ग्रॅमचे फळ होईपर्यंत एक दिवसाआड ताशी ७२ लिटर पाणी 
  • तीन महिन्यानंतर प्रति दोन तासांनी १४४ लिटर पाणी 
  • पावसाच्या काळात पाण्याचे नियोजन बदलते. 
  • संपूर्ण शेतीला वर्षभरात १८ लाख रुपयांचे शेणखत 
  • डाळिंबाचे एकरी उत्पादन 

  • २०१५-१६- सहा टन
  • २०१६-१७ -साडे सहा टन 
  • २०१७-१८ -सहा टन 
  • २०१८-१९ - सहा टन (निर्यातक्षम)
  • एकरी उत्पादन खर्च- किमान एक लाख रुपये येतो. प्रति झाडापासून ८०० ते ९०० रुपये मिळतात. त्यातील सुमारे २५० रुपये खर्च असतो. द्राक्षाचे एकरी उत्पादन- १२ ते १५ टनांपर्यंत मिळते. 
  • मागील वर्षी व्यापाऱ्यांमार्फत डाळिंबाची सहा टन निर्यात केली. त्याला किलोला ९० रुपयांपासून ते ११० रुपयांपर्यंत दर मिळाला. एरवी अलीकडील वर्षांत डाळिंबाला किलोला ५० रुपयांपासून ते पुढे असा दर मिळतो आहे. 
  • संपर्क- राजेश सातारकर ९४२३०३७६१९, ७८८८२२७७५५ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com