दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला मोठा आधार

जागेवरच दूध विक्री व्यवस्था घराशेजारीच सागर यांनी विक्री केंद्र उभारले आहे. तेथून दररोज सुमारे २०० ते २५० लिटर दुधाची विक्री होते. गायीचे तसेच म्हशीचे दूधही ६० रुपये प्रतिलिटर दराने विकले जाते. सुमारे ५० लिटर दूध हॉटेलला दिले जाते. उर्वरित दुधावर प्रक्रिया करून पदार्थांची निर्मिती केली जाते. गरजेनुसार डेअरीलाही दूध दिले जाते
सचिन राऊत यांनी उभारलेला जनावरांचा गोठा
सचिन राऊत यांनी उभारलेला जनावरांचा गोठा

बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर येथे राऊत कुटुंबाने गीर गायी व म्हशी मिळून सुमारे ७० जनावरांचे संगोपन केले आहे. प्रतिदिन ३५० लिटर, तर काही काळात ५०० लिटरपर्यंत दुधाचे संकलन होते. कुटुंबातील सागर यांनी आपल्याच घराजवळ केंद्र उभारून विक्री व्यवस्थाही उभारली आहे. शिवाय काही दुधावर प्रक्रिया होऊन पदार्थनिर्मिती केली जाते. या सर्वांमधून १० एकर शेतीला या दुग्ध व्यवसायाला मोठा आर्थिक आधार लाभला आहे.  बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर गाव आहे. येथे राऊत कुटुंबाची १० एकर शेती आहे. कुटुंबातील नामदेवराव सेवानिवृत्त प्राचार्य आहेत. ते बुलडाण्यात स्थायिक झाले.  शेतीच्या जोडीला मुख्य दुग्ध व्यवसाय आहे. कुटुंबातील सागर तो सांभाळतात. सागर यांनी बीएसस्सीची पदवी घेतल्यानंतर दुग्ध व्यवसायालाच वाहून घेतले. यासाठी गावाशेजारी काही शेती विकत घेतली. आता या व्यवसायात त्यांचा सुमारे १० ते १२ वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. शेतीचे उत्पन्न कमी झाले. पाण्याची समस्या निर्माण होत आहे. अशा स्थितीत सागर यांनी पूरक व्यवसायात घट्टपणे पाय रोवले. या व्यवसायासोबतच शेतीतही प्रयोगशीलता वाढविली आहे.  दुग्ध व्यवसायाची वाटचाल  दुग्ध व्यवसाय सुरू करताना या भागातील वातावरणाचा विचार करीत जनावरांची निवड केली. सुरवातीला जर्सी गायी घेतल्या. मात्र त्यांचे संगोपन करताना येणाऱ्या अडचणी पाहून त्यांची संख्या कमी करून देशी गीर गायींची संख्या वाढविली. आज गोठ्यात २८ गीर गायी तर ४२ म्हशी आहेत. वर्षभर प्रतिदिन ३५० लिटरपर्यंत दुधाचे संकलन होते. काही काळात हे संकलन ५०० लिटरपर्यंत जाते. उन्हाळ्यात थोडी घट होते. दूध पारंपरिक पद्धतीने म्हणजे मजुरांकरवी काढले जाते. यासाठी तीन ते चार जण पूर्णवेळ कार्यरत आहेत.  हवेशीर गोठ्याची निर्मिती  गायी व म्हशींसाठी पक्के गोठे तयार केले आहेत. जागेवरच चारा, पाणी हे घटक उपलब्ध केले आहेत. गव्हाण आणि त्याला लागूनच छोटेखानी हौद बांधल्याने सोय झाली आहे. जनावरे हवे तेव्हा पाणी पिऊ शकतात. उन्हाळ्यात उष्णतेपासून बचावासाठी फॉगर्स लावले जातात. गोठ्यामध्ये चौफेर हवा खेळती राहील अशा पद्धतीने रचना केली आहे. दूध देणारी आणि गाभण असलेली जनावरे वेगवेगळी बांधण्यात येतात. वासरांना बांधण्यासाठी गोठ्याच्या मधोमध स्वतंत्र सोय केली आहे.  पाणी व चारा व्यवस्था  गोठ्याजवळच विहिरीच्या आकाराचा मोठा सिमेंटचा हौद बांधला आहे. यामध्ये हजारो लिटर पाणी साठविण्यात येते. यातून पाइपलाइनद्वारे पाणी गोठ्यासाठी तसेच अन्य कामांसाठी वापरले जाते. जनावरांना दररोज ७० टक्के कोरडा चारा (मका, ज्वारी, शाळू, हरभरा कुटार) तर ३० टक्के हिरवा चारा दिला जातो. वर्षभर हिरवा चारा मिळावा यासाठी दोन एकरांत चारा पिकांची लागवड केली आहे. सोबतच ढेप व आंबोण दिले जाते. यामुळे दुधाचे प्रमाण कायम राहत असल्याचे सागर यांनी सांगितले.  जागेवरच विक्री व्यवस्था  घराशेजारीच सागर यांनी विक्री केंद्र उभारले आहे. तेथून दररोज सुमारे २०० ते २५० लिटर दुधाची विक्री होते. गायीचे तसेच म्हशीचे दूधही ६० रुपये प्रतिलिटर दराने विकले जाते. सुमारे ५० लिटर दूध हॉटेलला दिले जाते. उर्वरित दुधावर प्रक्रिया करून पदार्थांची निर्मिती केली जाते. गरजेनुसार डेअरीलाही दूध दिले जाते. गीर गायींचे मूत्र दररोज संकलित केले जाते. त्याची २० रुपये प्रतिलिटर दराने विक्री होते. गरजेनुसार जीवामृतही बनविण्यात येते. गोठ्यात दोन गीर वळू व रेडाही आहे.  उच्चशिक्षित मनीषाताईं पाहतात विक्री  सागर यांची पत्नी सौ. मनीषा या दूध विक्रीची जबाबदारी सांभाळतात. त्यांचे शिक्षण एमएबीएडपर्यंत झाले असून, नेट व सेट या परीक्षाही त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. गीर गायीचे दूध मिळण्यासाठी शहरातील ग्राहकांची पसंती असते. दुधात पाण्याचा थेंबही मिसळला जात नसल्याचे मनीषा यांनी सांगितले. दही, ताक, पनीर, श्रीखंड, तूप असे पदार्थ पारंपरिक पद्धतीने बनविण्यात येतात. म्हशीच्या दुधापासून बनविलेले तूप ८०० रुपये तर गीर गायीचे तूप २००० रुपये प्रतिकिलोने विकण्यात येते.  तुपाला वर्षभर मागणी असते. त्यासाठी ग्राहकांना ‘वेटिंग’वर राहावे लागते असे सौ. मनीषा म्हणाल्या. दूध विक्रीतून सुमारे १५ ते २० टक्के तर प्रक्रिया उद्योगासह ३० टक्क्यांपर्यंत नफा होतो.  शेतीतही प्रयोग  राऊत दहा एकरांत विविध प्रयोगही करतात. पेरू, सीताफळ लागवडीचे नियोजन आहे. गेल्या हंगामात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या फुले संगम या सोयाबीन वाणाची टोकन पद्धतीने लागवड केली. या वर्षी वाणाचे क्षेत्र वाढविणार असल्याचे ते म्हणाले.  अन्य ठळक बाबी 

  • गोठा व विक्री केंद्राच्या माध्यमातून सहा जणांना वर्षभर रोजगार 
  • उष्णतेच्या काळात थंडाव्यासाठी तुषार सिंचनाचा वापर 
  • गांडूळखत निर्मिती 
  • संपर्क- सागर राऊत - ९६०४७६१७८४  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com